सुनसान होते

Submitted by निशिकांत on 1 April, 2021 - 06:44

आठवांचे केवढे थैमान होते
वर्तमानी वाटले सुनसान होते

मागण्या आले मतांचे दान होते
घोळणारे शेपटी ते श्वान होते

घोषणा ऐकून हरले भान होते
स्वर्ग ते देतील हे अनुमान होते

काढला टक्का नि मी भयभीत झालो
शिक्षितांमध्ये किती नादान होते

चौकशीचे देउनी आदेश झाले
रत्नजडितांचे किती अपमान होते!**

दहशती करतात ते नापाक सारे
काय त्यांना? पर्व ते रमजान होते

का विरोधक भडकती अन् तोल सुटतो ?
सैनिकांचे जर कधी गुणगान होते

बैठकीमध्ये निघाला मार्ग नाही
वाद झाले, वाढले तपमान होते

कष्ट केले वाढवाया लेकरांना
आव असतो, ते खरे श्रमदान होते

वादळाने दावले आमिष तरीही
शांततेने राखले ईमान होते

केवढ्या "निशिकांत"जखमा काळजाला!
ठेवला विश्वास ते बेमान होते

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागा X ३
** लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची चौकशी करायचे मधे घाटत होते. या घटनेने घायळ होऊन लिहिलेला शेर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users