इ - मित्र

Submitted by शिवानीश्री on 28 April, 2021 - 05:58

आजकालचं जग पूर्वीसारखं नाही, पुर्वी माणसं जवळ होते, आणि मोबाईल चा जन्म झाला नव्हता, मित्र मैत्रिणी हाकेच्या अंतरावर होते. जुन्या गोल डायलच्या फोन वरुन संभाषण चालायचं. रांँग नंबर शी सुद्धा आपुलकीनं बोलणं व्हायचं. एकमेकांच्या घरी सणांना जाऊन, भेटीचा आनंद असायचा. दिलखुलास गप्पा रंगायच्या. क्वचित सुट्टीच्या दिवशी पत्ते, कँरम, चेस चा डाव रंगायचा. शेजारी पाजारी जायला यायला बंधन नसायचं. पुरुष मंडळी आवरुन कामावर गेले की बायका उन्हाळी कामे एकमेकांच्या मदतीने करायच्या. स्वयंपाकविषयक पुस्तकांवर चर्चा व्हायच्या. पदार्थांची देवाण घेवाण व्हायची. फिरायला जाताना ग्रुपने जाणं व्हायचं. सहवासाचा आनंद घेतला जायचा. फार नाही पण वीस - पंचवीस वर्षां पूर्वी असचं होतं.

पण आताचा काळ पुर्ण बदलला, किंबहुना ती आजची गरज बनली, त्यात काही गैर आहे असं अजिबातच नाही, माणुस जास्त वेळ कामात व्यस्त राहु लागला. पूर्वी सुद्धा पुष्कळ स्त्रिया नोकरी करीत होत्याच. पण आता पुर्वीच्या प्रमाणात लोकसंख्या, महागाई, शिक्षण, कामाकाजाचे स्वरूप, आपल्या दैनंदिन गरजा वाढल्यामुळे पर्यायाने कामाचे तास, ताण हे सर्वच वाढले, माणसाचा जास्तीत जास्त वेळ हा घराबाहेर जाऊ लागला. स्त्री, पुरुष दोघांनीही घरासाठी कष्ट करणे ही आजची गरज बनली. पुर्वीचं चित्र हे असं बदलत गेलं. ती काळाची गरज बनली.

मध्यंतरीच्या काळात मोबाईलचा जन्म झाला, आणि सर्व संभाषण त्याच्या मार्फत होऊ लागलं. माणसाची भेट 'अलभ्य लाभ' अशी होऊ लागली. पण आपल्या व्यापात व्यस्त असलेल्या माणसाला त्यामुळे दिलासा मिळू लागला. एका फोन वर व्यक्ती भेटु लागल्या. घरबसल्या मनमुराद गप्पा मारता येऊ लागल्या. ईंटरनेट मुळे पुष्कळ अँपस् च्या शोध लागला, व ग्रुप्स बनवुन चॅटिंग करता येऊ लागले. खांद्यावर हात टाकून होणारे मैत्रीचे संभाषण आता ईमोजी वापरुन होऊ लागले. समोरासमोर बोलले जाणारे असे व्यक्त होऊ लागले. दैनंदिन कामाच्या ताणात मित्राचा आलेला एक मेसेज क्षण सुखावणारा ठरू लागला. कामातून दोन क्षण वेळ काढुन त्याच्याशी बोलताना मनावरचा ताण हलका होऊ लागला. अगदी आबाल - वृद्धांचे वेगवेगळे ग्रुप बनले व माणुस मोबाईलचा आनंद लुटू लागला, मोबाईलच्या जास्त वापराचे दुष्परिणाम माहिती असुनही सकाळी उठल्या पासून मोबाईल हा जीवनावश्यक या कॅटेगरीत येऊन पोहचला.

रोगराईच्या दिवसात तर मोबाईल सर्वांची अत्यावश्यक सेवा बनला. संपर्कामुळे अनेकांचे काम सुसह्य झाले. एका ठिकाणाहून दुसर्या ठीकाणी माणसाला मर्यादा आली पण मोबाईल मात्र क्षेम कुशल कळवत राहीला. माणूस समाजप्रिय पाणी आहे, पण..... मोबाईल च्या निमित्ताने माणसाला एक ई-मित्रच मिळाला. नाही का..... ?

✍️ ®सौ. शिवानी श्री. वकील®

Group content visibility: 
Use group defaults

हो