जो तो त्रयस्थ आहे--( वीक एंड लिखाण. )

Submitted by निशिकांत on 27 March, 2021 - 11:31

मी मूळचा मराठवाड्याचा रहाणार. मी नोकरी निमित्ताने जरी खूप भ्रमंती केली असली तरी माझे बालपण, शिक्षण आणि संस्कारक्षम आयुष्य तेथेच गेले. माझ्या जीवनाचा पाया हा गरीब आणि मागासलेल्या भागातच आहे.
हे मराठवाड्यातील कुठेही आढळणारे दृष्य आहे जेथे मध्यभागी एक मोठे प्रशस्त अंगण आणि त्याच्या भोवताली चारही बाजूला छोटी छोटी एक किंवा दोन खोल्यांची घरे. अर्थात या अशा वस्तीत ( ज्याला चाळही म्हणले जायचे) आर्थिक दृष्टीने दुर्बल लोकच रहायला असत. हे वाचताना कसे उबगल्यासारखे वाटतेय ना! पण इथल्या जीवनाचेच पदर मी उल्गडणार आहे आज.
येथे लोक जातपात विसरून गुण्यागोविंद्याने रहातात. जीवनशैली प्रवाही आणि खळखळणारी असते. येथील सर्व वस्ती म्हणजे एक जंबो कुटुंबच असते म्हणा ना! येथे घराखिडक्याला पडदे क्वचितच असत. म्हणून वागण्यातही आडपडदे मला कधी दिसले नाही. सगळे कसे पारदर्शी. शहरी घरात नवरा बायको जर भांडत असतील तर बायको म्हणते जरा हळू बोला की! शेजारीपाजारी ऐकतील. म्हणजे भांडायला हरकत नाही पण शेजार्‍यांनी ऐकू नये ही अपेक्षा. तेथील कांही मजेशीर किस्से असे:
--जर कुणाच्या घरातून खमंग कांदा भजे तळल्याचा वास आला तर शेजारी त्यांच्या दारातूनच जोरात विचारणार दिगंबरराव, भजे तळल्याचा वास येतोय, भाऊ आला की काय? दिगंबराव आपल्या घरातूनच सांगणार बायकोचा भाऊ आलाय म्हणून भजे. माझ्या भावासाठी कुठे बनतात भजे? दिगंबररावांची पत्नी पण अशा टोमण्याने नाराज होत नसे.
एकदा एका घरात मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होता. मुलगा आणि त्याचे नातेवाईक आले मुलीला पहायला. सगळे मिळून आठ दहा माणसे. हा कार्यक्रम जवळजवळ एक तास चालला होता. ही बातमी सगळीकडे आधीच पसरली होती. किती तरी लोक कारण नसताना त्यांच्या घरासमोरून जायचे आणि हटकून डोकावून बघायचे मुलगा कसा आहे ते. यात कुणालाही गैर वाटत नव्ह्ते हे विशेष! सांगायचे म्हणजे जेंव्हा या मुलीचे लग्न झाले आणि ती सासरी जायला निघाली, तेंव्हा सर्व शेजार्‍यांचे डोळे ओलावले होते. हे बघून माझ्या मना आले की ती मुलगी फक्त तिच्या आईबापांची नसून पूर्ण चाळीची होती.
--गुरुवारची भजने, गौरीचे हळदी कुंकू सारी कशी धमाल असायची.
--एका घरात रोज रात्री जेवणे आटोपली की ४/५ कुटुंबातील लोक एकत्र जमायचे आणि पुलंची पुस्तके वाचायचे म्हणजे एकजण वाचणार आणि बाकी ऐकणार . हा कार्यक्रम एक तास चालायचा आणि सहाजीकच सप्तमजली हास्य पण. शेजार्‍यांनी कधीही तुसडेपणाने आमची झोप मोडते ही शिकायत केली नाही.
या असल्या जीवनाचा आस्वाद घेतलेले आस्मादिक (मी) पुणे शहरात स्थलांतरित झाले कायम स्वरूपी. वातावरणात जमीन अस्मानाचा फरक होता. जीवनाच्या गाडीची रूळ बदलताना व्हावी तशी खडखड सुरू झाली. एक नवीन जीवन, नवीन एकलकोंडे आत्मकेंद्रीत. खूप गुदमर व्हायचा सुरुवातीला. आता रुळलोय इथल्या जीवनाला. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे ही खासियत आहे मानवी स्वभावाची.
पण आल्या आल्या ज्या मनात भावना होत्या त्यांना व्यक्त करण्यासाठी मी एक गझल लिहिली होती. ही गझल मी अगदी नव्याने गझला लिहायला सुरुवात केली तेंव्हा लिहिलेली आहे. आज जाणवते की त्यात भरपूर चुका आहेत. पण मी शक्य असूनही दुरुस्त नाही केल्या चुका. या गझलेशी माझे भावनिक नाते आहे म्हणून छेडछाड टाळतो आहे. प्रस्तूत आहे ती गझल. माझा कुणाचीही आणि कुठलीही टिका करण्याचा हेतू नाही. जे मनात आले ते लिहिले एवढेच! गझल आनंदकंद या वृत्तात आहे.

माझ्या सभोवताली जो तो त्रयस्थ आहे
कोषात बंद जगण्या, जो तो व्रतस्थ आहे

बोलू नये कुणाशी संकेत आज इथला
शेजार धर्म गेला होऊन अस्त आहे

संकूल मम घराचे वस्ती हजार आहे
येथे स्मशान शांती घालीत गस्त आहे

संवाद, हास्य नसता सांगा कसे जगावे ?
जो तो मुकेपणाने दिसतोय त्रस्त आहे

संकेत लिफ्ट मधला पंख्याकडे बघावे
परिचय नको म्हणूनी करतो शिकस्त आहे

जाणीव, कळवळा हे नाहीत शब्द येथे
रुतबा, अमीर असणे याचेच प्रस्थ आहे

मदतीस धावता मी, तोडून कायद्याला
हिणवून सर्व म्हणती मी "एड ग्रस्त" आहे

फुरसत कुणास आहे ? देण्या मृतास खांदा
म्हणुनीच "स्वर्ग रथ" हा पर्याय मस्त आहे

"निशिकांत" सोड इथले श्रीमंत ते खुराडे
खळखळ हसून बोलू, जग हे प्रशस्त आहे.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र . ९८९०७ ९९०२३

 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ye ajun eak punyat yayche settal vhayache ani punyalach nave thevaychi
nishedh

कदाचित खरं असेलही...
सुरवातीला थोडं कमीजास्त सगळीकडे वाटतं...
पण जिथे आपलं Bread butter ते गाव आपलं, असं ठरवल्यावर रूळायला सोपं गेलं...

फक्त पुण्यात च असं नाही.आपलं मूळ गाव सोडून दुसरी कडे गेले कि असंच वाटत असावं.
पण जिथे आपलं Bread butter ते गाव आपलं, असं ठरवल्यावर रूळायला सोपं गेलं...>>>>>>> सहमत.