रावसाहेब ओ रावसाहेब

Submitted by वीरु on 15 March, 2021 - 13:47

मागचे चार दिवस घेतलेल्या कष्टाला यश मिळालं, नव्हे ते मिळेलच अशी खात्री होतीच मला. आजवर इतरांनी अनेकदा प्रयत्न करुनही कंपनीचं जे काम रखडलं होतं ते मी चारच दिवसात पार पाडलं. आपला खाक्याच आहे तसा. साम-दाम-दंड जे मार्ग वापरावे लागतील ते वापरायचे आणि यश पदरात पाडायचे. गेले चार दिवस या परक्या गावात नाना लटपटी खटपटी करुन काम फत्ते झाल्यामुळे आज मस्त वाटत होते. एव्हाना ही बातमी कंपनीत सगळ्यांना समजली असेलच आणि बातमी ऐकुन हितशत्रुंचे उतरलेले चेहरेही माझ्या नजरेसमोरुन तरळुन गेले. त्यांना माहितच आहे की या गोष्टीचा मी कसा वापर करुन घेईल ते. काही असो, हे यश रेवाबरोबर सिलेब्रेट करायला पाहिजे. हवं तर नंतर डच्चु देता येईल तिला. रेवा.. माझी पर्सनल सेक्रेटरी.. तिचा विचार मनात येताच चेहऱ्यावर एक स्मित तरळुन गेले.
"काय आणु साहेब?" काम फत्ते झाल्यावर निवांतपणे एका हॉटेलात बसलो असतांना वेटरने माझ्या विचारचक्रात खोडा घातला.
"चहा आण स्पेशल. आणि स्पेशल म्हणजे कमी साखरेचा बरं का. नाहीतर ओतशील डबाभर साखर."
त्या भागात अतीगोड चहा मिळत असल्याने मी आधीच सांगुन मोकळा झालो.
"नाही ओ साहेब. तुम्हा मुंबै पुण्याच्या लोकांना कमी साखरेचा चहा लागतो हे माहीत आहे आम्हाला." ओशाळवाणं हसत वेटर म्हणाला.
आमचं हे संभाषण सुरु असतानाच माझं लक्ष कोपऱ्यात बसलेल्या एका इसमाकडे गेलं. क्षणभर पहातच राहिलो. हो गोरखच होता तो. तोच डांबरी रंग, बसकं नाक, फताडे ओठ आणि तेच मिचमिचे डोळे. बोलायचा तेव्हा चिरक्या आवाजात काय सांगायचा काही कळायचंच नाही. सगळ्यांच्या टिंगलीचा विषय, मी तर आघाडीवरच असायचो त्याची चेष्टा करायला, त्याला काय वाटत असेल याचा विचारसुध्दा येत नव्हता मनात. शाळेपासुन ते कॉलेज पर्यंत माझ्याच वर्गात होता. फारसा कोणाशी बोलायचा नाही. त्याने मध्येच कधीतरी कॉलेज सोडलं होतं. नेमकं कधी ते आठवतही नाही आणि लक्षात ठेवायची गरजही कधी भासली नाही. आयुष्यात काही व्यक्ती अशाच असतात, सिनेमातल्या एक्स्ट्रा कलाकारांसारख्या.. त्या असल्या काय अन् नसल्या काय, काही फरक पडत नाही..
एरव्ही मी त्याची फारशी दखल घेतलीही नसती, पण आज या परक्या गावात तो मला दिसला होता आणि मलाही माझी यशोगाथा कोणालातरी सांगायची हुक्की आली होती.
"गोरख.." मी हलक्या आवाजात हाक मारून हात हलवला. त्याने चमकुन माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी अघटीत पाहिल्यासारखा चेहरा करुन तो वेगाने हॉटेलबाहेर पडला.
तो नक्की गोरखच होता. दुसरा असता तर त्याची अशी प्रतिक्रिया नक्कीच नसती. झाल्या प्रकाराने वेटरही चक्रावुन गेला.
"ते साधारण या टायमाला नेहमी येतात साहेब. तासभर एक कप चहा पीत बसतात. या वेळी हॉटेलात जास्त गिऱ्हाईक नसतं म्हणुन आम्ही काही बोलत नाही. पण तुम्हाला पाहुन ते भुत पाहिल्यासारखा चेहरा करुन पळुन का गेले ते काही कळेना बघा." वेटरने माहिती पुरवली.
म्हणजे मला जे जाणवलं ते वेटरच्याही लक्षात आलं होते तर.
"ओके, मी बघतो काय आहे ते. तु जा आता" मी वेटरला दटावलं.
मी तसा प्रत्येक शक्यतेचा विचार करुन कृती करणारा व्यक्ती आहे, पण खुप विचार करुनही गोरख असा का वागला असावा याचा अंदाज काही बांधता येईना. तसे आज परतुन उद्याचा दिवस मस्त रेवाबरोबर घालवायचा माझा विचार होता, पण मध्येच हा प्रकार घडल्याने विचारांचा गुंता झाला होता आणि तो सुटल्याशिवाय मला चैन पडणार नव्हती. म्हणुन पुन्हा गोरखची भेट घेणे आवश्यक होते. वेटरच्या सांगण्यानुसार तो दुसऱ्या दिवशी त्याच्या नेहमीच्या वेळी हॉटेलमध्ये येण्याची शक्यता होती. एक दिवस मुक्काम वाढवुन मी गोरखची भेट घेण्याचे ठरविले आणि मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
ती रात्र तळमळत कशीबशी घालवली आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तयार होऊन वाट पहात बसलो.
साधारण गोरख येण्याच्या अर्धा तास आधी हॉटेलसमोरच्या एका टपरीच्या बाजुला आडोसा पाहुन वर्तमानपत्र चाळत उभा राहिलो. कालच्या प्रकारामुळे तो येण्याची शक्यता कमीच होती, पण मन मोठं आशावादी असतं. जवळपास तासभर वाट पाहुनही गोरख येण्याची काही चिन्ह दिसेना तेव्हा मी परत जायचा निर्णय घेतला. 'उगाचच आजचा दिवस फुकट गेला' असा विचार मनात आला असतांनाच पाठीवर थाप पडली. चमकुन मागे वळुन पाहिले तर गोरख उभा होता.
"तु सागर आहेस ना? मला वाटलंच होतं, तु मला भेटायला पुन्हा येशील म्हणुन. चल बाजुलाच एक मंदिर आहे. आपण तिथे जाऊन बसु." इकडे तिकडे पहात घोगऱ्या आवाजात गोरख म्हणाला.
मंदिराचा परिसर प्रशस्त आणि स्वच्छ होता. तसा मी नास्तिक व्यक्ती आहे. पण या ठिकाणी आल्यावर प्रसन्न वाटले मला. एका डेरेदार झाडाखाली असलेल्या बाकड्यावर आम्ही बसलो.
"काय करतोस तु? पत्नी, मुलंबाळं काय करतात?" घसा खाकरत गोरखने सुरुवात केली.
"एका कंपनीत मॅनेजर आहे मी. आणि लग्न या भानगडीतच रस नसल्याने पत्नी, मुलांचा विषयच येत नाही. मस्त चाललंय माझं" छद्मी हसत मी उत्तरलो.
"मग कशात रस आहे तुला?" आपले मिचमिचे डोळे आणखी बारीक करत गोरखने विचारले.
"तुला सरला आठवते? कॉलेजला आपल्या वर्गात होती ती. तुझ्या लक्षात येणार नाही कदाचित. कॉलेजात हिरो होतास ना तु." आता गोरखचा आवाज चिरका झाला होता.
कॉलेजमध्येच काय, आत्ताही हिरोच आहे मी. आणि ती सरला, कुठल्याशा खेड्यातली गावंढळ मुलगी, स्वत:च माझ्याकडे आली तर मी काय करणार त्याला. माझा हात हातात घेऊन सुखी संसाराची स्वप्न पहात बसायची ती. शेवटी माझा कार्यभाग पुर्ण झाल्यावर मी नेहमीप्रमाणे दुर केलं तिला.
"माझं प्रेम होतं तिच्यावर. पण रंगरुपामुळे तिच काय दुसरी कोणतीही मुलगी माझ्या प्रेमात पडणे शक्य नव्हते. त्यातच ती तुझ्या नादाला लागली होती. दुरच्या नात्यातील असल्याने 'तु फसवशील' हे मी हिंमत करुन तिला समजावण्याचा प्रयत्नही केला होता. पण एखादं झुरळ झटकावे तितक्याच तिरस्काराने तिने मला उडवुन लावले." तो क्षणभर थांबला.
आता मला गोरखचा राग यायला लागला होता. इतक्याशा गोष्टीसाठी त्याने माझा एक दिवस वाया घालवला होता. मी उठुन उभा रहाणार तोच त्याने माझे मनगट पकडुन खाली बसवले.पकड जबरदस्त होती त्याची.
"बस खाली. अजुन बरेच ऐकायचे‌ आहे तुला." गोरखच्या आवाजात जरब होती. "तुझ्या नकाराने ती खचुन गेली होती. तिचे आईवडील लहानपणीच कुठल्याशा अपघातात देवाघरी गेले होते. आजीआजोबा यांनीच सांभाळले होते तिला. तुझ्याजवळ प्रेम शोधायला आली होती ती, पण तु स्वार्थ पुर्ण झाल्यावर झिडकारले तिला. तु टाळलेस पण निसर्गाने मात्र त्याचे काम पुर्ण केले होते. तिच्या घरी हे समजले तरी सरलाने तुझे नाव काही सांगितले नाही. नावाप्रमाणेच सरळ होती बिचारी.
दुरचा का असेना पण नात्यातला असल्याने तिचे आजोबा आले होते माझ्याकडे, तो कोण आहे याचा तपास करायला. तुझ्या पायावर डोके ठेऊन नातीला पदरात घ्या अशी विनवणी करणार होते ते."
धाप लागल्यागत गोरख थांबला. सोबतच्या बाटलीतून घोटभर पाणी पिऊन त्याने पुन्हा सुरुवात केली.
"माहित असुनही मी नाही सांगितलं तुझे नाव. शेवटी मी पण स्वार्थीच निघालो रे. वाटत होते आजोबांनी एकदा जरी मला विचारले असते तर‌ी मी तळहातावरच्या फोडासारखे जपले असते तिला. मी काही सांगत नाही हे पाहुन हताश होऊन परत गेले ते. पण मला बरंच माहित आहे हे त्यांना जाणवले होते..
त्याच रात्री सरलाने गावातली विहिर जवळ करुन स्वत:ची सुटका करुन घेतली आणि या धक्क्याने आजोबाही गेले.
या सगळ्याला मीच जबाबदार आहे रे. तुझे नाव सांगितले असते तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता.
अविवाहित राहुन आजही मी याचे प्रायश्चित्त घेत आहे, सरलाच्या आजींच्या समोर जायची हिंमत नाही, पण त्यांच्या गरजेपुरते पैसे न चुकता दर महिन्याला पाठवतो मी. थकल्या आहेत आता त्या." गोरख बोलायचा थांबला.
"झालं तुझं? संपलं असेल तर मी निघतो. आधीच उशीर झालाय." हातातल्या घड्याळाकडे पहात मी उठलो.
"थांब! आता आलाच आहेस तर पुर्ण ऐकुनच जा. वाटले होते काळानुसार तुही बदलला असशील.
ते आजोबा दिसतात मला. रात्री अचानक कधीतरी जाग येते तेव्हा काळी टोपी काळा कोट घातलेले कोणीतरी मी काही सांगेल याची वाट बघत बसलेले आहे असा भास होतो मला."
आता मला हसायलाच आले.
"एक सल्ला देऊ तुला. शक्य असेल तर चांगल्या मानसोपचारतज्ञांचा सल्ला घे तु." गोरखच्या खांद्यावर थोपटत मी त्याचा निरोप घेतला.
रात्री परत जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा गोरखचाच विचार मनात होता. काय नग भेटतात एकेक. उगाचच आजचा दिवस फुकट गेला.
गाडी स्टेशनमधुन सुटली तेव्हा बाहेर पहातांना अचानक माझे लक्ष प्लॅटफॉर्मवर उभ्या बसलेल्या काळा कोट-टोपी घातलेल्या म्हाताऱ्याकडे गेले. माझ्याकडेच टक लावुन पहात होता, असा भास झाला. क्षणभर शहारा आला अंगावर. पुन्हा माझे मलाच हसायला आले.
दुसरा दिवस खुपच व्यस्त होता. कामाच्या‌ व्यापात कसलाच विचार करायला वेळ नव्हता. सगळी कामे आटोपताना रात्रीचे साडेदहा केव्हा वाजले ते समजलेच नाही.
काम बंद करुन बाहेर पडलो. पार्कींगमधुन गाडी बाहेर काढली. मस्त आवडीचे संगीत लावुन हमरस्त्याला लागलो. नेहमीचा रस्ता होता रहदारी तुरळक होती आणि मलाही घाई नव्हती म्हणुन संथ गतीने गाडी चालवत होतो.
अचानक 'रावसाहेब ओ रावसाहेब' अशी मागुन हाक ऐकु आली. गर्रकन मागे वळुन पाहिले तर मागच्या सीटवर तो काळा कोट-टोपीवाला म्हातारा आरामात बसला होता. 'किती शोधायचे तुम्हाला. मुलगी वाट पाहतेय तुमची' तो हसत मला सांगत होता..
'..नो..खोट आहे..भ्रम आहे हा सगळा.. तो गोरख फसला असेल आपण नाही फसायचे..' एक मन मला सावध करत होते तोच..
...त्या निर्मनुष्य रस्त्यावर आता बरीच गर्दी जमा झालीये. पोलीस पार्टीही आलेली दिसते.
"काही कळेना बघा साहेब. गाडी अगदी स्लो स्पीडने जात होती, आणि अचानक खेचली गेल्यासारखी समोरुन येणाऱ्या मालवाहू कंटेनरकडे गेली बघा." चुराडा झालेल्या कारकडे बघत एक प्रत्यक्षदर्शी पोलीसांना सांगत होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

मस्त जमलीय!
वीरू , अश्या प्रकारच्या कथा तुम्ही छान लिहीता.