अदाबेगम - भाग एक

Submitted by बिपिनसांगळे on 29 March, 2021 - 02:06

अदाबेगम
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सैंया तू झूठीयां
मोह माया ये दुनिया
दौलत नाही तो
कुछ भी नाही
उसके बिन तो
साथ भी छुटियां

अदाबेगम मखमली आवाजात गात होती. तिच्या दालनात बसलेले शौकीन त्या संगीतस्वर्गात भान हरपून गेले होते. तिच्या तानेसरशी, माना डोलत होत्या. तिच्या पदन्यासासरशी नजरा हालत होत्या. तिच्या फिक्या गुलाबी रंगाच्या लेहेंग्याच्या फिरकीसरशी नजर गिरकी घेत होती . साजिन्द्यांनी मध्येच वाजवलेल्या द्रुत लयीवर होणाऱ्या तिच्या वेगवान , मोहक अदांनी तिच्यावर नजर ठरत नव्हती . तबलजीचा हात वेगाने थाप टाकत होता की तिची पावलं ,सांगणं मुश्किल होतं !
ते दालन उत्कृष्ट सजवलेलं होतं. रंगीबेरंगी हंड्या अन झुंबरांनी त्याच्या शोभेत भरच पडत होती . आलेल्या दिवाण्यांसाठी लोड-बिछायती होत्या .त्या लोकांनी लावलेल्या उंची अत्तरांचा वास दरवळून वातावरण धुंद करत होता .
मद्याचे प्यालेच्या प्याले रिते होत होते. गडीमाणसं मद्याची आणि हुक्कापाण्याची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करत होती .
मध्येच तिची नजर सलिमजीकडे जात होती. त्याच्या पेहरावावरून श्रीमंती झळकत होती. त्याचे उंची रेशमी कपडे , त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या माळा, त्याच्या बोटांमधल्या जाड जाड अंगठ्या आणि गळ्यात रुळणारा बेशकिमती हिऱ्याचा कंठा पाहणाऱ्याचं लक्ष ओढून घेत होता.
बाहेर अंधार असला तरी तिच्या त्या डोळे दिपवणाऱ्या दालनात शमादानं तळपत होती. आणि त्या प्रकाशात अदाचा साजशृंगार लखलखत होता !
अदाबेगम कोठेवाली म्हणजे सुरत शहराची विलासी शान होती ! तिच्या वाड्यामध्ये ऐऱ्यागैऱ्या माणसाची पाय टाकण्याची हिम्मतच होत नसे. सुरतमधल्या मोठ्या मोठ्या असामीच काय त्या तिच्याकडे पायधूळ झाडायच्या .
अदा होतीच तशी . खूबसूरत ! गौरगुलाबी ! आरस्पानी सौन्दर्याची नाजूक पुतळीच जणू ! नावाला साजेशी ! तिच्या देहात अदा भरलेली होती आणि वागण्यात आदब ! आणि यावर सरताज म्हणून खुदाने तिला कोकिळकंठीही केलं होतं . पण एक होतं- तारुण्याने मुसमुसलेली , मिठ्या आवाजाची मलिका असलेली अदा गिऱ्हाईकाला पागल बनवण्यातही खूब तरबेज होती.
गिऱ्हाईकांना लुटून लुटून जमा केलेली दौलत तिच्या देहावर झळकत होती. तशीच तिच्या संखेडा लाकडाने सजलेल्या कोठीवरही. सुरतमधल्या धनिकांच्या हवेल्यांशी स्पर्धा करणारी तिची कोठी होती. लाकडात केलेली कलाकुसर नजर खिळवणारी होती.
बाहेर असाच तिचा एक जुना आशिक आला . विरमजी पारेख . तिने ज्याला पार खाक बनवला होता . त्याच्या झोकांड्या जात होत्या . त्याचा अवतार पाहवत नव्हता . तो दरवाजावरच्या तिच्या हत्यारबंद पहारेकऱ्यांशी हुज्जत घालत होता - त्याला आत यायचं होतं . त्याला तिचं गाणं कानात साठवायचं होतं, तिचं रूप नजरेत भरून घ्यायचं होतं ; त्या साठी तो तरसला होता.
त्यांनी त्याला धक्के मारून हुसकावून लावलं. कंगालांना तिच्या कोठ्यावर प्रवेश नव्हता.
अदाच्या स्वराला, ती गात असलेल्या मुजऱ्याच्या लफ्जांना आज एक दु:खी किनार होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं .पण क्षणभरच … तिने ते पाणी एका मोहक हालचालीत पुसलं . तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. शेवटी ती एक कमालीची अदाकारा होती !
अदाला आता कोणी नव्हतं . ज्या नूरआपाने तिला मोठं केलं होतं , नाचगाण्याची तालीम दिली होती,तिला जाऊन फक्त दोन आठवडे झाले होते. आणि आज अदा मुजऱ्यासाठी पुन्हा उभी राहिली होती .
बुढा बाबुलजी उत्कृष्ट सारंगीया होता. सारी उमर त्याने त्यात घालवली होती. त्याने सारंगीवर शेवटचे भैरवीचे स्वर वाजवले व ती बाजूला ठेवली. तबलजीही थांबला. गाणं संपलं.
मैफल थांबली तसा सलीमजी बोहरा उठला . गळ्यातला हिऱ्याचा मोठा किमती कंठा तो अदाच्या गळ्यात घालायला गेला. कंठा गळ्यात घातला अन तो लडखडला. अदाने त्याला सावरलं . तिच्या मिठीत झुकलेल्या त्याच्याकडे तिने एक मादक कटाक्ष टाकला. त्या घायाळ करणाऱ्या नजरेने त्याच्या नशेची खुमारी दुगनी झाली .
सध्या दौलतजादा करण्यामध्ये त्याची बरोबरी करायला कोणी धजत नव्हतं . भल्याभल्यांची त्याच्यापुढे माघार होती. रोजची गिऱ्हाईकंसुद्धा म्हणू लागली होती की हा पुरता पागल झालाय म्हणून . याला अदा कंगाल करून सोडेल …लवकरच . जसं तिनं कित्येकांना याआधी केलंय .
म्हणून तर बेपारी नसली तरी शहरातल्या आमिरांच्या यादीत तिचं नाव वर होतं. !
बाहेर पौषातली थंडी असली तरी आतमध्ये उबदार होतं… आणि मिठीत तर जास्तच ऊबदार !
थंडी भरात होती आणि जवानीही ... दोघांची !
*******
औरंगजेबाने शाहिस्तेखानाला महाराष्ट्रात पाठवलं होतं. शिवाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी.त्याला ते काम जमलं तर नाहीच ; पण स्वतःची तीन बोटं मात्र गमावून बसला तो लालमहालात.
पण त्याने मराठी मुलुख मात्र मारला,लुटला. उध्वस्त केला. कंगाल केला. गोरगरिबांना मारलं. बायाबापड्यांच्या इज्जतीला तर काही अर्थच राहिला नाही . साधीसुधी माणसं भिकेला लागली. अन त्यांना भीक तरी घालणार कोण? सगळ्याच घरांचे वासे फिरलेले. राज्याचा महसूल उणा झालेला.
राज्यशकट चालवायचा कसा ? फौज पोटावर चालते, तिला बुलंद करायचं कसं ? द्रव्य गोळा करणं अपार गरजेचं होतं. शिवाजी महाराजांनी यावर मसलत काढली.
आणि एक नाव पुढे आलं. सुरत !....
सुरत बंदर हे मोगल राजवटीमधलं मोठं व्यापारी केंद्र होतं. पैसा नुसता पाण्यासारखा वाहत होता . मोठं धनिक शहर. धनाढ्य व्यापाऱ्यांची संख्या मोठी. देशोदेशींचा व्यापार तिथून चालायचा. पोर्तुगीज , वलंदेज, टोपीकर आणि फ्रांसिसी यांचा तिथे सारखाच राबता असायचा.
बहिर्जी नाईक महाराजांचा खास गुप्तहेर. चलाख बहुरूपीच ! त्याने खुद्द सुरतेत राहून सारी खबरबात काढलेली. धनिकांची यादीच तयार केलेली.
सुरतचा सुभेदार होता इनायतखान. त्याने कागदोपत्री सुरतच्या रक्षणासाठी पाच हजारांची फौज दाखवलेली. मोगल बादशहा औरंजेबाकडून तो पाच हजार फौजेचा खर्च घेत होता ; पण आतून लोच्या होता ! प्रत्यक्ष फौज होती हजाराचीच.
कामगिरी सोपी होती !...
मोगल सत्तेला तडाखा बसणार होता. त्यांचा व्यापार - उदीम थंडावणार होता. सारे फिरंगी बादशहावर नाराज होणार होते . राजांना धनप्राप्ती होणार होती.
आणि एक गोष्ट होती - त्या बंदरातुन गुलामांचा व्यापार चालायचा. देहाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा, ठिकठिकाणाहून पळवून आणलेल्या आयाबहिणी तिथे देहव्यापाराच्या जहन्नुममध्ये ढकलल्या जायच्या. तिथून देशी-परदेशी पाठवल्या जायच्या. आपापल्या मुलखाला त्या कायमच्या परक्या व्हायच्या .
महाराजांना तेही सलत होतंच.
आणि ठरलं !
सुरतची बदसुरत करायचं ठरलं.
*******
तरणाबांड, देखणा सलिमजी बोहरा हा सुरतमधल्या एका अतिश्रीमंत व्यापाऱ्याचा वाया गेलेला पोरगा होता. त्याच्या अब्बाने त्याला वेगळी पेढी काढून दिली होती. पण कारोबार सोडून सध्या त्याची जान अडकली होती अदामध्ये !
रोज तो अदाबेगम कोठेवालीकडे यायचा. खूब दौलतजादा करायचा. आशिक झाला होता तो तिचा. अदाला वाटू लागलं होतं की तो तिच्यासाठी जान छिडकतो.
पण तिला आताशा या जिण्याचा वीट आला होता . गाण्याबजावण्याची घिन आली होती. नूरआपा गेल्यापासून तिला फार एकटं वाटू लागलं होतं . विश्वासानं कोणाच्या खांद्यावर मान ठेवावी असा भक्कम आधार नव्हता.
आज सलिमजी तर उद्या आणिक कोणी . सगळे पुरुष एकसारखेच वाटू लागले होते तिला . तिचा जीव रोजच्या त्याच त्याच, तसल्या जिंदगीला उबगला होता . तिला वाटायचं ,मर्द समजतात हे साले स्वतःला ; पण आपल्या जिंदगीला पुरेल असा एकही खरा मर्द नाही. तरी नकळत, तिच्या मनाचा पारवा सलिमजीभोवती घुमत होता.
बाबुलजी एकदा तिला म्हणाला , जोवर जवानी आहे तोवरच पैसा !... बाबुलजी तिला अब्बासारखा होता . ती त्याच्या समोरच मोठी झाली होती. त्यालाही कोणी नव्हतं. नूरआपाच्या मागे तोच होता आता तिला.
सलिमजी म्हणजे पक्का बेपारी होता. तो अदाकडून त्याची पै न पै वसूल करायचा. सध्या तर त्याची शाम आणि रात म्हणजे अदा झाली होती.
ज्या दिवशी त्याने तो हिऱ्याचा कंठा दिला , त्या शामला तर तो पीत होताच; पण मैफिल संपल्यावर तर तो वेड्यासारखा आणखी झोकत होता . त्याचं पिणं पाहून अदाला त्याची कीव येत होती. त्याचं अधाशीपणे खाणं- पिणं आणि त्याहून नंतरचं त्याचं ओरबाडणं पाहून तिची तबियत नरमच झाली होती.
मुडद्यासारख्या शेजारी पडलेल्या सलिमजीला पहात, पुरुषजातीचा विचार करत ती, पडली होती . केव्हा तरी पहाटे तिचा डोळा लागला .
बाहेर काय आफत कोसळलीये याची त्यांना खबरच नव्हती.
*******

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे .

पुढील भागही टाकला आहे आणि पटपट टाकणार आहे .
कथा सादर केलीये बाकी रसिकांची मर्जी .

धनवंती
सुरत म्हणले की मलाही न बऱ्याच जणांना महाराजच आठवत असतील

आंबट गोड
आभार
आशा आहे की कथा पुढे वेगळी वाटली असेल