अज्ञातवासी - भाग ३१ - रात्र वैऱ्याची आहे!

Submitted by अज्ञातवासी on 19 March, 2021 - 21:34

भाग ३१ -

https://www.maayboli.com/node/78358

खुर्चीवरचा तो माणूस त्याच्याकडे रोखून बघत होता.
"तयारी झाली?"
"हो बाबा!"
"सगळं सहज मिळालं ना तुला?"
"तुमची पुण्याई बाबा."
"माझी पुण्याई?" तो भेसूर हसला. "माझ्या पापांमुळे तू या स्थानी आलाय मोक्षा...
रात्र वैऱ्याची आहे, सांभाळून राहा.
खुर्ची काटेरी आहे, सांभाळून राहा.
माणसं जीव लावतात, जीव घेतातही, सांभाळून राहा.
भलेमोठे दोरखंड मोठमोठ्या दऱ्या पार करवतात, आणि केसानेही गळा कापला जातो, सावध रहा.
बाहेर कितीही मोठं राज्य असलं, तरी घरातील राजकारण जीवघेणं असतं. सावध रहा.
नाशिकला आपलं बनव, नाशिक तुला आपलं बनवेल."
मागून पिंगळा आला,
"जा महाराजा, तांडव करा..."
आणि मोक्षला जाग आली.
तो उठला, आणि तयारीला लागला.
◆◆◆◆◆
वाड्यासमोर भलामोठा मंडप टाकला होता. पाहुण्यांची गर्दी नसली, तरीही बऱ्यापैकी लोक होतेच.
अप्पा त्यांच्या खोलीत बसले होते, आणि समोर काही लोक उभे होते.
"बाराशे लोकांचा अंदाज आहे, त्यानुसार जेवणाची तयारी करा."
"जी आप्पासाहेब."
"ते काही भजनी मंडळ वगैरे असेल तर, त्याची व्यवस्था तुम्ही बघून घ्या."
"जी."
"बरं, या तुम्ही. राजा, तू थांब."
ते लोक बाहेर पडले.
"एवढं काय अर्जंट काम होतं, की न विचारता खोलीत घुसला तू."
"आप्पासाहेब... बातमीच तशी आहे."
"काय?" अप्पांचे कान टवकारले.
"माझा भाऊ, रवी, शेखावतच्या फॅक्टरीत काम करतो."
"मग?"
"आज शेखावतला खानसाहेब भेटले."
"काय?",
"हो..."
"...आणि त्यांच्याबरोबर मोक्षसाहेबही होते..."
"काय?????" अप्पांना पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.
◆◆◆◆
"लास्ट डे झोया, आणि शेवटची रात्र."
"पुन्हा कधी येणार?"
"तुला भेटायचं असेल तर दररोज. की जाऊ नको, सांग."
"नको, तुझं लक्ष्य ते होतं, ते गाठ."
मोक्ष हसला.
"मोक्ष..."
"बोल ना झोया."
झोया शांतच राहिली.
"बोल झोया."
"माझ्या आयुष्यात मी कुणाला जवळ येऊ दिलं नाही. वेळही नव्हता, आणि मी पडले अशी."
"काहीही काय, तू खूप सुंदर आहेस."
"आय नो… पण तू आल्यापासून..."
"झोया..." मोक्ष शांतपणे म्हणाला. "नको कॉम्प्लिकेशन निर्माण करुस."
"मोक्षा... आय लव यु..." ती भावविभोर होत म्हणाली.
"झोया... तू जगातील बेस्ट मुलगी आहेस. पण माझं जगच वेगळं आहे, क्षणोक्षणी बदलणार...
आवडलं असतं मला प्रेम करायला तुझ्यावर, पण माझी नियती ती नाही."
"मोक्ष प्लिज."
"शांत हो.." त्याने तिचा हात हातात घेतला. "शांत हो..."
"आणि, कायम माझी टीचर, मैत्रीण राहा, कायम."
"तू नाही म्हणतोय ना मोक्ष..."
"तेवढी हिम्मत माझ्यात नाही झोया. पण मीच तुझ्या लायक नाही. चल मला माझ्या रूममध्ये जाऊ दे, पॅकिंग करायचीय."
तिने हात सोडला.
"तू अमूल्य आहेस झोया, चांगला साथीदार निवड..."
झोयाने क्षणभर त्याच्याकडे बघितले...
आणि त्याला मिठी मारली...
तो कितीतरी वेळ तिला थोपटत राहिला.
"यापुढे असं काहीही नकोय," तो झोयाला म्हणाला, आणि तिथून निघून गेला.
◆◆◆◆◆
"साला खान..."
"शांत व्हा संग्राम."
"प्यारेलाल, तुझे लोक तयारीचे आहेत ना?"
"पट्टी बांधली डोळ्याला तरी नेम चुकत नाही आप्पासाहेब."
"खानाची हवेली म्हणजे किल्ला आहे प्यारेलाल."
"चिंता नको. चांगले वीस माणसं घेऊन जातो."
"पन्नास! पन्नास घेऊन जा. कितीही गोळ्या चालू देत. कुणालाही मारा, फक्त एक जीव घेतल्याशिवाय परत येऊ नका... नाहीतर मी तुमचा जीव घेईल."
"जी अप्पा."
"दहा कोटी प्यारेलाल... आयुष्यभर सुपारी घेत राहिला, तरी एवढी रक्कम मिळणार नाही. काम फत्ते झालं पाहिजे."
"होणारच!"
"जा आता." अप्पा म्हणाले.
तो निघून गेला.
"अप्पा, एवढा मोठा गेम! आपल्यासोबत?
सगळा खानाचा खेळ, आणि शेखावतही त्यांना मिळालाय. भुतं त्याच्या बाजूने आहेत."
'का अप्पा पण, का?"
"दादा गेला संग्राम, पण अजूनही प्रत्येकाचा मनात जिवंत आहे, त्याची भीती, दहशत...
जे होईल ते होऊ दे. आज खानाच्या हवेलीत एकजण वाचणार नाही...
...आणि त्यानंतर...
उरेल फक्त कोळसा!"
◆◆◆◆◆
"मोक्षसाहेब."
"बोला खानसाहेब."
"उद्या अकरा वाजता आपण वाड्यावर पोहोचायचं ना?"
"येस. शार्प अकरा."
"एकमताने नाही, तर बहुमताने निर्णय होईल.
सहा भुतं आपलीच आहेत."
"तात्या जाधव...राऊत... विश्वासराव...ज्ञानेश्वर शेलार...अप्पासाहेब... काकासाहेब आणि अस्मिता शेलार...
काकासाहेबांवर सगळं अवलंबून असेल. सगळं..."
"जे महादेवाला वाटेल, ते होईल खानसाहेब."
"हो, पण जर हा खेळ फसला तर?"
"तर खानसाहेब, मला अज्ञातवासात जावं लागेल." मोक्ष हसला.
"नाही जाणार मोक्षसाहेब. पण मला एक वचन द्या."
"काय हवंय खानसाहेब."
"तुम्ही कधीही झोयाच्या जवळ जाणार नाहीत..."
"खानसाहेब?" मोक्ष चमकला.
"वचन द्या मोक्षसाहेब..." खानाने हात जोडले.
"खानसाहेब, दिलं वचन... दिलं, पण झुकू नका..."
"तिचं आयुष्य सुंदर पाहिजे मला, बंदुकीच्या टोकावर नको. ती आग आहे, पण मला तिला विस्तवाशी नाही खेळू द्यायचं."
"खानसाहेब, काळजी करू नका. तुम्ही जे म्हणाल तेच होईल."
तेवढ्यात बाहेर गोळीबार आणि किंचाळण्याचा आवाज आला.
'रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा...' मोक्षच्या कानात शब्द घुमले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
पुढचा भाग जास्त interesting असेल...
"जा महाराजा, लवकर लवकर लिहा!"

सुंदर भाग..!!
आता कथा मस्त वेग घेईन असं वाटतयं..!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!

पुढचा भाग जास्त interesting असेल...
"जा महाराजा, लवकर लवकर लिहा!"

>>>> मोक्षचा वेताळावतार कदाचीत पाहायला मिळेल. Happy

छान