भीतीला हरवणारे एक शस्त्र "संकट"

Submitted by Rudraa on 3 May, 2021 - 08:46

"ह्या क्षणाला वाटणाऱ्या संकटाची भीती त्यापेक्षा मोठ्या संकटाने नाहीशी होते. एकवेळ अशी येती की मनात भीती साठी कुठलाही आडोसा राहत नाही आणि माणूस कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी निडर बनतो"

रात्रीचे आठ नऊ वाजले असतील मी अंगावर गोधडी घेऊन डोळे झाकलेच होते, तेवढ्यात विजांचा कडकडाट ऐकु येऊ लागला तसे डोळे घट्ट दाबून गुडघे पोटात घालत गोधडीला गच्च धरून झोपण्याचा प्रयत्न करत होते पण पत्रांवर पडणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज ,विजेचा कडकडाट आणि हृदयाची धडधड ऐकुन कान सुन्न पडले होते. मी ताटकन उठून बसले घरात लाईटही नव्हता बहिणीला आवाज दिला ये !मी येऊ का शेजारी ?तस तर ती पण तिथेच होती पण पत्र्याच्या दुसऱ्या कोपऱ्याला, मी तिच्या शेजारी जाऊन बसले तेवढ्यात पत्राच्या एका कोपऱ्यात फुस फुस आवाज येत होता बाबांनी ऐकताच त्यांना अंदाज आला असावा !दिवा लावून कोपऱ्यात पाहतात तर काय साप! बाबा जोरात ओरडले काठी घे काठी! आई नी धावत कोपऱ्यात ली पहार बांबाच्या हातात दिली, बाबांनी भीतीपोटी जोरात घावा मागून घाव घातले पण साप तो पर्यंत अगदी चपळाईने दिसेनासा झाला .आई ,बाबा ,मी ताई दिव्या शेजारी एकत्र येऊन बसलो सापाच्या भिती पोटी पावसाचा विजांचा येणारा आवाज आणि त्यामुळे वाटणारी भीती कुठे हरवली ते कळच नाही. एक दोन तास उलटले आता तर पाऊस एवढा वाढला की घराच्या म्हणजे शेड च असणाऱ्या घरात सगळ्याच बाजूनी पाणी आत शिरत होत ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात बघता बघता सगळ्या घरात पाणीच पाणी झालं पाणी बाहेर काढता काढता सापाची भितीही कुठे हरवली कळलचं नाही पाणी काढत होतो तो पर्यंत घराची पत्रे उडून गेली घरातून पाणी काढण्याची धावपळ आणि पाणी घरात घुसल्याची खंतही आता संपली होती, उरलेल्या पत्राच्या कोपऱ्यात बाबा आईला ,ताईला आणि मला घेऊन उभा राहिले आता ना सापाची भिती राहिली होती ना धो धो पडणारा पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची भीती राहिली होती कारण ह्या क्षणाला भीती साठी आडोसाचं नव्हता.थोड्याच वेळात पाऊस आणि विजांचा कडकडाट थांबला आता पत्रे गोळाकरून शरीरासाठी लागणारा आडोसा म्हणजे घर पुन्हा नव्याने बनवल पण ह्या घरात माझ्या मनात भिती साठी कुठलाही आडोसा नव्हता .

गडगडाटाने कानास डिवचले
मिटूनी डोळे अंधारास घट्ट कवटाळले ....

मेघामागून मेघ गरजले
घरट्यात हळूवार सापाने फुंकारले .....

मिटवता मिटवता डोळेच दिपले
अंधाराचे घट्ट कवटाळले सुटले....

धबधब्याने दार ठोठावले
देता अलिंगण सर्व जलमय जहाले....

पावसात अंग ओलावले
पाण्याने मात्र हृदयास जाळले......

रुद्रा......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users