अज्ञातवासी! - भाग ३०!

Submitted by अज्ञातवासी on 15 March, 2021 - 11:01

भाग - २९

https://www.maayboli.com/node/78262

"शेखावतसाहेब."
"बोल जयशंकर..."
"जयशंकर चुळबुळत उभा राहिला.
काय झालं जयशंकर, बोल की." शेखावत लिहिण्यात मग्न होता.
"बाहेर... मोक्षसाहेब आलेत."
"काय?" शेखावत उडालाच...
"खानाचा डाव यशस्वी ठरला." तो पुटपुटत बाहेर गेला.
"मोक्षसाहेब, अहो आम्हाला बोलवायचं..."
"काका." मोक्ष पुढे आला, आणि शेखावतच्या पाया पडला.
"मोक्षसाहेब."
"मोक्ष म्हणा काका, साहेब नको. तुमच्या मुलासारखा आहे मी."
"खानसाहेब?" शेखावतने खानसाहेबांकडे बघितलं.
"हो, सगळं सांगितलंय मी त्यांना. शेवटी वडिलांच्या महान परंपरेसाठी आले."
"मोक्ष, कधी आलास."
"काल रात्री."
"अरे कुठे थांबलाय, हे नाशिक आहे राजा, इथे पावलोपावली तुला धोका असेल."
"म्हणून काका एका अतिशय सुरक्षित जागी थांबलो."
"कुठे?"
"खानसाहेबांच्या हवेलीत...."
शेखावतला धक्क्यांवर धक्के बसत होते.
'त्याहून सुरक्षित काही असूच शकत नाही.' तो स्वतःशीच म्हणाला.
"शेखावतसाहेब, परवा निर्णय होईल. तुमच्या शब्दांवर विसंबून मी मोक्षसाहेबांना आणलंय..."
"रजपूत आहे मी, माझा शब्द कधी फिरवत नाही." शेखावतही म्हणाला.
"काका..." मोक्षने त्यांना मिठी मारली.
तिकडून जयशंकर असहायपणे सगळं बघत होता.
◆◆◆◆◆
'कसमss, पैदा करने वाले की.'
डिसुझा पब मध्ये थिरकत होता. मिथुनची भ्रष्ट नक्कल करत.
"डिसुझा." पांडे ओरडला.
डिसुझा आपल्याच धुंदीत होता.
"सोड त्याला पांडे, येडा आहे तो. ड्रग्स, दारू आणि पोरी, यांशिवाय त्याला काही सुचत नाही."
खळकन काचेचा आवाज झाला...
शेखावत शिताफीने बाजूला झाला.
टेबलाच्या मधली एक वाईनची बॉटल फुटली...
"डिसुझा...भेxxx..." शेखावतने शिवी हासडली.
"शेखावत, लक्षात ठेव, मिथुनची स्टेप आणि डिसुझाचा नेम, कधीही चुकत नाही...."
डिसुझा शांतपणे म्हणाला, आणि पुन्हा नाचू लागला.
"मला तर वाटत, यालाच आधी उडवावं," शेखावत पांडेला म्हणाला.
"सोड... सांग मग तुझे मोक्षसाहेब काय म्हणाले?"
"मोक्ष फक्त, साहेब नाही. काका म्हणाला मला तो."
"काही दिवसांनी काका मला वाचवाही म्हणेल." पांडे फिदीफिदी हसला.
"सध्यातरी एक बुजगावण खुर्चीवर बसवायला हवं पांडे. नाशिक विनानायक असणं परवडणार नाही, नाहीतर गल्लीबोळात भाई तयार होतील. मुंबईची नाशिकवर बारीक नजर आहे, त्यामुळे फक्त एकदा कुणीतरी खुर्चीवर बसलं ना, त्याच्या नावाखाली गल्लीबोळातले छोटेमोठे भाई मी कापून काढतो."
"...आणि मी या कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या संघटना." पांडे म्हणाला.
"परवा, आपला खेळ सुरू होईल पांडे." शेखावत म्हणाला.
पांडेंनी समाधानाने मान हलवली.
◆◆◆◆◆
"अप्पा, येऊ का?"
"संग्राम... ये... अरे कधीपासून एवढा सोज्वळ झालास."
संग्राम हसला, आणि आत येत म्हणाला.
"अप्पा... धन्यवाद...."
"काय??? बरा आहे ना तू?"
"हो अप्पा."
"सुधरतोय का काय तू?"
"अप्पा, सांभाळू शकेल ना मी सगळं?"
"संग्राम?"
"भीती वाटतेय अप्पा, दादासाहेबांच्या कथा अक्षरशः दंतकथा झाल्या आहेत..."
"तू दादासाहेब बनायचा प्रयत्नही करू नको. कधीही नाही. दादा वेताळ होता, ते खोटं नाही. नेहमी स्वतः गोळीबारात उतरायचा, नेहमी वाटायची, आजच बातमी येईल, गेला गोळी लागून...
पण कधीही नाही, नेहमी यायचा, एखाद्या वाघासारखा, आणि लोकांना दंतकथेसाठी एक नवीन विषय मिळायचा."
"अप्पा..."
"पोरा जा, नाशिक तुझं आहे..." अप्पा म्हणाले...
संग्राम त्यांच्याकडे बघतच राहिला, आणि निमूट बाहेर पडला.
बाहेर ती खुर्ची अजूनही उभी होती...
रात्र मध्यावर आली होती...
...आणि कारस्थानेही...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...