नाती !

Submitted by Swati Karve on 23 April, 2021 - 05:38

नाती !

नाती... मनात सतत
रुंजी घालणारी...

नाती...मनाला
गारवा देणारी...

नाती...उत्कट ओढ
निर्माण करणारी....

नाती...मनाला
हुरहूर लावणारी...

नाती...आयुष्यात सप्तरंगी
इंद्रधनुष्य घेऊन येणारी...

नाती ... आयुष्याचा
बेरंग करणारी...

नाती ... सुख
ओरबाडून घेणारी...

नाती... माणसं
घडवणारी...

नाती... माणुसकी
जपणारी...

नाती...मनाला
भुरळ घालणारी...

नाती...अगदी अनपेक्षितपणे
शुष्क होत जाणारी...

नाती...किती हि टाळायचा
प्रयत्न केला तरीही
मनात झिरपणारी...

नाती...आयुष्याला रीती रिवाज,
परंपरा यांच कुंपण घालणारी...

नाती...प्रेमाच्या ओलाव्याबरोबरच,
दुनियादारी, छक्के पंजे शिकवणारी...

नाती...असूनही जवळ जवळ
नसल्यासारखी, नात्याच्या
एकूण अस्तित्वाबद्दलच
मनात प्रश्न निर्माण करणारी....

नाती...सोन्याच्या पिंजऱ्यासारखी,
स्वत्वाची आहुती मागणारी...

नाती...रक्ताची नसूनही,
रक्ताचीच असावीत
इतक्या ओढीने
जपली जाणारी...

नाती...एखाद्या सुरेख,
रेशमी वस्त्रा सारखी,
मन अभिमानाने
व्यापून टाकणारी...

नाती... गैरसमजूतीच्या
हलक्याश्या आघातानेही
कोमेजणारी...

नाती...दुरून डोंगर साजरे
या पठडीत मोडणारी...

नाती...एकतर्फी, खरंखुरं अस्तित्व
मिळण्याआधीच विरून गेलेली,
पण तरीही, आयुष्यभर मनाच्या
एका कोपऱ्यात दरवळत राहणारी ...

नाती...ऊन, पाऊस, थंडी वारा,
सारं काही सहन करून ही,
सदैव साथ करणारी...

नाती...एखाद्या यज्ञासारखी,
निस्वार्थ प्रेम, त्याग आणि
समर्पणाच्या आहुत्यांमुळे,
विलक्षण तेजाने तळपणारी...

नाती ...अगदी सहज आपल्या
आयुष्यात शिरकाव करणारी आणि
तेवढ्याच सहजतेने नाहीशी होणारी...

नाती... वाट चुकलेल्या,
भरकटलेल्या, एखाद्या जीवाला
पुन्हा माणसात आणणारी...

नाती ...कोणतीही अपेक्षा
न करता, अमाप माया आणि
आपुलकीचा वर्षाव करणारी...

नाती...केवळ एक तडजोड
म्हणून निभावली जाणारी,
मन सतत पोखरत राहणारी...

नाती...काळाच्या पडद्याआड
गेलेली, पण तरीही मनात
सतत निनादत राहणारी...

नाती...आपल्यावर कधी प्रेमाने
तर कधी सक्तीने हक्क गाजवणारी...

नाती ...शब्दांपलीकडली,
शब्दांविनाही संवाद साधणारी...

नाती...कोरडी, हिशोबी, रोखटोक,
शब्दांचे जीवघेणे वार करणारी...

नाती...लोभासवणी, गोड,
अविस्मरणीय आठवणी देणारी...

नाती...अल्पश्या काळापुरती
जपली गेली असूनही,
मनात घर करून राहणारी...

नाती...नंदादीपासारखी,
समयीतल्या सात्विक ज्योती सारखी,
मनात सतत तेवत राहणारी...

नाती ...कोणतंही नाव
देता येणार नाही अशी,
वय विसरून जपली जाणारी...

नाती...एखाद्या नागमोडी
पायवाटे सारखी,
हळू हळू उलगडत जाणारी...

नाती... अगदी अनपेक्षितपणे
नियतीने आपल्यापासून
हिरावून घेतलेली,
मन सुन्न करून टाकणारी...

नाती... गूढ, अथांग, खोल,
जन्म-मृत्यूच्या पालिकडली,
मनालाच नव्हे तर,
आत्म्याला स्पर्श करणारी...

नाती... फक्त सजिवांच्याच नव्हे तर
निर्जीव गोष्टींच्या सहवासात हि
प्रकर्षाने जाणवणारी...

नाती... मनात अमर्याद आदर
आणि निष्ठा निर्माण करणारी...

नाती...टप्या-टप्याने, काळानुरूप
आपला गाभा आणि संदर्भ बदलणारी...

नाती....स्फटिका प्रमाणे पारदर्शी,
प्रांजळ, निखळ, मनमोकळी,
अथांग मनातल्या व्यक्त, अव्यक्त,
साऱ्या गोष्टींचा ठाव घेणारी...

नाती... स्वत्वाचा शोध घायला लावणारी
आणि स्वतःची स्वतःला नव्याने
ओळख करून देणारी...

नाती... जणू सुपीक माती,
आयुष्य नावाचे रोप फुलवणारी,
त्या रोपाला बहर आणणारी...

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users