चरैवती...keep moving...

Submitted by Gandhkuti on 20 April, 2021 - 04:45

*चरैवती... चरैवती...*

नाजूकसे पंख पसरूनी
बघ पाखरे उडती
जगण्याचा मंत्र सांगती
चरैवती... चरैवती...

कोण पुरवितो इवल्या
चिमण्या चोचिंसाठी चारा
कोण भरवितो तयांच्या
इवल्या पंखामध्ये वारा

ओढ ही कुठली नेतसे
खेचुनी साता समुद्रापार
कोण दाखवी रस्ता, दिशा
वाऱ्यावर ते होती स्वार

कुठे जायचे कसे कळते
नाही चुंबक, नाही नकाशा
नाजूक त्यांचे पर फडफडती
घालती गवसणी आकाशा

प्रश्न तयांना कधी ना पडती
कोण मी, कुठे चाललो, कशासाठी
पंख पसरूनी ते झेपावती
गाती चरैवती... चरैवती

ओलांडीती ते पर्वत सागर
झेलीत पंखावर ऊनवारा
कधी पाऊस कधी विजा
तर कधी उबदार निवारा

ऋतू बदलता बदले निसर्ग
बदल हा विश्वाचा नियम
विश्वास ते ठेवीती प्रभुवर
काळजी तो वाहील कायम

ऊन सोनसळी कधी
झळाळे पंखावरती
कधी झेलीत चांदणे
गाती चरैवती... चरैवती

पंखावर कधी हिमकण
हिऱ्याप्रमाणे झगमगती
कधी पखरतो पाऊस
मोती ही पंखावरती

किती ही असो दुस्तर वाट
उचल पाऊल, जा ओलांडून
जीवन जगण्याची रीत
शिक रे मना पाखरांकडून...

येवो विपदा वा संकटे
अडचणी वा सुस्थिती
गीत गात जा आनंदे
चरैवती.... चरैवती....

गंधकुटी

Group content visibility: 
Use group defaults

Thanks