प्रिय तू..

Submitted by सांज on 11 April, 2021 - 14:14

प्रिय तू,

तुझ्या-माझ्या कविता नाही लिहत मी आता
तुझ्या-माझ्या नसलेल्या आठवणींचा पसाराही नाही काढून बसत
तू दूर आहेस खूप
जवळ तसा नव्हतासच कधी
पण, दोन वर्तुळं क्षणभरासाठी एकमेकांना परीघावर स्पर्शून पुन्हा दूर सरकावेत ना तसं काहीतरी झाल्यासारखं वाटतं
खूप जवळ आलास क्षणभरासाठी
आणि मग निघून गेलास खूप दूर
इतका दूर की माझी साद तुला ऐकायला तरी येते की नाही असं वाटावं
की जाणीवपूर्वक अंतर राखून आहेस, काय माहित!
मी बंद दाराच्या फटीतून पाहतेय तुझ्याकडे.
आणि तू
तुझ्यासमोर मोकळं आकाश आहे.. भविष्य आहे.
भविष्याची चिंता आहे.
आपली सांगड तशी होऊचं शकत नाही कधी.
कळतं मनाला.
मग दुरून पाहात राहते तुझ्याकडे.
ते ही करायचं नाही असं ठरवलेलं असतं खरंतर,
पण एखाद्या अवघड क्षणी येतोस डोळ्यांसमोर..
तुझं ते येणं एकाचवेळी खूप दिलासादायकही असतं आणि खूप जीवघेणंही.
हे कसलं जगावेगळं नातं आहे?
कसला जगावेगळा बंध आहे, जो बांधून ठेवतोय..
उत्तरं नसलेले प्रश्न सगळे!
तुझ्या तटावर शांतता.. जीवघेणी
आणि माझ्या तटावर आर्तता.. केविलवाणी
खरंतर यातलं काही म्हणजे काही तुझ्याशी बोलायचं नाही हे ठरवलं होतं बरंका..
आपणही तुझ्यासारखंच वागायचं.
अंतर राखून
पण, हे बघ लिहतेच आहे पुन्हा काहीतरी
पाठवायचं नाही हे बुद्धी सांगतेय आत्ताही ओरडून पण, मला माहितीय ही मन नावाची गोष्ट येणारच आहे आडवी आणि घालून ठेवणारंय पुन्हा सगळा गोंधळ!
‘ही अनोखी गाठ कोणी बांधली
जाणीवांचा पूल कोणी सांधला
रंगली मेंदी नव्याने रंगली..’
खूप सुंदर गाणं आहे.
पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तुझी प्रचंड आठवण आली होती.
न राहवून मी ते गायलं. पाठवणार होते तुला.
पण नाही पाठवलं.
तू काय विचार करशील वाटलं.
अंदाजच लागत नाही अशात तुझा..
नुसत्या स्मायलींची भाषा किती दिवस डिकोड करत बसणार..
आता डोकं बधीर झालंय!
कान आतूर झालेयत.
पण त्यावर काही पडेल अशी अपेक्षा धूसर आहे.

आवरते आता हा फापटपसारा
अर्थ नसलेला.
कितीतरी न पाठवलेली पत्रं पडून आहेत. त्यात अजून एकाची भर
तशी मी दु:खात वगैरे नाही रे
पण, तुझ्या असण्याने जिवंत वाटायला लागतं, इतकंच!

पुरे आता!
थोडं जास्तच डोक्यावर चढवून ठेवलंय का मी तुला?

तुझी,
मी

सांज
https://chaafa.blogspot.com/?m=1

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users