स्वप्नांसवेही खेळतो आहे

Submitted by निशिकांत on 27 April, 2021 - 22:33

स्वप्नांसवेही खेळतो आहे

तुझ्या गंधाळण्याचे धुंद ओझे पेलतो आहे
म्हणोनी मी तुझ्या स्वप्नांसवेही खेळतो आहे

जुना हा दोष प्रेमाचा, न फुटतो शब्द ओठांवर
तरी नजरेतुनी जेजे हवे ते बोलतो आहे

कधी केली उसनवारी, असे प्रेमात ना घडले
जमाना का तरी इतका हिशोबी वागतो आहे?

जरासे पंख फुटले अन् भरारी लागलो घ्याया
तुटोनी नाळ जमिनीशी, अधांतर शोधतो आहे

किती रे! विनवणी केली तुझी मी सांग ना भाग्या!
कधी चुचकारले होते, अता धुतकारतो आहे

उशाला घेतली स्वप्ने, उद्याची आज स्वेछेने
हरवली झोप इतकी की, छताला पाहतो आहे

करोनाचा विषाणू संपवाया, औषधी म्हणुनी
पुणेरी वागणे तुसडे, अता स्वीकारतो आहे

असोनी तीच ती व्यक्ती, गुणांकन वेगळे होते
कुणा ना आवडे मी तर कुणाला भावतो आहे

जुगलबंदी पुरे झाली, अता " निशिकांत" जगण्याची
निघू एकांत शोधाया, मनाला सांगतो आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा चार वेळा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users