फार कठीण असतं

Submitted by किमयागार on 2 May, 2021 - 17:22

निराशेच्या काळ्याकभिन्न अंधारात
शक्यतांचे असंख्य काजवे जेव्हा
फेर धरून नाचू लागतात
तेव्हा प्रत्येक काजवा सूर्यासारखा प्रखर वाटू लागतो...
आणि प्रत्येक दिशा पूर्व वाटू लागते...
मग वाटू लागतं की मी म्हणेन ती पूर्व दिशा असावी..

मी म्हणेन ती पूर्व दिशा होईलही..
फक्त मला तिथे सूर्य होऊन उगवावं लागेल जिवात जीव असेस्तोवर...!
सतत ओकावी लागेल आग..
पर्वा करून चालणार नाही नसांच्या जळण्याची आणि रक्ताच्या उकळण्याची...
नियमितपणे जळावं तर लागेलच आणि उजळावंही लागेल प्रत्येकाचं एक एक आकाश...

तेव्हा कुठेतरी कुणीतरी दोन ओंजळी अर्घ्य देईल...
आणि शक्यतांचे असंख्य काजवे ,
निमूटपणे खाली मान घालून बसून राहतील....
माझ्या अस्ताची इच्छा मनात धरून..

आपल्याला वाटतं पूर्वेला सूर्य उगवतो...
पण तसं मुळीच नसतं...
सूर्य उगवतो ती पूर्व असते,
आणि सूर्य होणं फार फार कठीण असतं...

----©किमयागार----
    

Group content visibility: 
Use group defaults

वाह! प्राप्त परिस्थितीत प्रेरणादायी Happy

ध्यासाने पेटून उठणे कठीण. पण एकदा पेटणे सुरु झाले कि सूर्य होणं मुश्कील नाही Happy