श्रीमान योगी कादंबरी बद्दल!

Submitted by निमिष_सोनार on 30 April, 2021 - 09:09

श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. २०२१ साली फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत मी ती वाचली. यात मांडलेल्या इतिहासातील घटनांची सत्यता किती हा माझ्या या पुस्तक परीक्षणाचा हेतू नाही आणि त्याबद्दल भाष्य करण्याची माझी योग्यता नाही. किबहुना या कादंबरीचे "परीक्षण" करण्याची पण माझी योग्यता नाही कारण मी इतिहास तज्ञ नाही. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण जगासाठी आदर्शवत असणाऱ्या शिवाजी महाराजांबद्द्ल ही कादंबरी आपल्याला भरभरून माहिती देते आणि त्यामुळे न राहवून इतरांनासुद्धा त्याबद्दल थोडेसे सांगावे आणि सगळ्यांनी ती कादंबरी वाचावी असे वाटल्याने मी या कादंबरीबद्दल माझे विचार एक सामान्य वाचक म्हणून मांडत आहे.

या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन प्रत्येक प्रकरणात दिसून येते. अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शिवधनुष्य रणजीत देसाई यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत मी कधी ऐकल्या नव्हत्या.

शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे. यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते.

शिवाजी महाराज लहान असताना बंगलोरला शहाजीराजांच्या राज्यात (जहागिरीत) जिजाऊंसोबत जातात तेव्हाचे तिथले वातावरण, शिवाजींचे सावत्र भाऊ वगैरे (हा भाग मला माहित नव्हता) यात वाचायला मिळतो. राजमाता जिजाऊ शिवाजींना बेंगलोरला न राहू देण्याचा निर्णय का घेतात ते सर्व कळते.

स्वराज्य निर्मिती आणि शिवाजींची जडणघडण यात जिजाऊंसोबत अनेक जणांचा वाटा आहे. दादोजी कोंडदेव, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, जीवा महाला, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी, पानसंबळ, तानाजी मालुसरे, मोरोपंत, त्रंबकपंत डबीर अशी आणखी खूप नावे घेता येतील. त्यांच्याशी असलेले राजांचे बंध, तसेच आई जिजामाता, वडील शहाजीराजे तसेच शिवाजीराजांच्या राण्या, मुलगी सखुबाई, मुलं संभाजी व राजाराम आणि इतर नातेसंबंध यांचा संपूर्ण परामर्श लेखकाने घेतला आहे.

शहाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे शिवाजी महाराज जिजाऊंना सांभाळून घेऊन निराशेतून बाहेर काढतात त्याच प्रकारे नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहामुळे गमावलेल्या गड आणि किल्ल्यांमुळे निराश झालेल्या राजांना जिजाऊ निराशेतून बाहेर काढतात आणि दोघांचा जगण्याचा नेहेमी एकच उद्देश्य असतो - स्वराज्य! याची ते एकमेकांना आठवण करून देतात.

राजांचे संत तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी यांच्याशी असलेल्या बंधाचेही दर्शन आपल्याला यातून होते. त्यांचा राजांच्या जीवनावर आणि विचारांवर होणारा परिणामसुद्धा यात दिसतो.

औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून छोट्या संभाजीसह नाट्यमय सुटकेनंतर कादंबरीत निश्चलपुरी, कवी कलश, गागा भट्ट अशी नवीन पात्रे कादंबरीत प्रवेश करतात.

यात हीच पात्रे आहेत असे नाहीत तर शिवनेरी, रोहिडा, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशालगड, लाल महाल, रायगड, जंजिरा, लोहगड, कर्नाळा, प्रतापगड, पुरंधर, चाकण, कोंढाणा ही सुद्धा स्वतंत्र पात्रेच म्हणावी लागतील इतके त्यांचे स्वराज्यातील महत्त्व आहे.

मिर्झाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेब तह मोडून हिंदूंवर जिझिया कर लादतो त्यानंतर वेगळ्याच घटना घडायला लागतात. विशेषत: राज्याभिषेक झाल्यानंतर आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर नेमके काय काय होते हे यात अगदी तपशीलवार वाचायला मिळते.

पुत्र संभाजी सोबत राजांचा (आणि अष्टप्रधान मंडळाचा) असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेला आहे. संभाजीराजे मोगलांशी हातमिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजी राजे यांची भेट होते तेव्हाचा दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे रणजित देसाईंच्या लेखणीची कमाल आहे. राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण वाचून मन विषण्ण आणि विदीर्ण होते.

औरंगजेब दक्षिणेकडे मोगली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने येणार असतो आणि त्याच्या पाडावासाठी राजांनी बनवलेली योजना राजांच्या मृत्यूमुळे अपूर्णच रहाते याचे खूप वाईट वाटत रहाते. एकाच आयुष्यात राजे इतक्या गोष्टी करतात की ते अवतारी युगपुरुषच होते यावर शिक्कामोर्तब होते.

नुसतेच आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशीच राजांना आयुष्यभर लढावे लागले नाही तर इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना पण राजे वेळोवेळी वठणीवर आणतात. अनेक स्वकीयसुद्धा राजांच्या विरोधात जातात पण त्या सर्व गोष्टीसुद्धा राजे समर्थपणे हाताळतात.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आणि थोडक्यात चरीत्र वर्णन करणाऱ्या इतर अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना जुजबीपणे आपण वाचलेल्या असतात परंतु त्यामागचा संगतवार घटनाक्रम, त्या घटनांमागची अनेक कारणे आणि त्या घटनांचे परिणाम हे जाणून असतील तर या कादंबरीशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक संकटांतून मात करण्यासाठीचे सकारात्मक बळ ही कादंबरी नक्कीच आपल्याला देते. बाकी जास्त मी काही सांगत नाही. मात्र एवढे नक्की सांगतो की, ही कादंबरी जरूर वाचा! जय महाराष्ट्र, जय शिवराय!

(हेच परीक्षण good reads या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे:)

https://www.goodreads.com/review/show/3970431541

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एफ.वाय. बीए का?

वावा! छान आहे परिक्षण.

>>
Artist, Connoisseur, Creative, Friendly, Imaginative, Leader, Literateur, Maverick, Motivator, Restless, Retaliative, Sensual, Stylish, Talkative, Tech-savvy, Versatile, Witty
<<
वॉव!! मस्तच!

रच्यकने , Literateur चं स्पेलिंग चुकलंय. Litterateur हवं.

रच्यकने , Literateur चं स्पेलिंग चुकलंय. Litterateur हवं>>>.>>
दोनीही स्पेलिंग बरोबर आहेत.
विशेषणांची खैरात आहे!

छान लिहिलंय.
श्रीमान योगी वाचलंच आहे तर छावाही वाचा असं म्हणेन.
छावाची शेवटची दहा ते बारा पाने वाचताना मी अक्षरशः ढसाढसा रडलेली आहे.
तळटीप : वरची मत ही माझी वयक्तिक मत आहेत.
त्यावर इतरांनी सहमत असलंच पाहिजे असं नाही.
प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात / असतात.

मुले लहान असल्यामुळे कादंबरी वाचायला दीड वर्ष लागले. अप्रतिम अगदी सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
मागच्या वर्षी कोविड आधी प्रतापगडाला भेट दिली होती. महाराजांच्या रोजच्या पुजेतील स्फटिक शिवलिंग आहे तिथे अजून. महाराज ते शिवलिंग लढाईत असताना सुद्धा जवळ ठेवीत असा उल्लेख आहे कादंबरीत. पूर्वी पण प्रतापगड पाहिला होता पण कादंबरी वाचल्यानंतर प्रतापगड पहाताना कादंबरी मधिल सगळे प्रसंग डोळ्यासमोर आहेत असे वाटले.

कामाच्या व्यापामुळे रोज थोडा थोडा वेळ मिळाला. त्यामुळे ही कादंबरी वाचायला मला २७ फेब्रुवारी २०२१ ते २८ एप्रिल २०२१ असे साधारण दोन महिने लागले.

आ.रा.रा. यांच्या प्रतिक्रियेवर माझे उत्तर: मी सायन्स चा विद्यार्थी होतो आणि बी. ई. (इलेक्ट्रोनिक एन्ड टेलीकोम) हे शिक्षण घेतले आहे आणि सध्या खासगी कंपनीत (गेली १८ वर्षे) काम करतो आहे. सध्या ऑडीट एंड कम्प्लायंस बघतो. आय. एस. ओ. २७००१ ऑडीट संबंधित!

श्रीमान योगी मी सहावीत असताना वाचली. मराठी माध्यमात असल्याने मराठी वाचन जमत होते. वडील अशी पुस्तके आणून देत. शाळेतले शिक्षक सुद्धा अवांतर वाचनाला प्रोत्साहन देत. त्या वेळी शहेनशहा, श्रीमान योगी, राधेय, स्वामी, मृत्युंजय, झुंज , झेप, नाझी भस्मासुराचा उदय आणि अंत, छावा इत्यादी मोठमोठ्या कादंब-या उन्हाळ्याच्या सुटीत वाचून व्हायच्या.

<< त्या वेळी शहेनशहा, श्रीमान योगी, राधेय, स्वामी, मृत्युंजय, झुंज , झेप, नाझी भस्मासुराचा उदय आणि अंत, छावा इत्यादी मोठमोठ्या कादंब-या उन्हाळ्याच्या सुटीत वाचून व्हायच्या. >>

----- वरच्या यादीतले सर्व पुस्तके वाचली आहेत नाझी भस्मासून सोडून. जोडीला शिकस्त (पार्वतीबाईवर - पानिपत युद्धात पराक्रम दाखविणारे सदाशिवरावभाऊसाहेब पेशव्यांच्या पत्नी ) आणि शहेनशाह (आलमगिर बादशहा वर). छान मजेत दिवस जायचे.
पुस्तक वाचायला बसल्यावर ते पुर्ण केल्याशिवाय चैनच पडायचे नाही...

श्रीमान योगीची प्रस्तावना फार सुन्दर आहे. नरहर कुरुन्द्कर यान्नि लिहिली आहे.
नवीन Submitted by तिता on 4 May, 2021 - 18:58
<<
यक्झॅक्टली.

अन हो,

मा. लेखक महोदय,

मी लेखाच्या लेव्हलबद्दल एफ वाय बीए लिहिलं आहे. तुम्हाला परिक्षण लिहावं वाटलं हे सुंदरच आहे, तसाच तुमच्या 'शैक्षणीक पात्रते" बद्दल आदर आहेच.

फक्त ती प्रस्तावना..

त्या तिता यांनी लिहिलंय तशी याची प्रस्तावना वाचलीत का आपण? कार्यबहुल्यामुळे वाचली नसेल्/स्किप केली असेल तर वाचाच असे सुचवितो. त्याला त्या पुस्तकाचा संपूर्ण रसास्वाद म्हणता येईल.

मी पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा यत्ता पाचवीत होतो. फार काही कळलं नव्हतं तेव्हा. गावातल्या लायब्ररीत एक पुस्तक अलं होतं, त्याचे "खंड" वेगळे तोडून, बायंडीग करून लोकांना वाटत होते. शेजारच्या मावशींनी लायब्ररीतून ते पुस्तक आणावं मग आधाश्यासारखं ते दोन घरादारांनी वाचावं असे ते दिवस होते. कधी कधी १० पैसे रोज दंडही लागला आहे.

त्यानंतर श्रीमान योगी ४-५ वेळा वाचलं. प्रस्तावना पहिल्यांदा वाचली तेव्हा कॉलेजात होतो.

असो.

यानिमित्ताने अजून एक वेगळे.

त्याकाळी लेखकाने लिहावे, मग वाचकांनी काही पत्रव्यवहारातून दाद वगैरे द्यावी वगैरे नॉर्म्स होत्या. आजकाल लेखाखाली डायरेक्ट प्रतिसाद येतो. विदाऊट काँटेक्स्ट.

कधीकधी वेगळाच वाटू शकतो. कधिकधी प्रतिसादकाचे/लेखकाचे हितचिंतक येऊन त्या प्रतिसादाचा विपर्यास वगैरे करू शकतात.

टाईम्स चेंज.

थोरल्या महाराजांनंतर ४ एकशे वर्षें निघून गेलीच आहेत..

श्रीमान योगी कादंबरी छानच आहे. पण नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना त्या कादंबरीपेक्षा एक कण सरस आहे..

का कोण जाणे, पण मी ती प्रस्तावना कादंबरी वाचून झाल्यानंतर वाचली होती. आता वाचायला काही शिल्लक नाही असे झाले तेव्हा. आणि मला खरेच वाटते की ती प्रस्तावना करण्यापेक्षा समारोप करायला हवा होता. तशी पद्धत नसेल तरी.

बाकी, परीक्षण आवडले, म्हणजे प्रयत्न आवडला, पण सखाराम गटणे आठवला. तेव्हढा त्याला बाजूला काढता आला तर बघा.