नेत्राला आता मात्र बजावण्यात आले होते की पुढचा कॅडिंडेट निवडायचाच. त्यासाठी कोणताही सबब चालणार नाही.....
थांबा...थांबा...हे कोणत्या वधू-वर परिक्षेचे वर्णन नाहीय.
तर नेत्रा एका आयटी कंपनीतील टू बी स्पेसिफिक एका प्रॅाडक्ट कंपनीतील टेस्ट लिड होती. त्यांच्या कंपनीतील फंडा जरा अजिब-गरिबच होता. काय तर म्हणे कंपनीतील कायमस्वरुपी कर्मचारी कमीत कमी ठेवायचे आणि जास्तीत जास्त आउटसोर्सिंग करायचं.
तिच्या टीम मध्येच बघाना... कायमस्वरूपी कर्मचारी फक्त ४ आणि इंटर्न, कॅान्ट्रॅक्ट बेसिस , टेंपररी, CTS, TCS, अलाणा- फलाणा कंपनीचे मिळून तब्बल १०० मेंबर्स होते. कंपनीचे प्रोजेक्टस् जोरात सुरू होते. टेस्टिंगला कधी नव्हे ते अभुतपूर्व महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांचा टिम साईझ हनुमानाच्या शेपटीसारखा वाढतच चालला होता.
नेत्रा अलाणा-फलाणा कंपनीतील मठ्ठ आणि मख्ख टेस्टर्सचे इंटरव्ह्यू दर आठवड्याला घेऊन कंटाळली होती आणि त्या कंपनीतील अनुराधाला दर आठवड्याला फ्रेश , इनोव्हेटिव्ह ब्लड पुरवता पुरवता तोंडाला फेस आला होता. शेवटी आता जो कॅंडिडेट दिलाय तो स्वीकार नाहीतर स्वत: हात काळे करायला बस अशी नेत्राच्याच मॅनेजरने तिला सज्जड धमकी दिली होती.
आलिया भोगासी... म्हणत तिने नवीन कॅंडिडेटचा म्हणजे साठेचा रेझ्यूमे बघायला घेतला....अबबबब....१० पानी रेझ्यूमे... तिच्या कपाळाला आठ्या पडल्या. याने नोकरी. कॅामची “how to write short and sweet resume” सर्व्हिस घेतली नाही वाटतं असं पुटपुटतं तिने झर्कन रेझ्यूमेवर नजर फिरवली आणि भर्कन दुसर्या दिवशीचा इंटरव्ह्यू ठरवला.
दुसर्या दिवशी ती अतिशय पॅाझिटिव्ह फ्रेम ॲाफ मांइडने त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सज्ज झाली.कॅान्फरन्स रूम मध्ये तो अगोदरच येऊन बसला होता. त्याचे चष्म्याआडचे लुकलुकणारे डोळे पाहून तिला उगीचच सखाराम गटणेची आठवण झाली.
तिने “ Tell me something about yourself” या अगदी घिसापिट्या प्रश्नाने सुरूवात केली. आणि साठे सुटला....
त्याचा जन्म कुठे झाला पासून त्याने जी सुरूवात केली ते त्याने काल काय व्हॅल्यू ॲड केले हे सांगूनच तो थांबला.तब्बल १० मिनीटे तो बोलत होता. नेत्रा त्याला अडवायला म्हणून आ वासायची पण साठे जाम थांबला नाही. शेवटी नेहाचा आ वासून आणि साठेचा बोलून जबडा दुखायला लागला तेव्हा दोघेही थांबले आणि दोघांनीही त्यांच्या समोरचा पाण्याचा ग्लास घटाघटा पिऊन रिकामा केला.
नेत्रा आता अगदी स्पेसिफिक, टू द पॅांईट प्रश्न विचारायला लागली. पण साठे काही बधला नाही. सवाल एक जवाब दो अशीच बॅटिंग त्याची सुरू होती. साधी sql क्वेरी लिहायला दिली तरी निबंध लिहिल्यासारखा लिहायचा. कोणती टेक्निकल टर्म विचारली तर संदर्भासहित स्पष्टिकरण द्यायचा.
नेहाला इतकी बडबड ऐकून गरगरायला, थरथरायला, घाबरायला व्हायला लागलं. तो सिलेक्ट झाला तर या प्रकारे रोज आपल्याला डेली स्टेटस देणार या विचाराने तिचा थरकाप उडला.इतका बोलभांड माणूस दहा हजार वर्षांत झाला नाही आणि होणार नाही अशी तिची खात्री पटली.
नेत्राने तिच्या मॅनेजरला सारिकाला कळवळून सांगितले ;
“मी नाही याला घेऊ शकत”
“पण का?”
“ तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो,असंबध्द बोलतो”
सारिका हे ऐकून हतबुद्ध झाली आणि तिने अनुराधाला कळवले.
हे कारण ऐकल्यावर अनुराधाने डोक्याला हात लावला. नखरेल नेत्राला कसं मनवायचं आणि सटकलेल्या साठेला कुठे चिटकावयाचं या विचारात ती परत एकदा गढून गेली.
समाप्त.
यात विनोदी काय आहे?
यात विनोदी काय आहे?
अवांतर: "व्हिसल ब्लोअर"चा पुढील भाग कधी लिहिणार?
साठ्यांचा स्वभाव आणखी विशद
साठ्यांचा स्वभाव आणखी विशद करून सांगितलात आणि आणखी प्रसंगांची भर घातलीत तर वपुंच्या स्टॅटिस्टिक्स मराठे किंवा जेके मालवणकर सारखा विनोदी लेख/कथा होऊ शकेल. कृपया ह्याचा सिक्वेल लिहा.
धन्यवाद उबो, हरचंद.
धन्यवाद उबो, हरचंद.
दोन्ही प्रतिसादांवर काम करणार आहे.उत्साहवर्धक, नेमक्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मस्त.
मस्त.
अश्याच एका प्राण्याचा टेलि इंटरव्ह्यू घेतला होता २ महिन्यापूर्वी. त्याने मध्ये 'तुला अमुक स्किल येतं का' असा एक वाक्य मध्ये टाकायला पण संधी दिली नाही त्याने. १२ मिनीट अखंड बोलत होता. फीडबॅक मध्ये 'हा खूप बोलत होता त्यामुळे आपल्या कामाचे मुद्दे कळले नाहीत, पण कदाचित कामात ओके असेल' असं लिहील्याचं आठवतं
खूपच छान. .. खूप वेळा या
खूपच छान. .. खूप वेळा या परिस्थितीतून गेले आहे त्यामुळे अगदी अगदी झाले. चांगले candidates मिळणे हा फारच कठीण प्रश्न झाला आहे. .
धन्यवाद अनू,धनवन्ती.
धन्यवाद अनू,धनवन्ती.
हो, खरंच, या सगळ्या वाक्गंगेत कॅंडिडेटकडे योग्य ते स्किल्स आहेत की नाही हेच काहीवेळा कळत नाही.
सध्या हेच चालू आहे!
सध्या हेच चालू आहे!
दाखवायला म्हणून स्टुडिओत जाउन काढलेले फोटो आणि चहापोह्याच्या कार्यक्रमात कळून आलेली वास्तविकता यात जितका फरक असतो तितकाच रिझ्युमे आणि इंटरव्ह्यूला बसलेला माणूस यात असतो.... किंबहुना तितकाच फरक इंटरव्ह्यूला होयबा करणारा बोलघेवडा आणि दोन चार महीन्यात स्थिरावलेला आणि पाट्या टाकू लागलेला इंजिनिअर यात असतो!
चांगले candidates मिळणे हा
चांगले candidates मिळणे हा फारच कठीण प्रश्न झाला आहे. >>> धाग्यासाठी विषय.
ज्ञानी असेल तर मोजकंच बोलेल.
ज्ञानी असेल तर मोजकंच बोलेल.
नाही तर माझ्यासारखा बडबड करत राहील.
“ तो खूप बोलतो, अतिप्रचंड
“ तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो,असंबध्द बोलतो” >> पात्राचे आडनाव 'ठाकरे' असते तर गोष्ट विनोदी झाली असती...
तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो
तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो,असंबध्द बोलतो”
>>प्रोजेक्ट मॅनेजर ची पोस्ट द्यायची ना...
रेझ्युम नव्हे हो तो रेझ्युमे
रेझ्युम नव्हे हो तो रेझ्युमे असा शब्द आहे. दोन्ही शब्दान्चे स्पेलिन्ग सारखेच आहे फक्त एकाचा अर्थ पुन्हा सुरु व त्याचा उच्चार रिझ्युमे असा तर दुसर्याचा अर्थ तुमच्या पूर्वी केलेल्या कामाचा गोशवारा असा आहे.
तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो
तो खूप बोलतो, अतिप्रचंड बोलतो,असंबध्द बोलतो” >> हे वाक्य सोडून फारशी विनोदी वाटली नाही.
हरचंद पालव यांच्या प्रतिसादाला अनुमोदन.
पुढचा भाग विनोदी लिहा. आवडेल वाचायला.
धन्यवाद स्वरूप, उबो,रानभुली,
धन्यवाद स्वरूप, उबो,रानभुली, परदेसाई,च्रप्स, दिगोचि, वर्णिता.
सर्वांच्या विनोदी/गंभीर/चर्चात्मक प्रतिसादांबद्दल आभार.