"मानवतेची गुढी"

Submitted by Krlam521 on 13 April, 2021 - 09:55

आपल्या सनातन किंवा हिंदु धर्माचा नविन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. १३ एप्रिलला शालिवाहन शकेप्रमाणे १९४३ वे वर्ष सुरू होतं आहे. माझ्या लहानपणी सगळेच सण धार्मिक व कौटुंबिक द्रुष्टीकोनातून साजरे व्हायचे. त्यामुळे मोठ्यांबद्दल आदर, इतरांबद्दल सहिष्णूता, माया, ममता ही सगळी नैतिक मुल्ये जपली जायची. एकमेकांच्या सहकार्यामुळे समाजात सुख, शांतता होती. म्हणून सध्ध्यांच्या रोजच्या बातम्यांमधुन, जगांतली वाढत असलेली अस्थिरता व कमी होतं असलेली शांतता व मानवतां फार जाणवते. म्हणूनच, मी या वर्षी, नविन विचारांची "मानवतेची गुढी" स्थापन करायचे ठरवल आहे. आणि करोनामुळे आपण सामुदायिक गुढीपाडवा साजरा करू शकत नाहीच. त्यामुळे माझी ही गुढी सर्व आबाल-वृद्धांना मनांत उभारतां येईल. व प्रत्येकालाच, ती शक्य असेल तेवढी, आचरणांतसुद्धां आणतां येईल. व आपल्या जवळपासच्या सर्वांना तशा आचरणाची प्रेरणा पण मिळेल. व ही मी उभारलेली "मानवतेची गुढी" सगळीकडे झळकेल. भाषा जरी अलंकारिक वाटली तरी निसर्गाबद्दल आदर व सर्वांबद्दल सहानुभुती मनांत बाळगून मानवतां जपणं हा त्यातला मुलभूत उद्देश आहे.
"ही मानवतेची गुढी" उभारण्यासाठी, -- प्रथम, आनंदवृक्षाच्या हिरव्यागार ताज्या पानांचे व समतोल विचारांच्या डहांळ्यांचे तोरण प्रवेशद्वारावर बांधायचे. मग गुढीसाठी स्वार्थ, धर्मांधता नष्ट करण्याच्या प्रतीज्ञेची काठी घेऊन तिला सकारात्मक विचारांच्या धाग्यांनी घट्ट विणलेली गर्भ-रेशमी पैठणी नेसवायची. मानवतेचा अस्सल चांदीचा कलश तिच्यावर ठेवायचा. मग तिला प्रेम, माया, ममतेच्या सुंदर, सुवासिक भावपुष्पांचा हार आणि सौजन्याच्या गोड शब्दांच्या बत्ताशांची माळा घालायची. अशी सजवलेली "गुढी" घरावर उभारून तिची आप्तेष्टांसह हंसत-खेळत, खुप आनंदाने मन:पूर्वक पुजा करायची. पुजेसाठी व्यापक दृष्टिकोनाच्या मनांचे सुबक तबक घेऊन त्यांत पुजेचे सगळे साहित्य ठेवायचे. त्यांतील सर्व जाती-धर्माबद्दल सहिष्णूता व आदर यांचे हळद-कुंकू व दया, क्षमा यांच्या गंध, अक्षता गुढीला लावायच्या. निसर्गाबद्दल प्रेम व जाणीव यांची पाने, फुले तिला वहायची. मग स्वार्थत्यागाच्या निरांजनाने ओवाळून आरती करायची. आणि निरपेक्ष कर्तव्य-कर्माच्या ध्येयाने मंत्र-पुष्पांजली म्हणायची. जगभर शांती पसरवण्याची धुरा खांद्यावर घेऊन तोच "नैवेद्य" सगळ्यांना वाटायचा. शेवटी मनोभावाने नमस्कार करून प्रार्थना करायची की हे नविन वर्ष जगभर सर्वांची सद्सत्-विवेकबुद्धी जागृत करो आणि हे येणारे वर्षच नाही तर सगळा भविष्यकाळच जगांतील सर्वांना सुख, समाधानाचा, सुआरोग्य, संप्पन्नतेचा, व शांतीदायक जावो. या नविन वर्षाच्या सर्वांना शुभकामना.

सौ. लीना फाटक. ११ एप्रिल २०२१,
Warrington, United Kingdom
Emailz:-- linaphatak@yahoo.co.uk

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users