ओम, भ्रमरी प्राणायाम, नायट्रिक ऑक्साइड वायू (NO) आणि कोरोना विषाणू

Submitted by चामुंडराय on 24 April, 2021 - 11:47

कोरोना विषाणूच्या कोविड-१९ ह्या जागतिक साथीबद्दलची माहिती आंतरजालावर वाचत असताना अनपेक्षितपणे एक नवीन बाब समजली. विषाणूचा परिणामकारकरित्या सामना करून त्यावर मात कशी करता येईल ह्या संदर्भात ही माहिती असल्याने सध्याच्या काळात ह्या माहितीचा सर्वांना उपयोग व्हावा म्हणून हा पंक्तीप्रपंच.

अलीकडच्या काळात म्हणजे फारतर तीस पस्तीस वर्षांपूर्वी मानवाच्या शरीरातील जैविक प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका असलेल्या परंतु तेव्हा अनभिज्ञ असलेल्या वायूच्या स्वरूपातील एका रेणूचा शोध लागला. हा रेणू म्हणजे नत्रवायू आणि प्राणवायूचा एक एक अणू एकत्र येऊन बनलेला नायट्रिक ऑक्साईड (NO). तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे नॅनो मिरॅकल मॉल्युकुल म्हणून ओळखला जातो. हा वायू शरीरांतर्गत प्रक्रियेत तयार होत असतो आणि नाकातील सायनस पोकळीतून आत येणाऱ्या श्वासातील हवेत मिसळून त्यातील अपायकारक सूक्ष्म जीवांचा नाश करतो. वयपरत्वे NO तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते त्यामुळे विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी होतात.

आत्तापर्यंत ह्या वायूच्या शरीरातील जैविक प्रक्रियेमधील महत्वपूर्ण सहभागाची यथायोग्य कल्पना आली आहे. ह्या वायूमुळे रक्तवाहिन्या शिथिल होऊन प्रसरण पावतात आणि त्यामुळे रक्त प्रवाह वाढून रक्तदाब कमी होतो व रक्तातील प्राणवायूचा पुरवठा शरीरात सर्वत्र होण्यास मदत होते. त्याबरोबरीने रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबन्ध करतो त्यामुळे पक्षाघात, हृदयरोग इत्यादींपासून संरक्षण मिळते.

त्याचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो जिवाणू, विषाणू, बुरशी, यीस्ट आणि इतर परोपजीवी सूक्ष्म जीवांचा संहार करतो. तो कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये काही बदल करतो त्यामुळे विषाणूला पेशींच्या रिसेप्टरला चिकटता येत नाही. नॅनो पार्टीकल असल्याने पेशींच्या आत जाऊन आधीच आत गेलेल्या विषाणूच्या RNA पुनरुत्पादनास आळा घालतो आणि पेशींच्या आतील विषाणूच्या RNA ला पेशींच्या बाहेर येण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे आजूबाजूच्या इतर निरोगी पेशींना होणारा संसर्ग टाळता येतो असे प्रयोगशाळेत (इन व्हीट्रो पेट्री डिश प्रयोगात) दिसून आले आहे. अशा प्रकारे NO च्या तिहेरी कार्यपद्धतीमुळे शास्त्रज्ञांना कोविड-१९ वर योग्य उपचार सापडण्याची मोठी आशा आहे.

कोविडच्या रुग्णाच्या फुफ्फुसाला जेव्हा संसर्ग होतो तेव्हा प्राणवायूचे रक्तामध्ये संक्रमण पुरेसे होत नाही त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी व्हायला लागते तेव्हा बाहेरून श्वसनावाटे योग्य प्रमाणात (PPM - पार्टस् पर मिलियन) नायट्रिक ऑक्साईड दिला तर फुफ्फुसाच्या पेशी प्रसरण पावून प्राणवायूचे संक्रमण वाढेल आणि त्याबरोबरीने विषाणूंचा नाश होऊन कोविडवर मात करून रुग्णांना दिलासा मिळेल अशी शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स मंडळींची अटकळ आहे.

सध्या त्याच्या चाचण्या पाश्चात्य देशांमध्ये चालू आहेत आणि त्यातून उत्साहवर्धक व सकारात्मक परिणाम हाती आले आहेत. परंतु ह्या चाचण्या यशस्वी झाल्यावर जनसामान्यांना कोविडसाठी उपाय योजना उपलब्ध व्हायला कदाचित बराच वेळ लागेल कारण हा वायू उपलब्ध करून कोविड रुग्णाला प्रमाणित मानकाप्रमाणे (PPM) देण्यासाठी यंत्रणा उभारावी लागेल.

हा वायू आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होतो. हा जिवाणू, विषाणू, बुरशी आणि इतर परोपजीवींचा संहारक असला तरी शरीरात तयार होत असल्याने मानवी पेशींना त्यापासून धोका नसतो. त्याचे शरीरातील प्रमाण वाढवण्यासाठी चाचपणी करत असताना शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की तोंड बंद करून नाकातून भुंग्यासारखा गुंगुं आवाज केला (गुंजारव - humming sound) केला तर पॅरा नेझल सायनसेस मधून NO चे श्वासात मिसळण्याचे प्रमाण वाढते. हमिंगच्या आवाजाची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) जेव्हा १३० हर्ट्झ (Hz) होते तेव्हा तर NO चे प्रमाण १५ पटीने वाढते ( जवळपास २५० PPM, वैद्यकीय उपचारात साधारणतः १५० PPM वापरतात). भारतीय योग शास्त्रातील भ्रमरी प्राणायाम करताना हमिंग आवाजाची वारंवारिता उच्चतम असल्याने NO चे प्रमाण वाढते असे योगशास्त्राचा अभ्यास असलेल्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मंडळींच्या लक्षात आले. आणि "ओम" चा दीर्घ उच्चार करताना "म" चा उच्चार लांबवला तर असाच परिणाम साधता येतो.

सध्याच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर निरोगी व आरोग्यपूर्ण राहण्यासाठी भ्रमरी प्राणायाम आणि ओंकार साधना करता येईल. NO हा रेणू अस्थिर (फ्री रॅडिकल) असल्याने त्याचे हाफ लाईफ कमी आहे (म्हणजे तो दीर्घकाळ राहू शकत नाही) त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी दिवसातून ४ ते ५ वेळा १० - १५ मिनिटे भ्रमरी प्राणायाम केला तर फायदा होईल. भारतीय योगशास्त्राबद्दल अभ्यास आणि सराव असलेल्या, भारतीय परंपरेविषयी आस्था असलेल्या अनेक पाश्चिमात्य डॉक्टरांचे भ्रमरी प्राणायाम व ओंकार साधनेची महती सांगणारे व्हीडीओज् अधिक माहितीसाठी आंतरजालावर उपलब्ध आहेत. अर्थात ह्या प्रयोगाच्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या नसल्या आणि हे गृहीतक खरे नाही असे क्षणभर गृहीत धरले तरी भ्रमरी प्राणायाम आणि ओंकार साधनेचे नकारात्मक परिणाम नक्कीच नाहीत किंबहुना ताणतणाव कमी करणारे परिणाम सर्वश्रुत आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी मन तणावमुक्त असणे गरजेचे असतेच.

रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये ह्या कारणासाठी इतक्या साध्या, सोप्या, बिन खर्चिक आणि भारतीय परंपरेतील कालातीत उपाय योजना करायला काहीच हरकत नसावी. फायदा जरी झाला नाही तरी नुकसान नक्कीच नाही, नाही का?

शेवटी काय तर महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे "करके देखो".

सर्वे सन्तु निरामया !

तटी - येथील डॉक्टर्स, सूक्ष्मजीव तद्न्य आणि योगाभ्यास असणाऱ्या मंडळींकडून अधिक माहितीची अपेक्षा आणि ह्या माहितीचा सर्वाना फायदा व्हावा हि सदिच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users