महारोगी!

Submitted by अज्ञातवासी on 23 April, 2021 - 05:35

'साली गोचिडे, कित्येक वर्षे त्याच त्याच खुर्चीला चिकटून वाळवी कशी लागत नाही यांच्या बुडाला...'
हा विचार करूनच तो हसला, आणि भानावर येऊन त्याने पुन्हा चेहरा केविलवाणा केला.
मधल्या पंख्याचा कर्रर्रर्रर्र आवाज एका लयीत त्याच्या कानावर पडत होता.
टण्ण!!!!
तो भानावर आला.
समोरच्या ताटलीत कुणीतरी रुपया टाकला होता...
बिननावाचा, बिनचेहऱ्याचा कुणीतरी...
याच्या आशीर्वादाचीही त्याला गरज नव्हती. 'भुर्रकन निघून गेला असेल तो...
जशी चिमणी, भुर्रकन निघून गेली.
ताप आला, डोळे फिरवले, निघून गेली.
गोड होती माझी चिमणी, गोड...
त्या रांडेच्या पोटी आली... पण गोड होती.'
जुनाट नळातून नकळत दोन थेंब ओघळावे, तसे त्याच्या डोळ्यातून नकळत दोन थेंब निघाले.
चिमणी गेली, आणि रांडेची सुनाटच झाली. आधी कारभार लपून चालायचा, नंतर राजरोस करायला लागली.
त्या अमऱ्यामध्ये तिला काय दिसलं? साला चकणा...
पण सालं दोन टायमच खायला घालायची. धंदा होवो ना होवो.
त्याची त्यालाच शरम वाटली.
दुपारचा एक वाजला. मधली मंडळी बाहेर आली.
'सालं सरकारी काम लेट होणारच, येतात आमदाराचं पत्र घेऊन....' एकजण बोलता बोलताच त्याच्या बाजूला गुटखा थुंकला, आणि न बघता पुढे निघून गेला.
तो संतापला... डिवचला गेला...
फाड फाड गालात मारून घ्यायला लागला...
येणारे जाणारे त्याच्याकडे बघू लागले.. काही हसू लागले.
'चिमणी असती तर थांबवलं असतं मला.…
बाबा मारू नको स्वतःला...'
त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
'हा वेडेपणा थांबवायला हवा...
काय होतो आपण, काय झालो.
गिरणीचा राजा, कामगारांचा हक्काचा माणूस...
...मालकाची बायको चार चारदा वळून बघायची...
संपलो... महारोगाने संपलो...
कुणी जवळ येत नाही... कुणीही नाही.'
रेल्वे थांबली... रेल्वेतून घोळका उतरला.
काही टपोऱ्या पोरीसुद्धा!!!
क्षणभर लाळ तोंडातच घुळमटली.
'आपली शांता, तिचा नवराही आपल्यासारखाच पडून होता.
ती यायची आठवड्यातून दोनदा, खाज भागवायला...
तुडवायचो अक्षरशः मी. तिलाही आवडायचं.
अरे ही पोरगी, शांताच...'
त्याने एका पोरीचा पाय पकडला.
"शी... आईईई ग..." ती ओरडली...
'शांती, लई त्रास दिला, ये जवळ...' त्याने पोटऱ्या चाटायला सुरुवात केली...
आणि पुढच्याच क्षणी तो लाथाबुक्यांनी तुडवला गेला...
कधीतरी अर्धवट शुद्धीवर आला.
रात्र बरीच झाली होती, फलाटावर शुकशुकाट...
'शांतीच्या नवऱ्याला कळलं... साला हरामखोर... माणसं आणून मारलं...
चिमणी तिकडे काय करतेय? चिमणी? रुळावर जाऊ नको, चिमणी...'
त्याचा आवाज निघत नव्हता...
'गाडी येतेय चिमणी, जाऊ नको...'
तो सरकू लागला, जिवाच्या आकांताने.
चिमणी अजूनही रुळावर खेळत होती...
तो फलाटावर आला.. सरकून खाली पडला...
'चिमणी...' तो वेदनेने कळवळला...
तो रुळाकडे सरकू लागला.
'चिमणी...' तो चिमणीच्या जवळ पोहोचला, आणि त्याने चिमणीला घट्ट मिठी मारली...
'चिमणे...' त्याचा डोळ्यातून अश्रू वाहत होते...
...समोरून गाडी येत होती....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान....
शेवट सुन्न करणारा ...!!....1