एका लसीकरणाची गोष्ट...

Submitted by व्यत्यय on 16 March, 2021 - 07:28

जेष्ठ नागरीकांना कोव्हिडची लस मिळायला लागल्यापासुन आमच्या घरी दुफळी माजली. बाबांनी जाहीर केलं की त्यांना लस घ्यायची नाहीये.
"गेल्या १५ वर्षांत मला साधी सर्दी झालेली नाही, माझी प्रतिकारशक्ती अगदी उत्तम आहे, मी काही लसबिस घेणार नाही" त्यांनी जाहीर केलं.
याउलट माझ्या आईल fear of missing out (FOMO) चा प्रचंड धसका.
"सावंत, जोशी, जाधव, दामले, पाटील सगळे जाउन लस घेउन आले, मलाच आता त्यांच्यासमोर जायला लाज वाटते, पण काय करणार माझं नशिबच फुटकं, मी म्हणुन ५२ वर्ष या हेकेखोर माणसाशी जुळवुन घेतलं, दुसरीशी कोणी असती तर घटस्फोट घेउन केव्हाचीच पळुन गेली असती...." आईने येताजाता जीभेचा पट्टा फिरवायला सुरुवात केली. बाबा कानात इयरफोन खुपसुन गाणी ऐकत असल्याने ते सोडुन बाकी सगळ्यांना हे ऐकावं लागत होतं. शेवटी मी, माझी बायको, माझी बहीण आणि मुख्य सेनापती माझी आई यांनी एकत्र हल्ला चढवुन बाबांचा विरोध ढासळवला.

लगेच आई माझ्या मागे लागली. "टग्या, बाळा लगेच अपॉईंट्मेंट घेउन टाक राजा"! काही काम असलं की आई एकदम प्रेमाने बोलते माझ्याशी. नाहीतर अवलक्षणी कार्टा आहे मेला हे तिचं माझ्याबद्दलचं मत अख्ख्या टगेवाडीत वर्ल्ड फेमस आहे.
"आता कामात आहे मी, उद्या सकाळी बघुया" मी उगाचच टोलवाटोलवी केली. ऑफिसची सवय हो बाकी काही नाही.
एकाच दिवशी बाप-लेक दोघांशीही पंगा घ्यायचा नसल्याने तिने ओठातोंडाशी आलेल्या शिव्या आवंढ्याबरोबर गिळलेल्या मला स्पष्ट दिसल्या.
तरीही तिने रजिस्टर करायच्या साईटची लिंक, रजिस्टर कसं करायचं हे समजावुन सांगणारे दोन व्हिडीओ एव्हढा ऐवज मला व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवुन दिला. व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीची पोस्ट ग्रॅज्वेट असल्याने असली माहीती तिच्या एका तर्जनीवर खेळत असते.
"एक बाई इंजेक्शन घेतल्यावर मेली" आईने कुजबुजत माझ्या बायकोला बातमी सांगितली. हे असं कुजबुजणं फक्त आईच्या जमान्याच्या बायकांनाच जमु शकतं. "पण गप्प रहा, म्हातार्‍याला कळलं तर पुन्हा गोंधळ घालेल".

मग आईने नेहमीप्रमाणे माझी मावशी, आत्या, मामी, काकी अशा सगळ्यांना एकामागोमाग फोन करुन बातमी जाहीर केली.
"हो आम्ही केलं तयार यांना..... झाले तयार, न होउन जातात कुठे..... हो......हो ना...... आता अपॉईंट्मेंट कधीची मिळतेय काय माहीत......नाही हो त्या तमक्या हॉस्पिटल मधे नाही जाणार आम्ही, पाचशे रुपडे गेले तरी चालतील पण आम्ही ढमुक मध्येच जाउ..... हो नाहीतर काय......
अहो आमचा टग्या हातातली कामं सोडुन लगेच रजिस्टर करायला निघाला, मीच म्हणाले त्याला.... थांब रे बाळा.... तुम्ही कामाची माणसं.... आम्ही काय आज आहोत उद्या नाही..... तु उद्या आरामात आंघोळ करुन खाउन पिउन झाल्यावर रजिस्टर कर.... काय सांगता तरी काय, तुमचा बंड्या १० वेळा आठवण करुन सुद्धा कामं करत नाही?......आमचा टग्या नाही हो तसा.... मी हुं म्हटलं की लगेच गोष्ट समोर हजर करतो...... नाही हो ते एकदाच झालेलं..... तुम्हाला पण ना कुठल्या जुन्या गोष्टी आठवतात....." Happy

तर दुसर्‍या दिवशी मला तिन वेळा आठवण करुनही मी ढिम्म हलत नाही म्हटल्यावर आईने बायकोच्या मागे भुण्भुण लावली. "त्याला लिंक दिली, व्हिडीओ दिले, तरी पण रजिस्टर नाही करत बघ". बायकोने आवाज दिल्यावर मी गुपचुप जागचा उठलो. "तुच का करत नाहीस?" हा प्रश्न विचारायचा नाही एव्हढी अक्कल मला होतीच. गपगुमान मी २ दिवसांनंतरची अपॉईंट्मेंट घेतली आणि पुन्हा लोळायला लागलो.

आता आईच्या अंगात लसीकरण संचारलं. सगळी माहीती आधीच मिळवुन इतर ४ जणांबरोबर व्हेरिफाय पण करुन झालेली. पहीला प्रश्न उद्भवला कपडे काय घालायचे? खांद्याजवळ दंडावर घ्यायच्या इंजेक्शनमुळे नेहमीची साडी/ब्लाउझ चालणार नव्हता. बिनबाह्यांचा ब्लाउझ नव्हता. बायकोने उदार मनाने तिचा स्लीवलेस पंजाबी ड्रेस उधार द्यायची तयारी दाखवली. "अगं तुझा ड्रेस मला किती ढगळ होईल" हा वरवर हसतमुखाने केलेला वार बायकोने २० वर्षांच्या सवयीने इग्नोर केला. शेवटी अल्टर करायच्या बोलीवर पंजाबी ड्रेसची आयडिया पास झाली. मग बेडरुम मध्ये स्लीवलेस ड्रेसचं प्रदर्शन लावण्यात आलं. त्या सगळ्या ड्रेसना यथेच्छ नावं ठेउन झाल्यावर शेवटी आईने एक ड्रेस निवडला.
दुसरा प्रश्न उद्भवला, ब्रेक्फास्ट काय करायचा यावर. तिकडे भरपेट खाउन जायला लागतं ही माहीती व्हॉट्सअ‍ॅपने पुरवली होतीच. "आपण न मेथीचे थेपले घेउन जाउया. की सॅन्डविच खायला सोयिस्कर पडतील?"
"आजी, व्हॅक्सिन घ्यायला जातेस की पिकनिकला?" आमचं कन्यारत्न मध्येच पचकलं
आता या उर्मट कमेंटवर "उपाशीपोटी व्हॅक्सिन घेण्याचे दुष्परीणाम" या विषयावर अर्ध्या तासाचं बौद्धिक घेणं भागच होतं. आईने मोठ्या मनाने ही कामगिरी पार पाडली.
हे सर्व चालु असताना आमचे तीर्थरुप "मला लस घ्यायची नाहीये, फक्त तुम्ही म्हणताय म्हणुन मी तायार झालोय" हा राग आळवतच होते.

लसीकरणाच्या दिवशी सकाळी ५ वाजता अलार्म लावुन पालक उठले. सहा वाजल्यापासुन तयार होउन दरवाज्याजवळ बसले. मी आठ वाजता उठुन सव्वा आठला त्यांना घेउन निघालो. हॉस्पिटलमध्ये २०-२५ जण आधीच येउन बसलेले. हॉस्पिटलने सोय मात्र चांगली केलेली. बसायला शंभरेक खुर्च्या, व्यवस्था सांभाळायला ५ सिक्युरीटी गार्ड. चेहर्‍यावर अतिशय काळजीचे भाव घेउन येणारे पाल्य आपल्या पालकांना पुन्हा-पुन्हा सुचना देउन तिथे बसवत होते. सिक्युरीटी गार्ड सगळ्या मुलांना पळवुन लावत होते. तरी सुकत घातलेल्या पापड्/फेण्यांकडे कावळे जसे तिरक्या नजरेने बघत हळुहळु जवळ येतात तसे सगळे आई/बाबांकडे जात होते. मध्येच एखादा सिक्युरीटी गार्ड पुन्हा सगळ्या कावळ्यांना उडवुन लावत होता.
अ‍ॅक्च्युअल इंजेक्शन घ्यायचा प्रसंग फारच uneventful ठरला. इंजेक्शन दिल्यावर अर्धा तास बसायचं मग घरी जायचं. त्या डॉक्टरना इंजेक्शन देताना मध्येच माझ्या बाबांशी बोलायची हुक्की आली. "काय काका, कसं वाटतंय?"
"मला काय धाड भरलीय, मला गेल्या १५ वर्षांत साधी सर्दी पण झाली नाही. मला ही लस घ्यायचीच नव्हती, उगाच मला इथे यायला लावलं सगळ्यानी." बाबांना समोरुन चालुन आलेली संधी सोडणं मान्य नव्हतं.
"चला झालं इंजेक्शन, नेक्स्ट या" डॉक्टरनी मनातल्या मनात कपाळावर हात मारुन घेतला असणार.

शाळेतल्या पहिल्या दिवसानंतर सगळं वर्णन सांगावं तसं आई कार मध्ये सगळी स्टोरी सांगत होती. सेम स्टोरी मला पुन्हा १५-२० वेळा आई सगळ्यांशी फोनवर बोलताना ऐकावी लागली. आईने बाबांचा इंजेक्शन घेतानाचा फोटो काढला, पण बाबा मात्र आईचा फोटो काढायला विसरले त्यामुळे "पण काय करणार माझं नशिबच फुटकं, मी म्हणुन ५२ वर्ष या विसरभोळ्या माणसाशी जुळवुन घेतलं, दुसरीशी कोणी असती तर घटस्फोट घेउन केव्हाचीच पळुन गेली असती...." ही घासुन घासुन गुळगुळीत झालेली टेप सध्या आमच्याकडे वाजते आहे Lol

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी लिहिलंय , आमच्या घरी पण सध्या यावर बरीच चर्चासत्र घडत आहेत, त्यामुळे अगदीच भावलं
बाबा फोटो काढायला विसरले, हे मात्र फार वाईट झालं Lol

भारी लिहिलंय
फोटो काढायला विसरणे हा अक्षम्य अपराध आहे. Happy

भारी Lol

भारी लिहिलंय!

हो,तो फोटो काढणे कम्पल्सरी आहे की काय असेच फिलिंग येतेय.

खुसखुशीत..
वाचताना खुदकन हसायला आलं.
खूप छान Happy

काय धमाल आहे!! आपल्या लहानपणी आपल्याला लसीकरणाला नेताना बखोटीला मारून घेऊन गेले असतील आणि आपण आता किती लाड करतोय Wink Lol

Pages