कुणी आज नाही----

Submitted by निशिकांत on 23 April, 2021 - 11:27

तरही गझल--उला मिसरा गझलकार भूषण कटककर यांचा.
करोना बाधित झाल्यामुळे दवाखान्यात पंधरा दिवस होतो. परतल्यानंतर नकरात्मक मूडमधे लिहिलेली गझल

कुणी काल होते कुणी आज नाही
नियंत्या! दयेचा तुझा बाज नाही

स्मशानात गर्दी तरी तू विटेवर
म्हणू मी कसा रे! तुला लाज नाही

किती वादळे! भोवताली त्सुनामी
तुझी मी प्रभू ऐकली गाज नाही

चला सावडा प्रेत अपापुले या!
भुकेचा गिधाडास अंदाज नाही

असो देव माणूस अथवा फरिश्ता !
कुणी भेटलेला घरंदाज नाही

पुरे भक्तिमार्गात निष्काम जगणे
तिथे रात्र कायम नि रविराज नाही

नका चित्र रेखू कसा काल होतो
आत राहिला कालचा माज नाही

हिवाळा, उन्हाळा, असो पावसाळा
जिथे आसवांचा कधी साज नाही

करोनात " निशिकांत" ने भोगले जे
दुजी घाव करण्या कुठे धार नाही

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--भुजंगप्रयात
लगावली--लगागा X ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

करोना बाधित झाल्यामुळे दवाखान्यात पंधरा दिवस होतो. >>>> बरे आहात ना?
तुम्हाला ठणठणीत बरे व्हायला शुभेच्छा!!

चांगली आहे.

चला सावडा प्रेत अपापुले या! >> ह्याचा अर्थ नाही कळला. शिवाय हे मीटरच्या बाहेर जातंय. आपापुले असा शब्द वापरला तर बसतंय बरोबर.

आत राहिला कालचा माज नाही >> मीटरमध्ये बसत नाहीये. पहिला शब्द आत च्या ऐवजी अता असता तर बसले असते.

दुजी घाव करण्या कुठे धार नाही >> दुजी घाव म्हणजे काय? दुजा पाहिजे ना? की दुजी हे विशेषण धारशी निगडित आहे? कुठे धार नाही - हे समजलं नाही. कोणत्या वस्तूला कुठे धार नाही? की इथे 'घाव करण्या कुठे' नंतर स्वल्पविराम आहे?

परंतू असे जाण संवेदनांची
चुका काढण्याची मला खाज नाही

जसे वाटले ते तसे स्पष्ट सांगे
तसा काहि हर्पा दगाबाज नाही