द्विपा ( iland) कन्नड चित्रपट परिचय आणि रसास्वाद - सकाळ मधे प्रसिदझा;झालेला लेख

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 21 March, 2021 - 13:17

द्विपा ( iland)

सुप्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचा कन्नड भाषेतील द्विपा हा २००२ सालचा चित्रपट. याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला ( कादंबरीचे लेखक :- एन डिसोझा ). दोन national awards , चार कर्नाटक स्टेट फिल्म अवार्ड आणि तीन फिल्म फेअर अवार्ड साउथ अशी विविध पारितोषके मिळाली होती.
हि कथा घडते सीता पर्वत नावाच्या एका बेटावर. सभोतली दुथडी भरून वाहणारा निसर्ग, मधे नदीचा शांत प्रवाह, पावसाची होत असलेली संतत धार आणि आजूबाजूला विखुरलेली मोजकीच घरे. या मोजक्या घरांपैकी एक घर आहे दुग्गाजीयाचे ( एम. वासुदेव राव ). दुग्गाजीया या वयस्कर माणसाला गणापी नावाचा मुलगा ( अविनाश ) आणि नागी नावाची सून आहे ( सौंदर्या). त्या छोट्याशा बेटावरील हे प्रतिष्ठित कुटुंब. पण हि प्रतिष्ठा पैशाच्या श्रीमंतीतून आलेली नाही तर मांगल्य , पावित्र्य या त्यांच्या कुटुंबात असणार्या उपजत गोष्टीमुळे लोकांनी त्यांना बहाल केलेली आहे. संकटे दूर करण्यासाठी लोक देवाला साकडे घालतात आणि त्यासाठी जर दुग्गाजीया किंवा गणापाने जर पूजा केली तर त्याला यश मिळते अशी त्यांची धारणा आहे. थोडक्यात, हे कुटुंब त्या बेटावरील लोकाच्या श्रद्धेचा भाग आहे.

मुसळधार पावसाने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. शासनाने पुराच्या धोक्याची घंटा केव्हाच दिली आहे . हळूहळू गाव खाली होत असले तरी दुग्गाजीया आणि त्याचे कुटुंब मात्र कुठेही जात नाही कारण एकच त्यांची देवावर श्रद्धा आहे. हळूहळू सर्व गाव रिकामे होते. आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी पोलीस एक दिवस दुग्गाजीया आणि त्याच्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षित ठिकाणी म्हणजे नागीच्या माहेरी स्थलांतरित करतात.

पण दुग्गाजीयाचे आपल्या बेटावर, घरावर प्रेम आहे. नागीच्या माहेरी त्याचे मन लागत नाही. दुग्गाजीयाच्या हट्टामुळे पुन्हा ते सर्व बेटावर येतात. नाही म्हण्याला नागीच्या आईने तिला सोबतीला तिचा दुरचा नातेवाईक कृष्णाला पाठवण्याची तयारी दाखवली आहे. नागी आणि गणापी दुग्गाजीयाच्या हट्टापोटी बेटावर परततात. आता त्या निर्जन बेटावर आहेत रौद्र रूप धारण करू पाहत असलेला निसर्ग आणि ते प्रतिष्ठित कुटुंब.
नागी बेटावर परतल्यावर पुन्हा त्या वातावरणाशी एकरूप होते. जर नशिबात मरण लिहिलेच असेल तर ते कुठेही येईल असे तिला वाटत असते. आणि त्याचमुळे ती आनंदात आहे. त्या दिवशी पावसाळी वातवरणात डोंगर दऱ्यांच्या मधून येणारे शेतकऱ्यांचे हलकेसे गाणे ती तल्लीन होऊन ऐकत आहे. डोळ्यात आहे तिचे स्वप्न. छोटासा का होईना जमिनीचा तुकडा असावा हे तिचे स्वप्न होते. स्वप्नात ती रममाण झालेली असतनाच कृष्णाचा आवाज येतो. तिच्या आईने तिच्या मदतीसाठी पाठवलेला हा तरुण मुलगा आहे. कथेला खरी सुरवात येथून होते.
कृष्णा स्वभावाने आनंदी आणि उत्साही आहे. त्याच्या बेटावरील आगमनाने इतके दिवस कंटाळलेली नागी सुद्धा उल्हासित होते. उत्साहाच्या भारात कृष्णा अनेक गोष्टी करत असतो. पण गणापि मात्र अस्वथ आहे. कृष्णाचा अति उत्साही स्वभाव आणि त्याची अव्याहत बडबड त्याला नकोशी झालेली असते.

त्या चौघांचे दिवस जात असतात पण पावसाला मात्र खंड नसतो. शेवटी दुग्गाजीयाच्या घराभोवती पाणी येतेच . तिघेही अवस्थ होत्तात. दुग्गाजीयाच्या विश्वासाला धक्का लागला म्हणून तो दु:खी आहे , गणापी आणि नागी चिंतेत आहे कारण घर पाण्याखाली गेले आहे. शेवटी बेटावर एका उंच ठिकाणी हेरंबा नावाच्या व्यक्तीचे घर आहे तिथे ते जाण्याचे ठरवतात.
कृष्णाचे वास्तव्य गणापीला नको आहे. म्हणून एक दिवस तो त्याला मुद्दाम नदीमधून त्याची गाय घरी घेऊन येण्यासाठी सांगतो. कृष्णाला त्रास देणे हाच त्याचा हेतू आहे. पण कृष्णा त्यालाही तयार होतो. मुसळधार [पाउस आणि नदीमध्ये कृष्णा पोहत आहे. काठावर नागी काळजीने बघत आहे आणि गणापी बेफिकीरपणे. शेवटी नागी नाव घेऊन पाण्यात जाते आणि त्याला मदतीचा हात देते.
घरी आता अंधार. मिणमिणता प्रकाश. गणापी हातात ढोलकी घेऊन हलकेशी वाजवत आहे. चेहऱ्यावरचे भाव छद्मीपणाचे, कृष्णा थंडीने कुडकुडत आहे आणि नागी त्याला कधी औषध देते आहे तर कधी त्याच्या अंगाला तेल लावत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निर्विकार आहेत. ती फक्त तिचा गृहिणी धर्म पार पाडत आहे. कृष्णा कावराबावरा झाला आहे कारण एका स्त्रीचा स्पर्श तो अनुभवत आहे. आणि गणापी .... मघाशी वाजणारी ढोलकी थांबते आणि त्याची जागा आता मनातल्या संशयाने घेतली आहे

या प्रसंगानंतर नवरा बायकोच्यात वाद होत्तात. कृष्णाला परत जायला सांग असेही गणापी नागीला सांगतो. पण सरकारचा मोबदला मिळेतो पर्यंत कृष्णा राहील असे नागी गणापीला सांगते. शेवटी गणापी जेवढा मोबदला मिळतोय तेवढे घ्यायचे ठरवतो. त्या दिवसापासून त्याची मानसिकता बदलते.

नदीमधून नावेतून परत येत असताना आगतिक होऊन तो नदीला प्रार्थना करतो “ आमच्याशी इतकी निष्ठुर होऊ नकोस” किंवा आपल्या वडिलांशी बोलताना तो सांगतो “ भगवती नदी आपल्याला बुडवणार नाही पण कृष्णा नक्की बुडवेल” या कारणासाठी आहे तो मोबदला त्याने स्वीकारण्याचे ठरवले आहे. दुग्गाजीया अर्थातच सही करत नाही कारण त्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे. आपल्या मुलाबरोबर तो देवळात जातो.
त्या देवळात दुग्गाजीयाला रात्रभर पूजा करायची आहे. गणापीला तो घरी जायला सांगतो. ज्या परमेश्वरावर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला, त्याच्याजवळ तो अजुनी कृपेची याचना करणार आहे. दुग्गाजीया तल्लीन होऊन पूजा करू लागतो.
त्याचवेळी घरी नागी आणि कृष्णा सारीपाट खेळत आहेत. हास्य विनोद करत त्यांचा खेळ चालला आहे आणि इतक्यात कृष्णाला एक सावली दिसते. घरात लावलेल्या शेकोटीपुढे गणापी चोरट्या पावलाने येऊन बसला आहे. नागी त्याला विचारते “ तुम्ही केव्हा आलात “ गणापी सांगतो “ जेव्हा तुमचा खेळ चालला असतो तेव्हा तुला काहीच दिसत नाही” उपहास, द्वेष सार्या भावना यातून व्यक्त होत्तात.

त्या रात्री तिघांची मनस्थिती निराळी आहे. नागीच्या मनात तरी काहीच नाही पण कुणी असा विचार करू शकत या विचाराने ती काळजीत आहे. गणापीची मानसिक अवस्था पूर्णपणे संशयी झाली आहे . आणि कृष्णा तसाच आनंदीपणे पहुडला आहे. एक गुमसुम वातावरण आणि साथीला असलेले पावसाचे टपटप थेंब. त्या पडणार्या थेंबाची कृष्णाला मजा वाटते. तो हातात भांडी घेतो आणि कधी हा थेंब तो कधी तो थेंब त्या भांड्यात पकडायचा प्रयन्त करतो. मनात चालणाऱ्या विचारांचे प्रतिक त्या भांड्याच्या आवाजातून प्रतिबिम्बित होत असते.
देवळात पूजेसाठी गेलेला दुग्गाजीया अजुनी परत आलेला नाही. दुसरे दिवशी नागी स्वत: त्याला बघण्यासाठी जाते. नावेतून जाताना दूरवर दिसणारे ते देऊळ आता पाण्याने वेढलेले आहे. नागी दुग्गाजीयाला आजूबाजूला बघते. पण दुग्गाजीया कुठेच दिसत नाही. देवळात त्याच्या अंगावरची वस्त्रे दिसतात. त्या पाण्यात परमेश्वराचा नि:सीम भक्त वाहून गेलेला असतो. थोड्याच वेळात आपल्याला अग्नीच्या ज्वाळा आणि पावसात भिजणारे गणापी आणि नागी दिसतात. असहाय नागी हंबरडा फोडते. हे केवळ दुग्गाजीया गेल्याचे दु:ख नाही तर मनात साठलेली सारी वेदना ती बाहेर ओकते आहे. कृष्णा तिचे सांत्वन करतोय आणि गणापीची नेहामिची कठोर नजर.

कृष्णामुळे घारातील वातावरण बिघडले होते. एक दिवस मनाचा हिय्या करून नागी कृष्णाला परत जाण्यसाठी सांगते. कृष्णा नाईलाजास्तव जातो पण जाताना तेथील बोट घेऊन जातो
. आता त्या घरात आहे फक्त गणापी आणि नागी. मदतीला कुणी नाही. ये जा करण्यासाठी लागणारी बोट सुद्धा कृष्णा घेऊन गेला.
.... त्या सूनसान रात्री नागी घराभोवती साठलेले पाणी काढत असताना तिला वाघाचा आवाज येतो. भोवती पसरलेल्या जंगलातून वाघ येण्याची पूर्ण शक्यता असते.नागी घाबरते. गणापी जवळ जाऊन काही करण्याबाबत सांगते. पण परिस्थिमुळे गणापी पूर्णपणे निष्क्रिय झालेला आहे. त्याला जीवनच नको इतकी निराशा आलेली आहे. त्यामुळे वाघ जरी आला तरी त्याच्यात फरक काहीच पडत नाही. वाघ आगीला घाबरतात म्हणून शेवटी नागी सर्व घराभोवती जाळ करते. जेणे करून वाघाला भीती वाटून धोका टळावा

दुसऱ्या दिवशी वाघाचा धोका तर टळतोच पण आश्चर्य म्हणजे पाउस थांबलेला असतो, संकट पूर्णपणे टळलेले असते. पण हे संकट कशामुळे टळले ? नागीचा विश्वास आहे तिच्या इच्छा शक्तीने तिला तारले तर गणापीचा विश्वास असतो त्याच्या भक्तीचा हा विजय आहे. नेमके कोण जिंकले याचा विचार नागी करत असतनाच चित्रपट संपतो.

या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला विविध पैलू आहेत. नागी इतकीच महत्वाची भूमिका आहे गणापियाची. सुरवातीला स्वभावात कोणतेच गांभीर्य नसलेला गणापिया आपल्या समोर येतो. गावात, घरात जर पाणी आले तर तुम्ही राहणार कुठे असा प्रश्न जेव्हा नागी विचारते तेव्हा दुर्योधन जसा पाण्यात राहिला तसा आपण पाण्यात राहू असे त्याचे उत्तर आहे. व्यवहारिक पातळीवर विचार करण्याची त्याची क्षमता नाही. सरकार जेव्हा मोबदला देत आहे त्या मोबोद्ल्यावर गणापी खुश नाही. गावात त्याचे घरदार नाही पण तरीही मोबदला त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे मिळावा अशी त्याची इच्छा आहे. नागीवर संशय घेणारा, किंवा आपल्याच नादात काळजीत राहणारा, मूकपणे कृष्णावर त्रागा व्यक्त करणारा, त्याला त्रास देणारा अशी गणापिची अनेक रूपे आपल्यला दिसतात. हि रूपे साकार केली आहेत अविनाशने
या चित्रपटात नागीची भूमिका मात्र सर्वोत्तम आहे. नागी व्यवहारिक आहे. त्याचमुळे सुरवातीलाच आपण बेट सोडून द्यावे व दुसरीकडे स्थलांतरित व्हावे असे तिला वाटत असते. मनाने ती निर्मळ आहे. कृष्णा बद्दल तिच्या भावना पवित्र आणि निष्प्पाप आहेत. आपल्या सासऱ्यावर सुद्धा त्ती तसेच निर्व्याज प्रेम करत असते. नवऱ्याची मानसिक स्थिती जेव्हा बिघडते तेव्हा त्याच्या मागे ती खंबीरपणे उभी राहते. आपल्या बद्दल जेव्हा नवर्याला संशय आलेला असतो तेव्हा तिला होणारा पश्तापाप किंवा सासऱ्याच्या मृत्यूला आपणच जबाबदार नाही ना हे तिच्या मनात निर्माण झालेले शल्य या सार्या गोष्टी फार समर्थपणे आपल्यापुढे येत्तात.सौंदर्याने हि भूमिका उत्तम साकारली आहे.
कृष्णाची ( हरीश राजू) भूमिका आनंदी आहे. पण जेव्हा जेव्हा त्याच्या गत आयुष्याबद्दल त्याला विचारणा करतात तेव्हा मात्र त्याच्या मनात अपराधी भावना निर्माण होत असते. नागीवर कळत न कळत तो आकर्षित होत असतो म्हणूनच जेव्हा ती नवऱ्याबरोबर हितगुज करत असते तेव्हा त्यांचे बोलणे चोरून ऐकत असतो. दुग्गाजीयाची भूमिका सुद्धा सुंदर रित्या साकारलेली आहे एम. व्ही. वासुदेवराव.
श्रद्धा, भक्ती या सर्व गोष्टी नक्कीच महत्वाच्या आहेत पण त्याचबरोबर प्रयत्न न करता आयुष्य काढले तर हे शब्द पोकळच नव्हेत काय? खोटी प्रतिष्ठा धारण करून व्यवहाराकडे कानाडोळा करणे कितपत योग्य आहे.? शेवटी पाउस थांबतो हि निसर्गाची कृपा पण आपल्या घरात पाणी येऊ नये म्हणून तुंबलेले पाणी बाहेर फेकून देणाऱ्या नागीचे प्रयन्त महत्वाचे नाहीत का?
पावसाचा पूर येत राहील, जात राहील पण मनात निर्माण होत असणारे वादळ, संशय या गोष्टीना आपणच आवर घालायला नको का? नागी सारख्या निर्मळ बाईकडे त्याच निर्मळ पणे तिचा नवरा का बघत नाही? असे अनेक विचार मनात येतात.
एका निर्जन बेटावरची हि कहाणी मनातल्या बेटावर विचारांची गर्दी करून सोडते, आपल्याला अस्वथ करते हे या चित्रपटाचे वैशिठ्य म्हणावे लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

परीक्षण वाचून काल तुनळीवर हा चित्रपट पाहिला. आवडला . छान लिहिले आहे परीक्षण. अजूनही असे वेगळ्या भाषेतले चित्रपट सुचवलेले आवडतील पाहायला.

स्पॉयलर:
शेवटी त्या झोपलेल्या नवऱ्याला नागी पाणी ओसरतेय हे दाखवते तेव्हा तो आनंदाने श्रद्धा, भक्ती , देवावरचा विश्वास याबद्दल बोलतो आणि ती या बरोबर त्याने आपलेही नाव एकदा घ्यावे म्हणून आशेने विचारते की रात्री मी थटलेले पाणी मोकळे केले, वाघ येऊ नये म्हणून विस्तव पेटवला हे काहीच नाही का? त्यावेळी फार वाईट वाटलं.