दिगंत : भाग १२

Submitted by सांज on 12 April, 2021 - 12:16

“one.. two.. three.. jump right away!!”

अनुरागचं कौंटिंग ऐकत संहिता ने मोठा श्वास घेऊन त्या उंचावरच्या मोठ्या दगडावरून पाण्यात उडी मारली. पाण्याचा मोठा आवाज झाला. क्षणभराने खोल पाण्यातून वर येत तिने वरुन पाहणार्‍या अनुरागला आणि रियाला थम्ब्स अप केलं आणि त्या विशाल जलाशयात पोहू लागली.

अनुरागने वळून रियाकडे पाहिलं. ती अर्धवट रागावलेल्या, अर्धवट भीतीने भरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. खरंतर, Coracle मधून उतरल्यावर जेव्हा अनुरागने ही cliff jumping ची कल्पना सांगितली तेव्हापासून रिया त्याला विरोधच करत होती. पोहायला जरी येत असलं तरी तिला उंचीची प्रचंड भीती वाटते हे तिने शक्य त्या सर्व प्रकारे सांगून पाहिलं. पण, त्याच्या आणि संहिताच्या उत्साहापुढे तिचा निभाव लागेना. तशीच चरफडत ती त्यांच्यासोबत इथे आली होती. मनात प्रचंड भीती, उंचवरचा तो अवाढव्य पाषाण, खाली चमकनारं निळंशार पाणी.. रिया थरथरत होती.

अनुराग तिच्या जवळ आला,

“कसली भीती वाटतेय तुला?”

“उंचीची.. अर्थात!”

तिच्या शेजारी बसत तो म्हणाला,

“हम्म.. मला पहिल्या भेटीतच कळलं होतं, तू भित्री आहेस.”

“एक्सक्यूज मी..” रियाचा चेहरा अजून लाल झाला.

“हो. कधी कधी प्रवाहा सोबत स्वत:ला वाहू द्यायलाही गट्स असावे लागतात. दरवेळी ‘मी म्हणतेय तसं’, ‘मला हवं तसं’, ‘माझ्या पद्धतीने’ वगैरे हट्ट चालत नसतात. ते हट्ट चालवण म्हणजे यश नसतं. कधी कधी स्वत:ला बाजूला ठेवत, पुर्णपणे बाजूला ठेवत, या आयुष्य नावाच्या गोष्टीत स्वत:ला झोकून देता यायला हवं. नाही, वाटतंय तितकं सोपं नाही ते. रिस्क आहे. Uncertainty आहे. पुढचा क्षण कसा असेल याची खात्री नसणं आहे.. पण ते स्वीकारता यायला हवं. आपण जशी कल्पना केलीये तेच आणि तसंच आपल्या सोबत घडेल असं अजिबात नसतं. तसा हट्ट करणं हा शुद्ध बालिशपणा आहे. आणि मला तेच तेवढच हवय म्हणत आयुष्य जगायचच थांबवण हा मूर्खपणा. आणि त्यापायी प्रवाहात उडी मारायला नाही म्हणणं हा शुद्ध भित्रेपणा आहे. तू भित्री आहेस!”

त्याच्या त्या रोखठोक बोलण्याने खजील होत रिया शब्द गोळा करत म्हणाली,

“मी तुझ्याशी लग्नाला नाही म्हणतेय याचा तू असा अर्थ लावतोयस तर?”

त्यावर किंचित हसत तो म्हणाला,

“नाही. तू लग्नाला नाही म्हणतेयस, माझ्याशी लग्नाला नाही म्हणतेयस म्हणून अजिबात नाही. तू ‘जगायलाच’ नाही म्हणतेयस म्हणून मी तुला भित्री म्हणतोय. तुझ्या आयुष्याचं एक चित्र तू मनात तयार केलं आहेस. आणि त्यातल्या प्रत्येक मायनर डिटेलसह ते तुला प्रत्यक्षात यायलाच हवंय. तसं नाही झालं तर काय? या विचारानेही तुझा थरकाप उडतो. तू प्रचंड घाबरतेस. माय डियर, जे जसं समोर येईल ते तसं स्वीकारण्याची हिम्मत ठेव.”

त्याचं बोलणं ऐकून रिया आतून हलली. आपली दुखरी नस कोणीतरी गचकन धरावी असं तिला झालं. तिला पुन्हा तो फायनल इंटरव्ह्युचा दिवस आठवला. लेखी परीक्षेत ती पास झालेली असली तरी पोस्टची खात्री वाटावी इतके तिला पेपर बरे गेले नव्हते. आणि त्यामुळे अर्थातच मुलाखती वर पोस्ट मिळणार की नाही हे ठरणार होतं. त्या गोष्टीचं आलेलं टेंशन तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. सिलेक्ट नाही झाले तर काय ही भीती प्रत्येक उत्तरातून ठळक दिसत होती. सगळं येत असून, लाखो विद्यार्थ्यांमधून मुलाखती पर्यन्त पोचून, सगळ्या प्रकारची तयारी करून देखील इंटरव्ह्यु पॅनल समोर तिची झालेली अवस्था ती विसरू शकत नव्हती. आणि त्यामुळेच, केवळ त्यामुळेच तिची पोस्ट हुकली हे आत कुठेतरी ती जाणून होती. अनुरागच्या बोलण्याने त्याला दुजोरा मिळाला फक्त.

“मी तुला फोर्स करणार नाही. तुझं तू ठरव.” असं म्हणून काहीवेळाने अनुराग उठला आणि त्याने पाण्यात उडी मारली.

रिया भानावर आली.

एका वेगळ्याच तंद्रीत, कसलाच विचार न करता त्याच्या मागे तिनेही उडी मारली. वार्‍यावर स्वत:ला पाण्याच्या दिशेने तिने झोकून दिलं. त्या क्षणी तिचं शरीर तिला कमालीचं हलक वाटलं. क्षणात पाण्याचा मोठा आवाज झाला. त्या निळ्याशार पाण्यात ती खोल गेली आणि मग वर आली.. डोळ्यावरचं पाणी तिने बाजूला केलं. समोर अनुराग होता. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं. भीतीच्या पलीकडे यश असतं म्हणतात. ती भीती सर केल्याचा विलक्षण आनंद तिच्या चेहर्‍यावर होता. नजरेनेच त्याचे आभार मानून ती फिरली आणि पाण्याच्या प्रवाहासोबत मनसोक्त पोहायला लागली.

अनेगुडीला पोचून दुपारचं जेवण होईपर्यंत आपण पुढे कुठे जातोय हे संहिता आणि अनुराग दोघांनाही माहीत नव्हतं. सनापूरहून अनेगुडीला पोचेपर्यंत आणि जेवण करतानाही त्यांच्या, कॉर्पोरेट कल्चर अँड इट्स चेंजिंग असपेक्ट्स या विषयावर सेमिनार चालुये की काय असं वाटण्या इतपत कमालीच्या गहन चर्चा रंगल्या होत्या. रिया सगळं एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देत जेवणावर ताव मारत होती. मध्येच नावाला त्यांच्या हो मध्ये हो मिसळत होती. त्या दोघांना त्यांच्या चर्चेमध्ये सोडून बिल भरायला काऊंटर वर गेल्यावर तिने हॉटेल मालकाकडे ओणके किंडी विषयी चौकशी केली. पण त्यांना काही माहीत नाहीसं दिसलं. या गावाजवळ एक प्रागऐतिहासिक ठिकाण आहे आणि त्याची गावातल्या कोणाला कल्पनाही नसावी याचं तिला प्रचंड आश्चर्य वाटलं. तिने मग बाहेर येऊन जराशी चौकशी केली. शेवटी एक हम्पीमधला रिक्षावाला सापडला ज्याला या ठिकाणाविषयी माहिती होती. त्याने पूर्वी कधीतरी एका विदेशी दांपत्याला तिथे नेलं होतं म्हणे. मग तो रिक्षावाला पुढे आणि या तिघांची गाडी मागे अशी त्यांची स्वारी ओणके किंडी मधली जवळपास पाच हजार वर्षांहून जुनी असलेली रॉक पेंटिंग्स पाहण्यासाठी निघाली. एव्हाना सूर्य खूपसा पश्चिमेकडे कलला होता.

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !
कथेत आलेली ठिकाणं खरी आहेत कि काल्पनिक