दिगंत - ५

Submitted by सांज on 19 March, 2021 - 05:16

जीपीएस ने दाखवल्याप्रमाणे त्यांनी गोकाक-हुबळी स्टेट हायवे धरला. सात वाजून गेले होते. अंधार दाट व्हायला लागला होता. रस्ता चांगला होता पण दोघींसाठी तसा नवीनच. रस्त्यावरच्या पाटयाही आता बर्‍यापैकी कन्नड मधूनच दिसत होत्या. त्या आणि तिथली कन्नड बोलणारी माणसं पाहून संहिताला लहानपणी ती जालन्याला असताना शेजारी राहणार्‍या कानडी प्रभा काकू आठवल्या. त्यांचं कानडी मिश्रित मराठी तिला फार गोड वाटायचं. आणि त्यांच्या घरी गेल्यावर कानावर पडणारी ती अस्सल कन्नड भाषाही. उन्हाळ्याच्या दिवसात प्रभा काकू कैरीचा कायरस बनवायच्या. तो संहिताला प्रचंड आवडायचा. तो बनवला की दरवेळी त्या संहितासाठी थोडा नक्की आणून द्यायच्या. नुसत्या आठवणीनेही ती चव संहिताच्या जिभेवर रेंगाळू लागली. प्रभा काकूंपासून सुरू झालेला तो आठवणींचा रस्ता पुढे तिचं बालपण, आई-बाबांचं व्यवसाया निमित्ताने सतत शहरं बदलण, तेव्हाची हलाखीची परिस्थिती, नंतरचं आईचं आजारपण, त्यातूनही आईने तिच्या शिक्षणाला आणि करियरला दिलेलं प्रोत्साहन, बाबांचा पाठिंबा आणि मग काळीज पोखरवून टाकणारं आईचं जाणं, आणि त्यानंतरची पोकळी इथपर्यंत येऊन पोचला. नकळत तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं. पण निकराने ते तिने पुसलं. आणि पुन्हा लक्ष समोरच्या अंधार्‍या पण का कोणास ठाऊक आता उगाच ओळखीच्या वाटू लागलेल्या त्या रस्त्यावर केन्द्रित केलं.

दिवसभरात दोघींचं मन जरी हलकं झालेलं असलं तरी शरीर आता थकलं होतं. गोकाक-हुबळी जवळपास तीन तासांचा प्रवास होता. ट्रॅफिक कमी आणि संहिताचा वेग पाहता त्या अडीच तासात पोचतील असं वाटत होतं. रिया जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत करत पेंगत होती. इतक्यात तिच्या फोन ची रिंग वाजली. ती दचकूनच जागी झाली. नंबर अनोळखी होता. झोपेतच तिने तो रिसीव्ह केला आणि ‘हॅलो..’ म्हटलं..

“हॅलो.. रिया सामंत?” अनोळखी आवाज.

“येस.. कोण बोलतंय?” रियाने जांभई मॅनेज करत विचारलं.

“हाय, मी अनुराग. अनुराग राव.” अतिशय शांत पण तितकाच भारदस्त आवाज.

“अनुराग?”

रियाच्या डोक्यातली ट्यूब पेटली. आईने सकाळी सुचवलेलं ‘स्थळ’! तिने संहिता कडे पाहिलं. दोघींच्या भुवया उंचवल्या होत्या. रिया जवळपास ब्लॅंक होती. तिला समजेचना काय बोलावं.

“ओह येस.. हाय अनुराग!” शक्य तितक्या मृदु आवाजात बोलण्याचा तिने प्रयत्न केला. संहिता तिचा गोंधळ पाहत होती. आणि हसू दाबतही होती.

“सो.. कधी भेटूया आपण?” त्याने सरळ विषयालाच हात घातला.

रिया पुन्हा ब्लॅंक.

“हॅलो.. यू देअर?” पुन्हा शांत आणि वजनदार आवाज.

रिया तिच्या गोंधळातून बाहेर आली. आणि काही विचार न करता म्हणाली,

“भेटूया ना.. उद्या चालेल?”

आता संहिता ब्लॅंक झाली. तिने प्रश्नार्थक नजरेने रिया कडे पाहिलं. रियाने तिच्याकडे पाहत डोळे मिचकावले.

“उद्या.. let me see.. ok fine. कुठे भेटायचं?” अनुराग.

“हम्पी.. at 6 pm शार्प!” रिया म्हणाली.

संहिताला आता हसू आवरेना.

“हम्पी?” त्याचा आवाज जरासा curious झाला.

“येस! Any problem?” रियाने त्याची फिरकी घ्यायचा चंगच बांधला.

“हम्म.. नॉट रियली! ग्रेट चॉइस ऑफ अ प्लेस बाय द वे..”

तितक्याच शांत आवाजात रीप्लाय आला आणि पलिकडून फोन कट झाला.

रियाने गोंधळून फोनकडे पाहिलं.

“काय गं काय झालं?” संहिता ने विचारलं.

“अगं माहित नाही. फोन कट झाला. की कट केला देव जाणे..” रिया.

“हाहा.. बिचारा!”

“anyways, भेटून नाही म्हणण्यापेक्षा बरं नाही का हे. जाऊदे बरच झालं कट झाला.” रिया स्वत:चच समाधान करत पुटपुटली.

रियाने मग हुबळी मधलं एक चांगलं हॉटेल सर्च करून बूक केलं.

गप्पा, गाणी, बाहेरची शांतता आणि अंधार यांच्या जोडीने त्यांचा प्रवास थोड्याशा धाक-धुकीने पार पडला.

बरोबर 9.35 ला संहिताने हुबळीमधल्या त्यांच्या नियोजित हॉटेल समोर गाडी पार्क केली. आणि त्या आत गेल्या. दिवसभराच्या थकव्याने बाकी कशाचाही विचार करण्यास त्यांना फुरसत दिली नाही. थोडं काहीतरी पोटात ढकलून त्या कधी झोपेच्या आधीन झाल्या त्यांचं त्यांनाही समजलं नाही.

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा उत्तम वेगाने चालली आहे.. उत्कंठा आणि अपेक्षा वाढवत...
हंपी नावाचा मराठी चित्रपट पाहिला होता... त्याची प्रकर्षाने आठवण झाली.