कोविड डायरीज! - १४ एप्रिल २०२१

Submitted by अज्ञातवासी on 24 April, 2021 - 14:37

डिस्क्लेमर -
कोविडविषयी कुणाला काही निगेटिव्ह वाचायचं नसेल, तर पुढचा लेख वाचू नये.

१४ एप्रिल २०२१.

एक विषण्ण शांतता ऑफिसात. सगळे एसी बंद, फॅन मात्र गरागरा चालू.
एरवी कमीत कमी २० लोक असणारं आमचं कॉर्पोरेट ऑफिस, यादिवशी फ़क्त दोन लोक.
मी आणि माझा बॉस!
"लस घेतलीये. आय एम सेफ नाऊ.."
त्याच्या क्यूबिकलमधून समोर दोन रिकाम्या क्यूबिकल सोडून तिसऱ्या क्यूबिकलमध्ये असलेल्या माझ्याशी तो बोलत होता.
"तरीही काळजी घ्यायला हवी सर." मी काय बोलायचं म्हणून बोललो.
"येस." तोही म्हटला.
रात्री आठ पासून लॉकडावून... काय करायचं, काय चालू, काय बंद... काहीही माहिती नाही.
'वि आर वर्किंग टूमारो!' डिरेक्टरचा मेसेज धडकला.
मी सुन्न.
१६ लोक पॉजिटिव्ह असलेली कंपनी, पण मोजक्या एसेन्शियल सेक्टरला सप्लाय करतेय, म्हणून बंद ठेवू शकत नव्हतो.
'यु विल वर्क फ्रॉम होम!' पुढचा पर्सनल मेसेज धडकला.
कमीत कमी तेवढा क्षण तरी माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
एक वाजला. जेवणाची सुट्टी...
सहज व्हाट्सअप स्टेटस बघत होतो.
एक मैत्रीण, जिचं मागच्याच महिन्यात लग्न झालं.
'मिस यु ममा!'
उडालोच...
'अग काय झालं?' मी मेसेज टाकला.
'परवा वारली ममा, कोरोनाने!' तिकडून खूप वेळाने रिप्लाय आला.
सुन्नता अजून वाढली.
बरीच कामे आटपायची होती. एक महत्वाचं काम त्यात सर्वात आधी होतं.
लोक इतके अनप्रोफेशनल कसे असतात, नाही कळत. आता बघा ना. उद्या १०० टक्के तुला अपडेट देते म्हणून सांगणारी बाई, गेले चार दिवस फोन उचलत नाही.
आज रागारागातच फोन लावला.
फोन उचलला गेला.
"हॅलो मिस आरती?" माझा पारा चढलाच होता.
"सॉरी सर, त्या कालच वारल्या...कोविडने."
"सॉरी..." मीही इतकंच म्हणू शकलो.
सगळीकडे कामांची धावपळ. सहज फॅक्टरीत चक्कर टाकायला गेलो.
एक्स्पोर्ट वाला शेख काहीतरी टाईप करत होता. मला बघून हसला.
"शेखभाई, क्या बोलते?"
"दोनो अकाउंट वाले पोजिटीव्ह होके बैठे है. पुरा अकाउंट संभालना पड रहा है!" तो हसतच म्हणाला.
तेवढयात मार्केटिंगचा गट्टू समोर आला. हाही कोरोना पेशन्ट. घरीच बरा झालेला. आजच जॉईन झालेला.
"सर, लै त्रास होतो. लै म्हणजे लई... हातपाय लई दुखतात."
त्याने कर्मकहानी सुरू केली.
"भाई, नासिक शमशान बना हुवा है! लोगो को सिरीयसनेसही नही है!" शेख म्हणाला...
"मी उद्यापासून नाहीये." मी मध्येच म्हणालो.
"भाई, क्या बोलते. तुम्हारा बॉस पागल हो जायेगा."
"भाई वर्क फ्रॉम होम करतोय." मी हसून म्हणालो.
फिर ठीक है!
वीस मार्चला एका कलीगने राजीनामा दिला, तिचा लास्ट डे होता.
पंचवीस मार्चला गट्टूची बायको पॉजिटिव्ह आली, गट्टू गायब.
तीस मार्चला एक कलीग आजारी पडली. ९ एप्रिलला गेली.
सत्तावीस वय! माझ्यापेक्ष्या सहा महिन्यांनी मोठी.
आज गट्टू परत आला.
फक्त दोन जण पूर्ण भारत सांभाळत होतो... फिल्ड वाले सोडून....
श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती.
"साहेब, लकी पण तुम्ही." स्टोरचा जाधव म्हणाला. फॅक्टरी खूप खतरनाक झालीये आजकाल.
"कुणाची नेक्स्ट विकेट, नाही सांगता येत." डिसपॅचचा राजेंद्र हसत म्हणाला.
"हम्म." मीही हसलो.
सगळ्यांशी बोलून बरं वाटलं.
कामे संपत नव्हती. सात वाजले.
"सर, मी निघतो आता, आठ च्या आत नाशिकच्या बाहेर पडायला हवं."
"येस, चलो, हॅप्पी जर्नि. कसा जाशील?"
"आईला फोन करतो. जर जास्त सामान आणायला नाही सांगितलं, तर ज्युपिटर. नाहीतर डस्टर."
"कळवण नाशिक किती अंतर?"
"शहात्तर."
"मग डस्टरने जा. ज्युपिटर इज रिस्की."
मी ओके म्हटलो आणि सटकलो.
तसही माझं प्रेम ज्युपिटरवर जरा जास्तच.
मात्र यादी खरच मोठी होती. फ्लॅटमधून आणि बाहेरून विकत घेऊन सगळ्या वस्तू जुळवतानाच ७.४५ झाले.
आणि ८ वाजता मी नाशिकच्या बाहेर होतो. रस्त्यात कुठेही गाडी न थांबवता, ९.३० ला कळवणला पोहोचलो...
...घरासमोर गाडीचा आवाज ऐकताच बाबा आणि दोन्ही काका धावतच बाहेर आले.
"परत नाशिकला जावं लागेल... घरात येऊन फ्रेश हो, मग निघू!"
"का? मी आताच आलो ना. आणि हे सामान काढू द्या आधी."
"दादा... काका गेले..." घरातून बहिण बाहेर येत म्हणाली...
मी मान सुन्नपणे मागे टेकवून गाडीतच बसून राहिलो...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad _/\_

कठीण काळ आहे.
काळजी घ्या.

आपण सगळं गृहीत धरून असतो. सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा आपल्याला आता बऱ्यापैकी मिळते आहे. जग हे असंच सुरू राहील, प्रगती व सुधारणाच होत रहातील हे आपल्या मनात कुठेतरी फिट झालेले असते.
चढ उतार येतात हे वाचले असते आणि थोडेफार बहुतेक प्रत्येकाने अनुभवलेले असते. पण एवढा मोठा उतार!
असे झालेय इतिहासात अनेक वेळा. आपण वाचलेले असते. पण ते मेंदुत कुठल्यातरी कोपऱ्यात पडलेले असते. आपल्या पिढीत / आधीच्या पिढीत असे घडलेले नाही, शिवाय आता किती प्रगती झालीय या गोष्टी त्याचे गांभीर्य मनात खोल उतरु देत.
आणि मग हा दणका. काहीच शाश्वत नाही वगैरे आपण ऐकले असते, मान्य केलेही असते पण त्याला अजिबात खोली नसते. ती आता जाणवते. आज हे गेले, परवा ते गेले, त्यांचा मुलगा फक्त चाळीस वर्षे वय तो ही गेला अशा बातम्या यायला लागतात. बघता काही दिवसांत, महिन्यात कोण जाईल सांगता येत नाही. याने आपल्या सगळ्या सुरक्षांना छेद पडतो.

अशा वेळी इतिहास आठवला / परत वाचला की मन जरा स्थिर होण्यास मदत होते.
युद्ध, द्वेष भावनेने काय काय आणि किती किती संहार केला!
कितीतरी साथी येऊन गेल्या, लोकांचे असेच आप्तेष्ट गेले, कुणी अनाथ झाले, कुणी म्हातारपणात एकटे पडले, कुणी रस्त्यावर आले. वाईट झाले. पण जग परत उभे राहिले, जीवनरहाट चालू राहिले. नुसते चालूच राहिले नाही तर प्रगती होत राहिली, नवनवीन शोध लागत राहिले. आपण त्यांचा पुरेपूर उपभोग घेत आलो आहोत.

हे असेच चालू रहाणार आहे. आधीही होते, पूढेही होईल. नवीन वैद्यकीय शोध लागले, पण प्रगती मुळे देश पृथ्वी छोटी झाली, इकडून तिकडे संसर्ग पसरायला वेळ नाही लागला.
यातून आपण काही शिकू, सुधारणा करू पण नवी चॅलेंजेस येत रहातील. (पुढे ग्लोबल वार्मिंग, अति वाढलेले आणि अजून वाढतच जाणारे इकॉलॉजिकल फूटप्रिंट या समस्यांना तोंड द्यायचे आहे.)

रामराज्य (अँड द वर्ल्ड लिव्ह्ड हॅप्पीली एव्हर आफ्टर या अर्थाने) ही कवि कल्पना आहे. जग हे नेहमीच नैसर्गिक/मानवनिर्मित (अनवधानाने चूका, निसर्गाचा ऱ्हास आणि द्वेष, अतिमहत्वाकांक्षेमुळे युद्धे) आपत्तींनी भरलेले होते आणि असेल.

आपण खरं तर याची फार काही झळ न बसता मस्तपैकी रामराज्य जगलो आता पर्यंत. लकी.
आता वास्तवाला स्वीकारून दोन हात करायला शिकायचे, नाउमेद न होता जगरहाटी चालू ठेवण्यात आपला जमेल तसा हातभार लावत रहायचा. जग असेच होते आणि रहाणार. अजून काही हजार वर्षे तरी.

सुन्न करणारा अनुभव.
भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही आणि आली तरी फार सौम्य असेल - कोरोना बाबतीत इतर गृहितका प्रमाणे हे पण गृहीतक फेल ठरले.
लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, झाला तरी फार सौम्य असतो - आता फक्त हे गृहीतक खरे ठरावे हीच इच्छा.

सुन्न करणारा अनुभव.>>>+1

अज्ञातवासी काळजी घ्या..!!

@मानवजी तुमचा प्रतिसाद पटला.

काळजी घ्या.
ही वेळ ही निघून जाईल!!

काळजी घ्या
मानव, तुमचा प्रतिसाद आवडला

मागच्या दोन दिवसात मी पण हाच अनुभव घेतेय Sad
कधी नातेवाईक, कधी ऑफिस मधल कोणी, कधी जवळच्यांचे कोणी जवळचे. धडाधड बातम्या येतायेत.

मानव दा, खरंय तुमचं. कळतंय पण वळत नाही

काळजी घ्या...
डायरीज लिहिले आहेस तेही तारखेनुसार.... होप की हा एकच भाग आहे

सॉरी....
हे करण्याची काय गरज होती?

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
_/\_ एवढंच करू शकतो... सगळ्यांच्या सदिच्छासाठी!!!
काळजी घेणं आपल्या हातात आहे, प्रचंड काळजी घेतोय... पण कितीही अपरिहार्य कारणास्तव बाहेर पडल रे पडलं, आपला जीव आपल्या हातात नसण्याची फिलिंग येते...।जीवावर उदार झालेले अनेकजण घोळक्याने खिदळताना दिसतात.
७ ते ११ तर नुसती जत्रा भरतेय गावात.... कॉमन सेन्स गहाण ठेवलाय लोकांनी...
ज्यांनी कोरोनाला जवळून अनुभवलंय, ज्यांना कोरोना स्पर्श करून गेलाय, त्यांना कोरोना काय आहे, हे चांगल्या रित्या माहितीये. मात्र तरीही गांभिर्य नाहीच...
आजही मी सकाळी उठतो. गच्चीवर जाऊन काय व्यायाम करायचाय तो करतो... चकरा मारतो... तर परवा एक होतकरू ६० वर्षाच्या तरुणाने कुत्सितपणे मला टोकल... की आमच्यासारखे वय झालेले लोक कोरोनाला भीत नाहीत, आणि तुम्ही तरुण घरात लपून बसलाय... आणि यांच्यासारखे बरेच होतकरू सकाळी फिरताना दिसतातच... मस्त तीन तीनच्या घोळक्याने...
आणि नाशिक काय, कळवण काय की पुणे काय, सगळीकडे हीच परिस्थिती.
जाऊदे... आज पुन्हा होतकरू तरुण खालूनच ओरडत होते, तर सरळ सांगितलं... तुमचं आयुष्य जागून झालंय, सगळी मजा करून झालीय, तुम्ही वर गेलात तरी कुणाला काहीही फरक पडणार नाही... आम्हाला जगू द्या...
बस...सर्वांना एवढंच सांगतोय, काळजी घ्या... खूप काळजी घ्या.... कारण जे आपण बातम्यांत बघतोय, ऐकतोय, त्यापेक्षा प्रचंड वाईट अवस्था आहे...
_/\_
आणि अजून एक, आपला जीव आता दुसराही त्याच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू शकतो!!!!

अज्ञातवासी, हलवून टाकणारे अनुभव आहेत.
आमच्या सोसायटीत पण लोक मास्क न घालता 3 च्या घोळक्याने गप्पा मारत फिरतात.मागच्या वर्षी करोना होऊन गेला म्हणजे आता आपण अमर झालो असा काहीतरी समज आहे.
ज्याप्रकारे ओळखीतले अचानक नसल्याच्या बातम्या येतायत त्याप्रकारे सर्व इतक्या मजेत घ्यावं असं अजिबात वाटत नाही.
कोणताही 2 वर्षानंतरचा प्लॅन बनवताना 'म्हणजे तोवर असलो तर' असं वाक्य मनात आपोआप जोडलं जातं. फक्त ते बोलायचं नाही इतकंच.
टीव्ही, जाहिराती, रेडिओ चा वापर करून अजून खूप प्रबोधन करणे गरजेचे आहे.

आणि अजून एक, आपला जीव आता दुसराही त्याच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात घालू शकतो!!!!
>> हे अगदीच खरंय.. अश्याच काही विचित्र लोकांमुळेच खूप काळजी घेणारे देखील भोगत आहेत... अक्कल गहाण टाकलीय की विकलीय काय न कळे

आमच्याही सोसायटीत असे महाभाग आहेत. नातेवाइक पण आहेत त्याना वयोगटातील असल्यामुळे करोना लस मिळाली म्हणून मास्क न घालता फिरतात जणु काही अमृताचा डोस मिळाला.
लोकांना परिस्तिथीचे गांभीर्य नाही. ज्याना मार्च मध्ये कोरोना होवुन गेला ते सुद्धा बाहेर फिरायला उताविळ झाले आहेत. त्यांचे नशीब चांगले होते की बेड मिळाले आताची परिस्थिती खूप भयानक आहे.
ज्यांचा इन्सुरन्स आहे आणि ज्याना काही लक्षणे नाहित असे पॉझिटीव्ह लोक फक्त ट्रीप म्हणून 1 आठवडा हॉस्पिटल मध्ये भरती होतात आणि बेड अडवतात. हे असे प्रताप आमच्या ओळखीच्या लोकांत झाले आहेत. कीव कराविशी वाटते त्यांच्या बुद्धीची.

<<ज्यांचा इन्सुरन्स आहे आणि ज्याना काही लक्षणे नाहित असे पॉझिटीव्ह लोक फक्त ट्रीप म्हणून 1 आठवडा हॉस्पिटल मध्ये भरती होतात आणि बेड अडवतात.>>
डोक्याला हात लावलेली बाहुली.

भाई, नासिक शमशान बना हुवा है! >>
खरचं नाशिकची परिस्थिती खूप भयानक आहे.गेेल्या चार ते पाच दिवसापासून मी पण हाच अनुभव घेतेय..
कधी नातेवाईक, कधी जवळच्या मित्र मैत्रिणीचे कोणी. रोज बातम्या येतात.
काही संपुर्ण कुटुंब पॉझिटीव्ह येताय तर काही खूप जवळच्या व्यक्ती खूप कमी वयात जवळच्या व्यक्ती गमवताय.
त्यांना सर्व ठीक होईल हे बोलणं देखील कठीण जातय.यात आपण काहीच करू शकत नाही हे जास्त वाईट आहे.फक्त काळजी घ्या म्हणणं...काळजी घेणं इतकच आपल्या हातात आहे.
तुम्ही पण काळजी घ्या...

Pages