जगणे समजत गेलो

Submitted by निशिकांत on 3 May, 2021 - 01:18

गुदमर सोसत जगण्याला मी जगणे समजत गेलो
वेष्टनास मी चेहर्‍यावरच्या हसणे समजत गेलो

धनाढ्य याचक तुझ्याभोवती, मग्न त्यात तू देवा
मी आल्यावर मंदिरात तू नसणे समजत गेलो

विश्वामित्रा मेनकेसवे तुझी अवस्था बघुनी
सुरकुत्यातही अमाप हिरवळ असणे समजत गेलो

बंधनात ती इतकी!  असुनी श्रीरामाची भार्या
आळ घेतला तरी गाप्प ती बसणे समजत गेलो

सभ्य माणसा! आरशातले बिंब म्हणाले हसुनी
सभपणाच्या आड तुझे मी लपणे समजत गेलो

शेतकर्‍यांचे अंदोलनही विचित्र इतके झाले!
सुप्रिम कोर्टाने अगतिकही बनणे समजत गेलो

शंभर कोटी दर महिन्याला आठवते का सारे!
राजकारणी नेत्यांचे मी पडणे समजत गेलो

नजरेने नजरेशी आता कुणी कसे बोलावे?
नजरेचे शरमेने खाली झुकणे समजत गेलो

मुले उडाली दूर तरी ' निशिकांत " केवढी भिजवण?
मनास माझ्या मनोमनी कुरतडणे समजत गेलो

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users