'अलिबाबा'च्या गुहेत

Submitted by Sushilkumar on 20 March, 2021 - 03:53

जॅक मा: अलीबाबा चा संस्थापक
हँगझाऊ शहर. आजच्या झेजियांग परगण्याची अत्याधुनिक विलासी सुखसुविधांनी झगमगणारी राजधानी. चीन मधील वाणिज्य व व्यापारदृष्ट्या एक महत्वाचे शहर. ७० च्या दशकापूर्वी मात्र हे नगर फार वेगळे होते. ग्रँड कॅनॉल जलमार्गावरील दक्षिण टोकाकडील हे शेवटचे स्थानक. जवळच बोटीने जाता येण्याजोगे एक बेट, सुंदर मंदिरे, सभा मंडपे, बगीचे पर्यटनास आकर्षक अशी सर्व वैविध्यपूर्णता लाभलेले शहर. या हँगझाऊ नगरात १५ ऑक्टोबर १९६५ या दिवशी जगातील अत्यांत यशस्वी व प्रभावी उद्योजक "मा युन" उर्फ जॅक मा यांचा जन्म झाला. जॅक मा ई-कॉमर्स क्षेत्रातील 'अलीबाबा' (Alibaba), ताओबाओ (Taobao), अतिशय लोकप्रिय असे पैसे अदा करण्याचे इलेकट्रोनिक माध्यम (Payment Channel) 'अलीपे' (Alipay) , विपणन व जनसंपर्क क्षेत्रातील 'अली मामा' (Ali Mama) या अक्राळ विक्राळ अश्या उद्योगांचा संस्थापक व मालक. चीन मधील द्वितीय क्रमांकावरील व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. अलीबाबा" ई-कॉमर्स क्षेत्रात सेवा पुरविणारी अशिया खंडातील प्रथम क्रमांकावरील तर जगात दुसऱ्या क्रमांकावरील कंपनी आहे.
या जॅकचे कुटुंब तसे ५ व्यक्तींचे सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंब होते. आई, वडील आणि इतर दोन भावंड असा अगदी आटोपशीर परिवार.जॅक त्यातील मधला आपत्य होता. त्याचे वडील संगीतकार होते आणि उपजीविकेसाठी ते कथाकथन सारखे कार्यक्रम देखील करायचे. जॅक चे वडील “पीपल्स पार्टी ऑफ चाईना” पक्षाशीही संलग्न होते असे म्हंटले जाते जो चीन मधील एक विरोधी पक्ष आहे.
१९७२ साल म्हणजे माओंच्या मावळतीचा आणि चीनच्या मुक्त आर्थिक द्वाराच्या प्रयोगांच्या सुरुवातीचं काळ. चीन-अमेरिका सुसंवाद स्थापित करणे, व्यापार वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी या वर्षी चीनचा दौरा केला होता. या भेटी अंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी निक्सन यांनी बैजिंग, शांघाय, हँगझाऊ या शहरांना सपत्नीक भेट दिली.
जुनाट, मळकी, ढगळ व जाडी भरडी कपडे घातलेली अशक्त मुले हे त्या काळातील चीन च्या कोणत्याही शहरात आढळणारे सार्वत्रिक चित्र. सामान्यपणे सर्व चीनची हीच अवस्था होती. जॅक त्यावेळी अवघ्या सहा वर्षांचा होता. अभ्यासात अति साधारण या श्रेणीत मोडणारा हा मुलगा हँगझाऊ शहरातील अन्य कुपोषित दिसणाऱ्या मुलांपैकी फक्त आणखी एक. मात्र या मुलाचे निरीक्षण कौशल्य असामान्य होते. नाकतोडे पकडून त्यांच्या झुंजी लावणे हा त्याचा जगावेगळा छंद होता. त्याच्या अचूक व सखोल निरीक्षण करण्याच्या उपजत क्षमतेमुळे या खेळात अल्पावधीतच त्याने असे काही प्राविण्य मिळविले कि नाकतोड्याच्या पंखांच्या आवाजाचे केवळ काही मिनिटेच अवलोकन करून हा पठ्ठ्या कोणता नाकतोडा झुंझीत विजयी होईल ते अचूक ओळखत असे.असो.
निक्सनच्या शिष्टमंडळातील अतिशय आकर्षक केशभूषा, वेशभूषा केलेली व त्याने या पूर्वी कधीही न ऐकलेली इंग्रजी भाषा बोलणारी पाश्चिमात्य माणसे पाहून उत्तम निरीक्षण शक्ती लाभलेला जॅक प्रभावित झाला नसता तरच नवल. बालवयच ते व त्यात जॅक पडला जिज्ञासू वृत्तीचा मग काय जॅक ने पाश्चात्यांची इंग्लिश भाषा शिकण्याचा जणू काही पणच केला. हि जॅकच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना होती कारण या घटनेतच जॅक च्या यशस्वी व्यावसायिक व्यक्तिमत्वाची बीजे पेरली गेली.
जॅक ने इंग्लिश भाषा शिकण्यासाठी खूप खटपट केली. परंतु त्याकाळी चीन मध्ये इंग्रजी भाषा हि अभावानेच शिकविली जात असे. शाळांमध्ये तर अजिबातच शिकवली जात नसे. या अडचणीवर लवकरच त्याने एक उपाय शोधून काढला. हँगझाऊ शहर निक्सन यांच्या भेटी नंतर सर्वतोमुखी होऊन पर्यटनासाठी नुकतेच नावारूपाला येऊ लागले होते. विदेशी पर्यटकांची वर्दळ तेथे वाढली होती.सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे वरदान लाभलेल्या जॅकचे या बदलांकडे लक्ष गेले.अनायसेच त्याला या बदलांमध्ये इंग्लिश भाषा शिकण्याच्या त्याच्या सुप्त इच्छेच्या पूर्तीची संधी दिसू लागली. त्याने हँगझाऊला भेट देणाऱ्या पर्यटकांचा स्वयंघोषित वाटाड्याचे (tourist guide) काम सुरू केले. या कामाचा मोबदला म्हणून काही पैसे, रक्क्म देऊ करणाऱ्या पर्यटकांना तो विनम्र नकार देऊन त्या ऐवजी त्यांना इंग्लिश कसे बोलावे व या भाषेचे प्राथमिक धडे देण्यास तो सांगे. अश्या प्रकारे जॅक चा इंग्लिश भाषा शिकण्याचा श्रीगणेशा झाला. त्याच्या उत्तम आकलन शक्तीमुळे लवकरच त्याने इंग्लिश भाषेच्या अध्ययनात लक्षणीय प्रगती केली. अशाच एका इंग्लिश पर्यटकाशी त्याची चांगलीच गट्टी जमली व त्या पर्यटकानेच "मा युन" चे प्रथम जॅक हे नामाभिदान केले. पुढे त्याच्या व्यवसायिक आयुष्यातही त्याने “जॅक" हेच नाव धारण केले.
चीन मध्ये इंग्लिश हि फारशी बोलली जाणारी भाषा खचितच न्हवती परंतु बाह्य जगातील शक्तिशाली राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने इंग्लिश भाषाच बोलली जाते. या भाषेचे ज्ञान किती आवश्यक आहे हे आपण सर्व जाणतो. किशोर वयातल्या जॅकला या भाषेच्या ज्ञानाचा पुढे त्यास काय उपयोग आहे हे खरोखरच माहिती न्हवते पण इंग्लिश पर्यटकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे इंग्लिश हि जगातील एक अतयंत महत्वाची भाषा आहे हे तो समजून चुकला होता. पुढे जेंव्हा अनेक प्रयत्न करूनही जॅक विश्वविद्यालयातील लोकप्रिय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही तेंव्हा त्याने हँगझाऊ टीचर्स ट्रैनिंग कॉलेज मध्ये नाव नोंदवून १९८८ साली इंग्लिश भाषेचीच पदवी प्राप्त केली. जॅकने त्याच्या पूर्व आयुष्यात अनेक अपयशे पचवली.अनेकदा अपयशाचा सामना करत त्याने कसे बसे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले हीच त्याची शाळेतील कामगिरी. असे म्हणतात कि पोलीस दलातील निवड चाचणीतील फक्त पाच उमेदवारांपैकी एक नीवडला गेला न्हवता तो म्हणजे जॅक, हार्वर्ड विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतही जॅक अनेक वेळा अनुत्तीर्ण झाला. परंतु त्याने जिद्द सोडली नाही त्याच्या उत्तर आयुश्यात ही पदवी तर त्याने मिळवलेच पण इतर अनेक परदेशी विद्यपीठांच्या मानद पदव्याही त्याने मिळविल्या.
जॅक ने उपजीविकेसाठी हँगझाऊ च्या स्थानिक विद्यापीठात इंग्लिश भाषेच्या अध्यापनास सुरुवात केली. काही वर्षे विद्यापीठात इंग्लिश भाषेचे अध्यापन केल्यानंतर स्वयंरोजगाराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्याने भाषांतरकार म्हणून सेवा देणायास प्रारंभ केला. अनेक स्थानिक व्यापारी बाहेरील देशांशी व्यापार उदीम करण्याच्या प्रयत्नात होते परंतु भाषा हा त्यांच्या या प्रयत्नात मोठा अडथळा होता. जॅक च्या इंग्लिश भाषेवर प्राप्त केलेल्या प्रभुत्वामुळे लवकरच तो या व्यापारी वर्तुळात अत्यंत प्रभावी भाषांतरकार म्हणून नावाजला गेला. परकीय व्यापारी, गुंतवणूकदार व स्थानिक चिनी व्यापारी यांच्यामध्ये मध्यस्त म्हणून तो काम पाहू लागला. स्थानिक व्यापाऱ्यांचे परकीय वित्त व्यापार संस्थाशी चालणारे सौदे यांत भाषांतरकाराची महत्वपूर्ण भूमिका तो पार पाडू लागला.
थोड्याच कालावधीत त्याने नौकरी करून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नपेक्षा कितीतीरी अधिक उत्पन्न हि सेवा देऊन मिळविले. हि सेवा देत असताना त्याने अनेक उद्योग, व्यवसाय यासंबंधी सखोल ज्ञान प्राप्त केले. या व्यसायातील सधी व विस्तार, वितरण, विपणन पद्धती या संबंधीत पायाभूत गोष्टींशी त्याचा परिचय झाला. या गोष्टींमधील बारकावे ध्यानात आले व त्यामुळे पुढे त्याला चीनचा सर्वांत शक्तिशाली उदयोजक म्हणून पुढे येण्यास मदत झाली. हीच कौशल्ये त्याला स्वतःच्या व्यवसाय उभारणीसाठी पुढे उपयुक्त ठरली.
१९९५ साली जॅकने त्याची पहिली अमेरिका वारी केली. एका आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सौद्यासाठी भाषांतरकार म्हणून त्याची वर्णी लागली होती. तेथे तो एका मित्र सोबत राहिला होता. त्याच्या अमेरिकेतील वास्तव्यात इंटरनेट, संगनक अश्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी त्याची ओळख झाली. जॅक इन्टरनेट वर एका बियर ची माहिती शोधात असताना त्याच्या लक्षात आले कि चीनच्या मद्य उद्योगाची कोणत्याही स्वरूपाची माहिती इन्टरनेट वर उपलब्ध नाहीये. त्याने मग चीनच्या अनेक उत्पादनांचा शोध इन्टरनेट वर करून पहिला. त्याच्या जिज्ञासू स्वभावामुळे त्याला इन्टरनेट ची व्यापाराचा प्लॅटफॉर्म या स्वरूपाने महती लक्षात आली.
ऍमेझॉन या इलेक्ट्रॉनिक वाणिज्य (e-commerce) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कपंनीचा संस्थापक जेफ बेझोसला वाटले कि जगाच्या कोणत्याही कानकोपऱ्यातील ग्राहकाला जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही उपलब्ध असलेली वस्तू हि घर बसल्या मिळायला हवी. अर्थात त्या वस्तूचा वाजवी मोबदला देऊनच. याच विचारातून पुढे ऍमेझॉन या बलाढ्य ई -कॉमर्स कंपनीचा उदय झाला.
जॅकचे याबतीत जेफ बेझोस शी विलक्षण साम्य आहे. त्याच्या अमेरिकेच्या पाहिल्या भेटीतच इंटरनेटशी परिचय झाल्यावर लक्षात आले की चीनच्या वेगाने वाढणाऱ्या व्यापार उदीमाचे जागतिक पटलावर कोठेही नोंद घेतली जात नाहीये. त्याच्या अंदाजाप्रमाणे कमीतकमी इंटरनेटवरच्या बाजारपेठेत तरी चीनच्या कोणत्याही उत्पादनाची उपस्थिती नाहीये. चीनच्या आश्चर्यजनक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत ठसा उमटला पाहिजे व यात प्रचंड ववसायिक संधी आहेत हे चाणाक्ष जॅक ने ताबडतोब ओळखले. येथे एक गोष्ट निश्चित नोंद घेण्यासारखी आहे ती म्हणजे ऍमेझॉन हि बलाढ्य कंपनी त्यावेळी बाल्यावस्थेतच होती यावरून आपण अनुमान करू शकतो कि जॅक सारख्या दूरदृष्टीच्या माणसाला हि संधी हेरल्यानंतर आकाश किती ठेंगणे झाले असेल.
पुढे लवकरच जॅकने त्याच्या काही चीनी मित्रांना बरोबर घेऊन "चाईना पेज" नावाने येलो पेजेस च्या धर्तीवर एक ऑनलाईन वेब डिरेक्टरी सुरु केली. या डिरेक्टरीचे व्यावसायिक वेब पेज बनवन्यात आले व त्यात चीन मधील सर्व प्रमुख व्यवसाय आणि सेवा अंतर्भूत करण्यात आल्या होत्या. "चाईना पेज" ला मध्यम स्वरूपाचे यश प्राप्त झाले. जॅकने २०,००० डॉलर चे भांडवल
या व्यवसायाच्या उभारणीत लावले होते. उद्योगाच्या मोठया प्रमाणातील वाढ व विस्तारासाठी त्यांना अधिक भांडवलाची आवशकता होती त्याकरिता त्यांनी शासकीय मदत घेण्याचे ठरविले. चीन मधील शासकीय व्यवस्थेप्रमाणे गुंतवणूक तर झाली परंतु त्याबरोबरच सर्वात मोठा गुंतवणूकदार या नात्याने "चाईना पेज" वर अनेक शासकीय नियंत्रने घालण्यात आली. या सर्व प्रकारांमुळे "चाईना पेज"चे स्वातंत्र्य व व्यवसाय संकटात आला. व्यथित जॅकने अत्यंत निराशपणे "चाईना पेज" सोडली. तत्पूर्वी पहिल्या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या उलाढालींमुळे "चाईना पेज" ने ८,००,००० डॉलरचा महसूल मिळवला होता.
"चाईना पेज" सोडल्यानंतर जॅकने त्याच्या सर्व व्यवसायिक योजनांना तात्पुरती स्थगिती दिली आणि अधिकृतपणे सरकारी विभागात काम करण्यास सुरुवात केली. जॅक "आंतरराष्ट्रीय व्यापार व वाणिज्य सहकार"(International Trade and commerce) मंत्रालयात काम करू लागला. या विभागात नौकरी करत असताना योगायोगानेच जॅकचा परिचय याहूचा सहसंस्थापक "जेरी यांग" यांच्याशी झाला. पुढे याच जेरी यांगच्या प्रभावामुळे याहू कंपनीने जॅकच्या "अलीबाबा" या ई-कॉमर्स उद्योगात थोडी थोडकी न्हवे तर १ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. दरम्यान जॅकने चीनच्या शासकीय "इंटरनॅशनल कॉमर्स सेंटरचा" मुख्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. या भूमिकेतून काम पाहत असताना जॅकला "ई-कॉमर्स" प्रणालीतील अनेक बारकावे आणि नवीन पैलूंची ओळख झाली. मग मात्र जॅक पुढे फार काळ या पदावर राहीला नाही. साधारण वर्ष दिड वर्षांच्या आतच आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या १७ मित्रांना सोबत घेऊन जॅकने "अलीबाबा" या भविष्यातील महाकाय होऊ घातलेल्याई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली.
"अलिबाबा"ची सुरुवात अतिशय अचानक झाली. जागतिक पातळीवर सुविधा पुरविणारी व स्पर्धाशील कंपनी म्हणून पुढे येणासाठी त्यांच्याकडे ना पुरेसे भांडवल होते ना मोठे गुंतवणूकदार. "चाईना पेज" च्या पूर्वानुभवावरून जॅक सरकारी गुंतवणुकीच्या बाबतीत अनिच्छूक होता. तातडीच्या आर्थिक मदतीसाठी मग त्याने गुंतवणूकदारांची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीतील शक्तिशाली गुंतवणूकदारांचे दरवाजे ठोठावण्याचे ठरविले. सिलिकॉन व्हॅलीतील तज्ञ गुंतवणूकदार "अलीबाबा"च्या व्यावसायिक प्रारूपावर फारसे आश्वासक न्हवते. त्यामागे त्यांचे स्वतःचे असे वास्तवदर्शी विश्लेषण होते. त्यांचे असे म्हणने होते की ज्या चीन मध्ये "अलीबाबा" व्यवसाय करणार आहे त्या देशाची बँकिंग प्रणाली हि मूलभूत स्वरूपाच्या ई-वाणिज्य सेवा देण्यासाठी देखील सक्षम व प्रगल्भ न्हवती. क्रेडिट कार्ड सारखी प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नसताना "अलीबाबा"च्या यशाबाबत सिलिकॉन व्हॅलीतील पंडित साशंक होते. कित्येकजण तर प्रत्यक्ष बोलून दाखवत "अलीबाबा" फार मोठे अपयश घेऊन येईल. जॅक चे पाठीराखे वडील देखील त्याच्या या योजनेचे सर्वात मोठे विरोधक होते.
जॅकच्या नशिबाने १९९९ साली त्याच्या "अलीबाबा" योजनेस मोठे यश मिळवून दिले. जॅक "गोल्डमन सॅक्स" या बँकेस "अलीबाबा"त गुंतवणूकीसाठी राजी करण्यात यशस्वी झाला. "गोल्डमन सॅक्स" ने "अलीबाबा"त ५ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. त्यापाठोपाठ काही महिन्यांच्या कालावधीत सॉफ्टबँकने "अलीबाबा"त २०मिलियन डॉलर्सची गुंवणूक केली. या नंतर मात्र जॅक ने पुन्हा मागे वळून पहिले नाही. आज "अलीबाबा" आशियायतील सर्वात मोठी "ई-कॉमर्स" सेवा पुरविणारी कंपनी बनली आहे.
सप्टेंबर २०१९ ला जॅक "अलिबाबा" च्या कार्यकारी चेयरमन पदावरून पायउतार झाला. आज २०२० या वर्षी "अलिबाबा"चा महसूल ७२ बिलीयन डॉलर वर पोहोचला आहे. फोर्बच्या ग्लोबल २००० च्या रँकिंग मध्ये अलिबाबा ३१ व्या स्थानी आहे तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा पुरविणारी जगातील ५ वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
जॅक कडव्या कम्युनिस्ट विचाराच्या देशामध्ये एक मोठा भांडवली उद्योग उभारण्यात यशस्वी झाला. त्यासाठी देशाच्या मूलभूत तत्वांशी तडजोड करण्याचा गंभीर आरोप त्याच्यावर होण्याची शक्यता होती. परंतु तसे काही फारसे झाले नाही जॅकचे यश हे चीनच्या बदलणाऱ्या मानसिकतेचे लक्षण आहे. वाढत्या पमाणात भांडवली अर्थव्यवस्थेच्या स्वीकारातूनच चीनची त्यांच्या समाजाची उत्पन्न व राहणीमानातील सुधारणा हि प्राथमिकता दिसून येत आहे.असो.
जॅक त्याच्या सामाजिक जवाबदारीबद्दल अतिशय जागरूक आहे. तो म्हणाला होता "मला वाटत जेव्हा तुमच्याकडे १ मिलियन डॉलर असतात तेव्हा ते तुमचे असतात, २० मिलियन असतात तेव्हां अडचणीस सुरुवात होते, जेव्हा तुमच्याकडे १ बिलियन डॉलर असतात तेव्हां ते तुमचे नसतात तर तो अतूट विश्वास असतो जो समाजाने तुमच्यावर ठेवलेला असतो. त्यांना वाटत असते कि तुम्ही त्यांच्या पैशांचा सरकार किंवा इतर कोणापेक्षाही अधिक व्यवस्थित विनियोग कराल".

By:सुशीलकुमार देशमुख

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती

काही दिवसांपूर्वी ते गायब आहेत अशी बातमी वाचनात आली होती