हलोधीया चोरये बाओधन खाई -- आसामी चित्रपट - परिचय , रसास्वाद - सकाळ पेपर्स मधील माझा लेख

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 16 April, 2021 - 13:10

हलोढीया चोरये बाओधन खायी ( कॅसट्रोफे)

I would rather be on my own farm than emperor of the world… George Washington

दिग्दर्शक जानू बरुआ यांचा १९८७ सालचा आसामी भाषेतील अजुनी एक अप्रतिम चित्रपट हलोढीया चोरये बाओधन खायी. १९८८ साली या चित्रपटास बेस्ट फिचर फिल्म चे national film award मिळाले होते.

ही कथा आहे एका शेतकऱ्याची जो परीस्थीच्या दलदलीत खोलवर रुतत जातो आणि बाहेर येण्याचा त्याला कोणताच मार्ग सापडत नाही. चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी तो लढत राहतो आणि त्याच्या पदरी पडत जाते घोर निराशा . एक दिवस हि निराशा त्याला वैफल्याच्या रस्त्यावरून नेऊन सोडते आणि आपल्या समोर उभे राहते प्रश्नचिन्ह.

आसाम मधील एक छोटेसे खेडे. या खेड्यात राहत आहे राकेश्वर ( इंद्रा बनिया ) नावाचा शेतकरी. पूर्णपणे निरक्षर. बाजारातून सामान घेऊन येणे त्याला जमते पण सामानाची यादी त्याला वाचता येत नाही. स्वत:ची जमीन आहे, दोन जनावरेही आहेत पण तो सधन शेतकरी आहे असे म्हणता येत नाही. बाजारातून जेव्हा मुलासाठी अभ्यासाचे पुस्तक आणायचे असते तेव्हा पुरेसे पैसे नसल्यामुळे तो दुकानदाराला शर्ट काढून देतो पण मुलांचे अभ्यासात नुकसान होऊ देत नाही. बायको तरू ( पोर्णिमा पाठक ) हातमागावर कापड विणून प्रपंचाला हातभार लावत आहे. पण एकूण घरची परिस्थिती बेताचीच. त्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत, डोळे वटारून बघणाऱ्या समस्या आहेत. तरीही राकेश्वर आणि त्याच्या कुटुंबाला हा लढा द्यायचा आहे.

सकाळची वेळ. काल रात्री पाउस पडल्याने राकेश्वर खुश आहे. मऊमऊ चिखलातून बैल नांगरणी करत आहेत. आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने गावातील निवडणुकीला उभे राहिलेला पुढारी सनातन शर्मा ( हेमेन चोरडिया) शेतात येताना आपल्याला दिसतो. सनातन बद्दल राकेश्वरला मृदू व्यक्ती म्हणून आदर आहे. पण असे असले तरी तो दिवस मात्र राकेश्वरच्या आयुष्यात काळा दिवस आहे. सनातन राकेश्वरला सांगतो जी जमीन तो आत्ता नांगरत आहेस ती जमीन त्याच्या वडिलांनी सनातनकडे गहाण ठेवली होती, आणि तो करार आज संपला आहे. त्या जमिनीचा मालक आता सनातन आहे. हा राकेश्वरला धक्का आहे. कारण इतके दिवस जमिनीचा सर्व खर्च, सरकारी कर, जर तो भरतो आहे तर जमीन सनातनची कशी? इतकेच नव्हे तर त्याने आपल्या वडिलांना सनातनला पैसे दिलेले बघितले आहे तर सनातन त्या जमिनीवर हक्क कसा काय सांगू शकतो? राकेश्वर आणि सनातन यांची चर्चा वाढत जाते. पण राकेश्वर जवळ वडिलांनी पैसे परत फेडल्याचा कोणताच पुरावा असत नाही. कारण पैशांची परतफेड विश्वासाने केलेली असते आणि कायदा विश्वास जाणत नाही.

ज्या जमिनीवर राकेश्वर मालक म्हणून वावरला त्या राकेश्वरला जेव्हा अचानक कळते हि जमीनीच आपली नाही तेव्हा तो सैरभैर होतो. ज्या बैलांना तो आपले म्हणून काही वेळापर्यंत नांगरणी करून घेत असतो त्याच बैलांच्यावर तो अचानक क्रुरपणे चाबूक फटकारतो. एका तिरमिरीतच तो घरी येतो आणि स्वत:च्या मनातील राग तो बायकोवर काढतो, तिला मारहाण करतो. मनातील पराकोटीचा हा उद्रेक आहे.

घराच्या एका कठड्यावर शांतपणे बसलेला राकेश्वर. वरून शांत असला तरी मनात आहे विचारांचे वादळ. शेतीच नाही तर खाऊ काय? मुलांची आबाळ नाही होणार? उद्यापासून नांगरणी बंद. ? काळजाला पडलेला ओरखडा. त्याच्या मनातील व्यथा त्याच्या चेहरयावर दिसते.

रात्रीची वेळ. तरू शांत झोपली आहे. जणू काही घडलंच नाही. शेजारी दोन निष्पाप मुले. पण राकेश्वर मात्र जागाच आहे. कारण आता शेती त्याची राहिली नाही इतकीच व्यथा त्याच्या मनात नाही तर बायकोला मारल्याचा पश्चातापहि त्याला होत आहे. ज्या पायावर त्याने मारलं त्या पायाला तो हळूहळू कुरवालू लागतो. स्वत:च्या मनातील भावनांना करून दिलेली हळुवार वाट. पण तरू दचकते. सकाळी नवर्याने मारलेले घाव अजुनी कुठेतरी शरीरावर तसेच आहेत.

राकेश्वरला परिस्थितीतून मार्ग काढण्याशिवाय ईलाज नाही. गावात मंडल ( बादल दास ) नावाचा सरकारी नोकर आहे जो सर्वांना सरकारी कामाबद्दल सल्ला देत असतो. राकेश्वर त्याच्याकडे जातो. सनातन शर्मा वर केस घालण्याशिवाय गत्यंतर नाही असे मंडलचे म्हणणे असते. हि केस एका कमिटीपुढे चालणारी असते ज्याच्या प्रमुख आहे कलेक्टर. कमिटीतले सदस्य चांगले आहेत पण त्यांना लाच द्यायला लागेल असे मंडलचे म्हणणे असते.

राकेश्वरच्या मनात पुन्हा तेच घोंगावणार विचारांच वादळ. “जमीन जर माझी स्वत:ची आहे तर मी केस का घालावी आणि लाच तरी का द्यावी?” हा त्याचा निष्पाप प्रश्न आहे. व्यवहारिक जगाशी त्याचा संबध नाही. मंडल जेव्हा त्याला काही गोष्टी समजून सांगत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे आहे आपल्या शेतातून नांगरणी करणाऱ्या बैलाचे पाय. जर मंडलच्या बोलण्याप्रमाणे केल नाही तर आपले शेत ... !! मंडलच्या घरातून खचून घरी जात असलेला राकेश्वर आणि त्याचवेळी निवडणुकीसाठी फोटोशूट करत असणारा सनातन शर्मा आपल्यला दिसतो.

विचारांती राकेश्वर सनातनवर केस घालण्याचे ठरवतो. पण त्याच्याकडे लाच द्यायला पैसे कुठे आहेत ? मुलांनी साठवलेले पैसे जरी बाहेर काढले तरीहि उपयोग होत नाही. बैल जर विकले तर शेत परत मिळाल्यावर नांगारायचे कसे? शेत मिळेल हि वेडी आशा त्याला आहे. गाय जर विकली तर दुध विकून पैसे कसे मिळवायचे? राकेश्वर आणि तरू विचार करत बसले आहेत. प्रश्नाच पोळ घोंगावत आहे आणि दंश होणार्या वेदना मनातून झिरपत आहेत.

शेवटी विचारांती गाय विकायचे ठरते. जनावरांना बोलता येत नसल तरीही त्यांना भावना असतातच. जेव्हा राकेश्वर गाय विकायला जात असतो त्यावेळी तिच्यापुढे तिचे जेवण ठेवतो पण कदाचित गाईला काही विपरीत चालले आहे याची चाहूल लागली असावी. ती जेवण नाकारते आणि जेव्हा राकेश्वर तिला जबरदस्तीने बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो त्यावेळी ती पुढे जात नसते जणू तिला आपले घर सोडायचे नाही. परिस्थितीने हतबल झालेला राकेश्वर, गाईचा हंबरडा, राकेश्वरच्या मुलाचे रडणे आणि त्याच्या आईने व्याकूळ होऊन मुलाला समजावणे, हृदयद्रावक प्रसंग !!!

राकेश्वर मंडलच्या साह्याने पिटीशन दाखल करतो. अपेक्षेप्रमाणे लाचहि देतो. पण मंडलच्या मते केस आपल्या बाजूने करण्यासाठी कलेक्टरला उंची मद्य देणे आवश्यक आहे. कलेक्टर स्त्रीलंपट आहे. त्या बाबतीतहि राकेश्वरने काही करावे हि त्याची अपेक्षा असते.

राकेश्वरची मानसिकता कमालीची अस्वस्थ होते. उंची मद्य? काहीतरी करता येईल. पण बाई ? घराच्या अंगणात राकेश्वर विचारात गढून गेलेला आहे. हातमागावर काम करत असणारी त्याची पत्नी. मागाचा होत असणारा “खट खट” आवाज आणि राकेश्वरच्या डोक्यात बसणारे मंडलच्या बोलण्याचे तीव्र घाव. राकेश्वर आपल्या पत्नीकडे बघतो. क्षणभर त्याच्या मनात चमकून गेलेला विचार? ती स्त्री तरूच का नाही? पण तरुची वेगवेगळी रूपे त्याच्या नजरेसमोर तरळतात. डोक्यावर पदर घेऊन काम करणारी तरू कधी दुसऱ्याची होईल? आपल्याच विचारांनी तो चमकतो आणि मनात एक निश्चय घेऊन उठतो.

गाय तर गेलीच पण आता राकेश्वर बैल सुद्धा गहाण टाकतो. विषण्ण अवस्थेत तो जेव्हा घरी येतो तेव्हा मुले मातीचे घर बनवत आहेत. कोण कोणत्या खोलीत राहणार इतके सविस्तर नियोजन मुले करत आहेत. मुलांचा खेळ चालू आहे कारण शिक्षक शाळा बंद ठेऊन त्याचा पगार आणण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रत्येकजण परिपूर्ण आहे आणि राकेश्वर मात्र रिता आहे. त्याच्याकडे ना शेती, ना बैल, ना गाय !!!
सातत्याने सरकारी कार्यालयाच्या चकरा आणि द्यावे लागणारे पैसे याला कंटाळून शेवटी राकेश्वर गावाच्या सरपंचांकडे जातो. सरपंच नाराज आहे कारण राकेश्वर त्याच्याकडे पहिल्यांदा आला नाही. पण शेवटी राकेश्वारला मदत म्हणून तो त्याच्या मुलाला मोहनला घरात काम करण्यासाठी ठेऊन घ्यायचे कबूल करतो.

दुसऱ्या दिवशीची सकाळ. राकेश्वर आणि तरू मोहनला कसे सांगायचे म्हणून अस्वथ आहेत. आपल्या मुलाची शाळा बंद आणि तो कामाला .. ? शेवटी मनाचा निश्चय करून तरू मोहनला समजून सांगते. पण मोहन शाळा सोडायला तयार नाही. तो ओरडतो कारण त्याला शाळा प्रिय आहे आणि तरू परिस्थितीपुढे हतबल आहे. ती पुढे जळत असलेल्या चुलीतील लाकूड घेते आणि पुस्तकावर डाग देते. हे परिस्थितीने ज्ञानाला दिलेले चटके आहेत. मोहन आपल्या वडिलाच्या बरोबर पुढेपुढे जात आहे आणि मागे साश्रू नयनांनी त्याला आवाज देत आहे त्याची आई.

सरकारी कार्यालयात राकेश्वरने बऱ्याच चकरा टाकल्या आहेत. काही लोकांना लाच द्यावी लागली म्हणून म्हणून सरकारी खात्यात सगळेच काही वाईट नाही. ज्या कलेक्टरची ( प्रांजळ साकीया) इमेज स्त्रीलंपट म्हणून लोकांनी करून दिलेली असते तो कलेक्टर प्रत्यक्षात मात्र चांगला असतो. देशातला भ्रष्टाचार कसा कमी होईल इकडे त्याचा ओढा आहे. कायदा हवाच पण लोकांच्या रक्तात भिनलेला भ्रष्टाचार कमी होणे गरजेचे आहे असे त्याला वाटत असते.

जेव्हा राकेश्वरची केस त्याला कळते तेव्हा तो राकेश्वरची अगत्याने चौकशी करतो आणि राकेश्वरसाठी काही करायचे ठरवतो. सनातनला कलेक्टर समजून सांगतो विरोधक राकेश्वरच्या जमिनीचा मुद्दा करतील. सनातनकडे बरीच जमीन आहे तर राकेश्वरच्या जमिन घेऊन असा काय फरक पडणार आहे? शेवटी विचारांती सनातन राकेश्वरला जमीन देण्यसाठी तयार होतो.

त्या दिवशी सनातन राकेश्वला जमिनीची कागदपत्रे परत देतो. क्षणभर अविश्वास. कारण जे कधीही शक्य होणार नाही ते झाल असते. दुसर्याच क्षणाला त्याला प्रचंड आनंद होतो आणि तो तरुला आनंदातीशयाने ओरडून हि बातमी सांगतो. . मनाच्या एका बेफाम अवस्थेत तो बाहेर जातो कारण त्याला ताबडतोब शेतावर जायचे आहे. पण शेतावर जाऊन नांगरणी करण्यसाठी बैल कुठे आहेत? मघाशी विजेसारखा धावणारा राकेश्वर अचानक शांत होतो. कोणतीच प्रतिक्रिया त्याच्या चेहराय्वर असत नाही. समोर पडलेली कुऱ्हाड तो घेतो. चालत आपल्या शेत्तात जाऊ लागतो. समोर एका झाडावर सनातनचे पोस्टर लावले आहे. राकेश्वर त्या पोस्टर कडे धाऊन जातो आणि बेफाम होऊन कुऱ्हाडीचे घाव घालू लागतो “ माझी जमीन तू दिलीस म्हणून मी तुला मत देईन असे समजू नकोस तुझ्या आजूबाजूचे जग कधीच जागे होणार नाही असे तू समजू नकोस” मघाशी हिरव्या पानानी डवरलेला वृक्ष अचानक काळा पडतो. काळवंडलेल्या परिस्थितीचे ते द्योतक होते. तो वृक्ष बघत असतानाच चित्रपट संपतो.
यातील प्रत्येक प्रसंग दिग्दर्शकाने भावस्पर्शीरित्या सादर केला आहे पण असे करत असताना वास्तवाचे भान सोडलेले नाही, शेतकऱ्याच्या समस्या दाखवत असताना सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार दाखवला पण सगळेच वाईट असते असेही दिग्दर्शक म्हणत नाही .परीस्थितला विरोधाभास किंवा राकेश्वरच्या कुटुंबाला करावी लागणारी तडजोड या सार्या गोष्टी दिग्दर्शकाने अचूक पडतीने आपल्यासमोर सादर केल्या आहेत.
इंद्रा बनियाची भूमिका वास्तववादी. मनातील वैफल्य असो किंवा विचारांचे वादळ असो मुद्राभिनायाने सुद्धा आपल्या पर्यंत पोचते. सनातनचे पोस्टर लावत असतना त्याचा झालेला वैचारिक स्फोट हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

शेतकरी समस्या आपल्या देशात गंभीर आहे. भ्रष्टाचार सुद्धा वेळोवेळी वर डोके काढत असतो. पण मला वाटते याकडे निराशावादानेच बघून चालणार नाही. सरकार आपल्या प्रकारे प्रयन्त करत आहे. आणि यश मिळतही आहे. कदाचित ते अजुनी मिळणे बाकी असेल.
पण आशेला अजुनी जागा आहे. एक दिवस हिरवीगार शेती अजुनी डुलणार आहे .. वृक्ष अजुनी बहरणार आहेत .. हृदयातून नवीन अंकुर फुटणार आहेत .. आणि एका उंच आभाळात पाखरे भरारी घेणार आहेत....यात संशय नाही.

https://youtu.be/guoHOgcGZ1o

सतीश गजानन कुलकर्णी
९९६०७९६० १९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गारंबीचा पाउस या चित्रपटाची आठवण झाली थोडीफार अशीच कथा आहे. असाच संघर्ष दाखवला आहे त्यातही.गिरिश कुलकर्णीने कमाल अभिनय केला आहे त्यात.

एका सुंदर कलाकृती ची ओळख करून दिलीत, मागेच वाचलं होतं परीक्षण, चित्रपट पाहून प्रतिसाद द्यावा म्हणलं. पाहिला , अभिनय खूप चांगला केलाय . त्याचा उद्वेग भिडतो अगदी.