सल, जन्माची . . .

Submitted by अलंकार on 7 April, 2021 - 08:10

सल, जन्माची . . .

"काय करायचं काय नक्की मी? कि ज्याने ते माझ्यासोबत असं वागणं सोडून देतील??"
आज भैरवीचा स्वतःवरचा सय्यम सुटला आणि एका कोपऱ्यात बसून ती आक्रंदत होती मनातल्या मनात. नकळत आसवांचा बांध फुटला आणि दोन महिन्यांपासून साठवलेलं सगळं अगदी सगळंच डोळ्यांतून बाहेर वाहत होतं.

काय केलंय इतकं असं मी?? साखरपुडा मोडला इतकंच ना??
अरे तुम्ही लोकांनी ठरवलेला मुलगा दारू पितो हे कळलं म्हणूनच तोडलं ना ते नातं मी, कि हौस होती मला स्वतःवर डाग लावून घ्यायची?

कसंतरी आई बाबांना हट्ट करत करत एम.ए केलं, तेही ह्या अटीवर कि शिक्षण घेतावेळेस जर चांगलं स्थळ आलं तर लग्नाला नकार देणार नाही, मान्य केलं ना ते मी? केलं ना?
मला शिकायचं होतं, मी जिद्दीने शिकले, अरे कुणी कौतुक तर सोडा आई बाबांना सोडून अजून कोणाला दखल देखील नाही कि मी संपूर्ण कॉलेज मध्ये दुसरी आली.

मुलं पाहायला येतच होती तरीही नोकरी मिळवली, तर काय ऐकायला मिळालं?? तेच जे शिक्षण घेता वेळेस ऐकायचे. मुलगी आहेस काय करणार ह्या शिक्षणाचं?? शेवटी करावं लागणार काय? तर स्वयंपाक, घरची कामं, आणि भाकऱ्या.

मी ते सगळं जमेल तसं करूनच जायचे ना कॉलेजला आणि जॉबला देखील, तरीही हे सगळं ऐकावंच लागायचं आणि ऐकायचे मी, का???

कारण माझे आई बाबा माझ्या बाजूने नव्हते, माझ्या विचारांच्या बाजूने नव्हते, माझ्या स्वप्नाच्या माझ्या आनंदाच्या बाजूने नव्हते.
ते देखील ह्याच विचारांचे, इथेच वाढलेले, ह्याच बुरसट विचारांच्या समाजात मोठे झालेले.
त्यांचीही जवळपास तीच मतं, समाजापुढे जायची हिम्मत नाही, काही बोललो तर मुलगी ह्याच समाजात खपवायची आहे ना, समाजासारखं वागलं नाहीतर कोण आणणार स्थळ तिच्यासाठी???

लग्न लग्न लग्न?? ह्या एकाच कारणासाठी जन्माला येतो का आम्ही?? जन्माला आल्यापासून आई बापाच्या डोक्यात एकच विचार मुलीचं लग्न.
माझ्या मुलीचं लग्न झालं कि मी मोकळा. इतका जड असतो एका मुलीचा जन्म आई बापासाठी??

का म्हणून मी त्यांच्या चुकीच्या चालीरीतींना बळी पडायचं??
'विशीच्या आधीच उरकलेलं बरं बाबा, नाहीतर कठीण होऊन बसतं. आमच्या हिचंच बघा ना, विशीची व्हायला एक वर्षाचं गुटगुटीत बाळ आहे तिला, मुलगी एकदा का लग्न होऊन गेली म्हणजे बापाच्या जगण्याचं कर्ज फिटलं म्हणायचं'
हे हे असले विचार असलेल्या समाजासाठी, त्यांनी मला चांगली म्हणावी यासाठी त्या दारुड्या सोबत संसार करायला हवा होता का??

काय तर म्हणे चौदावी शिकलाय, घरच्या जबाबदारीमुळे पुढे शिकता नाही आलं त्याला, पण चांगला कमावतो, घर दार आहे स्वतःचं, दोन शेतं आहेत आणि घरची माणसं शोधून मिळणार नाहीत इतकी चांगली आहेत.

ऐकलं सगळं, ठरवलं लग्न, साखरपुडा केला.
एकदाही एकांतात बोलता आलं नाही त्याच्याशी, ना त्याचा स्वभाव माहिती ना त्याच्या सवयी, फारतर चार वेळा पहिला आणि बोललो तेही काय तर
एकदा त्याने नाव विचारलं तेव्हा आणि दुसऱ्यांदा सारखपुडा ठरवायला आला तेव्हा, तेही काय "चहा छान झालाय"
इतकंच.

झाला साखरपुडा. नवीन मोबाईल दिला त्याने गिफ्ट, एकमेकांशी बोलायला हवं बॉण्डिंग पाहिजे म्हणून व्हाट्सअप वर बोलायला लागलो तर ह्या चौदावी शिकलेल्या माठाला साधा CUTE शब्दाचा अर्थ माहित नाही.
मेसेज चा रिप्लाय करायला ऑनलाईन असून देखील उशीर,
बरं दुसर्यांसोबत बोलत असेल म्हटलं तर हा टायपिंग करतोय.
विचारलं असं का?? तर म्हणाला मला आवडत नाही असं मेसेजवर बोलायला आणि इंग्लिश जास्त येत नाही.
ठीक ऐकलं.
फोनवर बोलूयात. बोलायला लागलो तर ह्याची भाषा पार जुन्या म्हातार्यांना लाजवेल. काय बोलतो ते कळायचं देखील नाही काही वाक्य.
एकदा भेटलो दोघे, एका बाकावर बसून सहजच म्हणून विषय काढला 'मी पुढे जॉब चालू ठेवू शकते ना?'
त्याचे विचार ऐकून धन्य झाले आणि मुकाट्याने घरी आले.

जे आहे ते आहे, आई बाबांनी मला इतकं तरी मनासारखं जगू दिलं आहे, त्यांच्यासाठी ह्याच्यासोबत ढकलेन मी आयुष्य कसंतरी विचार केला आणि लग्नाच्या तयारीला लागले.

ब्लाउज बनवायला दहावीला सोबत होती त्या मैत्रिणीकडे गेले तर तिचा नवरा देखील होता घरी, माझं त्यांच्यासोबत काही खास कनेक्शन नसल्याने मी त्यांना साखरपुड्याला बोलावलं नव्हतं, लग्न ठरल्याचं त्यांना सांगेन आताच असा विचार मनात आणि शब्द ओठांवर येतंच होते तर
तर तिचा नवरा म्हणाला " भैरवी रागावू नकोस पण तू इतकी शिकलेली असून देखील ह्या मुलाला पसंत केलं? माझ्यासोबत होता दहावीला, नापास झाला आणि शिक्षण कायमचं सोडलं त्याने, दहा बारा हजार जीवावर कमावतो, त्यात घरचं हि काही खास नाही गं, काळजी वाटली म्हणून विचारलं, तुला हे सगळं माहित असून तू होकार दिलास??"

पायाखालून जमीन सरकते म्हणजे काय होतं ते त्या क्षणाला कळलं मला, उद्या येते म्हणून कापड तिथेच टाकून घरी आले.
आधी त्याला फोन लावला, जे मी ऐकलं ते खरं आहे का? विचारलं, तर आधी उडवा उडवी करायला लागला, मी कोणत्याही अगदी कोणत्याही सेमीस्टरची रिजल्ट मागितली, तर खड्या आवाजात म्हणाला "दहावी नापास आहे मी, पुढे शिक्षण नाही घेतलं, बस्स. हे ऐकून तू काय लग्न मोडणार आहेस? (आणि हळूआवाजात एक छद्मी हास्य)"

खाड . . .
मुलगी म्हणून जन्माला आले ह्याबद्दल आज खरा चपराक खाल्ला मी.
आवाज इतका जोरात होता त्या चपराकाचा कि फोन हातातून पडलेला आवाज माझ्यापर्यंत आलाच नाही. फोन तुटून तुकडे सर्वत्र पसरले, माझ्या आयुष्यासारखे, असा तुटला कि जोडणं अशक्य वाटलं माझ्या स्वप्नांसारखं.

पूर्ण रात्र रडून काढली, आई बाबाने विचारलं तर सांगायची हिम्मत नाही.
रात्रीचे सव्वा अकरा वाजले बाबा जोरात ओरडले "काय झालं सांग नाहीतर जीव घे आमचा"

उठले जुना फोन घेलता आणि पाठ झालेल्या त्याच्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं " साखरपुडा मी मोडत आहे, उद्या येऊन तुझ्या वस्तू आणि भेटी घेऊन जा"

खाड...
हि चपराक जास्त लागली, गालापेक्षा मनाला, कारण ती आईने मारली होती.

ती पुढे काय बोलायच्या आधीच मी सांगून टाकलं, जे मला कळलं त्याच्या विषयी आणि जे तो बोलला ते.
ते काहीच बोलले नाहीत आणि निघून गेले झोपायला.

सकाळी आठलाच पंचवीस माणसांचा फौजफाटा घेऊन तो माठ माझ्या घरात.
मी सगळ्या वस्तू आणून समोर ठेवल्या, त्या उडवून म्हणाला आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे, आमची इज्जत गेली त्या बद्दल आणि साखरपुड्याच्या खर्च देखील.

मी क्षणाचाही विलंब न करता कानफटात वाजवली त्याचा.
खूप गोंगाट झाला, ज्यांनी स्थळ आणलं होतं ते आई बाबाला नको नको ते बोलले, मला तर काय काय बोलले असतील हे शब्दांत सांगण्या पलीकडे आहे.
खूप लोकं जमले तमाशा बघायला, माझेच शेजारी त्यांच्या बाजूने बोलत होते, काहीतरी म्हणत होते माफी मग आणि लग्नासाठी पायांवर पडा त्या लोकांच्या, शेवटी आपण मुलीवाले.
आई बाबांनी तसं काही केलं नाही, न ते माझ्या बाजूने धड बोलले ना त्यांची माफी मागितली फक्त तमाशा करू नका अब्रू जाईल इतकंच बोलत राहिले.
एकाने बाबांची कॉलर पकडली तेव्हा मात्र सगळं सध्या टोमण्या पासून ते अश्लील शिव्यांपर्यंत ऐकून घेऊन मी त्या माणसाला लोटून दिला आणि आई बाबांच्या पुढे उभी राहून फसवणुकीची केस करेन आणि इथे आलेल्या एकेकाला तुरुंगात टाकेन म्हटल्यावर वातावरण निवळत गेलं आणि एक एक जण काढता पाय घेऊ लागला.
जाता जाता तो मुलगा म्हणाला " तुझं इतर कुठेही लग्न जमणार नाही याची पुरेपूर काळजी घेईन मी"

झालं माझं चारित्र्य, माझं शिक्षण, माझा स्वभाव, माझा जॉब, माझं मी पण सगळं झाकणारा डाग माझ्यावर लागला "जमलेलं लग्न मोडलेली मुलगी"

झाले २ महिने ह्या गोष्टीला, ज्यांनी लग्न जमवलं होतं ते माझ्या तोंडाकडे पाहत नाहीत, शेजारची बोलत नाहीत, किती निलाजरी मुलगी आहे ह्या नजरेने सगळे पाहतात.
शेजारच्या लग्नाच्या मुली देखील माझ्यासोबत बोलत नाहीत, पाहतच नाहीत माझ्याकडे.
माझे काका काकी, मामा मामी अजून खूप जण बोलतच नाहीत माझ्यासोबत.
अजिबात फरक नाही पडला मला पण आई बाबा देखील गप्पच असतात बोलत नाहीत पाहिल्यासारखे, जुजबी अगदीच गरज पडली तरच बोलतात.

असल्या पोरीला शिकवली म्हणून हे दिवस दाखवले तिने, लफडं असेल तिचं बाहेर, कॉलेज ला जाऊन हेच तर करतात, पळून जाईल बघा थोड्या दिवसांनी, वैगेरे वैगेरे.
गावात सगळीकडे जो तो हेच म्हणाला पण मला काय वाटतं, मी असं का केलं कुणी विचारलं नाहीच उलट मलाच नाव ठेवली.

शेजारच्या काकाच्या छोट्या मुलीनं हट्ट केला, मीही येणार तुझ्यासोबत बाहेर, बोलतच होते तिच्यासोबत तर काकीने झटक्यात तिला आत खेचून नेलं आणि जोरात म्हणाली 'खबरदार जर पुन्हा तिच्या सोबत कुठे निघालीस तर...तुही तिच्या सारखी वागशील'. . ..
का वागली ती अशी आज??? मी काय पढवणार होते त्यांच्या इवल्याश्या मुलीला??

मान खाली घालून जायचं आणि खाली ठेऊन च यायचं असंच वागले मी, कोणाकडे पाहिलं नाही कि कोणा मुलाला आयुष्यात येऊ दिलं.
कुणी विचारलंच नाही असं अजिबात नव्हतं पण ते प्रेम वैगेरे माझ्यासाठी नाहीच आहे माहित होतं मला, त्यामुळे आईबाबांना लोक नाव ठेवतील, नको नको ते बोलतील म्हणून त्या गोष्टींकडे पाहिलंच नाही कधी.
आई बाबाना कुणी नाव ठेवणार नाही असेच कपडे घालते नेहमीच
कोणासाठी वागले मी तशी?? आई बाबांच्या साठीच ना?? माझा स्वतःचा विचार मी करू शकत होते पण मी नाही केला, का??? कोणासाठी??

आई बाबांसाठीच ना, मग का ते माझ्या बाजूने ठाम नाहीयेत?? का मला नाव ठेवणाऱ्याला दटावून बोलत नाहीयेत, का ते माझ्या तोंडावर बोलत नाहीयेत कि तुझी चूक नाहीये ह्यात.
का पाहिल्यासारखं वागत नाहीत, का बोलत नाहीत नीट?? मला त्रास झालाच नसता इतर कोण काय बोलतो याचा जर माझे आई वडील ठामपणे माझ्या बाजूने असते तर...

काय मिळालं मला इतकं सय्यमी आणि सोज्वळ वागून??
हे असलं जगणं? माझी काय चूक ह्यात??
मुलगी म्हणून जन्माला आली हीच. . . हो चुकलेच मी मुलगी म्हणून जन्माला येऊन . . .

( सत्य घटनेवर आधारित आहे, जमेल तसं तिची घुसमट शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केलाय, काही चुकलं असेल तर माफ करा )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद.
काश. . . हे १९६० पर्यंतच मर्यादित असतं, काही ठिकाणी काही मुलींना अजूनही हे सगळं सहन करावं लागतं, तरीही बरंय स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची हिंमत आणि मुभा आलीये सगळ्यांना.

बापरे कठीण आहे
मुलीला शहरात नोकरीसाठी आल्यावर, काही काळ राहिल्यावर मनासारखा साथी नक्की मिळुदे. ही गोष्ट खेडेगावातली वाटते आहे.

मुलीने नुसतं शिकून उपयोग नसतो,त्या शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरी करण्यासाठीच व्हायला नको.असा दारुडा आणि 10th नापास असून 14वी शिकलोय असं खोटं सांगणाऱ्या मुलाला ती मुलगी चारचौघात ठणकावून सांगू शकत नसेल,त्याचा खोटेपणा उघड करू शकत नसेल,वाचवचा बोलणाऱ्या आजूबाजूच्या लोकांची तोंडे बंद करू शकत नसेल,अगदी काहीच जमत नसेल तर निदानwho cares असा अप्रोच ही ठेवता येत नसेल तर तिच्या शिक्षणाचा उपयोग फक्त उपजीविका मिळवण्यासाठी झालाय,सक्षम होण्यासाठी नाही असं मी म्हणेन

अगदीच माझं देखील हेच मत आहे, शिकून काय उपयोग, जर अशिक्षित लोकांच्या चुकीच्या विचारांखाली मरायचं असेल तर.