
काव्यसुधानंद
कवयित्री -- सौ. सुजाता सुभाष बोधनकर
पत्ता-
द्वारा-डॉ.सुभाष बोधनकर
"सुधाम" प्लॉट नं.70 गिरिश सोसायटी
गेट नं.3 शानू पटेल शाळेजवळ
आंबेडकर चौक,वारजे,
पुणे 411058
फोन नं-9421679043/ 02025231831
मनोगत
"ह्या कविता केवळ स्वत:च्या आनंदा साठी लिहिलेल्या असल्याने संग्रहाला "काव्यसुधानंद" हे शीर्षक दिले आहे. हा कवितासंग्रह प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होतो आहे कारण अनेक वर्षांपासून केलेल्या या कविता माझ्या डायरीत तशाच पडून होत्या त्यांना एकत्र करून माझ्या हितचिंतकांच्या भेटीला त्यांना घेऊन येण्याचा हा योग आज जुळून आला आहे याचे मला निश्चितच अप्रूप आहे. माझ्या मनात विचारांची जशी दाटी झाली तशी या विचारांनी शब्दांचं रूप घेऊन कागदावर अवतरायला सुरुवात केली. विचारांना कुठलं आलं विषयांच बंधन? कधी ते निसर्गावर फिदा व्हायचे, तर कधी ईश्वरचरणी लीन व्हायचे, कधी ते माहेरच्या वाटेने धावायचे, तर कधी सासरी शांतपणे विसावायचे. जेव्हा मनात आत्मकेंद्रित विचार सुरू झाले तेव्हा 'मी माझे, या कवितांची एक साखळीच विणल्या गेली. त्यातूनच मी, माझे हे, माझी मुलं, माझा देश, माझं शहर, इथपासून ते माझी शेजारीण, इतकच काय माझ्या कामवाल्या बाई, इथपर्यंत ती मालिका शब्दबद्ध होत गेली. एका वर्षी ज्या दिवशी घरी तुळशीचं लग्न होतं त्याचदिवशी अचानक मला प्रवासाला निघावं लागलं. ही घटना प्रवासभर मनात सलत राहिली आणि ती, प्रवासातच 'तुळशीचं लग्न', या रूपाने साकार झाली तो सल इतका गहरा होता की तुळशीच्या लग्नाचं गाणं झालं त्याची चाल आणि शब्द माझ्या मनासारखे जमले.
वाचक मंचाची सदस्य झाल्यानंतर वाचनाविषयीची आस्था काही कवितांमधून प्रकटली.
काही दिन विशेषांच्या निमित्ताने जसे महिला दिन, हास्य दिन, जेष्ठ नागरिक दिन, विचारांची जुळवणी झाली. शिवाय मदर्स डे, चिल्ड्रेन्स डे , न्यूइअर डे, वगैरे सुद्धा माझ्या कवितांनी साजरे केले. श्रीमद्भगवत गीतेच्या विचारांनी प्रभावित झाल्याचा परिणाम म्हणून गीतामाता ही माझी आवडती पद्यरचना म्हणून तयार झाली. कधी संसाराकडे धाव, तर कधी परमार्थाची आसक्ती, कधी प्रपंचाची विरक्ती, तर कधी ईश्वर भक्ती, कधी सद्गुरु भेटीची तळमळ, तर कधी भूतमात्रांविषयी कणव जशी मनस्थिती तशी पद्यरचना होत गेली. या रचनांचे इ बुक करण्याची कल्पना सर्वस्वी सुहास ताईंची तेव्हा सर्व हक्क त्यांच्या स्वाधीन करून माझं मनोगत इथेच थांबवते
सौ. सुजाता (सुधा) बोधनकर
ऋणनिर्देश
या काव्यसंग्रहाचं संपूर्ण श्रेय माझी नणंद सुहास ताई इंदुरकर हिला जातं. मी फक्त कविता लिहिल्या. शब्दरूप असूनही त्या शब्दातीत असल्यासारख्या अनेक वर्ष माझ्या डायरीत निपचितपणे झोपल्या होत्या, ना मी कधी त्यांना जागवायचा प्रयत्न केला ना कधी त्यांनी मला हाक दिली, पण सुहास ताईंचा स्वभावच वेगळा, त्यांनी इतक्या हळुवारपणे त्या कवितांना साद घातली कि त्यांचा संग्रह, इ बुकच्या रूपात येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अगदी सुखरूपपणे पार पडला, या कवितांचा प्रवास खरंच फार बिकट होता. मी रोज एका कवितेचा फोटो काढून व्हॉटस्पने तो सुहास ताईंना हैदराबादला पाठवायचा, त्या त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून नागपुरला माझा भाचा केदार इंदुरकर याला पाठवायच्या, त्याने टाईप करून ती फाईल पुन्हा हैदराबादला पाठवायची, त्यात काही करेक्शन्स असतील तर त्या करून ती पुन्हा चेकिंगसाठी माझ्याकडे म्हणजे पुण्याला यायची, बहुधा काही चुका नसायचच्याच पण एखादी दुसरी टायपिंग मिस्टेक असेल तर तशा सूचना मी दिल्यानंतर शेवटी ती कविता फायनल फॉर्ममध्ये सुहास ताईंच्या लॅपटॉप मध्ये आनंदाने घर करायची. प्रत्येक कवितेचा असा अवघड प्रवास, न थकता, न कंटाळता, घडवून आणल्याबद्दल सुहास ताईंना कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत. कवितांचा हा प्रवास जलद घडवून आणण्यामध्ये इंटरनेट टेक्नॉलॉजीचा भरपूर वाटा आहे. तांत्रिक बाबतीत केतकीची खूप मदत झाली. दुसर क्रेडिट जातं ते म्हणजे केदारला एखाद्या दिवशी माझ्याकडून जर कविता पाठवली गेली नाही तर तो आवर्जून फोन करायचा. त्याने टायपिंगचा कंटाळा केला असता तर हा संग्रह प्रकाशितच झाला नसता. त्याचे आभार मानायला जावं तर तोच मला थँक्यू म्हणतो. त्याचा वेळ खूप छान गेला म्हणतो टायपिंगमध्ये. किती हा निरागसपणा निरपेक्षपणा. खरंच माय लेक दोघेही धन्य आहेत.
अनुक्रमणिका
शीर्षक पृष्ठ क्रमांक
१. शिवलीलामृत गीतमाला(अध्याय १ ते १४)
२. भागवत कथा 33
३. माझी प्रार्थना 35
४. माझा विठ्ठल 36
५. का रे विठोबा 37
६ श्रीकृष्ण जन्म 39
७. आला रे आला 41
८. माझ्या तुळशीचे लगीन 42
९. मी गणपती बोलतोय 44
१०. प्रार्थना 46
११. अंत 47
१२. गुरूमाऊली 48
१३. गीतामाता 49
१४. अनंत 50
१५. भजन करी 51
१६. पुत्र शारदेचा 52
१७. आळवणी 54
१८. जगदंबेची महती 64
१९. विठ्ठल मनातला 65
२०. नामरुपगुणातीता 66
२१. गुरुराया 67
२२. माझी शरणागती 68
२३. माझा देव 69
२४. समाधान 71
२५. मी 72
२६. माझे 'हे' 74
२७. माझी मुले 76
२८. माझे शहर 78
२९. माझ्या इच्छा 79
३०. माझं माहेर 81
३१. अशी कशी जाऊ मी माहेराला 84
३२. माझी आई 85
३३. माझ्या मन मानसी 86
३४. माझा छंद 87
३५. माझे जीवन 89
३६. माझा प्रॉब्लेम 90
३७. माझी शेजारीण 93
३८. माझ्या कामवाल्या बाई 94
३९. माझा नातू 96
४०. माझा देश 97
४१. माझ्या सुनेचं मनोगत 99
४२. मन 100
४३. माझे कोडे 101
४४. माझी खरेदी 102
४५. माझे मूकअश्रू 104
४६. माझी कल्पना 105
४७. माझा साज 106
४८. माझा व्यायाम 108
४९. माझी बाग 109
५०. मी प्रवासाला निघते 110
५१. मी वाचनालयात जाते 111
५२. आली माहेरपणाला 113
५३. ती व तो 114
५४. घर असावे घरासारखे 115
५५. घर 116
५६. काय वाचतेस 117
५७. वाचक मंच 118
५८. वाचक मंचाने मला काय दिले 119
५९. वादळ 121
६०. परी 122
६१. बाई 123
६२. स्त्री 125
६३. बाई तू कोणाची 126
६४. हास ग घुमा 128
६५. महिला क्रिकेट 130
६६. केळवण 132
६७. निसर्ग 133
६८. मी रत्नाकर 134
६९. पाऊस 135
७०. जेष्ठ नागरिक संघ 137
७१. सरत्या वर्षाला सलाम 140
७२. कमला सोहनी 141
७३. होकार 142
७४. वाढदिवसाच्या शुभेच्छा 143
७५. जुने-नवे कव्वाली 144
७६. स्त्री- पुरूष कव्वाली 147
७७. काबिलियत 150
७८. Education 151
७९. वाढदिवसाच्या शुभेच्छा 153
८०. माझे म्रुत्युपत्र 154
८१. मुक्ती 155
८२. श्री पाणी पुरी पुराण 156
८३. श्रीकृष्णा देई तव नाम 157
८४. माझे मन चंचल 158
८५. स्मरण 159
८६. शंभो महादेव 160
८७. सय मायभूमीची 160
८८. अंतर्यामी 161
८९. मोबाईल 162
९०. हरी 163
९१. मी धरा 164
९२. आला श्रावण 165
९३. तू माझा भगवंत 166
९४. पुरूष पृकृति 167
९५. आयुष्य 168
९६. पुण्योदय 169
९७. तुझं देणं 170
९८. शोध 171
९९. आमचा भाऊ सियान 172
१००. कवितेची कविता 173
१. शिवलीलामृत गीतमाला
श्री.
श्री गणेशायनमः
श्री गुरवे नमः
श्री श्रीधर स्वामी नमाय
श्री शिवलीलामृत गीतमाला
श्री गणेश वंदन
हे गणराया नमन तुझ्या पाया
देई बुद्धी देई शक्ती शिवलीला गावया (धृ)
सिद्धीबुद्धीचा तू दाता
सकल जिवांचा तू त्राता
देई भक्ति देई स्फूर्ति
संकल्प सिद्धी जावया (१)
वरद विनायक तुझसी म्हणती
गण देव तुझं नित्य गौरविती
देई यश अन देई सुमती
आले शरण तुझीया पाया (२)
जरी तू मानीसी यथार्थ
तरी पूर्ण होईल ग्रंथार्थ
तुझा महिमा तो अतर्क्य
निर्विघ्न करिसी तू कार्या (३)
अध्याय पहिला
दाशार्हरायाचे आख्यान
प्राशिता शिवलीलामृत थोर
तृप्त होय श्रवण चकोर (धृ)
जपता शिव पंचाक्षरी मंत्र
रक्षितो निजांगे त्रिनेत्र
भक्तीने आकळीतो पंचवक्त्र
मंत्रराज कल्पतरू साचार (१)
राजा दाशार्ह राहे मथुरेस
राणी कलावती सेवेस
रूप गुण ऐश्वर्याची दोघे खाण
सर्व राजे नमती त्या वारंवार (२)
परी राजास न घडे शिवार्चन
राणी सांगे जावे गर्गमुनीस शरण
घेता शिवदीक्षा गुरु मुखातून
कोट्यावधी पापे जाती पळून
निष्पाप होई नृपवर (३)
कलावती परम चतुर
करी रायाचा उद्धार
गुरु स्तवन शिव मंत्र पठण
उभयता करी प्रेमे करून
सुफळ होई त्यांचा संसार. (४)
शिवलीलामृत अद्भुत
शिवमंत्राचा महिमा परमामृत
सांगे वेद व्यासशिष्य सूत
श्रवणे पातक पर्वत जळत
मिळेआयुरारोग्य संतती
संपत्ती ज्ञान विचार (५)
अध्याय दुसरा
शिवरात्री महिमा
शिवनाम परम पवित्र त्यातूनही ती शिवरात्र
उपवास बिल्वार्चन, जागे रात्र, भस्म होती पापे समग्र (धृ)
विंध्याद्री वासी एक व्याध
ज्याने केले बहु अपराध
निघे तो करण्या पारध
माघी कृष्ण चतुर्दशी रात्र (१)
विनोदे बोले शंभू शिव हरहर
नकळत बिल्वदल पाडी शिव लिंगावर
व्याधास उपवास जागरण घडतं
तेणे संतोषला पंचवक्त्र (२)
जलपाना लागी येई एक हरिणि
व्याध तिये लक्षीला दुरुनी
प्रार्थी ती व्याधास कळवळोनी
म्हणे सोडी मज मी दीन गर्भिणी
गर्भ ठेवोनी येईन परतोनि
आण वाहोनि गेली ती परत (३)
दुसरी हरिणि आली तेथे तृषार्त
म्हणे व्याधा वधू नको मी दीन आर्त
सोडी स्वार्थ आचरी परमार्थ
दया करील मग भालनेत्र (४)
नीरपानार्थ येई मृगराज
व्याध नेम धरी, जाणुनी सावज
मृग विनवी, मारू नको आज
राम प्रहरी परतेन सहज
व्याध सदगद अश्रू भरले नेत्र (५)
पूर्व दिशा मुख प्रक्षाळीत
तो तिसरी मृगी आली अकस्मात
व्याध देखोनी कृतांतवत
म्हणे मारू, रक्षी प्राणार्थ
कृपा प्रसाद देईल त्रिनेत्र (६)
चौ प्रहरांच्या पूजा चारी
संपन्न होतं शिवजागरी
पापे सप्तजन्मीची जाळी निर्धारी
व्याध पाही सदाशिव सर्वत्र (७)
व्याध गेला शिव पदा प्रती
तारा मंडळी अद्यापि मृगे राहती
धन्य धन्य ते शिवभक्त ते ची
जे शिवरात्री व्रत आचरती
शिव कृपेस तेची होती पात्र (८)
अध्याय तिसरा
गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य
ओंकार रूपे कैलास नाथ
भवानी सहित तेथे नांदत
ते गोकर्ण क्षेत्र परम पवित्र
ब्रम्हादिक जेथे तप आचरत (धृ)
लंका नाथाची माता कैकसी
लिंग पूजनाविण न प्राशी जलासी
तिच्यास्थव जाऊन कैलासासी
रावण मागे आत्मलिंग शंभूसी
भक्तवत्सल शिव देत दिव्य लिंगाप्रत (१)
लिंग घेऊनी निघाला दशानन
वाटेत गाई राखी गजानन
देव स्तविति, आणी लिंग सोडवून
गुराख्या हाती लिंग सोपवून
एकांती जाई रावण लघुशंके प्रत (२)
तीन वेळा हाक देई एकदंत
मग लिंग भूमीवरी ठेवीत
तो तेथेची एकरूप होतं
गुप्त गणेश, गाई लुप्त भूमीत
रावण धावे सवेग रागात (३)
दशमुख पाहे लिंग उपटोनी
ते न निघे डळमळे कुंभिनी
एका गाईचा कर्ण धरे धावोनी
तोही न उपटे तया लागोनी
नाम गोकर्ण महाबळेश्वर होतं (४)
त्या गोकर्णीचा अगाध महिमा
कैवल्य गर्भीचा तो पूर्ण गाभा
मृडानी सह शीव तेथे उभा
अभंग लिंग कोटी सूर्यांची प्रभा
अष्टसिद्धी नवनिधी तेथे विराजीत (५)
गुरु वशिष्ट शापि मित्र रायास
तो नृप होई कलमाषपाद राक्षस
ब्रह्म हत्या लागे त्याच्या पाठीस
राणी मदयंती सह सदा उदास
पाप मुक्तीस्तव दिनरात तळमळत (६)
मुनी गौतम त्यास म्हणे जाई गोकर्णासी
करी समुद्र स्नान अन अर्चि महेषासी
आज्ञा पाळूनी राजा, मुक्ती पावे शिव पदासी
चांडाळाही उद्धरे, जाती गोकर्णासी
वर्णावया महिमा वाणी चाचपडत (७)
अध्याय चौथा
श्रीकर बालकाची कथा
नको जप, नको तप, नको यज्ञ यागाला
भोळा शंभू भक्तीचा भुकेला (धृ)
भूप चंद्र सेन, भक्त महांकाळाचा
मित्र उपहार देत दिव्य मण्याचा
मणी रक्षणार्थ समय येत युद्धाचा
राव भावे पूजी कर्पूरगौराला (१)
सहा वर्षांचा बाळ पूजा विलोकी
पाषाणाने पाषाण तो अर्ची
मृत्तीकेने करून शिव आरती
ध्यान कराया नेत्र सान झाकी
उमारमण तत्क्षणी त्यास पावला (२)
तृणगृह होई रत्न खचित
बाळ माता, अलंकार मंडित
चंद्रसेना सह जन येत त्वरित
शिवाची अद्भुत करणी विलोकित
धन्य गोपबाळ ज्याने शिव नमिला (३)
होता खुळा सदाशिव प्रसन्न
शत्रु मित्र होती, रंक होती सधन
मूढ होई वक्ता, पंगु जणू पवन
श्रीकर बाळास सर्व करती नमन
थोर महेश्वर, थोर त्याची लीला (४)
अध्याय पाचवा
प्रदोष महिमा
प्रदोष व्रताचा महिमा गाऊ कसा? नसे सीमा (धृ)
व्रत आचरिता भावे प्रदोष
महा व्यथा पळती नि:षेश
मिळे तुष्टी, पुष्टी, आयुर्वर्धन
संतती संपत्ती दिव्य ज्ञान
मृत्यू गंडांतर दारुण,
प्रदोष व्रते जाती निरसोन (१)
धर्म गुप्त बाळ राजनंदन
माता पित्या विण वसे घोर कानन
तव उमा नामे विप्र पत्नी जाणं
स्व पुत्रासह राजपुत्रा देई स्तन
म्हणे दोघेही माझेचं नंदन (२)
उमा घाली दोन्ही पुत्र ऋषी चरणी
शांडिल्य सांगे प्रदोष व्रत समजावूनी
व्रत आचरता धन वाढे प्रतिदिनी
धर्मगुप्ता मिळे अंशुमती गृहिणी
त्याच्या भाग्या नव्हती क्षिति वाहे ओसंडूंनी (३)
शत्रू पराजुनी सुराज्य केले स्थापन
जेथे नसे आधि व्याधी दुःख अवर्षण
चिंतीता मनी मृडानी- रमण
जाती कैलासा प्रती विमानी बैसून
व्रताची प्रचिती खचित ही जाण (४)
अध्याय सहावा
सोमवार व्रत महिमा
निशिदिनी भजावा गंगाधर
त्यातही आवडे त्यास सोमवार (धृ)
आर्यावर्त देशीचा चित्रवर्मा नृपवर
त्याची कन्या सीमंतीनी होता उपवर
भाकीत कथिति द्वीजवर वैधव्य शीघ्र येणार
राव साहिना हा दुःखाचा डोंगर (१)
सीमंतीनी जाई शरण मैत्रेयीला
पुसे तिज सौभाग्यवर्धन व्रताला
मैत्रेयी सांगे आळवी तू उमा वल्लभाला
सोमवार व्रत, दुःख पर्वत ताडणार (२)
सीमंतीनी होई विवाहित चित्रांगदाशी
व्रत आचरे, सांब पूजी सोमनीशी
त्यास मागे अखंड सौभाग्यासी
भक्ति भावे विनवी ती कर्पूरगौर (३)
एके दिनी जाई तिचा पती नौकायनासी
नाव बुडोनी जाई तो यमुना तळासी
नसे दुःखाला पार, सावरे कोण कोणासी
शोक नावरे, सीमंतीनी पडे धरणीवर (४)
सीमंतीनी न सोडी व्रत, आदरे आचरी
श्रद्धा तिची दृढ असे महेषावरी
तक्षक वाचवी चित्रांगद, सोडी यमुना तिरी
सवे देत वस्त्र- अलंकार पर्वताकार (५)
तीन संवत्सर होता तीज भेटे भ्रतार
सीमंतीनीच्या आनंदास नसे पारावार
शत्रू जाती पळूनी, दुमदुमले नगर
सोमवार व्रताचा महिमा अति थोर (६)
अध्याय सातवा
भद्रायु आख्यान
हे पिनाक पाणी नीलकंठा
आले शरण तुला भगवंता
तुझ्या चरणी ठेविते माथा
ठाव देई तुझिया द्वारवंटा (धृ)
वज्रबाहूची पट्टराणी सुमती
तिचा द्वेष करती तिच्या सवती
तिच्या बाळासह तिला विष देती
मृत्यू न ये, विष फुटे अंगावरती
राजा बाळासह तिला वनी सोडीता (१)
सुमती करुणा भाके महेषाची
म्हणे धाव धाव हे जगत पती
तो पद्माकर नामे वैश्याधिपती
मानी सुमतीस धर्म कन्या निश्चिती
वाढे बाळाची दिवसेंदिवस व्यथा (२)
व्याध घेई राजपुत्राचा प्राण
सुमती शोक करी दीनवदन
परी न सोडी विश्वनाथाचे चरण
शिव योगी करी दिव्य निरूपण
भक्तरक्षणा उमेष झाला धावता (३)
जपता मृत्युंजय मंत्र शिव योगी
बाळ उठले, सुमती होई निरोगी
मृत्यूभय तोडी मंत्र राजयोगी
बाळ भद्रायू नामाने धन्य जगी
गुरुचरण दिसे भाग्यवंता (४)
अध्याय आठवा
भद्रायु कीर्ती मालिनी कथा
शंभो त्रिपुरांतका
करी क्षमा माझ्या पातका (धृ)
शिव भद्रायूस प्रसन्न, देई अद्भुत वरदान
दीर्घायु, आरोग्य, शौर्य आणि विद्याधन
त्यासी कशाची न पडे न्यून
रणी शत्रुस जिंकून, पित्या देई सिंहासन
सदाशिव त्याचा पाठीराखा (१)
चित्रांगद- सीमंतिनी, लेक त्यांची कीर्तीमालिनी
शिवयोग्याच्या वचनाने अर्पिती भद्रायुस प्रेमानी
पिता वज्रबाहू, माता सुमती भेटती कितिक वर्षांनी
करीती हिम केदारी तप, राज्य भद्रायुस सोपवूनी
धन्य भद्रायू शिवयोगी त्याचा सखा (२)
किर्तीमालिनी समवेत जाता, वन विहारार्थ
तो स्त्री, पुरुष ऊर्ध्व्य करोनी हस्त, येती वेगे धावत
कल्लोळ करती, म्हणती पाठी लागला महा व्याघ्र
व्याघ्र स्त्रीस नेत धरुनी, राजा सोडी जरी शर बहुत
पुरुषाच्या ठाव नसे शोका (३)
भद्रायुस अपयश, विप्र त्यास धिक्कारी
राया सत्वशील, देई त्यास स्वनारी
म्हणे देह त्यागी, अग्नि चेतवोनी
तो विप्र नसे, सत्व पाहे मदनारी
उमे सहित प्रकटे उमा रंगा (४)
भद्रायुस हृदयी धरुनी, हासे गजमुखतात
व्याघ्र मीच होऊनी, नेले भवानीस पळवित
तुझ्या भक्तिने मी अंकित, माग तुला जे अपेक्षित
उभयता जे मागत, त्याहूनी अधिक पुरवीत
जावे शरण कैलास नायका (५)
अध्याय नववा
वामदेव व शबर आख्यान
करिता शिवनामघोष
पापे जळती निशे:ष (धृ)
वामदेव नामे महाज्ञानी
शिवध्यानी रत, फिरे काननी
विश्व अवघे शिवमय मानी
आत्म स्वरूपी असे समाधानी
शिवनामा विण न करी भाष्य (१)
ब्रम्ह राक्षस एक येई धावूनी
वाम देवाला घेई कवळोनी
मती पालटे, सद वृत्ती जागोनी
म्हणे गुरुवर्या तुज स्पर्शोनी
होई महाज्ञान गेलो उद्धरोनी
नसे नरकासी आता प्रवेश (२)
संतसंगा सम विभूतीची महती
भस्म लेपने पापे भस्म होती
शबरासी सांगे, सिंहकेत नृपती
चिताभस्माविण न भजे उमा पती
लिंग घरा आणी, झाला हर्ष (३)
सुमूर्ते दोघे शिव लिंग स्थापिती
शबर, शबरी, पूजन कदापि न सांडिती
भावे चिताभस्म नित्य नूतन अर्पिती
नेवैद्य दाखविती होताची एकार्ती
सत्व पाहे त्यांचे एक दिनी महेष (४)
चिता भस्म कोठे न मिळे शबरासी
तो भक्त न अर्पे नेवैद्य शिवासी
शबरी, स्वदेह जाळून भस्म अर्चि शंभूसी
मिळे दिव्य देह तीज, जणू रंभा उर्वशी
उभयता पावती शिवपदा विशेष (५)
अध्याय दहावा
शारदा कथा
करावे उमा महेशाचे ध्यान
विवेके दूर सारावे अज्ञान (धृ)
शारदा नामे एक व्दिज तनया
पद्मनाभाची होई ती परिणीता
परी दैव कठोर, काळ नेई प्राणनाथा
कसे करावे त्या अबलेचे समाधान (१)
वृद्ध तपस्वी, अंध ऋषि नैधृव
पुत्र प्राप्तीचा देई शारदेस वर
अघटित घडे कैसे थक्क आप्तवर
नैधृव म्हणे सत्य बोलेन ही आण (२)
व्रत सांगे तुज एक अलौकिक
मंत्र षडाक्षर जपे विधी युक्त
पूजी उमा महेश्वर रोज एकनिष्ठ
शारदा मानी भावे गुरुस प्रमाण (३)
प्रसन्न होऊनी प्रकटली भवानी
नैधृवास नेत्र येत, तिच्या दिव्य तेजानी
ऋषि स ह शारदा लागे तिच्या चरणी
श्रद्धेने करीती देवीचे स्तवन (४)
उमा देई वर शारदेस तत्वता
पूर्व जन्मीचा पती, स्वप्नी तुज भोगिता
पुत्र होईल तुज शारदानंद नामाचा
होईल तो खचितच भाग्यवान (५)
पुत्रा सह शारदा करी गोकर्ण यात्रा
पूर्व जन्मीचा पती तिज तिथे भेटता
पुत्र देई त्याला, दूरूनी घे दर्शना
महिमा असा शिव भक्तीचा महान (६)
विख्यात झाला शारदानंदन
माता पित्यास करी नियमित वंदन
शिव कथेचे करी निशीदिनी श्रवण
शिवलीलामृताचे नित्य करावे रसपान (७)
अध्याय अकरावा
महानंदा आख्यान
ओम शिव, ओम हर, स्मर नागेश्वर,
नित्य भजावा मृत्युंजयेश्वर (धृ)
काश्मीर देशीचा नृप भद्रसेन,
पुत्र प्राप्त त्यास बहु प्रयासेन
राजपुत्र सुधर्म प्रधानपुत्र तारक
शिव भजनी दोघे सदा सर्वदा गर्क (१)
राजा चिंताग्रस्त पुसे पराशरास,
पुत्र वैरागी दोघे का भजती शिवास
ऋषी महाज्ञानी सांगे पूर्व कथा त्यांची
म्हणे महानंदा होती वारांगना काश्मीरची
वेश्या जरी असे ती, तरी पतिव्रता
श्रद्धा नेमे आचरी साऱ्या शिवव्रता (२)
कुकुट, मर्कट पाळी, रुद्राक्ष बांधी प्रीतीने
शिवा पुढे नृत्य गान करी त्यांच्या संगतीने
सदाशिव घेई परीक्षा सौदागराचा वेष धरोनी
म्हणे दिव्य लिंग ठेवी तीन दिवस जपोनी
जरी न रक्षि लिंग तरी अग्नि प्रवेश करीन मी
स्वत:च जाळी नृत्य शाळा आणि भस्म करी लिंगही (३)
महानंदा धावे घाबरी, मर्कट कुकुट देई सोडूनी
सौदागर प्रवेशी अग्नि, लिंग दग्ध झाले म्हणोनी
सर्व संपत्ति सहित करी गृहदान महानंदा
लुटवी सर्व संपदा बोलावूनी ब्रम्हवृंदा
सर्वांगासी भस्म चर्ची, रुद्राक्ष सर्वांगी धारण
अग्निकुंडा उडी टाकी, हृदई चिंती शिव ध्यान (४)
तो प्रगटे चंद्रमौळी, जो भक्ता ते संकटी पाळी
अलगद झेली महानंदेस अन् लावी हृदयकमळी
पावली ती शिवपदी जेथे नाही आधि व्याधी
राया सांगे पराशर पुत्र, कुकुट, मर्कट आधी (५)
परी आजपासूनी सातवे दिवशी राजनंदन पावेल मृत्युमुखी
राजा पिटे वक्षस्थळासी सहावे न दुःखाग्नीसी
मुनि म्हणे भद्रसेनास भावे करी रुद्रानुष्ठान
पुत्राचे टळले गंडांतर होई आर्युर्वधन (६)
रुद्राक्षाचा महिमा परम पावन
देई पाप मुक्ति त्याचे पूजन
आयुष्यहीन लोकांसाठी शिवानुष्ठाना महिमा थोर
इच्छिलेले मिळवे पद देऊनी त्यासी
स्वरूपी मिळवी कर्पूरगौर (७)
अध्याय बारावा
विदुर बहुला उद्धार व भस्मासुर कथा
करिता शिवलीलामृत श्रवण
भक्ती, वैराग्य ये आंगी पूर्ण (धृ)
विप्र विदुर कामकर्दमी लोळत
पत्नी बहुला जार कर्म करीत
दोघे करिती पापे असंख्यात
विदुर होई पिशाच्च येता मरण (१)
आली गोकर्ण यात्रेस शिवरात्रीस
बहुला पुनीत, ऐकता शिवनाम घोष
ऐके पुराण, घेई महाबळेश्वराचे दर्शन
अनुतापे पुराणिकासि जात शरण (२)
गुरुमुखे घेई पंचाक्षर मंत्र
शिवनाम जपे अहोरात्र
प्रेमे ऐके शिवलीलामृत ग्रंथ
कैसे उरे पाप तिळमात्र, (श्रवण भक्तीने सत्संगाने)
बहुला झाली परम पवित्र
नलगे अष्टांग योग साधन (३)
स्वयातीकीर्ती पुष्टीवर्धन
बहूलेने तिन्ही देह जाळून
तेची भस्म अंगी चर्चून
झाली शिवरुपी परम पावन
सदाशिव उद्धरे पापीण (४)
करी शिवअंबेचे स्तवन
म्हणे पतीस करा पावन
शिव कीर्तन ऐकविता पिशाचास
होई दिव्य रूप जाई शिव पदास
जैसे जळी विरत लवण (५)
भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन
भस्मासुरास निर्मुन म्हणे आण चिताभस्म नित्य नूतन
असुर मातला मदे परम, गोब्राम्हण टाके मारून
इच्छी जिंकावे त्रिभुवन, विष्णु धूर्जटी संहारून
घाली कपटी, शिवासी लोटांगण (६)
भोळा शंभू देई त्यासी एक वर
भस्म होई ज्या माथी ठेवीशि कर
उद्दाम होई असुर, करी अमाप संहार
भयभीत देव, जोडिती शिवाशी कर
म्हणे भस्मासुरास आले मरण (७)
असुर उद्दाम धावित,
ठेवू पाही शिवमस्तकी कर
पळता झाला सवेग तो
भक्तजनभवभंग भवानी प्रार्थि
इंदिरावर म्हणे रक्षी चंद्रशेखर
हरी धावता मोहिनी रूपात,
घायाळ तिच्या पदी असुर
मोहिनी नृत्य करवीत,असुर स्वमस्तकी ठेवी कर
भस्म होई तो न लागता एक क्षण (८)
अध्याय तेरावा
दाक्षायणीअग्निप्रवेश तारकासुर वध कथा
महादेवा महादेवा मजवरी करी कृपा महादेवा (धृ)
दक्ष प्रजापती करी महायजन
भवानी जाता करी अपमान
उडी घाली कुंडी क्रोध आवरून
शिवगण बोलवीती शिवा (१)
क्रोध संतप्त उमाकांत
आवेशे जटा आपटीत
वीरभद्र प्रगटेअकस्मात
यज्ञ करी पूर्ण उध्वस्त
दक्षाचे शिर त्वरे उडवीत
ते पायातळी रगडीत
देव ऋषि बाहती उमाधवा (२)
मेष शिर लावोनी दक्ष करी सजीव
महास्मशानी तपे शिव चिरंजीव
मेनके पोटी ज्न्मे हिमनग नंदिनी
प्रणवरुपिणी आदि माया (३)
तारकासुराचे पुत्र झाले अनिवार
पिडिली धरणी, पापे त्रासिले त्रिभुवन
देव धरिती चरण, तोषे पंचवदन
त्रिपुरे टाकी जाळोनीया (४)
तारकासुर करीआकांत,
स्वर्ग जाळी तो समस्त
देवललना धरूनी नेत
देवऋषि पळती भयभीत
म्हणे शिवउमेचा षणमुखपुत्र
दानवा,या संपवी प्रलया (५)
शिव, भवानी लग्न झाले चैत्र अष्टमिसी
कधी होईल पुत्र सप्तऋषि वाट पाहती
सहा मुखांचा कुमार जन्मे कार्तिकमासी
तारकासुरासी नि:पाताया (६)
सेनापतीत्व दिधले कुमारास इंद्राने
तारकासुर वधिला सप्तवर्षी बालकाने
सर्व देव मुक्त होती नाचती आनंदाने
धन्य धन्य शिव जगदंबा (७)
अध्याय चौदावा
चिलया बाळाचे आख्यान
भस्मासुरहरणा, भाललोचना
आले शरण तुझ्या चरणा देई दर्शना (धृ)
शिव दुर्गा खेळती सारीपाट
नारदमुनी डाव विलोकित
म्हणे जो जिंकी त्यास द्यावी वस्त्र
दहाही आयुधे भवानी जिंकून घेत
दिगंबर केले भोगीभूषणा (१)
तो गुणातीत रुसूनी जाई वना
जगदंबा व्याकुळ शोधी निरंजना
अव्यक्त तो व्यक्त होई टाकिता अभिमाना
भिल्लिचा वेष धरुनी आणिले भुवना
निराकारा करी साकार अंबा (२)
क्रांति नगरी श्रियाळ चांगुणा
अतीता प्रती देती इच्छा भोजना
नारद म्हणे हे पंचवदना
या दोघा परी शिवभक्त उपजेना
कसोटी घेण्या शिव येई सदना (३)
विश्वंभर घेई रूप कुश्चळाचे
इच्छा भोजन मागे नर मांसाचे
राजा राणी नम्र म्हणे देतो स्वमासाते
अतीत मागे जेवण त्यांच्या चिलया बाळाचे
अवश्य म्हणे नृप पत्नी चांगुणा (४)
माता म्हणे पाच वर्षाच्या चिलयास
तुझे मास भोजन देणे आहे अतिथीस
बाळ थोर शिवभक्त, न डरे देह त्यागास
धन्य माता पिता पुत्र, पार न शिव भक्तीस
आनंदे इच्छि देह शिवार्पण (५)
अतीत म्हणे राजा राणीस,
भोजना बसावे माझ्या पंगतीस
विन्मुख जाऊ न द्यावे अथितिस
राजा राणी राजी, खाण्यास पुत्र मास
विनविति अतिथीस करा जेवणा (६)
कुश्चळ म्हणे तुम्ही पुत्राविण
निपुत्रिका घरी मी न घेत अन्न
श्रियाळ, चांगुणा, आर्त धरती चरण
दीर्घ स्वरे बाहती उमारमण
शिव प्रकटोनी देई चिलयास जीवना (७)
शंकर हृदयी धरे चिलयाला
श्रीयाळ, चांगुणा मिळे दिव्य रूपाला
जो जाई शरण शिव पदाला
त्यांच्या विनाशी तो, दुःख संकटाला
श्रीधर स्वामीस करू नमना (८)
भैरवी
श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र
सौराष्ट्राचा सोमनाथ, अनाथाचा नाथ
श्री शैल्याचा मल्लिकार्जुन, त्याला जावे शरण (धृ)
उज्जैनीचा महांकाळ अन् ओंकारीचाअमलेश्वर
परळीचा वैजनाथ, जो तोच माझा नाथ (१)
डाकिन्याचा भीमाशंकर, सेतू बंधाचा रामेश्वर
दारूकाचा नागेश जो, तोच माझा जगदीश्वर (२)
वाराणसीचा विश्वंभर गोदा तटीचा त्र्यंबकेश्वर
हिमालयी जो केदार तोच असे घृष्णेश्वर (३)
बारा ज्योतिर्लिंगाचे जो तिन्ही काळी स्मरण करतो
त्याच्या साती जन्मांची ही पापे शंभू भस्म करतो (४)
इति श्री सांब सदाशिवार्पणम अस्तु
श्री शिवाय नम:
श्री शिवाय नम:
श्री शिवाय नम:
२. भागवत कथा संक्षिप्त
ऐका हो भाविकजन
श्रीमद भागवत कथा
श्री व्यासांनी रचिली जी ही
मानव कल्याणार्था. (धृ)
श्री शुकमुनींनी सांगितली सप्त दिनी परीक्षिता
अमृता सम गोड कथा ही शांती देईल चित्ता I
गोकर्णाचे आख्यान सांगते भगवंताची महत्ता
महापापी धुंधूकारी उद्धरीला सप्ताही ऐकता
सांख्य, कर्म,भक्ती, ज्ञान हे चारी योग उपदेशीले
भक्तीला प्राधान्य देऊनी तिलाच अति गौरविले I
विदुर मैत्रेय संवादातून घडते सृष्टी क्रमदर्शन
कपिल करीती देवहुतीला तत्त्वज्ञान वर्णन
दक्ष यज्ञ विध्वंस सांगुनी हरी- हर भेद मिटविला
अढळ पद देऊनी धृवाला भक्तीने नटविला I
प्राचीन बर्हीला स्व- स्वरूपाचे ज्ञान देती नारदजी
पुरजनाची कथा सांगुनी कृतार्थ करीती त्यासी
नाभी पुत्र ऋषभ देव जे ज्ञानाचे अवतार
वैराग्यावीण न ब्रह्म प्राप्ती गरजती वारंवार I
भरत आख्यान सांगते त्यागा आसक्तीला
जड भरताचा जन्म घेऊन उपदेशिले रहुगणाला
अति पापी अजामिळ तरला नारायण नामाने
अंत:समयी हरी आठवा कोणत्याही मिषाने I
दधिची अस्थिचे इंद्र वज्र, संहारी वृत्रासुरा
असुर असोनी परमभक्त तो निमाला परमेश्वरा
भक्त प्रल्हाद रक्षिण्या घेतला नृसिंहाचा अवतार
नक्रमिठीतूनी मुक्त गजेंद्र हरी करी उद्धार I
कूर्म झाला, मोहिनी झाला समुद्र मंथन समयी
वामन बनुनी बळीराजाला पाताळ राज्य तो देई
हयग्रीव बनुनी प्रभूने केले वेदांचे रक्षण
मनू राजाला मत्स्य संहिता सांगे नारायण I
भक्ती केवढी अंबरीशाची दुर्वास ही येई शरण
दशावतार तो त्याच्यासाठी घेई नारायण
सौभरी सिद्ध असूनी भुलला कामी विलासी जगाला
सगरवंशी भगीरथ आणी पृथ्वीवर गंगेला I
रघुराजाच्या कुली अवतरे रामप्रभू साक्षात
मानव जीवन कसे असावे दावी प्रत्यक्षात
श्रीकृष्णाच्या लीला मधुर अति अवीट अपरंपार
स्मरुनी त्यांना, नित्य वंदावे त्याला वारंवार I
अहंकार नको, मद, मोह नको क्रोध, ममता शत्रु जाण
स्वकर्म करुनी भक्तीभावाने करावे ईश्वरार्पण
महाज्ञान देऊनी धाडिले उद्धवा बदरिकाश्रमास
सनातन भागवत धर्म चिरंतन करी त्याच्या प्रचारास I
निर्दळुनि उन्मत्त यादव कृष्ण जाई स्वधामास
नाम रूपाने इथेच सदैव, हा ठेवावा विश्वास
श्रीकृष्णाला स्मरावे क्षणाक्षणाला शयनी, भोजनी, भजनी
भक्तीने नतमस्तक व्हावे श्रीमद भागवत चरणी I
३ . माझी प्रार्थना
दयाघना रे तुझी लेक ही आली तुझिया दारी
देऽऽऽवा मजवरी दया करी (धृ)
तुझ्या कृपेचा वर्षू दे घन
तुझ्या दयेने जीवन पावन
मोह ग्रस्त मी, तुझा कमल कर
ठेवी माझ्या शीरी (१)
तुझिया नामी नित्य असो मन
घडो सतत मज तुझेच चिंतन
अपराधी मी तुला प्रार्थिते
नियमित घडवी वारी (२)
चंचल मन हे ध्यान करी ना
गात्रे स्वैर ती, स्वस्थ बसे ना
मी पतिता तू पतितपावन
भव सागर हा तारी (३)
भक्ती रसाचे करू दे प्राशन
अर्चनी तूझिया लागो तनमन
क्षमाशील तू तुला विनवते
रूप तुझे साकारी (४)
४. माझा विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला ऽऽऽऽ विठ्ठला
तुमच्या नामाची भिक्षा मज घाला (धृ)
आले दिनवाणी दाराशी
नका घालवू उपाशी
तुम्ही पुंडलिका कसे पावला (१)
संत गौरवती तुम्हाला
म्हणती तुम्हाला दिन वत्सला
मज दीनेवरी पाखर घाला (२)
नाही बुद्धी नाही शक्ती
नाही श्रद्धा नाही भक्ती
दृढ धरीते तुमच्या चरणाला (३)
५. कारे विठोबा
कारे विठोबा असा विटेवर उभा आहेस युगानुयुगं,।।
तेही कमरेवर दोन्ही हात ठेवून, ।।
अगदी कारभार्याचा आव आणला आहेस ।।
आणि असा गालातल्या गालात का हसतोस ? ।।
आमची फजिती पाहून?।।
प्रपंचातल्या आमच्या अडचणी सोडवता सोडवता।।
आम्ही अगदी थकून जातो।।
म्हणून तुला मजा वाटते?।।
कोणी तापानी फणफणलेला, कोणी भुकेने वखवखलेला ।।
कोणी कफल्लक झालेला, कोणी बेघर झालेला ।।
सगळेच इथे आर्त, तुझ्या डोळ्यात मात्र एक मिस्कील भाव ।।
आमची टर उडवतोस का उभ्या उभ्या ।।
पण एक लक्षात ठेव रे विठोबा।।
आम्हीच तुला जागा दिली आहे, त्या विटेवर ही आणि आमच्या हृदयातही ।।
मनात आणलं तर उतरवून टाकू शकतो एका क्षणात या दोन्ही ठिकाणांवरुन।।
पण आम्ही तसं करणार नाही ।।
कारण, हे कारभारीपण आम्हीच तुला बहाल केलं आहे तुला मोठेपणा देऊन ।।
आम्ही आमचे दानत सिद्ध केली आहे तेव्हा उगाच आव आणू नकोस ।।
जगाचा करता करविता असण्याचा आणि उगाच भाव खाऊ नकोस ।।
आम्ही आहोत म्हणून तू आहेस हे लक्षात ठेव ।।
कळलं का रे विठोबा तव शिरी शोभते ।।
६. श्री कृष्ण जन्म
देव आले शरण विष्णूला, तारा या भूमीला
कंसे मांडीला अनर्थ, भार भू चा तो व्यर्थ (धृ)
हसून बोले जगजेठी, दुर्जनांची झाली दाटी
मी आहे तुमचे पाठी, अवतरेन देवकी पोटी (१)
देव नाचती आनंदाने, अभय दिले भगवंताने
करिती नमन भक्तीभावाने, करिती उदो उदो हर्षाने (२)
कंसे कळता हा वृतांत, झाला कृतान्तवत
वसूदेव देवकीला घाली बंदीगृहात (३)
राक्षसांचा जागता पहारा, दोघे बिचारे बेसहारा
कंस म्हणे राक्षसांना, मूल होताच मजसी सांगा (४)
पहिले मूल होता देवकीला, राक्षस जागवीती कंसाला
दुसरे तिसरे चौथे पाचवे सहावे सुद्धा मारले,
कंसाच्या क्रूर कर्माने तिन्ही लोक हादरले (५)
सातवा गर्भ देवकीचा, अवतार शेषनागाचा
तो नेला रोहीणीपोटी खेचून नाव त्याचे झाले संकर्षण (६)
आठवा जन्मता तो सूत, कोटी भानू उगवत
चतुर्भुज विष्णू साक्षात प्रकट झाले बंदीगृहात (७)
वसुदेव देवकी विस्मित, घालती दंडवत
भगवंत होई मग बाळ, हा हाच कंसाचा काळ (८)
राक्षस होती तर्र बेशुद्ध, वसुदेव झाला सिद्ध
उचलोनी घेई बाळ, म्हणे, हाच कंसाचा काळ (९)
याला लपवितो सत्वर, घेई पाटी डोईवर
आला नंदाचीये घरी, ठेवीला तिथे श्रीहरी
घेऊन येशोदा कन्येला, वसुदेव येई बंदीगृहाला (१०)
राक्षस होऊनी जागे, धावती कंसा मागे
कंस धावे वेगे वेगे, कन्या फिरवी रागे रागे (११)
चंचल चपला ती निसटोनी, बोले गर्जुन गगनी
कंसा होऊ नको मदमत्त, गोकुळी तुझा कृतांत
७. आला रे आला
आला रे आला आला कृष्ण कन्हैया आला
भोवती गोपगोपिकांचा मेळा जमला (धृ)
हे श्रीकृष्णा हे श्रीरंगा
हे मधुसूदना हे मनमोहना
धरी मुरली ती अधरी मोहना
स्वर मधूर दे ऐकू आम्हाला (१)
मोरपीस तव शिरी शोभते
वैजयंती तव रूप खुलवते
पैंजण पाई रुणझुण करते
नजर न लागो नंदलालाला (२)
माखन चोर तू आगळाच रे
भुलवीसी आम्हा चित्त चोर रे
तुझ्या विणा न चैन पडे रे
तूच वाटे सर्वस्व आम्हाला (३)
८. माझ्या तुळशीचे लगीन
माझ्या तुळशीचे लगीन येणार कोण कोण (धृ)
डुलत डुलत आले गणपती
ऋद्धी सिद्धी असे सांगाती
मागे दिसती शंभू पार्वती
स्कंद महाराजही मग प्रवेशती
आणखी राहिलं सांगा बरं कोण (१)
ब्रम्हदेव येती लांबून
सावित्रीला संगे घेऊन
थोर ऋषी मुनींना पाहून
देव करती नमन लवून
दत्तात्रयांनी ही केलं येणं (२)
दिसती महालक्ष्मीची पावले
भगवान विष्णू तिच्या सह आले
राम सीता ही मग प्रवेशले
विठ्ठल रखुमाईचे आगमन झाले
आता कुणाची बरं वाट पहाणं (३)
आले यक्ष आणि किंनर
अप्सरा ही नृत्य करणार
गंधर्वाचे ऐकू गांधार
बृहस्पती पौरोहित्य करणार
माझ्या डोळ्यांचं फिटल पारणं (४)
परब्रम्ह ठरविला वर
त्याला नाही कुणाची सर
त्याच्या चरणी जुळवावे कर
त्याचे स्मरण करावे निरंतर
सोहम सोहम हा मंत्र सुजाण (५)
हिरव्या शालूत वधू दिसे उठून
मंजिर्यांच्या मुंडावळी लेवून
तिचे औषधी गुण महान
शोभिवले तिने वृंदावन
शुभमंगल म्हणू आपण (६)
९. मी गणपती बोलतोय
हॅलो!! लोकहो मी गणपती बोलतोय
हल्ली म्हणे पृथ्वीवर मोबाईलचा जमाना आलाय
एकमेकांशी डायरेक्ट बोलायचं म्हणजे म्हणे गुन्हाच झालाय
म्हणून मी तुमच्याशी थेट आकाशवाणीवरूनच संपर्क साधतोय
हॅलो!! लोकहो मी गणपती बोलतोय (१)
वर्षानुवर्षे मी तुमचा गणपती उत्सव वरून न्याहाळतोय
दरवर्षी तुमच्या आवाहनाला जास्तीत जास्त घाबरतोय
माझ्या नावावर चाललेला हा धुमाकूळ पाहून कासावीस होतोय
हॅलो!! लोक हो मी गणपती बोलतोय (२)
मला सुखकर्ता दु:खकर्ता म्हणून नावाजता गणेश उत्सवात
स्वतः मात्र दुखकर्ता अन सुखहर्ता होता
कर्णकटू आवाजासाठी रात्री दहानंतर परवानगी मागता
तुमच्या बुद्धीची हा बुद्धिदाता कीव करतोय
हॅलो!! लोक हो मी गणपती बोलतोय (३)
अनंत खड्ड्यांमध्ये मांडवाच्या खड्ड्यांची भर घालता
प्रदूषणाने गांजलेल्यांना त्यात वाढ कशी करायची ते शिकवता
करोडो रुपयांची वर्गणी गोळा करून गरीबीचा आव आणता
कार्यकर्त्यांच्या तीन पत्तीच्या डावाचा आणि नशा
पाण्याचा मी धिक्कार करतोय
हॅलो!! लोकहो मी गणपती बोलतोय (४)
शाळकरांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना वेठीस धरता
वाहतुकीमध्ये अडथळ्याची शर्यत लावता गुलालानी अंग धूवून हिडीस नाचता
जाड जाड भिंग घेऊन मी, उत्सवात भक्तीला शोधतोय
हॅलो!! लोक हो मी गणपती बोलतोय (५)
काय झालं पुण्याच्या उच्च संस्कृतीला?
काय कारण असाव त्यांच्या घसरणीला?
का आणलं त्यांनी सणात राजकारणाला?
विसर्जन मिरवणूकीत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतोय
हॅलो!! लोकहो मी गणपती बोलतोय (६)
स्वार्थापोटी तुम्ही न्यायालयाची पायरी ओलांडताय
पुढच्या वर्षी मला बोलवायचा अधिकार तुम्ही गमावताय
देवाच्या सुद्धा सहन शक्तीचा अंत पाहताय
काय केलं म्हणजे तुम्हाला सद्बुद्धी लाभेल
याचं चिंतन करतोय
हॅलो!! लोकहो मी गणपती बोलतोय (७)
१०. प्रार्थना
प्रभूच्या चरण कमळी मन राहो निरंतर माझे काया, वाचा, प्राण पणाने चिंतन घडू दे त्याचे
घरी असो वा दारी, असू दे,
सांज, सकाळ, दिनरात असू दे,
स्मरण्या इशा, नसू दे काळ ना वेळ
विषयारण्यी चंचल मन हे धावे सैरावैरा
कसे सावरू त्यास सांग मज, प्रभू तुझाच रे आसरा
मज घडू दे सेवा तहहयात संतांची अन भक्तांची
झिजू दे काया सत्कार्यास्तव हीच गोष्ट भाग्याची
सत्संग घडू दे, सतआचरण्या बुद्धी देई भगवंता
प्राणपाखरू उडून जाऊ दे तव कीर्तन करता करता
११. अंत
घे पदरी नाथा तुझ्या पदी, मम माथा
नको अंत पाहू माझा थकले मी आता
अनंत ब्रम्हांडांचा नायक तू, तूच वेद वेदांत
किती वाट पाहू तुझी, नको पाहू अंत
हे वस्त्र जीर्ण झाले त्याला किती वापरू
आता घे फेडूनी ते नाथा खुशाल
मोह न त्याचा उरला
प्रार्थना तुजला देवा कळवळून मी करते
"क्षण एक न जावो तव स्मरणावीण" नको काही या परते
१२. गुरुमाऊली
माऊली गुरुमाऊली
करी खकृपेची साउली
नको देऊ वो अंतर
घाली दयेची पाखरं
देई देई ओ भिक्षा भक्तीची (१)
टाकी दृष्टी मजवर
फिरवी हात पाठीवर
नेई नेई वो भक्ती पंथाशी (२)
तुझ्या पायाशी मस्तक
माझे राहो निरंतर
ठाव देई ओ तुझ्या चरणाशी (३)
१३. गीतामाता
तू माझी माता गीता, तू माझी माता (धृ)
तूच दावीले विश्वरूप दर्शन
तूच शिकविले आत्म संयमन
तूच पाजीले ज्ञानामृता (१)
कर्म काय अन काय अकर्म
धर्म कोणता काय स्वधर्म
तूच मिटविल्या या चिंता (२)
सांख्ययोगाची तू जननी
गौरविती तुज तत्वज्ञानी
मुकुटमणी तू महाभारता (३)
ओम, तत्, सत् हा मंत्र शिकवूनी
ज्ञान भक्ती कर्माचा गोफ गुंफूनी
तूच दाविले सत् पंथा (४)
हे भगवत गीते तुज कोटी प्रणाम
एकच मागते तुजं वरदान
नित्य स्मरू दे भगवंता (५)
१४. अनंत
किती नावे तुझी, किती रे विविध ती रुपे,
कशी मोजू कोणत्या मापे
सदानंद ही तू, तूच असुर-मर्दना
कोणत्या भावे करू तुझ्या भजना
फळ फुलात तू, तूच बीज, पीक अन वृक्ष
जळी रस अन काष्टी तू दक्ष
ब्रम्हाण्ड ही तू, तूच मुंगी, तूच हत्ती
कशी विराट तुझी ही व्याप्ती
परमाणु, अणू, तूच नदी, नगशिखरे
तिन्ही लोकी तूच
तू विहरे, प्राणी, पक्षी तू अग्नि वायु पृथ्वी आप
कसा सावरिसी अनंत तू हा व्याप
कृष्ण गोपाळ तू, तूच योगी अन भोगी
काळसर्प ही तू, तूच दिव्य अनुरागी
चरअचर ही तू, तूच गुणी, निर्गुणी
अनंता शरण आले तुझ्या चरणी
१५. भजन करी
श्री कृष्ण गोविंद हरी, श्री कृष्ण गोविंद हरी
हे मना तू श्रीकृष्णाचे भजन करी
श्रीकृष्ण माता, श्रीकृष्ण पिता
श्रीकृष्ण सखा श्रीकृष्ण भ्राता
त्याचे तू चरण धरी (१)
श्रीकृष्ण कर्ता, श्रीकृष्ण करविता
श्रीकृष्ण दाता श्रीकृष्ण भोक्ता
त्याचे तू स्मरण करी (२)
कृष्ण घडवितो कृष्णच मोडतो
कृष्ण शोषतो कृष्णच वर्षतो
जा शरण त्याला सर्व तोपरी (३)
श्रीकृष्ण सर्वात्मा श्रीकृष्ण परमात्मा
श्रीकृष्ण विश्वात्मा श्रीकृष्ण जगदात्मा
त्या आत्मारामाला पाही अंतरी (४)
१६. पुत्र शारदेचा
फाटले होते शब्दांचे वस्त्र
अर्थाचा सुई दोरा घेतला शिवायला
गुंता अजूनच वाढतं गेला
विचारांचा नुसता चोळामोळा झाला
उनाडच ती अक्षर
विस्कटू लागली धागे भरभर
सावरता त्यांना आवरता त्यांना
वस्त्र अजूनच झाले विरविर
टोकदार सुई बोचली मनाच्या गाभाऱ्याला
अन ध्वनी उमटला आतून,
शरण जा शारदेच्या पुत्राला
तोच सोडविल तुला यातून
फाटकं वस्त्र घेऊन
मग शोधू लागले त्या शारदेच्या पुत्राला
नाव त्याचं सांगायला हवं का?
व्यापून राहिलाय जो मराठी भाषेला
कोणी शब्द देता का शब्द
म्हणत हिंडले दारोदार
नकारच पदरी पडला पण
माझ्या वारंवार
पायरी चढले मग मी
शारदेच्या पुत्राच्या घराची
झोळी भरली त्याने माझ्या माय मराठीची
आजच्याच दिवशी जन्मला तो
माय मराठीचे भूषण
शेले भरजरी दिले
कसे फेडू त्याचे ॠण
कसे फेडू त्याचे ऋण
मराठी राजभाषा दिना निमित्त कवी कुसुमाग्रजांना आदरांजली
१७. आळवणी
देवा दयाघना, किती तुला मानू
तू थोर, मी सानु, कळत असे (१)
देवा दिनानाथा, किती पाया पडू
मी तम, तू उजेडू, दिसत असे (२)
देवा दिनबंधू, किती तुला सांगू
तू सर्वकर्ता, मी अपंगू, प्रणित असे (३)
देवा दीनदयाlळा, किती करू कळवळा
मी पापी, तू कृपाळा, आकळत असे (४)
देवा घननिळा, कृपाळा कनुवाळा
लागो तुझा लळा आळवित असे (५)
देवा दयेच्या सागरा, आले तुझ्या व्दारा
तू माय, मज लेकरा, कुरवाळीत असे (६)
देवा मोक्षदाता, तूच करता करविता
तू बलवंत, मी अबला, बाहत असे (७)
देवा कृपावंता, धरी मज हाता
मी बालक, तू माता, लडिवाळत असे (८)
देवा नारायणा, धरते तुझ्या चरणा
मी दासी, तुज राणा, पूजीतसे (९)
देवा पतीतपावना, किती करू वंदना
मी नर, तुज नारायणा अर्चित असे (१०)
देवा मनमोहना, किती सांगू यातना
मोहवी माझ्या मना आसुसतसे (११)
देवा कमलापती, थोर तुझी किर्ति
तू कमळ, मी माती, प्रार्थित असे (१२)
देवा लक्ष्मीपती, किती करू आरती
तू ज्ञानी, मी मूढमती, स्तवितसे (१३)
देवा कमलापती, मी एक मूढमती
घडो संत संगती, विनवितसे (१४)
देवा देवराया, वंदू तुझ्या पाया
तू वृक्ष, मी छाया, बिलगतसे (१५)
देवा सच्चिदानंदा, हे आनंदकंदा
वंदूनी तुझ्या पदा आनंदतसे (१६)
देवा नंद किशोरा, गोकुळीच्या माखन चोरा
माझे मन, चोरा बोलावितसे (१७)
देवा गिरिधारी, आले तुझ्या दारी
तू चंद्र, मी चकोरी, विरहत असे (१८)
देवा जनार्दना, किती करू प्रार्थना
मी मीन, जळा विना तडफडतसे (१९)
देवा शारंगपाणी, आले तुझ्या चरणी
मी रज, तू धरणी, जाणीतसे (२०)
देवा भवभयहारका, माझी लाज राखा
तुम्ही मधु, मी मक्षिका, घोटाळतसे (२१)
देवा बाकेबिहारी, मी एक निर्बल नारी
डोई पापाची शिदोरी हतबल असे (२२)
देवा व्यंकटेशा, तोडी भवपाशा
मी नगण्य तुज सर्वेशा विनवितसे (२३)
देवा जगजेठी, किती करू आटापिटी
तुझे नाम देई ओठी कळवळत असे (२४)
देवा कृपानिधे, नको कोप करू
तू दाता, मी कृपण, काय मागू (२५)
देवा दिनोद्धारा, हे मायेच्या माहेरा
पुरे झाल्या येरझार्या, माय माझे (२६)
देवा कैवल्यदानी, तूच माझा धनी
लागू तुझ्या भजनी हीच आस (२७)
देवा चक्रपाणी, किती करू आळवणी
तू क्षीर मी पाणी, चरणी आले (२८)
देवा चक्रधारी, यावे माझ्या दारी
तू राम मी शबरी, धरी करी (२९)
देवा वासुदेवा, किती करू धावा
तू अधर मी पावा, पाव मसी (३०)
देवा मुरलीधरा, वर्षी कृपाधारा
मी गार, तू हिरा, पैलू पाडी (३१)
देवा गदाधरा, किती धरू धीरा
देई मज थारा पदा पाशी (३२)
देवा दिनोद्धारका, नको मानू मज परका
तू दाता, मज याचका, भीक घाली (३३)
देवा जगन्नाथा, किती सांगू व्यथा
ठेविते पदी माथा अनन्य भावे (३४)
देवा जगदिशा, कशी माझी दशा
मी विनाशी तू अविनाशा, पाव मशी (३५)
देवा पुरूषोत्तमा, किती मी अधमा
तुझे नाम येईना अधरी माझ्या (३६)
देवा विश्वनाथा, जगणे माझे वृथा
तुझ्या पदी माथा जरी न ठेवी (३७)
देवा भक्तवत्सला, अगाध तुझी लीला
तू कनक, मी शीला, शरण आले (३८)
देवा वैकुंठवासी, ठाव देई पायासी
तू धनी, मी दासी, अभय देई (३९)
देवा अनाथनाथा, किती अंत पाहता
हे नाथ, मज अनाथा, थारा देई (४०)
देवा जगत गुरु, किती धीर धरू
तू धरेचा कल्पतरु, चिंतिलेले देसी (४१)
देवा दिनपती, कशी करू भक्ति
तू कस्तुरी, मी माती, मुक्ति देई (४२)
देवा विश्वव्यापका, किती मारू हाका
हे जगन्ननायका, धाव घेई (४३)
देवा विश्वंभरा, माझे दु:ख हरा
मी सरिता, तू सागरा, पोटी घेई (४४)
देवा कमलनयना, किति माझी दैना
माझे मन राहिना, तुझे ठायी (४५)
देवा श्रीनिवासा, जीव झाला वेडापिसा
तू सागर, मी मासा, जीवन देई (४६)
देवा परममंगला, जीव वेडा झाला
देई दर्शनाला झडकरी (४७)
देवा कुंजबिहारी, तुझी लीला न्यारी
तू स्वामी वेदांचा चारी, कृपा करी (४८)
देवा सहस्त्रबाहू, किती वाट पाहू
नको उभा राहू विटे वरी (४९)
देवा दशवतारधरा, हे निर्गुण निर्विकारा
मी त्रिगुणी, तू गुणातिता, सद्गुण देई (५०)
देवा दामोदरा, तूच माझा आसरा
माझा भर तुझ्या शिरा निवारा देई (५१)
देवा दयानिधे, किती कळवळू
मी हीन, तू कृपाळू, कळे मज (५२)
देवा करुणासिंधु, किती तुज वंदू
तू सागर, मी बिंदु, जाणीत असे (५३)
देवा घनश्यामा, घेते तुझ्या नामा
हे कृष्णा, हे रामा, उद्धरी मज (५४)
देवा दयेच्या मूर्ति, किती गाऊ किर्ति
मी अचेतन, तू स्फूर्ति, चेतवी मज (५५)
देवा रमापती, किती तुझी शक्ति
तू सागर, मी रेती, पावे मज (५६)
देवा श्रीपती, तू रुक्मिणीचा पती
मी शिंपले, तू मोती, कळे मज (५७)
देवा अनंत ब्रम्हाण्डनायका, किती धरू हेका
हे चराचर व्यापका, स्वीकारी मज (५८)
देवा श्यामसुंदरा, देवी रखूमाईच्या वरा
मी पाषाण, तू कृपाझरा, ओलवी मज (५९)
देवा जनजरामोचका एवढे माझे ऐका
तुझ्या पायीच्या पादुका करी मज (६०)
देवा मुकुंदा, गोविंदा, किती वंदू तुझ्या पदा
मी तहान, तू सुधा, तोषवी मज (६१)
देवा विश्वरूपा, त्वरे करी कृपा
मी रंक, तू नृपा, प्रतिपाळे मज (६२)
देवा हरी, श्रीहरी, माझे भव दु:ख हरी
तू भगवंत, मी पायरी, राऊळाची (६३)
देवा ऋषिकेशा, काय माझी दशा
मज दाखवी दिशा अध्यात्माची (६४)
देवा दिनांच्या कैवारी, तापत्रय वारी
घडो नित्य वारी पंढरीची (६५)
देवा पीतवसना, समजावी माझ्या मना
नको आता वासना आयुष्याची (६६)
देवा पद्मनाभा, काय वर्णू तुझी शोभा
मी काजळी, तू प्रभा, चराचराची (६७)
देवा परमेश्वरा देई मज थारा
तू परम मज पामरा परतवू नको (६८)
देवा वनमाळी पसरते झोळी
मी तृण, तू माळी, उपेक्षू नको (६९)
देवा सर्वज्ञ, सर्वेशा, किती करू आशा
तोडी भवभय पाशा शिणवू नको (७०)
देवा परमसमर्था, किती साहू अनर्था
मज नेई भक्तिपंथा प्रार्थिते मी (७१)
देवा शारंगधरा, आता त्वरा करा
मज द्या हो आसरा, खोळंबले मी (७२)
देवा करुणाकरा, आता दया करा
घाला मुखी चारा, नामामृताचा (७३)
देवा अधोक्षजा अखिल ब्रम्हाण्डाच्या राजा
ठेवी वरद हस्त माझ्या शिरावरी (७४)
देवा आनंदघना वर्षी कृपाघना
तोषवी माझ्या मना कृपावर्षावाने (७५)
देवाधीदेवा करीते तुमचा धावा
आता तरी पावा पापिणीला (७६)
देवा माय माऊली तू कृपेची साऊली
तुझी 'सुधा' आली शरण तुला (७७)
१८. जगदंबेची महती
काय बाई सांगू जगदंबेची महती
सुरगण मुनीगण ऋषीगण तिला वंदिती (धृ)
शुंभ निशुंभा मर्दुनी महिषासुरास वधुनी
साधू संत अन सतजनासी रक्षिती (१)
महालक्ष्मीती,तीसरस्वती,जगतजननी ती चितशक्ति
ब्रम्हा विष्णु महेश गाती तिची किर्ति (२)
सगुणी ती, ती,निर्गुणी,विष्णुपत्नी ती कमलांगिनी
ती वरदात्री, देई सुमती, देई यशकिर्ति, स्फूर्ति (३)
आई देई आरोग्याला, देई ऐश्वर्य, समृद्धिला
भक्तगण लागुनी चरणी तिजला विनविती (४)
१९. विठ्ठल मनातला
विठ्ठल मनातला,
कमरेवर हात ठेवून तिष्ठत असणारा
विटेवर समचरणांची कसरत करणारा
काळ्या सावळ्या तीन फूटी मूर्तीत सामावणारा
विठ्ठल मनातला, विठ्ठल मनातला ।।
उंच कड्यावरुन फेसाळत धबधबा कोसाळणारा
शांत शीतल नदीप्रवाहात झुळूझुळू वाहणारा
वादळ वार्यात वृक्षांच्या,फांद्यांनी मान डोलावणारा
विठ्ठल मनातला, विठ्ठल मनातला ।।
गोबर्या गोबर्या गालावरील गोड खळीत दिसणारा कातडीच्या सुरकुत्यांवर, बोळक्यातून हसणारा
पाठीवर फिरणारया मायेच्या हातातून थरथरणारा विठ्ठल मनातला, विठ्ठल मनातला ।।
टाळ मृदुंगाच्या गजरात बेभान होणारा
भीमेच्या रेताडाच्या कणाकणात जाणवणारा
पायी डोक ठेवणार्याच्या प्रेमात पडणारा
विठ्ठल मनातला, विठ्ठल मनातला ।।
नवकोट नारायणाच्या ढेरीवर नाचणारा
पोटाच्या खळगीतून आसूसून डोकावणारा
वारीतील प्रत्येक पावलाबरोबर चालणारा
विठ्ठल मनातला, विठ्ठल मनातला ।।
२०. नामरूपगुणातीता
किती रे प्रभू नावे तुझी, किती तुझे रुपे
सदा सर्वदा तिथे तू, जिथे नजर जाते (धृ)
सिंधू तूच, बिंदू तूच, तूच अणुरेणू
तूच ज्याने वृंदावनी वाजविला वेणू
जळी, स्थळी, पाषाणी मी तुझीच मूर्ति पहाते (१)
धरा, अग्नि, वृक्ष, वारे, तूच गगन, तारे
तूच धरीला गिरी कराग्रे तूच ना मुरारे
दरी शिखरी तूच वसशी चराचराते (२)
बाह्य जगी दिसशी मजला का न दिसे चित्ता
अंतर्यामी जाणावे तुज, हीच माझी इच्छा
तेवढेच दिनानाथा तुझ्या पदी मागते (३)
२१. गुरुराया
गुरुराया देई बा दर्शना
माझ्या आतुर आर्त लोचना (धृ)
माझे कंठाशी प्राण
तू सर्वज्ञ हे जाणं
तुझी घेतो मी आण
सोडीतो विषय वासना (१)
जिवाची होत असे तळमळ
तुझी ओढ तिन्ही त्रिकाळ
नको पाहू आता काळवेळ
येई झडकरी माझ्या अंगणा ( २)
मी अनाथ तूच माझा नाथ
या दिनासी दाखवी वाट
सोडवी भव बंधनाची गाठ
मज नाही त्राता तुझ्या विना (३)
२२. माझी शरणागती
विश्वंभरा दीनानाथा दया करी आता
तुजवीण कोणा शरण जाऊ मी , कुणी नसे त्राता ।। धृ ।।
तूच जगाचा स्वामी
तुझी लेकुरे आम्ही
तूच भूती, तूच नियंता
तूच करता करविता ।।१।।
विश्वंभरा दीनानाथा दया करी आता
तुजवीण कोणा शरण जाऊ मी, कुणी नसे त्राता ।।
देसी काया देसी छाया
दे मम तुझी माया
जगत्पीता तू जगज्जनिता
जगदात्मा तू जगन्नाथा ।। २ ।।
विश्वंभरा दीनानाथा दया करी आता
तुजवीण कोणा शरण जाऊ मी , कुणी नसे त्राता ।।
तुझ्या दर्शना व्याकुळ नयन
दावी तुझे मज मंगल चरण
तारी मजला भवभयहरीता
ने मज भक्तीपंथा ।। ३ ।।
विश्वंभरा दीनानाथा दया करी आता
तुजवीण कोणा शरण जाऊ मी , कुणी नसे त्राता ।।
२३. माझा देव
माझ्या देवाच्या दारी
नाही कोणी हलके भारी
तो अरिष्ट निवारी
सकलीकांचे (१)
माझा देव निर्गुणी
परी होतो तो सगुणी
सत्य रज तम
तिन्ही अंगीकारी (२)
माझा देव निराकार
दावी विविध आकार
घेई नाना अवतार भक्तांसाठी (३)
माझा देव तो अनंत
ज्याला ना आदि अंत
ज्याला म्हणती भगवंत
तो गुणातीत (४)
जो वसे चराचरी
भक्तांचा तारणहारी
दिनदुबळ्यांचा कैवारी
हरीहर (५)
जो दयेचा सागर
जो करुणेचे आगर
जो विश्वाचा आधार
तो माझा देव (६)
ज्याच्या लीला अपरंपार
ज्याला म्हणती विश्वंभर
ज्याच्या नामी संत तत्पर
तो परात्पर (७)
तो सर्वज्ञ विधाता
तो करता करविता
तो जगाचा नियंता विश्वात्मक (८)
जो आहे अगोचर
जो आहे चिरंतन
त्याला पूजू निरंतर
भक्ती भावे (९)
२४. समाधान
समाधान समाधान
सुख शांतीचे निधान (धृ)
कामक्रोध महा वैरी
नको मनी त्यांना स्थान (१)
लोभ मोह बलवान
त्यांचे करा बलिदान (२)
मत्सर मच्छरासारखा
चावा घेतो गुणगुणून (३)
मद आणि तो आळस
आयुष्याचा सत्यानाश (४)
सहा शत्रू मारायाचे
समाधान हे साधन (५)
कुठे मिळे समाधान
सद्गुरूला जावे शरण (६)
२५. मी
मी स्वतःबद्दल लिहायचं म्हणजे खूपच धारिष्ट्य करायचं
कारण माणूस स्वतःला ओळखेलंच असं नाही
आणि मी तर त्यातली मुळीच नाही
तरीपण आज कुणास ठाऊक लिहावसं वाटलं
स्वतःचं परीक्षण करायचं ठरवून पेन हातात घेतलं
आधीच खूप अभिमानानं सांगते मी खूप भाग्यवान आहे
कारण कमावलं गमावल्याच्या हिशोबात कमावल्याची बेरीज जास्त आहे
जन्म झाल्या झाल्या मला उदात्त आई वडील मिळाले
तसेच प्रेमळ भाऊ बहिणी व इतर आप्तही जुळले
माझे वडील तर माझ्यासाठी सर्वस्व
अजूनही आहेत ते माझ्या हृदयस्थ
ते माझे बाबा, माझे मित्र, माझे गुरु
त्यांची महती मी कशी वर्णन करू
मला दोन आया, आश्चर्य वाटलं न ऐकून
पण ते चूक मुळीच नाही
एक माझी सख्खी आई, दुसरी गीताई
कर्मण्येवाधिकारस्तेचा तिच्यामुळे मला बोध झाला
अभ्यास करण्याचा जणू मला छंदच लागला
माझ्या आईने मला श्रीमद्भागवताचे वेड लावले
माझ्या बाबांनी मला श्रीमद्भगवद गीतेचे अमोल धन दिले
सांगितले ना मी तुम्हाला की मी आयुष्यात खूप काही कमावले
माझ्या निरनिराळ्या शाळांनी मला आदरणीय गुरु
आणि ज्ञानाचा ठेवा दिला
सख्या मैत्रिणींच्या प्रोत्साहनाचा हात दिला
नाटक, पाठांतर, वाद-विवाद यात माझे कौतुक झाले
सांगितले ना मी तुम्हाला की मी आयुष्यात खूप काही कमावले
कॉलेज जीवनात इतर उद्योग कधीच नाही केले
नाकासमोर चालून मेहनतीने काम मात्र खूप केले
लग्नानंतर आयुष्य खूपच बदलले
पती राजांसोबत परदेश गमनाचे रंगही अनुभवले
आता तर सुनबाई मुळे सासू होण्याचे भाग्य लाभले
नंतर मी दोन मुलांची आई झाले
सांगितले ना मी आयुष्यात खूप कमावले
मला नोकरीची इच्छा होती पण करियरिस्ट मी कधीच नव्हते
इच्छा तिथे मार्ग हे माझे ब्रीद होते
शिक्षणाची आवड होती, घरून प्रोत्साहन होतं
घर व नोकरीची कसरत नेहमी आव्हानात्मक होतं
नोकर्या मिळत गेल्या त्या मी करत गेले
मित्र-मैत्रिणींचे धन त्यामुळे आपोआपच वाढत गेले
तुम्हा सर्वांची साथ लाभली अनुभव वृद्धिंगतच झाले
सांगितले ना मी तुम्हाला की मी आयुष्यात खूप काही कमावले
जाता जाता मी तुम्हाला एक टीप सांगते
तुम्ही सगळ्यांनी ऐकावे अशी विनंती करते
आयुष्यात काय गमावलं याची खंत नाही करायची
काय कमावलं याची नेहमी आठवण ठेवायची
मग बघा जीवन होईल किती सुंदर तुमचं
मी माझ्यावर लिहिलेल्या या कवितेला तुम्ही प्लीज मनातच ठेवायचं
२६. माझे हे
भगवंतांनी एकदा एक गूढ मिश्रण बनवलं
आम्ही सर्व स्त्रियांनी त्याला 'हे' नांव दिलं
'हे' मध्ये असतात खूप विविध प्रकार
माझे 'हे' म्हणजेच माझे दिव्य भ्रतार
माझ्या ह्यांच्याबद्दल मला बोलायचे तर आहे
पण शब्दकोश उणा पडणार याची खात्री आहे
काय बोलू किती बोलू कुठून सुरुवात करू
व्यक्ती एक पण त्यांच्या तर्हा नका विचारू
कधी पोलीस इन्स्पेक्टर बनून जाब विचारतात
घरचे तेच कर्ते ना, रुबाब दाखवतात
कधी रोमँटिक मूड असतो, स्वारी रंगात येते
अशावेळी सावध असावं, वेळ घातक असते
कधी शांत तर कधी वस्सकन अंगावर येतात
सवय असावी बापुडी म्हणून स्त्रिया कुत्री पाळतात
जेवण्याखाण्याच्या लहरी सांभाळताना होते कसरत
म्हणून काय हार मानायची? मी नाही नांगी टाकत
एकदा सांगू तुम्हाला मी काय केलं
माझं काळीज बशीत घालून यांना खायला दिल
वाटलं होतं मला हे खूप खुश होतील
पतिव्रता, सती म्हणून मला गौरवतील
पण कसच काय माझं मेलीचं नशीबच खोटं
वातड आहे म्हणून बशीला दूर लोटलं होतं
शान शौक टापटीप हिंडणे फिरणे
बायको कशी सदा एकदम फ्रेश हवी म्हणे
अगदीच नाही असेही नाही प्रेमही करतात कधी आणतात एखादी साडी असे ना का साधी
राग, लोभ, चिडचिड सगळे जेथे एकवटले
तेच माझे पतीराज तुम्ही बरोबर ओळखले
त्यांच्या शिवाय नाही किंमत मला जगतात
माझ्या कुंकवाचे ते धनी माझ्या पिल्लांचे ते तात
जरा कान इकडे करा सख्यांनो तुम्हाला म्हणून गुपित सांगते
माझ्या यांच्यावर मी खूप खूप प्रेम करते
२७. माझी मुले
हाय राम! कुणास ठाऊक मला काय वाटले मुलांना आदर्श करायचे ठाणले (धृ)
अष्टपैलू मुलं हवीत स्वप्न मी पाहिले
शिस्त त्यांना लावण्यासाठी नाना प्रयत्न केले (१)
सर्वप्रथम अभ्यासाला त्यांना मी बसवले
सगळी पुस्तक फाटली म्हणून त्यांनी जाहीर केले (२)
त्यांना मग मी व्यायामाचे महत्त्व सांगितले
कसरतीने त्यांच्या सगळे घर उचकटले (३)
खेळासाठी त्यांना मी मग स्वातंत्र्य दिले
क्रिकेट बॉलनी क्रोकरीचे तुकडे तुकडे झाले (४)
समतोल आहारासाठी मी राबराब राबले
मॅगीच हवी म्हणून त्यांनी ताट दूर ढकलले (५)
संस्कारांचे बळ त्यांना खूप द्यावे वाटले
"तूच ठेव तुझ्याजवळ" त्यांनी मला दाटले (६)
सत्य अहिंसा अस्तेयचे महत्व त्यांना पटवले
"भेकड नको बनवू आम्हा" त्यांनी फटकारले (७)
मोठ्यांना मान द्यावा मी सांगून पाहिले
"समानतेचे युग आहे ना" त्यांनी मला विचारले (८)
सहकार्याने काम करावे मी उपदेशले
भांडणाने त्यांच्या मला भंडावून सोडले (९)
एक काही ऐकत नाहीत कार्ट्यांना मी बदडले
कसले आदर्श, अन काय ती मुले मी पार खचले (१०)
"लागलं का गं आई तुला" मुलं गहिवरले
हात हाती घेऊन त्यांनी हळुवारपणे दाबले (११)
"ऐकू तुझे सगळे" म्हणून त्यांनी कान धरले
आदर्श माझी मुले म्हणून मी त्यांना बिलगले (१२)
२८. माझे शहर
माझे पुणे तिथे काय उणे
एकाहून एक तिथे राहतात शहाणे (धृ)
सोमवार ते रविवार इथे पेठा
चुकू नका वाटा, तुळशी बागेसारखी इथे दुकाने (१)
विद्येचे हे आहे माहेर घर
ट्यूशन क्लासेसचा कहर
येरवडयाचे ही इथेच असे ठाणे (२)
पेंशनरांचे असे हे शहर
नाटक, लावण्यांना, येई इथे बहर
मराठमोळा हा, जपले ह्याने लेणे (३)
गणेशाची होई इथे पुजा
राजकारणी लावती आपली ध्वजा
चितळे गाडगीळ नावाजले दूध सोन्याने (४)
वाडे गेले, झाला आयटी पार्क
मिठी घाली स्वार्थ परमार्थ
ऊरे केवळ, वाहन शिस्त अंगी बाणणे (५)
२९. माझ्या ईच्छा
माझ्या ईच्छा ग ऽऽऽ माझ्या ईच्छा
सदा पूरविती त्या माझा पिच्छा ग ऽऽऽ (धृ)
नव्या साड्यांचा ढीग असावा
संसार भांड्यांनी खूप सजावा
देह आभूषणांनी नटावा (१)
घर सुंदर अन स्वच्छ असावे
धनधान्याचे पेव फुटावे
चार चाकीनेच जाणे-येणे व्हावे (२)
ऐष आरामात लोळावे
कधी पुस्तकही एखादे चाळावे
रुचकर पाकरस आपोआप शिजावे (३)
आप्त सख्यांनी खूप वाखाणावे
समजूतदार प्रेमळ शेजारी असावे
कामवालीने आदर्श असावे (४)
मुलाबाळांनी खूप शिकावे
नवरोबांनी लाड जास्तीचे पुरवावे
मला जगभर फिरवून आणावे (५)
जावे कधीकधी लोकांकडे
द्यावे त्यांना उपदेशाचे धडे
स्वतः रहावे अगदी कोरडे (६)
मी आहेच अल्प समाधानी (कळलं का?)
थोडक्यातच खूप सुख मानी
मला दोष देऊ नका बाई कोणी (७)
३०. माझं माहेर
माझं माहेर माझं माहेर, माहेर वर्णिते
माझं घराणं घराणं, घराणं वानिते
अंगणी प्राजक्ताचा सडा
दारी जाई जुईचा वेढा
तो आम्रवृक्ष ही बडा
गुलमोहर स्वागताला खडा
सारी बाग मी न्याहाळीते (१)
द्वारी महालक्ष्मीची पावले
त्यांना वाकून मी वंदिले
ती महालक्ष्मी माझी माय
तिचे वर्णन मी करू काय
तिच्या मिठीत मी विरघळते (२)
माझे बाबा पहाडासारखे
संकटी पाठीशी उभे
ते माझे मित्र माझे गुरु
त्यांचे वर्णन मी कसे करू
त्यांच्या उराशी मी बिलगते (३)
माझ्या भाऊ रायांची जोडी
करती नशिबा वर कुरघोडी
त्यांच्या कर्तुत्वाची उंच उडी
त्यांच्या हुशारीला नाही तोडी
त्यांच्या प्रेमात मी नहाते (४)
माझ्या भाऊजया माझ्या सख्या
माया करतात बहिणी सारख्या
त्यांच्या अगत्याला नाही सर
त्यात सुगरण पणाची भर
माझ्या भाचरांना कुरवाळते (५)
माझ्या बहिणींची रीतच न्यारी
कधी वागती आईच्या परी
कधी करिती थट्टामस्करी
कधी शिरी साऊली धरी
त्यांच्या आठवणीनं हुरहुरते (६)
त्याची थोरवी वर्णावी किती
सारे शब्दकोश रिते पडती
माहेर म्हणता डोळे डबडबती
सारे बंध तिथे अडकती
माया ममता जिथे पाझरते (७)
ज्याला म्हणतो आम्ही माहेर
(आम्ही म्हणजे आम्ही स्त्रिया)
तो स्वर्गच असे भूवर
त्याला नाही कशाची सर
तिथे जन्म घ्यावा वारंवार
माझं मन तिथे घुटमळते (८)
३१. अशी कशी जाऊ मी माहेराला
अहो अशी कशी जाऊ मी माहेराला
सांगा अशीच कशी जाऊ मी माहेराला
साडी एकही नाही चांगली
गाडी आपली थकली भागली
दागिने नाही मला घालायला (१)
भेट वस्तू नाही एकही घेतली
पैशांची गड्डी तुम्ही नाही दिली
मिठाई ही नाही संगे न्यायाला (२)
कॉस्मेटिक्स माझी सगळी संपली
हायहिल्सची जोडी एकही नुरली
ड्रायव्हर नाही मला सोडायला (३)
तुम्हाला एकदा फायनल सांगते
तुमच्या संगती मी सासरी नांदते
ते माहेरी तोरा मिरवायला (४)
३२. आई माझी आई
आई तुझ्या भेटीसाठी जीव होतो वेडा पिसा
असा कासावीस होई जणू जळावीण मासा
माते तुझ्या स्पर्शासाठी आतुरली तुझी कन्या
जणू कृष्ण सख्यासाठी आसुसल्या गोपकन्या
तूच दिला मज जन्म तूच लावलीस शिस्त
जन्मभरी असे माते तुझ्यावरी सारी भीस्त
तू सद्गुणांची खाण मी निव्वळ खडक
तू भक्तीचा राजमार्ग मी केवळ सडक
तू लाविलास मळा भक्तीपंथाचा साजिरा
नाही वाखाणण्या शब्द, तुला मानाचा मुजरा
तूच माझी माता तूच जनकजननी
तुझी स्तुति करावया फिकी पडे माझी वाणी
किती दिले प्रेम मज किती साहिलेस मला
माझी ओंजळच रिती काय देऊ शकेन मी तुला
तूच दिले जन्मभरी दोन हातांनी अनंत
तुझे ऋण फेडू कसे मनी हीच एक खंत
माया ममतेच्या झूली तूच मज झुलविले
तुझ्या प्रेमाच्या आधारे आजवरी मी तरले
आई नाही घेतले तुझे गुण न मिळाले तुझे रूप
तुझ्या पोटी जन्मुनी मी भाग्यवान खूप
३३. माझ्या मन मानसी तिचे एकेक रूप
वात्सल्याची मूर्ती ती, तिची रुपे ती खूप
माझ्या मनमानसी तिचे एकेक रूप
कधी भरविला तूप भात अन कधी मारीला रट्टा
तिनेच लावले शिस्तीला अन तीच पुरवी मम हट्टा
किती शिकविले गणती नाही तीच माझी गुरु
तीच सखी अन तीच असे या भवसागरीचा तारू
तिनेच मजला संकटातूनी कितीदा तरी राखिले
लपून तिच्या पदरा खाली अमृत म्या चाखिले
३४. माझा छंद
ग बाई मला छंदाचा छंद मला लागला
छंद तरी किती बाई त्यांची काही गणतीच नाही (धृ)
एक छंद जल क्रिडेचा, एक छंद फोटोग्राफीचा हस्तकलेचा, व्यायाम करण्याचा,
सजण्या - सजविण्याचा छंद मला लागला (१)
एक छंद शिकण्याचा, एक छंद शिकविण्याचा लोक संग्रहाचा, वाहन चालविण्याचा,
लढण्या, लढविण्याचा छंद मला लागला (२)
शेती बाग कामाचा छंद, वाचन लेखनाचा छंद, गायन वादनाचा, नृत्य, नाटकाचा,
सर्कस करण्याचा छंद मला लागला (३)
वस्तू साठविण्याचा छंद, त्यांच्या प्रदर्शनाचा छंद, खरेदी- विक्रीचा, खेळ, मिमिक्रीचा,
प्रवास करण्याचा छंद मला लागला (४)
छंद वस्तू बनविण्याचा, छंद वस्तू दुरुस्तीचा नाना शर्यतींचा, गिर्यारोहणाचा,
आकाश न्याहाळण्याचा छंद मला लागला (५)
एक छंद हसविण्याचा, एक छंद फसविण्याचा चकाट्या पिटण्याचा, पाक कलेचा,
टीव्ही, सिनेमे पाहण्याचा छंद मला लागला (६)
शिकारीचा असे एक छंद, पशुपालनाचा दुजा छंद
दान, सेवा करण्याचा, संशोधनाचा
परोपकार करण्याचा छंद मला लागला (७)
छंद एक जडू दे देवा तुझ्या नामाचा ठेवा
नित्य असू दे जिव्हाग्रावरती
गुरु सेवेत भजन-कीर्तनात हरिनामात दंग मला होऊ दे
ग बाई मला भक्तीरसाचा रंग लागू दे
ग बाई मला नामस्मरणाचा छंद लागू दे (८)
३५. माझे जीवन
जीवनासाठी जीवन असते अत्यावश्यक सगळ्यांना
जीवना विना जीवन नसते हे रहस्य जाणून घ्या ना माता म्हणतो धरणीस आपण ते नाही केवळ उगीच
अन्नही देते ती आपणास अन जीवन देते तीच ।।
जीवनदायिनी एक स्वर्गीची विष्णूपदातूनि अवतरते।।
शंभूच्याजटेत विसावूनी हिमालयातूनी खळखळते ।।
आजन्म करीतसे मानवास जी जीवन अपुले अर्पण
आयुष्य सरते तेव्हाही तीलाच अस्थी समर्पण।। शीतल निर्मल शुद्ध नीर ते तृप्त करी आत्म्याला
नाही कोणी जलावाचुनी जे शुद्ध करी देहाला।।
जन्मापासूनी मरणापर्यंत आजीवन जीवन देते
तेच नीर बिजांकुरातुनी मोहक पीकवी शेते ।।
पशू पक्षी अन वन्य जीवांना जीवन देई जीवन
त्याच्या संवर्धना करूया तनमन अपुले अर्पण।।
'जगू अन जगवू,' जगण्याचा हाच खरा एक मंत्र
जलद कृती करू जल वाचवू या हेच आजचे तंत्र।।
३६. माझा प्रॉब्लेम
सुधा : काय ग राधा काय ग राधा
राधा : बोल न ग सुधा, ए बोल न ग सुधा
सुधा : ऐक ग राधा एक आहे वांधा
कस तुला सांगू सुचत नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
राधा : खरं आहे ग सुधा प्रश्न आहे साधा
पण उत्तर मुळी मात्र मिळतच नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
सुधा : ऐकलस का राधा एक आहे बाधा
टेलीविजन ज्याला म्हणतात ना ?
त्याच्याच भोवती सगळे जमतात ना
त्याने केला घात सगळे विसरतात
पुस्तक नावाची चीज असते का नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
राधा : ऐकलस का सुधा आणखी एक बाधा
क्रिकेट नावाचा खेळ खेळतात ना
त्याच्याचकडे सगळे वळतात ना
बॅट अन बॉल स्टंप अन धाव
याच्या विना दुसर सुचतच नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
सुधा : थोरांचंही तेच पोरांचंही तेच
काय उपाय करू मला सापडतच नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
राधा : स्त्रियांना नसतो वेळ मुलं खेळतात खेळ
पुरुषांच्या म्हणे वेळा जमतच नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
सुधा : हवी अशी युक्ति जी घडवेल वाचन भक्ति
फुकटचा वेळ कोणी दवडायचा नाही
आजकाल कुणी मुळी वाचतच नाही
दोघी : सुचली एक आयडिया वाचक मंच स्थापूया
वाचनाची आवड आपण जागवू या
वाचक मंचात सार्यांना बोलाऊ या
वाचक मंचात जाऊन वाचक भक्त होऊ
वाचू अन इतरांना वाचवू या
वाचक मंचात सार्यांना बोलवू या
(राधा जाऊ लागते)
सुधा : काय ग राधा चालली कुठे?
घडीभर जरा थांबशील का?
गुलूगुलू गप्पा जरा करशील का?
राधा : मला नाही वेळ
तू खेळत बैस खेळ
वाचक मंचात मला जायचंय ना!
वाचनात दंग मला व्हायचंय ना !
काय ग सुधा काय ग काय ग सुधा
सुधा : थांब ना ग राधा, ए थांब ना ग राधा
वाचक मंचात येते, पुस्तके मी वाचते
इतरांनाही वाचायला शिकवते ना
तुझ्या संगे राधा मी येते ना
राधा : चल ग सुधा चल ग सुधा
सुधा:चल ना ग राधा :
३७. माझी शेजारिण
सखे शेजारिणी बोलत रहा, बोलत रहा कायमच वटवट करीत रहा (धृ)
तुझ्या बोलण्याचे हे व्रत तू अखंड चालवी कधी नच सोडू,
जगण्याची ती माझ्या असते एक स्फूर्ति पहा (१)
कधी बोलणे असते कुचके
कधी प्रोत्साहन मज ते देते
कधी कुठे अन कसे असू दे
वागबाण तुझे तू सोडीत रहा (२)
गावी जाता तुझेच स्मरण
घरी राहता तुझी आठवण
कुठेही जावो माझ्या पुढती तुझीच मूर्ति पहा (३)
असुनी तू ग का वाटे अडचण
नसशी कधी तू खोळंबापण
असे तुझे असणे नसणे मज तू भारून रहा (४)
तुझ्याविना न च गमते क्षणभर
तुझी साथ मज हवी जन्मभर
शेजारिण ही अशीच असते तुम्ही कुठे ही पहा (५)
सुख असो वा दु:ख असू दे
तुझी साथ मज नित्य लाभू दे,
हसू, रडू एकत्र कधीहि, ही शपथ वहा (६)
३८. माझ्या कामवाल्या बाई
आल्या आल्या कामवाल्या बाई माझ्या आल्या
वाटे मला अवघ्या माझ्या चिंता आता गेल्या (धृ)
उद्याच येते म्हणुनी त्या ज्या गेल्या
आज अचानक कळे ना मजला कुठूनी त्या टपकल्या
दर्शन होता त्यांचे माझ्या चित्त वृत्ती मोहरल्या
हाती मग मी झटकन घेई मीठ आणि मोहर्या (१)
स्वागत त्यांचे कसे करू मी विचारात पडले
"च्या नाश्त्याचे बघा वहिनी जरा" त्यांनी मला फर्मावले
उत्साहाने सळसळुनी मी विविध फोडण्या टाकल्या
पाक कलेवर नजर ठेवूनी त्या निवांत विसावल्या (२)
कटाक्ष जहरी टाकूनी मजवर त्या जोरात कडाडल्या
'कचरा किती साठविला घर भर, घर आहे का उकिरडा'
'द्या तो झाडू' म्हणूनी मला, त्या माझ्या बॉसच झाल्या
तलवारी गत झाडू फिरविती जणू राणी लक्ष्मी संचारल्या (३)
क्षणात होत्याचे नव्हते त्या लीलया करिता झाल्या
मला लावूनी कामाला त्या विजयी हास्य हसल्या
साबण पावडर संपली म्हणून कोपऱ्यामध्ये बसल्या
धावती झाले दुकानात मी, पण कपबशा आधी विसळल्या (४)
भांड्यांचा तो ढिग दाखवी सिंकमधुनी वाकूल्या
त्यांना कुरवाळण्यासाठी बाई पुढे सरसावल्या
'खरकटी भांडी विसळा' आधी, मला सांगता झाल्या
'किती ही भांडी' माझ्यावरती जोराने बावरल्या (५)
राणी लक्ष्मीचा अवतार संपवून अहिल्याबाई झाल्या
कपडे धुता, फरशी पुसता, नाजूकपणे वागल्या
नको पडाया चरा पृथ्वीवरी म्हणुनी त्या गहिवरल्या
'कपडे किती मळविता तुम्ही' त्या मज हिणवित्या झाल्या (६)
त्यांचे जाणे येणे दोन्ही घोर लावी जीवाला
जातांना त्या चिंता वाटे येतील काय उद्याला
वेतन बोनस सर्व मागण्या जरी मी मान्य केल्या म्हणतील त्या जी पूर्व दिशा जणू करार त्यांनी केला (७)
३९. माझा नातू
बालकृष्ण आला घरी हर्ष मावेना उरी
आनंदाचे कारंजे माझ्या थुई थुई नाचे दारी (धृ)
चिमुकल्या त्याच्या मुठीत स्वर्ग माझा लपला
गोड त्याची जिवणी बघून, गुलाब गालात हसला (१)
त्याच्या टपोऱ्या डोळ्यात जणू जगच सारे वसले
काळ्याभोर जवळामध्ये हसरे ढग दिसले (२)
किती कोमल त्वचा त्याची, किती नाजूक तनु
लुसलुशित स्पर्श त्याचा आभाळ वाटे जणू (३)
पिटुकल्या कान्हयाला या नजर न लागो माझी
तिट लाऊन दृष्ट काढीते प्रेमळ सुधा आजी (४)
४०. माझा देश
भारत माझा देश आहे म्हणून तो महान आहे
जगात इतरत्र स्टॅच्यू ऑफ फ्रीडम झक्क असतो
इथे मात्र स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असतो
सध्या स्वातंत्र्याच्या आमच्या वेगळ्याच कल्पना
उगाच नाही करत आम्ही विकासाच्या वल्गना
इथे कोणी कुठेही थुंकत,कुठेही घाण करत
देश अस्वच्छ राखण हे आमच सतीचं वाण असतं
पोलिस खातं भ्रष्ट आहे असं सगळे म्हणतात
जनता त्रस्त करते म्हणून ते करवादतात
मंत्र्यांना तर देशभक्तीपाई मुळीच वेळ नसतो
इथल्या प्रत्येक घटने मागे त्यांना परकीय सत्येचाच हात दिसतो
सार्वजनिक संपत्तिवर ते खुशाल हक्क सांगतात
आम्ही जर जनतेचे, तर जनतेचे ते आमचेच असं ते मानतात
सरकारी नोकरांची वेगळीच कथा
काम खूप पण पगार कमी आणि आराम ही नाही ही त्यांची व्यथा
नुकतेच जागतिकीकरणाचे इथे वारे वाहू लागले
खाजगी कंपन्यांचे जणू भरघोस पीक आले
पिकता तर पिका बापडे पण आपल्या देशाची लाज राखा
स्वत:ला वस्त्र पाहिजे म्हणून माय भूमीला विकू नका
शिक्षणाचा प्रसार झाला पण भारतीय सुशिक्षित झाला नाही
वर्तमानात तो जगला त्याने भविष्याचा विचार केला नाही
नसेल शिक्षण, नसतील सुविधा, असेल प्रजा इतकी अजाण
मानवता आणि संस्कारांची मात्र नाही मुळीच वाण
संत भूमी ही आपली तिला कसली हो विभूतींची कमी
करूया तिजला सुजलाम सुफलाम हीच घेऊया हमी
देश दिसे मग उठूनी वेगळा, त्रिखंडात साजरा
त्रिवार करूया मातृभूमीला मानाचा मुजरा,
त्रिवार करूया मातृभूमीला मानाचा मुजरा ।।
४१. माझ्या सुनेचं मनोगत
अशी कशी बाई मिळाली मला सासू
तिच्या संगे आता मी स्वस्त कशी बसू।।
कधी उठते पहाटे अन उरकून टाकते स्नान
कधी दुपारी बारा पर्यंत ही नसतं आंघोळीचं भान।।
कधी इतक्या पोळ्या करते जणू गाव जेवणच घालणार
कधी नुसता भातच खाऊ म्हणते, कणिक कोण मळणार।।
घर आवरायची येते तिला एखाद्या दिवशी लहर
एरवी केला असतो घरभर पसार्याने कहर।।
कधी करते इतकी वटवट काही विचारू नका
कधी नुसते मौन धरते कितीही मारा हाका।।
तिच्या नाना कल्पनांना जगी तोड नसे
घटक्यात म्हणते नोकरी करते घटक्यात स्वस्त बसे।।
होत नाही तिच्याने पळापळ, धावाधाव
पण जग सुधारण्याची असे तिला मोठी हाव।।
कधी येतो झटका तिला मॉडर्न रहाणीचा
कधी येतो विचार उच्च विचारसरणीचा।।
खाण्यापिण्याचं ही करते कधी, नाही असं नाही
पण एकंदरीतच तिला त्याबाबतीत तशी ओढ नाही ।।
लिहिते वाचते काहीतरी पण त्यात काही दम नसतो
आपण काहीतरी महान करतो आहोत हा तिचा भ्रम असतो।।
विरोधांचे द्वंद्व चाले सतत तिच्या अंतरी
काही असो प्रेम करी ती माझ्यावर भारी।।
४२. मन
मन माझे ऐकेना ते धावे दहाही दिशांना (धृ)
अश्वा सारखा त्याचा वेग, बुद्धी सारथीला पळवी सवेग
विवेक लगाम त्याला बांधू शकेना (१)
हत्तीसम आहे ते बलवान
चंचलपणा अति वायु समान
किती समजवावे त्याला समजे ना (२)
रागावता धावे अधिक वेगाने,न छस्वस्थ बसे लाडीगोडीने
किती करू ग बाई त्याच्या विनवण्या (३)
जर नाही आले मन ताब्यात, कसा भेटेल मला भगवंत
गुरुराया काही उपाय सांगा ना (४)
४३. माझे कोडे
घालते कोडे एक तुम्हा मी, आहे अगदी छोटेसे
विचार करावा लागेल पण, जरी आहे अगदी सोपेसे।।
सदैव असते पाठीशी माझ्या, पिच्छा न सोडते कधी
नाही छाया नाही करवली, हिंट ही देते मी आधी।।
बसते कधी उरी दबा धरुनी, कधी उरावर नाच करी
नव्हे नर्तकी, नव्हे मांजरी, सतत मला हैराण करी।।
वसते का ती मनात माझ्या, की असते हृदयामध्ये
शिणवूनी टाकी तनमन अवघे, झोपही उडवी अधेमधे ।।
जरी उकले ना कोडे तुम्हा हे, नका लावू ग घोर जीवा ते
कान देवूनी नीट ऐकावे, मीच सांगते उत्तरा ते।।
क्षुल्लक कारण जिला पुरत असे, जी फणा काढूनी वार करी
तडफड तडफड करी जिवाची, चिंतेपरी त्या चिता बरी।।
४४. माझी खरेदी
खरेदी म्हटली की बावचळतात, त्या पुळचटातली मी नाही
बाजारात अशी एकही गोष्ट नसते, जिचा मला पत्ता नाही।।
आली हुक्की की निघावं, मुहूर्त बिहूर्त काही बघायला नको
बिनधास्त फिराव बाजारात, कोणाची भीड बाळगायला नको।।
कधी निवांत फिरते एकटी, कधी असतं कोणी बरोबर
शक्यतो नवऱ्यालाच सोबत घ्यावं, हे माझ ठाम मत खरोखर।।
दिला एखादा रुमाल किंवा मोजे, किंवा एखादे शेविंग क्रीम घेऊन
की चुपचाप आपल्या मागे मागे येतात हे, अन खरेदीच्या पिशव्यांचं ओझ आणतात वाहून।।
मुलांचं तसं नसतं, त्यांना मोठ मोठी आमिष लागतात
पिंकी, जिन्स आणि टॉपचा हट्ट करते, तर चिंटूराव, क्रिकेटची किट मागतात।।
मुलांना बरोबर नेण्यात, हा एक मोठा धोका असतो
त्यांचीच खरेदी होत राहते, आपण मात्र मागे पडतो।।
क्रेडिट कार्ड असलं पर्समध्ये, अन रस्ते असले ठाऊक
की खरेदी कशी सुखकर होते, मग ती ठोक असो किंवा घाऊक।।
पैठण्या दाग दागिने घाऊकच परवडतात,खूप
सारे घेऊ नये एकावेळी
आपलाही रुबाब रहातो मग बाजारात, ऐटीत मिरवता येतं दरवेळी।।
फळफळावळ भाज्या, नेहमी ठोकमध्ये घ्यावं
अशा फालतू गोष्टींच्या खरेदीच्या वेळी,वेळेचं भान ठेवावं
किराणा वगैरे य:कश्चित खरेदीत, वेळ वाया घालवू नये ।।
साड्या कॉस्मेटिक्स चपला विकत घेताना घड्याळाकडे अजिबात पाहू नये।।
एक्सचेंजसाठी दुसरा दिवस राखून ठेवावा
येइन उद्या हा दुकानदाराला दिलेला शब्द
हमखास पाळावा।।7
खरेदीचंही एक तंत्र असतं ते सगळ्यांनाच जमेल असं नाही
मी मात्र त्यात एक्सपर्ट झाले आहे कारण खरेदी शिवाय मी दुसरं काही करतच नाही।।
रोज बाजारात जायचंच हे माझ व्रत आहे
समस्त भगिनी वर्गालाही माझा तोच सल्ला आहे।।
जुन्या वस्तू सेलमध्ये खरीदण्यात काय अर्थ आहे?
नव्याकोऱ्यावस्तू दुकानातून चटकन उचलण्यातच खरा पुरुषार्थ आहे।।
खरेदी बद्दल अचूक मार्गदर्शन हे पुस्तक लिहीन म्हणते
वही-पेन, हे लेखन साहित्य खरेदी करायला बाजारात जाईन म्हणते।।
४५. माझे मूक अश्रू
एक होता मासा, अगदी इवलासा
पिटूकल्या खवल्यांचा, रंग मोहक सा
नाजूकशा जीवणीची, उघडझाप करी
गिरक्या घेई स्वतःभोवती, अगदी भोवर्यापरी
पिटूकले कल्ले शोभती, जणू दोन वल्हे
गुंजेवाणी डोळे लुकलुक, पाहून मन डुले
जीवन हेच स्थळ त्याचे, जीवन हेच बळ
जीवन हेच जीवन, अन जीवन हेच जळ
विहरे ऐटीत जलामध्ये, जणू नन्ही जलपरी
नाही ठाऊक जगात असती, दो पायांचे वैरी
वैर्याने त्या डाव साधला, घेतले शोषून जलाला
तडफड तडफड करी सानुला
देई कोण पण जीवनाला?
थरथरले मन, गहीवरले मन, पाहून त्याच्या देहाला
मूक अश्रु मम उठवतील का, माशाच्या त्या प्रेताला?
४६. माझी कल्पना
कल्पना रुपी पंख लावुनी नभांगणी विहरते
चंद्र तारिका ग्रहगोलांसह झिम्मा मी खेळते
जल बिंदूच्या दवात अलगद पुष्पदली टपकते
कोमल कमलीनी मज भ्रमरास्तव उष:काली आतुरते
अथांग सागरा तळी कधी मी मत्स्य म्हणून लवलवते
सरोवराच्या पुष्प तरंगी, हंसीनी मी डोलते
काळ्या भूमातेच्या पोटी बीज होऊनी अंकुरते
ताड माड मी गगनामध्ये वार्यासह डोलते
क्षणात होऊनी प्रधानमंत्री मी देशाग्रणी झळकते
परिचारिका सेवाप्रती मी देहाला झिजविते
मीच खाणीच्या अंधारातही हिरा जणू चमकते
बनुनी कोळसा मीच कधी तरी पाकरसा शिजविते
कधी इथे तर कधी तिथे हे मन माझे विचरते
पायरी होते मंदिराची, कधी कळस बनुनी उजळते
जळी स्थळी अन पाषाणीही मीच मला बघते
इथे मीच अन मीच तिथे, ही कल्पनेत रंगते
जागे होता कल्पनेतूनी खरे काय उमगते
चराचरी बसलेला ईश्वर नम्रपणे नमिते
४७. माझा साज
किती बाई घालू अन कसे मी घालू
दागिने सुंदर अंगावर आज
बघा कसा शोभून दिसतोय साज (धृ)
घातले विवेकाचे पैंजण
हाती दानाचे कंकण
मेखलेचे बंधन तीच जनलाज
बघा कसा शोभून दिसतोय साज (१)
वाक्या दाविति कर्तुत्वशक्ती
चपला हार असे सहन शक्ती
नथ म्हणते दाऊ नको कधी माज
बघा कसा शोभून दिसतोय साज (२)
घातली बिंदी सदवर्तनाची
अंगठी ठेवी जाण कर्तव्याची
जोडवी करती शिस्तीचा आवाज
बघा कसा शोभून दिसतोय साज (३)
ठुशी कंठी, माया ममता,
तनमणी दावी आत्मनिर्भरता
उगा नका मारू व्यर्थ गप्पा
बजावतो चमचमता लफ्फ़ा
सत्संगाचा ल्यायले शालू महाग
बघा कसा शोभून दिसतोय साज (४)
अगत्य दाखविती नाजूक बांगड्या
संकीर्तन करा म्हणती दोन कुड्या
तोडे पाटल्या दाखविती आत्मविश्वास
चिंचपेटी म्हणजे स्वछता हमखास
हेच आहे माझ्या सुखी संसाराचे राज
बघा कसा शोभून दिसतोय साज (५)
समाधानाचे घातले मंगळसूत्र
हिरवा चुडा जपे माझे पावित्र्य
माहे 'हे' हाच माझा सौभाग्याचा साज
बघा कसा शोभून दिसतोय साज (६)
४८. माझा व्यायाम
आजकाल काहीही वाचा त्यात हमखास असतो
फिटनेसचा मंत्र
उठसूठ कोणीही भेटो हटकून सांगतो तो व्यायामाचं तंत्र
कोणी म्हणतात चालण्याचाच व्यायाम सगळ्यात चांगला
त्यासाठी काही साधनंही नकोत अन खर्चही
नको करायला
तर कोणी म्हणतात जॉगिंग सारखा व्यायाम नाही
त्याने फ्रेशनेस तर राहतोच शिवाय वजनही
लागत घटायला
कोणी म्हणत रनिंगच बेस्ट त्याचे परिणाम
दिसतात झटकन
म्हटलं नको बाई, उगाच घाई करायला, धावतांना
पाय की ग मुरगळेल
पटकन दोरीवरच्या उड्या माराव्या,सांगतात
एखाद्या काकूबाई
म्हटलं आपल्या दणकट देहाचा लत्ता प्रहार
भुमातेला सोसायला तर हवा की नाही
शहाणे लोक स्विमिंग करतात कोणीतरी आपल
ज्ञान पाजळतात
जीम का लावत नाही सरळ सरळ, दुसरे उपदेश करतात
योगासनांना पर्याय नाही,वदते योगाचार्यांची गंभीर वाणी
कशी सांगू त्यांना माझी योगासनाची नित्यनूतन कहाणी
शेवटी मीच आपला बोध घेतला अन पदर घेतला खोचून
फिट राहण्यासाठी घरकामा करता कंबर घेतली कसून
४९. माझी बाग
बाग माझी फुलली ग, बाग माझी बहरली
फळा फुलांनी नटली ग बाग माझी बाग माझी (धृ)
चाफा शेवंती मोगरा फुले, प्राजक्ताची ही पाकळी खुले
जास्वंद कर्दळ केवडा डुले, भ्रमर घालती रुंजी (१)
मंडप डवरले जाईजुईंनी, खांब सजविले केळ फुलांनी
कनाती बांधील्या बोगनवेलांनी, कमल वधू राजी (२)
गुलाब राजा आला खुशीत, अबोली, बकुली, लिली मिरवीत
कुंद, रातराणी पिंगा घालीत, सोनटक्याला फुलांची ओझी (३)
नारळ जणू आकाशी भिडे, जांभळांनी तर घातले सडे
द्राक्ष बोरांचे झुलती घडे, अननस गाठे ऊंची (४)
मधु मालती गुलाबी हसे, तगर नागफणी उमटवी ठसे
झेंडू सदाफुली लाविती पिसे, गुलबक्षी फुलती तिन्ही सांजे (५)
फणस चिक्कू डौलात झुलती, कलिंगडे त्यांची दृष्ट काढीती
बदामाने सारी घेरली धरती, आंबा झाला राजा पपई राज्ञी (६)
अशा या बागेत येती पाखरे, रंगबिरंगी फुलपाखरे
पाहून बाग मनमोहरे, माझी बागही सखी माझी (७)
५०. मी प्रवासाला निघते
केल्याने देशाटन---- असं समर्थ नाही का म्हणाले?
त्यांच्यावर विश्वास ठेवून मी प्रवास करायला निघाले.
हेही घेतलं, तेही घेतलं, सामान झालं मणभर
प्रवासात कधी काय लागेल याचा भरोसा नसतो कणभर
यश्चयावत तयारी केली डाग झाले ड़झनभर
इहलोक की परलोक हा विचार येई क्षणभर
शेजारी पाजारी पिटला डांगोरा माझ्या प्रवासाचा
सपाटा लावला फोन करून नातेवाईकांना कळवण्याचा
डोझ घेतले उपदेशांचे बाटल्यांमध्ये भरून
बिसलेरीचं मेलं काय ते कुठेही जाईल मिळून
मिळत सगळं सगळीकडे, मंत्र होते जपत
ऊन पाऊस थंडीसाठी सामान होतं साठत
दमले होते जाम, बॅगेत सामान कोंबून कोंबून
प्रवासाचा उत्साह मात्र वहात होता ओथंबून
महत्त्वाचा मोबाईल कशी बाई मी विसरले
अर्थच काय प्रवासाला जर सेल्फी नाही काढले
जय्यत तयारी झाली, वेळ झाली निघायची
"किती किती बाई लोकप्रिय मी" झुंबड उडाली निरोपाची
हात उंचावून बाय करीत पाय टाकला दाराबाहेर
काय झाले नकळे डॉक्टरनी दिला प्लास्टरचा आहेर
कसला प्रवास अन कसले देशाटन दवाखान्याची वारी झाली
सोलो फोटोंच्या ऐवजी खोलीत एक्सरेचीच दाटी झाली
५१. मी वाचनालयात जाते
मी वाचनालयात जाते, मी हिला सांगते मी तिला सांगते
मी ह्यांना सांगते मी त्यांना सांगते (धृ)
मी वाचते ना, म्हणून वाचते (१)
साडी भारी नेसते, गॉगल्स ही लावते,
परफ्यूम फवारते, अन हाय हिल्स घालते
पीटुकला रूमाल हाती धरते, पीटुकली पर्स गळा अडकवते
मेकअप ठीक करून जरा लिपस्टिक डार्क करते (२)
निघणारच तेवढ्यात मला शामली दिसते,
अंगणातच शेजारची माली भेटते
फार नॉए कॉए मी त्यांच्याशी फक्त तासभर बोलते (३)
उशीर झाला म्हणून मी घाई करते, पुस्तक उराशी धरून लॉक लावते
कायनेटिकला जोरदार किक मारते, अन स्टाईलीशली वाचनालयात एन्ट्री घेते (४)
मग हिला हाय करते तिला बाय करते, सगळ्यांची थोडी थोडी विचारपूस करते
बुक रॅक जवळ मला लिली दिसते, ती माझी अगदी खास मैत्रीण असते
न चुकता ती मला इथेच भेटते, तिच्याशी मी जरा अघळ पघळ बोलते (५)
आता मात्र सिरीयसली पुस्तकांकडे वळते, कधी त्यांना कवेत घेते असे मला होते (६)
लघुकथा मला आवडतच नसते, कादंबरी तर नावडतीच असते
संकीर्ण शब्दाने मला भोवळ येते, अनुवादितांनी तर मी बेशुद्धच पडते
आत्मकथनाची मला शिसारीच येते, कोणतं बर पुस्तक घेऊ विचारच करते (७)
तेवढयात मला एक फेमिना दिसते, वाटलंच मला तुम्ही गैरसमज कराल ते
अहो ते काही मॅग्झिन नसते, ती एक सुंदर लेडी असते
तिची इत्तंभूत चौकशी करणे माझे कर्तव्यच असते (८)
जेव्हा मी वाचनालयाच्या बाहेर पडते, मला इतकी काही बौद्धिक मरगळ येते
मग वडापाव खाणं क्रम प्राप्तच होते, कोणी म्हणेल मी पार्शालीटी करते
म्हणून वडापाव बरोबर सांबार वडा मागवते (९)
घरी आल्या आल्या हुश्श करते, फॅन लावून सोफ्यावर अंग झोकून देते
पुस्तक चाळावे म्हणून डोळ्यापुढे धरते, पापण्यांवर किती झापड आली असते नेलेलेच पुस्तक आणले, हे जाणवत ही नसते (१०)
हातातले पुस्तक गळून पायापाशी पडते, उचलून घेण्याची शुद्धच नसते
उद्या कुठली साडी नेसू विचार करीत असते, पुस्तकांचं काय मोठं रोजच तर वाचते(११)
५२. आली माहेरपणाला
आली माहेरपणाला मन जणू उधाणले
भावनांच्या बंधार्याचे कारंजे झुळझुळले
ममतेचे भव्य सरोवर या उंबरठ्याच्या आंत
मम मनकमल विहरते त्या सरोवरी निवांत
माय बंधू पिता अन भगिनी, प्रेमे मज बिलगती
हे बंध जरी नाजुक जन्मभरी मज जखडती
अशी ऊब न मिळे कोठे जगभरी मी जरी फिरले
मायेच्या पदराखाली महाराज्ञी म्हणून पहुडले
वाटे इथेच रहावे उपभोगावे माहेरपण ते
लेक यावी माहेराला म्हणूनी सासरी मी नांदते
५३. ती व तो
ती धरते तो अबोला त्याचं म्हणे मौन
तो कायमच वरचढ ती मात्र गौण
त्याचं ते कर्तुत्व तिचं ते मातृत्व
ती करते नुसतं काम तो म्हणे गाळतो घाम
तो कायम भव्यदिव्य ती असते लहान
तो नेहमीच सेव्य तर ती सेविका छान
ती आग तो अग्नि ती दिवटी तो दिवा
ती साय तो खवा तो वारा झंझावाती ती मंदमंद हवा
ती सकाळ, ती दुपार, ती संध्याकाळ, ती रात्र तो मात्र दिवस
तो फाडतो तो कापतो तो उसवतो ती बसते शिवत
तो राजा ती राणी तो बाग ती फुलदाणी
तो शहाणा ती शहाणी म्हणून माना समान
समाजात त्यांना मिळावा मान समसमान
५४. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती
घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती
कर्तव्याचे भान असावे हृदयी असावी प्रीती
रसने वरती मधु शब्दांचे घरंगळावे मोती
त्या शब्दांच्या पिंजर्यात मग दाट जुळावी नाती
एकमेका सहाय्य करावे संकटांची का मग भ्रान्ति
कर्म करावे असे जगती जे दिगंत देईल कीर्ती
परस्परांचा विचार व्हावा स्वार्थ नसावा चित्ती
घर होईल मग घरासारखे नसतील नुसत्या भिंती
त्या घरट्याच्या प्रांगणात जणू ऋद्धीसिद्धि बागडती
समाधान सुख संतोषाचे पक्षी तिथे विहरती
५५. घर
या जगात आपलं असं एक हक्काचं स्थान असतं
'घर' असं त्याला मानानी संबोधलं जातं
थकल्या भागल्या क्षणी ते विश्राम धाम असतं
सुख दुख शेयर करण्याचं बंदिस्त ठिकाण असतं
वडील माणसं म्हणजे घराचं छप्पर असतं
सुरक्षिततेचं ते छाया रुपी छत्र असतं
नणंदा जावांचा सहवास घराच्या खिडक्यांचं काम करतं
त्यांच्याशी हितगुज करण शांती समाधान देतं
भाचे अन पुतणे मंडळींना तर अति महत्त्वाचं स्थान असतं
आनंदाची हवा खेळत ठेवणारं घराचं ते मुख्य द्वार असतं
नात्यांच्या स्नेह संबंधावरच पायाचं बळकटपण असतं
अशा भक्कम पायावरच घर कायम स्वरूपी टिकत असतं
जावई, लेक, यजमान यांना जबाबदारीचं भान असतं
त्यांच्या कणखर पिलर्सवर घर ताठपणे उभ असतं
लेकी सुना म्हणजे घराचं सुबक तोरण असतं
नातवंडांशिवाय घराला घरपणच नसतं
आमचंही असं एकमेव टूमदार घर असतं
प्रेमाच्या नक्षीदार भिंतीमुळे ते मनमोहक दिसतं
त्याचं यथार्थ नाव 'शांतीधाम' असं असतं
राजमहाला पेक्षाही ते आम्हाला प्रिय असतं
ते आम्हाला फार फार प्रिय असतं
५६. काय वाचतेस
भर भर भर भर झर झर झर झर
काय वाचतेस ग मोठ्या आवडीन
ग बाई तन्मय होऊन
बाई ग सई ग ताई ग ए माई ग (धृ)
वाचतेस का ह. ना. आपटे, की पुलं, ना. सी. फडके
गोनिदा, गदिमा, प्र. के. अत्रे,
गंगाधर गाडगीळांचा असे वेगळाच बाज (१)
हसवतील तुला चि. वि.जोशी,
अन रडवतील य. ग. जोशी
ह. मो. मराठे खिळवतील तुज,
जसे व्यंकटेश माडगुळकर (२)
वाच कुसुमाग्रजांना आवर्जून,
वि स खांडेकर, मालती बेडेकर,
व. पू. काळे अन रणजीत देसाईंना,
विसरू नकोस तू चुकून (३)
चिंब होई कवितेच्या सागरात,
बा. भ. बोरकर, सुरेश भट,
मंगेश पाडगावकर आणि मोरोपंत
सुखवतील तुज खूप (४)
शांता शेळके सरोजिनी बाबर
यांची येईल कोणाला सर
बापट, ग्रेस अन भा. रा. तांब्यांची
काय वर्णू मी मात (५)
५७. वाचक मंच
ऐन दुपारी मंचावरती, आळसात नका लोळू वाचक मंचाकडे वळू (धृ)
चला भरू ज्ञानाचे घडे, जे नेती प्रकाशाकडे
एकटीच नव्हे तर सगळ्या मिळूनी ज्ञान ज्योती पाजळू (१)
चला गिरवू साक्षरतेचे धडे, डोळे लावू विकासाकडे
उदयाचा झेंडा उंच, हा रोज रोज न्याहाळू (२)
नको नको जिणे बापुडे, वाचू आणि वाचवू या गडे
मग देशावर कर्तुत्वाची गंधीत फुले उधळू (३)
लहान थोरांचा विकास घडे स्वामिनी जेव्हा धडपडे
वाचनाची ती शर्त करुनी, गगनी मग विहरु (४)
पुस्तकांना घालू साकडे, वाचनाचे व्यसन मग जडे
पाऊल आपले भरभराटीच्या पथाकडे वळवू (५)
५८. वाचक मंचाने मला काय दिले
वाचक मंचाने मला काय दिले म्हणून काय विचारता?
खरंतर वाचक मंचाने मला काय दिले नाही हो मला? हाच प्रश्न अचूक होता
आता तुम्ही विचारताच आहात म्हणून सांगणं भाग आहे
वाचक मंच ही माझ्यासाठी एक रमणीय फुलबाग आहे
मंचाने मला केवळ पुस्तकच नव्हे तर कागद आणि कलम ही दिली
काय वाचावं कसं वाचावं हे शिकवून माझ्या अर्थहीन विचारांवर मलमपट्टी केली
केवळ मैत्रिणी जमवणे हा वाचक मंचाचा हेतू नाहीच मुळी
त्या काय भिशीने किंवा गॉसिपिंगने ही मिळतात
पण सम आणि उच्च विचारांच्या सर्कलमध्ये स्थान मिळवणे यालाच शहाणपणा म्हणतात
काय म्हणता विचारांचे आदान प्रदान?
अहो एवढे अवघड शब्द वापरायलाच हवेत का?
आपले एखादे छोटेसे स्वलिखित मंचात वाखाणlल्या गेले की धन्य वाटते
ते छापायलाच हवे का?
एक काळ असाही होता जेव्हा मी टाइमपास म्हणून वाचायचे
आता आभार मानते वाचक मंचाचे
कारण मूल्य शिकविले वाचनाचे
"जगा आणि जगू द्या" हा मंत्र जसा या सृष्टीचा
"वाचाल तर वाचाल" हा फरक जाहला दृष्टीचा
Eat, Drink and be Merry हे विचार पार पळाले
Read, Write, and be Happy हे तत्व मला आकळले
व्यक्तिमत्व फुलविणे आणि सदविचारांची फळे देणे
हे माझ्या वाचक मंचरूपी बागेचे काम आहे
ज्ञानाचे बीज मग आपोआपच अंकुरेल याविषयी माझे मत ठाम आहे
५९. वादळ
धाड धाड धाड धाड उबडे पाऊस, हत्तीच्या जणू पायाने
काड काड काड काड झाडे पडती, उन्मळून ती वेगाने
तड तड तड तड वाजती दारे, धड धड धड धड हृदय करी
कडकड कडकड करीत चपला, विकट चेटकी हास्य करी
धाड धाड त्या पडती इमारती, जणू पत्त्यांचे इमले ते
सूं सूं सूं सूं वारा करीतो, नगिणीचे फुत्कार जणु ते
सूर्य आपले डोळे मिटवी, पाहून रूप भयाण अति
तिमिराचे साम्राज्य पसरुनी,प्रकाशकिरणा हाकलती
सैरवैर त्या सरिता पळती, सरोवरांची तीच कथा
रत्नाकर दाही दिशांना नावरि, तो मारी लाथा
निष्प्राण होऊनी ताडमाड ते, धरणी वरती कोसळती
जलचर, स्थलचर आणि चराचर, पूर्णत: विस्कटूनी जाती
महाभूताचे तांडव बघूनी, गड गड गड गड जलद करी
थर थर थर थर कापे धरणी, गरगरते आभाळ वरी
ना दिसे ऐल ना दिसे पैल ही, होत्याचे नव्हते झाले
रौद्र रूप पाहुनी भयंकर, शिव शक्ति ही हादरले
राखावा समतोल निसर्गी, मानवा पुढे आव्हान असे
जल देवतेस त्या शरण जाऊया, तिच्या विना पर्याय नसे
६०. परी
पंख पालवित उतरून येते चंद्रावरची परी
काय सांगू कसं सांगू मोद मावेना उरी
पंख पालवित उतरून येते चंद्रावरची परी।।
आवड होती बालपणीच्या बाललीला बघण्याची
आतुरता ती असह्य होती परीच्या आगमनाची।।
छुमछुम पैंजण कधी वाजतील हुरहूर हीच मनीची
मनमोरानी पिसे फुलविली जव परी आली चंद्रावरची।।
नात जन्मली, नात जन्मली,इच्छा पुरविली मनीची
तारांगण ते घरी उतरले ती राणी अवनीची ।।
तीच तारका, तीच चंद्रमा, चंद्रावरची परी
तिच्या भोवती निरांजने मम प्रीतीची भिरभिरती ।।
६१. बाई
बाई तू कशी ?
मी एक इवलीशी कलिका जशी
मुग्ध अबोध, अबोल अन नाजूकशी
बाई तू कशी ?
मी नुकतेच उमललेले फूल जशी
हसणारी हसवणारी
गाणारी नाचणारी
उनमुक्तपणे विहरणारे फुलपाखरू जशी
बाई तू कशी ?
पूर्ण उमललेल फुल जशी
कर्तुत्वाचे पंख लावणारी
अंतराळात झेपावणारी
साऱ्या जगाला आपल्यात सामावणारी
सामर्थ्याचे प्रतीक जशी
बाई तू कशी ?
फुलाचं फळात रूपांतर होई तशी
मातृत्वाला आसावलेली
जननी पणाने भारावलेली
पुनर्निर्मितीने संतोषलेली
वर्षेने तृप्त भूमी जशी
बाई तू कशी ?
फळभाराने वाकलेली वेली जशी
जबाबदारीचं ओझं सांभाळणारी
घरासाठी झटझट झटणारी
सार्यांना आपल्यात सामावून घेणारी
सतत प्रवाहीत सरिता जशी
बाई तू कशी ?
पानगळ झालेली वृक्ष तशी
निष्पर्ण रूक्ष वाळलेली काष्ठ7 जशी
अनंतात विलीन होण्याची आशा जशी
बाई मी अशी बाई मी अशी
६२. स्त्री
एक स्त्री म्हणून हसतच राहते
फुलतच राहते सर्व संकटांना झेलून
एक स्त्री म्हणून जन्माला आले
याचा अभिमान वाटतो मला भरभरून
वटवृक्षा परी खंबीर मी
जननीरूपे गेले विस्तारून
लव्हाळ्या सम लवचिक मी
नाही पडले कधी उन्मळून मी
मी मदनमंजिरी, मी मदनमंजिरी
कीर्ती सुगंधे गेले गगनावरी
मुळे माझी पण सखोल रुजली
धरणीच्या साक्षात अंतरी
बोगनवेलापरी पाहते स्वप्न रंगबिरंगी
कधी शुभ्र कधी लाल-गुलाबी कधी ती नारंगी
नसू दे एकही पर्ण साथीला चाफ्या परी मी येते उमलून
काट्यातही मी सत्व सोडीना गुलाब जैसा येतो बहरून
पारिजातक मी नितांन्त नाजुक
सुगंध नाही गेले विसरून
कमलीनी मी चिखलातूनही
लावण्यासही टाकी भुलवून
अबोलीचं मी, अबोल राहून
झटते, खपते, सल लपवून
नका हिणवू मज अबला समजून
गौरविते मी मज सबला म्हणवून
गौरविते मी मज सबला म्हणवून
६३. बाई तू कोणाची
बाई तू कोणाची
मी नवऱ्याची त्याच्या मालकीची
त्याच्या हक्काची बटिक -दासी जणू त्याच्या पायाची
बाई तू कोणाची
मी मुलांची, जबाबदारी माझ्यावर त्यांच्या संगोपनाची
त्यांना जबाबदार नागरिक घडविण्याची
आवड मला त्यांचे लाड पुरविण्याची
जन्मभर त्यांच्यासाठी मरमर मरण्याची
बाई तू कोणाची
मी सग्या-सोयर्यांची सगळ्या नातेवाईकांची
सक्ती माझ्यावर त्यांच्या स्वागत सत्काराची
त्यांचे उणेदुणे सोसण्याची
सगळ्यांच्या भल्यासाठी मूग गिळण्याची
बाई तू कोणाची
मी समाजाची, जाणीव मला
त्याची उन्नती करण्याची
अज्ञानाच्या अंधकारापासून
त्याला वाचविण्याची
अडल्या नडलेल्या हात देण्याची
अग बाई तू होणार कधी स्वत:ची
गरज काय मला स्वत:ची होण्याची
माझ्या भोवती असताना माझी माणसं प्रेमाची
मी पुतळी त्यागाची,भिंत माझ्या भोवती
समाधानाची
सगळ जगच माझ्या मुठीत असताना
गरजच काय मला स्वत:ची होण्याची
गरजच काय मला स्वतःची होण्याची
६४. हास ग घुमा
हास ग घुमा, कशी मी हासू ?
बाई नाही, आली नोकर नाही आला
खूप काम पडतय मला
कशी मी हासू ?
हास ग घुमा, कशी मी हासू?
शेजारिण आली दागिने दाखवून गेली
एक दागिना नाही मला
कशी मी हासू?
हास ग घुमा, कशी मी हासू?
सतत पाहुणे येतात मला राबराब राबवतात
त्याचा वैताग येतो मला
कशी मी हासू ?
हास ग घुमा, कशी मी हासू ?
मुलं ऐकत नाहीत नवरा मुठीत नाही
राग राग येतो मला
कशी मी हासू ?
हास ग घुमा तरीही तू हास
तुझ हसूच सावरणार तुझ्या या घरास
तुझा आनंद हीच ऊब सर्वास
तुझ समाधान हीच तुझी देणगी खास
म्हणून तुला सांगते घुमा तू हास घुमा, तू हास
६५. महिला क्रिकेट
महिलांनी मोहल्ल्यातल्या खेळ खेळायचे ठरवले
खेळायचेच तर क्रिकेटच खेळू असे त्यांना वाटले
प्रॅक्टिस कशाला मॅचच खेळू आगाशे बाई बोलल्या
नाहीतर काय वेळेचा अपव्यय दाते बाई निवांत रेलल्या
दिवस ठरला मॅचचा अन वेळही ठरली
दोन संघ ठरवताना गट बाजी ही झाली
एका संघातली महिला टूणकन दुसर्या संघात जाई
असे कसे झाले म्हणून बाचाबाची होई
कॅप्टन ठरवताना तर इतकी पंचाईत झाली
प्रत्येक महिला या पदासाठी आपलं घोड दामटू लागली
शेवटी ठरले, प्रत्येक इनिंगला कॅप्टन बदलूया
तूही कॅप्टन, मीही कॅप्टन, भांडण मिटवू या
सामग्री जमवली मुलांकडून अंपायर ही ठरवला
निकाल आमच्याच बाजूचा, त्याला सज्जड दम दिला
टॉस कोणी जिंकला हे गोंधळात कळलेच नाही
कोण फिल्डर कोण बोलर एकीचा पायपोस एकीच्या पायात नाही
मीच पहिली बॅटर म्हणून जोशी काकूंनी बॅट घेतली हिसकून
मग मीच पहिली बोलर म्हणून थत्ते बाईंनी बॉल पाहिला टाकून
यष्टी रक्षण म्हणजे नेने मावशींना स्वसंरक्षण वाटले
सगळे स्टंप्स त्यांनी अलगद उराशी कवटाळले क्षेत्ररक्षणाच्या नावा खाली सर्व दूर हटल्या
नेहमीप्रमाणे ग्रुप्स करून आपापसात बोलू लागल्या
थोड्याच वेळात बॉल ही गायब, बॅट ही गायब, एकटाच अंपायर उरला
मॅच संपल्याचे जाहीर करत त्याने गुगली टाकला
"वूमन ऑफ द मॅच" म्हणून गोखले आजी जाहीर झाली
नुसतं "मॅच फिक्सिंग मेलं" म्हणत बायकांनी नाके मुरडली
पुढल्या मॅचमध्ये बॅटला हद्दपार करायचे
एकमते ठरले
आपली लाटणीच बरी असे सगळ्यांना मनोमन पटले
६६. केळवण
कळेल का आम्हाला जरा हे केळवण बिळवण काय असतं
अहो गृहस्थाश्रमात पदार्पण करणाऱ्यांसह ते एक गेट-टुगेदर असतं
त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं ते एक प्रयोजन असतं
अन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याचं ते एक माध्यम असतं
मित्र-मैत्रिणी आप्त सगे सोयरे या निमित्त्यानी जमतात
होऊ घातलेल्या श्री. व सौ. शी थोड्या गुज गोष्टी करतात
हसी मजाक थट्टा मस्करी यात सगळे रंगून जातात
अन येऊ घातलेल्या विवाहाचं टेंशन घालवू पाहतात
ज्येष्ठ मंडळी नव आयुष्यासाठी आशीर्वचन देतात
तर समवयस्क पण अनुभवी मंडळी बागुल बुवाचं काम करतात
चिल्लीपिल्ली, दादा ताई, भोवती गोल रिंगण घालतात
मित्रमंडळी अॅजयुज्वल गोड खिल्ली उडवतात
त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात आता नवीन भागीदार येणार
म्हणून जुने सगळे आज त्यांचा सहवास खूप उपभोगणार
या निमित्त्याने कोणी दोन गोष्टी उपदेशाच्या ही सांगणार
यापुढे कोणाचं ऐकून घ्यायला त्यांना कुठे वेळ असणार
अशीही केळवणाची प्रथा आहे खूपच चांगली
ज्याने कोणी सुरू केली त्याने खूपच शक्कल लढवली
भोजनासह गप्पा गोष्टींची खूप मजा चाखून घ्या
केळवण्यासारख्या प्रथांना पुढेही कायम राखूया
६७. निसर्ग
महाबळेश्वर असो माथेरान लोणावळा असो कि असो कुलुमनाली
निसर्गाने सौंदर्याची उधळण मुक्त हस्ते केली
रौद्र रूप ते हिमनगाचे विराट दर्शन घडवी
सह्याद्रीच्या कडेकपारी शौर्य मानवा शिकवी
सात पुड्याचे सुंदर दर्शन वनवासींना भुलवी
शिवपिंडीका या पृथ्वी वरच्या मनमोहना मोहवी
खळाळती ती भागीरथी जणू अल्लड कन्या भासे
गोदावरीचे पात्र रुंद जणू दर्शन तारुण्याचे
संथ वाहते कृष्णामाई रुपच गांभीर्याचे
ओतप्रोत भक्तीची भावना भाग्य चंद्रभागेचे
समुद्र -संगम, त्रिवेणी संगम
पन्हाळ्याचे ते रूप विहंगम
कास्य पठार गालीचे विणतो
पुष्पांचा कधी ना कळे उदगम
आमराई कोकणची सुंदर, भात शेती ही किती मनोहर
लावण्यवती रुपे घेऊनी निसर्ग नटवी वसुधेस निरंतर
फिर फिर फिरले अर्धे जग जवळूनी पाहिले
स्विझरलँड,पॅरिस, मॉरिशस अनुभवले
खिडकीतल्या हसऱ्या सदाफुलीने घरी स्वागत जेव्हा केले
सप्तस्वर्ग जणू मम हाती आले
किती लिहावे कसे लिहावे शब्दच जेव्हा पडती अपुरे
नि:शब्दपणे मनपूर्वक निसर्गा पुढे नतमस्तक व्हावे
निसर्गा पुढे नतमस्तक व्हावे
६८. मी रत्नाकर
मी रत्नाकर, मी रत्नाकर, मी रत्नांचे आहे आगर (धृ)
जे नसे धरणीवर, जे नसे गगनभर
ते साठवितो मी उदरी सत्वर (१)
मी विराट कुंभ, धरी जल अथांग
विहरवितो मी अमाप जलचर (२)
वनस्पतींचा मी आधार, क्षीर नसे परी देतो क्षार
जलाशयांचा मीच नृपवर (३)
चंद्र पुनवी जव ये आकाशी, मोद न मावे मम हृदयाशी
नृत्य करी मग मी लाटांवर (४)
अनंत वर्षे मी पृथ्वीवर, आर्तवितो हरदिनी मज तो दिनकर
अर्घ्य देई मी तव चरणावर (५)
सागर सरिता अभंग नाते, एक रूपता जी शिकविते
विलग न होतो कधी ही पळभर (६)
गंगा गंदा समान मानी मी, मी विक्रमी परी मी संयमी
सीमेत माझ्या मी जीवन भर (७)
६९. पाऊस
पाऊस डोळ्यातला झिरझीर झिरपणारा
आनंदविणारा रडविणारा
शब्दाविण संवाद साधणारा
पाऊस डोळ्यातला
पाऊस कानातला सुख ऐकवणारा
हळूवारपणे हितगुज सांगणारा
कधीकधी धाड धाड कोसळणारा
हजारो नगारे वाजविणारा
हृदयाचा थरकाप करणारा
पाऊस कानातला
पाऊस गालातला खुदकन हसवणारा
स्वप्न नगरीत रमविणारा गोड गोड खळी खुलविणारा
जगाचे भान हरविणारा
पाऊस गालातला
पाऊस रसनेतला
जठराग्नि प्रदीप्त करणारा
स्वादिष्ट पदार्थांची आठवण करून देणारा
स्वर्गीय आनंद देणारा
पाऊस रसनेतला
पाऊस रोमारोमातला तनमन फुलविणारा
वसुंधरेला गंधित करणारा आसमंतात दरवळणारा
अंग अंग धुंदविणारा
पाऊस रोमारोमातला
पाऊस पंचेद्रियांवर राज्य गाजविणारा
पाऊस पंचप्राण उजळविणारा
बेधुंद धुंद करणारा
चरा चराला भुलविणारा
पाऊस पंचप्राण शांतविणारा, पाऊस पंचप्राण शांतविणारा
७०. ज्येष्ठ नागरिक संघ
पहिला - काय आजोबा काय म्हणता ठीक चाललय ना ? मजेत आहात ना ?
दुसरा - अहो कसली मजा अन कसलं काय नुसती सजा आहे सजा
चाललाय कसाबसा आयुष्याचा खेळ, आपल्याकडे लक्ष द्यायला आहे कोणाला वेळ ?
पहिला -अहो असं म्हणून कसं चालेल तुमच्यावरच नाही का पुढील पिढीची भिस्त ?
दुसरा- काय होईल कोणास ठाऊक या पिढीचं, आहे का त्यांच्यात थोडीतरी शिस्त?
पहिला-बरं त्यांचं जाऊदे पण तुमच्या जेष्ठतत्वामुळेच राहतोय ना आपला समाज एक संघ ?
दुसरा-अहो वाढत्या वयानेच श्रेष्ठपणा येत असेल तर नारळी पोफळीनेही काढावा एखादा ताडमाड संघ
पहिला -तसं नव्हे हो पण तुमच्या विचारांचा तुमच्या अनुभवांचा होतोच ना जनतेला फायदा ?
दुसरा- कसच काय अन फाटक्यात पाय, आहे का आमच्यासाठी एक तरी धड कायदा?
पहिला- कायद्याचं जाऊदे, तब्येत काय म्हणते तुमची आजोबा?
दुसरा- सगळ्या व्याधींचं घर हे शरीर, आता त्याचे किती दिवस राहिले कोणास ठाऊक बाबा ?
पहिला- अहो असं दुःखी होऊन कसं चालेल अक्खा देश तर आहे तुमच्यावरच अवलंबून
दुसरा- उगाच खोटंनाटं सांगून भुलवू नका आम्हाला सगळीकडे बोंबाबोंब चालली आहे तरुण पिढीला वाव द्या म्हणून
पहिला- मग घरच्या गोकुळातच रमाव ना नातवंडांच्या बाललीला पाहत
दुसरा- कोणाशी बोलावं अन कोणात रमाव असतं का आज-काल कोणी घरात?
पहिला- नाही प्रपंचात तर परमार्थात मन रमवाव, राउळी मंदिरी जाव, देव देव करावं
दुसरा- अरे बाबा सांगणं सोप आहे, सारं आयुष्य खाण्यापिण्यात गेलं, आता हे मन ईश्वरचरणी कसं रमाव ?
पहिला- किती वैतागता हो आजोबा तुम्हाला काय अन कसं समजवावं?
दुसरा- काही नको समजवायला जो उठतो तो आम्हालाच सुनावतो, आमचं मन कुणी जाणावं?
पहिला- आहे आजोबा आहे तुमचं मन जाणेल असं एक ठिकाण आहे
दुसरा- सांग बघू लवकर मी अगदी अधीर झालो आहे, अरे सांग ना चटकन आता आणखी धीर धरवत नाही
पहिला- मग ऐकातर आजोबा जेष्ठ नागरिक संघा शिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही
दुसरा-काय ठेवलं आहे या संघात, तिथं मोठंसं काय होणार आहे?
पहिला- अहो काय होणार म्हणून काय विचारता तिथे सगळ्याच गोष्टींचा परिपाक आहे
दुसरा- अरे बाबा नुसतंच म्हणायचं संघ संघ पण जो तो असतो आपल्यातच दंग
पहिला- इथं असतात सगळेच विचारी जेष्ठ नागरिक, होत नाही त्यांच्याकडून कुठलीच आगळीक
समवयस्क सगळे एकत्र येतात हसतात हसवतात, अन दुःख विसरतात
हेल्थ कार्ड ही मिळतं इथे, तब्येतीची काळजी मिटते, सभा भाषणे संगीत प्रवचन यांचे टॉनिक मिळते
गुण ग्राहकता दिसून येते विचारधन पुरवितो, गुण संवर्धन करण्यासाठी वावही भरपूर मिळतो
मित खरचुनी अमित मिळते, घेणारा बहरतो पानगळीला मागे टाकून वृक्ष जणू बहरतो
संथ गतीच्या आयुष्याला देतो तो चालना, आता तरी जेष्ठ संघाचे सभासद तुम्ही व्हाल ना
दुसरा-खरं आहे रे बाबा तू म्हणतो ते अगदी तंतोतंत पटते
ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद मला कधीच व्हायला हवे होते
आताही वेळ गेली नाही Better late than never
वारजे माळवाडी जेष्ठ नागरिक संघच निवडतो तोच निवारेल माझा एकाकीपणा
अन ठेवील मला टवटवीत forever
७१. सरत्या वर्षाला सलाम
इवलीही नाही खंत गत काळच्या दिसांची
थोडीही नाही भ्रांत मज भावी जीवनाची
सुख दुःख दोन बाजू एक नाणे जीवनाचे
झेलले दोन्ही समरसून छाप-काटा खेळ दैवाचे
जावे जळून सगळे हेवे आणिक दावे
सुस्मित वदनचंद्र सुस्वरीत गीत गावे
सरले वर्ष जरी हे तव साथ ना सुटावी
मधु प्राशण्या संगतीचे वर्षे अशी सरावी
सत्संग हाच ध्यास आनंद हीच आस
सरत्यास त्या सलाम उगवत्यास नमन खास
७२. कमला सोहनी
पहिली महिला शास्त्रज्ञ
एक महिला फार सर्वज्ञ, पहिली भारतीय ती शास्त्रज्ञ
सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवून, केले स्वप्न तिचे तिने परिपूर्ण
आम्हा वाटतो तिचा अभिमान, कमला सोहनी असे तिचे नाम
स्त्री म्हणून जिथे डावलला प्रवेश, त्याच संस्थेची ती झाली संचालक
तिने लावले महत्वाचे शोध, सायन्स मधली तिची पुस्तके प्रसिद्ध
किती मिळाले तिला सन्मान, कमला सोहनी असे तिचे नाम
आहार तत्वांची गरज शोधून काढली, प्रोटिन्स विटॅमिन्सची महती पटवली
कुपोषितांसाठी नीरा सुचविली, जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवली
तिने घडवला खरा इतिहास, कमला सोहनी भूषण भारतास
तिचा थिसिस फक्त चाळीस पानांचा, वनस्पतीमधील सायटोक्रोम्सचा
केंब्रिज विद्यापीठाने वाखाणला, नोकरीच्या किती ऑफर्स आल्या
(पण त्या डावलून) स्वातंत्र संग्रामात तिने उडी घेतली
कमला सोहनी अतुलनीय ठरली
७३. होकार
नकार घंटा नको वाजवू आव्हानाचा कर स्वीकार
म्हणेल तेते होऊन जाईल सतत देत जा तू होकार
नन्हाच राहशील नन्ना पाढ्याने हो म्हणूनी होशील महान
दुर्बल मन तुज भिववित राहील, होकाराने हो बलवान
फळ सडले तरी टणक बीज ते जन्मा घाली वृक्ष अपार
शरीर खंगूदे मन सावर ते, भविष्यात आनंद अपार
बळी होऊनी पिळी कान तू, नको निराशा कधी मनी
उत्साहाने प्रोत्साहाने कीर्ति होईल तुझी जनी
जे जे वाईट ते ते टाळी, नकार तिथे मग स्पष्ट हवा
सत्कार्यास्तव साद ऐकता खंबीर नित्य होकार हवा
आकांक्षांचे पंख लावूनी उच्च ध्येय आयुध घेऊनी
होकराच्या रथी बैसुनी कर यशआभाळी विहार
धन्य वीर रणांगणी जे करती विपत्ति रिपुचा शरसंहार
७४. वाढदिवसाच्या शुभेच्छा
अहो वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
तुम्हाला निरामय उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना ईश्वराला.
तुमच्याकडून काय काय शिकावं याची गणना आहे का?
तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे सर्वस्व नाही का?
जीवन कसं जगावं याचा पहिला पाठ तुम्ही मला दिला
अजून थोडी वर्ष लागतील मला ते शिकायला.
तुम्ही एक आदर्श शिक्षक, आदर्श संशोधक
तुमच्यात काही कमी आहे का हे मी बसते शोधत.
तुमच्यासारखे आनंदी उत्साही पती लाभले हे माझे भाग्य
तुम्हाला मी देऊ शकते फक्त माझे आयुष्य माझे आरोग्य.
७५. जुने नवे कव्वाली
जुने - जुने ते सोने जुने ते छान आहे जुन्याचा आम्हा खूप अभिमान आहे
नवे - नवे ते हवे नवे ते मस्त आहे जे जे आहे मॉडर्न तेवढेच बेस्ट आहे (धृ)
जुने - सनातन संस्कृती आपली जुन्या लोकांनी छान जपली त्यांचे आचार-विचार करीती उच्च संस्कार
नवे - सोडा तुमचे जुने जगणे, शिका जरा नवे, अनुसरणे, नव्याची शानच औऱ, जुने सगळे फारच बोअर
जुने - जाणा वेदांचे सार, घ्यावा शास्त्रांचा आधार तुम्हा मग कळेल नक्की जुन्याची गर्भ श्रीमंती कारण…(ध्रुपद)
नवे - विसरा तुमचे वेद नि शास्त्र, बघा आमचे शोध नि शस्त्र, आम्ही सायन्सचे भक्त, मानितो पुरावे फक्त
जुने - विसरू नका ऋषि मुनींना त्यांनी जपलेल्या शोधांना, थोर त्यांच्या साधनेने सोपे झाले तुमचे जगणे
नवे - नका विसरू आजचे शास्त्रज्ञ, कसे तुम्ही अंध नी अज्ञ, आमची चंद्रावरी स्वारी जुन्यांना ती फारच भारी
काय त्या तुमच्या अंधश्रद्धा, पूजिता दगड धोंडेसुद्धा, झाडांना ही देव मानता, पशुंना ही हार घालीता, आम्ही असे नाही भोळे, मानीत नाही सोवळे ओवळे, मॉडर्न तेच अंगीकारितो बाकीच्यांना स्पष्ट नाकारतो कारण…(ध्रुपद)
जुने - मॉडर्नच्या नावा खाली करता पाश्चात्त्यांची कॉपी, राहणी आपली साधी नि सोपी, तिला तुम्ही घातली टोपी
काय हे तुमचे कपडे अंगविक्षेप वेडे नि वाकडे, नाही आदर थोर्या मोठ्यांचा काय फायदा अशा जगण्याचा म्हणून…(ध्रुपद)
नवे - बटन दाबताच पडतो प्रकाश, जवळ आणले आम्ही आकाश
आम्ही शोधली आकाश वाणी, अत्त्यावश्यक भ्रमणध्वनी, संगणक आमचा मित्र,
ज्याचा वापर दिसे सर्वत्र अशा कित्त्येक नवीन गोष्टी, शिवाय करतो कृत्रिम वृष्टी
तुमचे काही आहेत का शोध घ्यावा नव्या पासूनच बोध कारण---(ध्रुपद )
मानू नका जुन्यांना अडाणी,
किती झाले संत नि ज्ञानी
त्यांनी केले कष्ट अपार, तुम्हा द्याया ज्ञान भंडार
तुमचे नवे शोध हे सगळे जुन्या ग्रंथात आढळे, आठवा ते पुष्पक विमान तुक्याने केले सदेह गमन म्हणून --(ध्रुपद)
नवे - माना तुम्ही नव्यांचे विचार, फायदा तुमचा होईल फार, करू नका उगाच काळजी वापरा नॅनो टेक्नॉलॉजी,
घाई आम्हा सर्व कामांची सवय होईल धकाधकीची, संथ जिणे नको वाटते, गतीची एक मस्ती असते म्हणून…(ध्रुपद)
जुने - आरोग्याचे करतो रक्षण, जुना आयुर्वेद उत्तम
नवे -ॲलोपॅथीची महती मान्य असे साऱ्या जगती
जुने - कुटुंब पद्धती एकत्र होती
नवे - भांडणे किती त्यात होती
जुने - श्रेष्ठ होती शिक्षण पद्धती
नवे - छडी आता ना लागे हाती
जुने - शास्त्रीय संगीत मधुर ते
नवे - पॉप म्युझिक आम्हा थिरकवते
जुने - योगासने देती आरोग्य
नवे - आमचे एरोबीक्सच योग्य
जुने - उत्तम असे चालण्याचा व्यायाम
नवे - बेस्ट असे जीम आम्ही ठाम
जुने - कत्थक नि भारतनाट्यम सुंदर
नवे - ब्रेक डान्सचे अनुभवा वंडर
जुने - समतोल आहार तुम्ही घ्या ना
नवे - फास्ट फूडचा आहे जमाना
जुने - आम्ही समतेला मानीले
नवे - ग्लोबलाइजेशन आम्ही केले
जुने - आम्ही त्यागाला मानितो
नवे - आम्ही देहदान करितो
जुने - सेवा आम्ही मानिला धर्म
नवे - श्रेष्ठ आम्ही मानिले कर्म
जुने + नवे - चला आपण एक होऊ,
जुन्या नव्याचा मेळ जमवू
सुसंस्कृत समाज घडवू
विकास हेच ध्येय ठरवू कारण
जुने ते सोने नवे ही सोनेच आहे
७६. स्त्री-पुरुष कव्वाली
स्त्रिया - स्त्रिया आम्ही असू जरी बांध्याने लहान लहान लहान
समजू नका आम्हा, तुम्हापरीस सान सान सान ।।धृ।।
पुरुष - पुरुष आम्ही असू सर्व शक्तिमान मान मान
आमची जगी असे सदा और शान शान शान ।।धृ।।
स्त्रिया - आमची शौर्याची कहाणी, सांगते झाशीची राणी
आमची त्यागाची कथा, राणी पद्मिनीची गाथा
आमच्या भक्तीचा जोर हो ऽ ऽ ऽ संत मीराबाई थोर
सांगा तुमच्यात कोणी, आहे का ऐसा पुरुष ?
उगा दावू नका हो व्यर्थ अभिमान मान मान ।।धृ।।
पुरुष - आमच्या शिवाजीची सर, आहे का तुमच्या राणीस ?
आमचे बाळ गंगाधर, आणि लाल जवाहर
आमचे गांधीजी थोर, हो ऽ ऽ ऽ ऽ देशभक्तीचा जोर
करु नका बायकी कटकट, संपवा तुमची वटवट
सांगतो आम्ही स्पष्ट, आम्हीच असू महान महान महान।। धृ ।।
स्त्रिया - देशभक्तीच्या गप्पा, सांगू नका आम्हा बाप्पा
आम्ही करतो कराटे, गगन आम्हा थिटे वाटे
आमची कल्पना चावला, हो ऽ ऽ ऽ ऽ तिला कसे विसरला?
आता का खाली पाहता, नाही काही येत बोलता
आमची थोरवी ऐका, इकडे करा कान कान कान ।।धृ।।
पुरुष - नक्का दावू तो चेव, आठवा आमचे ज्ञानदेव
आमचे विवेकानंद नी, नाथ तुकोबा ज्ञानी
आमचे ते अब्दुल कलाम, करा लवून सलाम
किती किती नरवीर आम्ही पुरविले भूवर
आत्ता का तोंड लपविता, वळवा इकडे मान मान मान ।। धृ ।।
स्त्रिया - आमची गार्गी मैत्रेयी, आणि ती बहिणाबाई
इंदिरा गांधी मंत्री, फुलवे शिक्षणा सावित्री
आमची जिजाऊ ती थोर, हो ऽ ऽ ऽ ऽ अहिल्याबाई होळकर
किती उदाहरणे द्यावी, आत्ता का अळीमिळी ?
तुम्हा पटलेले दिसते, स्त्रीच जगी शान शान शान ।। धृ ।।
पुरुष - आमचे राणा प्रताप
स्त्रिया - तुमचे नाना प्रताप
पुरुष - आमचा सचिन तेंडुलकर
स्त्रिया - आमची लता मंगेशकर
पुरुष - आमचा अमिताभ बच्चन
स्त्रिया - आमची ती जया बच्चन
पुरुष - आमचा श्रीराम विष्णू
स्त्रिया - नका लक्ष्मीला विसरु
पुरुष - आमचा हा भारत देश
स्त्रिया - आमची ही पृथ्वी देख
पुरुष - आम्ही असू पिता जगाचा
स्त्रिया - मान असे आम्हा जननींचा
पुरुष - जगी सर्वत्र असे आम्हा प्रथम मान मान मान
स्त्रिया - आम्हीच दिला असे तो तुम्हासी सन्मान मान मान ।। धृ ।।
स्त्रिया - आम्ही असू ऽ
पुरुष - आम्ही असू
स्त्रिया - आम्ही असू
पुरुष - आम्ही असू
सर्वत्र महान महान महान ।।
७७. काबिलियत
न आशा है न निराशा है
आजकल तो बस सिर्फ करोना की ही भाषा है
जिसके बारे में हमें कुछ मालूम ही नहीं
उस विषय की हम क्यों चर्चा करें
हमारा अमूल्य वक्त क्यों बेवजह बर्बाद करें
खिड़कियों से झांको जरा,
फूल खिलखिला रहे हैं,
भवरे गुनगुना रहे हैं
पत्ते हिलहिला रहे हैं,
पक्षी चहक रहे हैं
हम क्यों उदास बैठकर वातावरण दूषित कर रहे हैं?
ये अधिकार हमें किसने दिया है कि हम सृष्टि में जहर भर रहे हैं
परिस्थिति बिगड़ गई तो क्या हुआ मनास्थिति तो अभी शाबूत है
मन अपने हाथ में है तो आओ शामिल हो जाए
परिस्थिति तत्काल बदलने के काबिल हो जाए
७८. Education
(By Smt Sujata Bodhankar, Member, AASCON)
Once upon a time, I was in college.
Now also I am in a college.
Pl. don't laugh, it’s not due to my repeated failure
Rather it is because of my teacher ship tenure.
I like to recall my those college days.
The teachers, the friends & the surrounding craze.
The craze was to succeed & go ahead.
The zest was to learn everything from the toe to head.
The lecturers were respected & the principal honoured.
The mob all around was very well mannered.
In addition to studies, other activities also I had.
The debates, the gatherings & picnics were never bad.
Copying, I think was also heard. But police force during exams was unheard.
Girls used to be shy, the boys used to ride the bicycles, which was a great pride.
I am still in the college thinking about the past
and I wonder, how the situation has changed so fast.
Girls & boys are friendly with each other.
The vehicle they use is only scooter or motor.
Sari-day, tie-day, rose-day, day and day
to some extent it’s good, but they shouldn’t be carried away.
Students are seen copying during exams with great despair.
Vice chancellor is also caught in mark sheet affair.
Burning alive girls and stabbing them in college building.
Are we lacking somewhere in our students moulding?
Ragging Is banned, the best law of the year.
Student used to die only by its fear.
When they learn, earn & prosper.
It’s our great pleasure.
But when they fly away to Europe & U.S.A.
We are loosing our precious treasure.
No doubt, they are talented, devoted & hard working with proper guidance, they are capable of India’s making.
It’s now, I have noticed one fact that now I am a student & I was a teacher in past.
Once upon a time I was in a college.
Now also I am in a college.
Pl. don’t be jealous it’s only now that I have gathered lots of knowledge.
७९. वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुहासताईंना
धन्य त्या माता पित्याची ज्यांना कन्या जन्मतःच कळलं
ती सदा हसतमुख राहील म्हणून तिचं नाव सुहास ठेवलं.
रुपमती बुद्धीमती ती आमच्या घराचं भूषण आहे
तिला आणखी कसं गौरवावं हाच मोठा प्रश्न आहे.
खरं म्हणजे ती कौतुकाची खाणच आहे कौतुकास्पद असं झाकलं माणिक आहे. स्वत:च्या संकटांवर मात करीत इतरांना मदत करणे हा तिचा स्थायी भाव आहे
सरस्वती लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न नसल्या तरच खरं नवल आहे
उदंड सुखी निरामय आयुष्य लाभू दे तिला तिच्याकडून काहीतरी शिकण्याची हे ईश्वरा बुद्धी दे मला.
खरं तर सगळ्याच बाबतीत
तुम्ही माझ्यापेक्षा जेष्ठ
आणि प्रत्येक गोष्टीत मी कनिष्ठ
पण तुम्ही हे कधीच जाणवून देत नाही
हेच तुमचे खास वैशिष्टय
मदतीला तत्पर,विचार करते सत्वर
श्रेय वाटते परस्पर,अशी ही माझी नणंद कम मैत्रिण
तिचा सहवास लाभो निरंतर
८०. माझे मृत्युपत्र
मनोदेवता जागृत झाली अकस्मात झडझडूनी
सरत्या आयुष्याची जाणीव दिली तिने करुनी
क्षण भंगूर हे जीवन याचा कसा करू भरवसा
क्षणात जाईल प्राण पाखरू उडून पतंगा जैसा
नश्वर देहाचे या मग मी कसे करू सार्थक
राख होईल बघता बघता जाईल निरर्थक
अंध बांधवा दृष्टी द्यावी नेत्रांच्या दानाने
जळलेल्यांना जीवन द्यावे त्वचा रोपणाने
जरी असे पाषाण हृदयी मी करीन ते ही दान
किडनी माझ्या दोन दोन त्या बनो कोणा जीवदान
रक्ताच्या दानाचा लाभो पुन्हा पुन्हा अधिकार
कच काय मम कुचकामाचे त्यांचा ही स्वाहाकार
चर्म अस्ती अन रोम रोम हे लाभो सत्कारणी
होवो अर्पण बांधवास्तम मम काया अन वाणी
किती अहं हा कसे समजते कर्णा सम तव दानी
तोच प्रथमता होणे अर्पण, ईश्वरास तू मानी
मुखी त्याचे नाम सर्वदा हाच असावा ध्यास
गीता असता करात माझ्या, थांबो अंतिम श्वास
८१. मुक्ती
ना भय ना चिंता मला कशाची आता
तू असता जवळी माझ्या हे भगवंता
तू करता, भर्ता तूच पिता अन माता
तू बंधु सखा मम तूच जगाचा जनिता
मम नसानसातुनी तूच प्राण अवतरला
तू इथे तिथे अन दश दिशातही भरला
अंतरी तूच अन बाह्य जगातही तूच
तत्वमसीची ओळख मजला पटली खचित
तू असे चहूकडे सर्व व्यापूनी उरला
तू चराचराच्या अणूरेणूतही भरला
जर सर्व तूच तर मी ही तूच नाही का?
मम भ्रांतच मिटली मुक्तच मी नाही का?
८२. श्री पाणीपुरी पुराण
ऐका ऐका हो सख्यांनो
माझ्या सगळ्या भगिनींनो
समस्त सख्या मैत्रिणींनो
पाणीपुरी पुराण हे महान।
हे पुराण नव्हे महापुराण
जे ऐकता होईल कल्याण
अज्ञान फिटेल दारुण
आजवरीच्या आयुष्याचे।
पाणीपुरी नव्हे केवळ पदार्थ
तिच्यातील जाणून घ्यावा भावार्थ
म्हणजेच टळेल घोर अनर्थ
भविष्य काळातील हमखास ।
चौकाचौकात असतात पाणीपुरीवाले
परंतु सगळेच नसतात चांगले
ज्याच्या भोवती खूप लोक जमलेले
तेच खरे समर्थ ।
गाडीपाशी जाऊन राहावे उभे
रसनेची मग लाळ गळू लागे
ती आवरता आवरता चिकाटी लाभे प्रयत्नपूर्वक प्रत्येकासी।
मग भैय्या देई बशी पटकन
एक एक पुरी फोडी टचकन
पाण्यात प्रत्येकीला बुडवी पचकन
घालावी ती मुखात गपकन
ठसका लागे असा ठसकन
नेत्रात अश्रु येती ।
मग जो ब्रम्हानंद होई
त्यास वर्णावया शब्द नाही
जो तो आजूबाजूस पाही
शेजार्याच्या पुर्या मोजावया ।
परंतु ते येर्या गबाळ्याचे काम नोहे
केवळ भैय्याच गणती करी लवलाहे
हरेकाचा हिशोबही तोच पाहे
पैसेही वसूल करी नेमाने।
तो भैय्या वाटे जादूगार
तैसीच पाणी-पुरीही जादू करी फार
कितीही करावा तिचा भडिमार
तरी समाधान होत नसे ।
पुन्हा पुन्हा जावे वाटे त्या चौकात
आणि वाटे बसावे पाणीपुरी खात
तिच्या पुढे पक्वांन्नांची ही नसे मात अनुभवावा स्वाद तो।
हे पाणीपुरी तुझ्या उदरात काय दडविले, आम्हासी त्या नादी लाविले
उदरी जाउनी आम्हा धन्य केले
काय महिमा वर्णू तुझा।
वाटे पुन्हा पुन्हा घ्यावा तिचा आस्वाद
तिच्या चवी पुढे अमृताची काय बिशाद
देव जरी आले पृथ्वीवर तर देतील दाद पाणीपुरीच्या चटकदार चवीला।
इति श्रीमद गाडीवाले भैय्या नामे चौकातले पाणीपुरी महापुराणम् समाप्तम् ।
८३.श्रीकृष्णा देई तव नाम
श्रीकृष्णा कृष्णा कृष्णा
देई तव नाम माझे मुखा करी कृपा, ठेवी तुझे नाम माझ्या मुखा (धृ)
मी दिनवाणी मी अज्ञानी
काम क्रोधे पीडिले मज, मत्सरी, मी मानी
तारी हरी, तारी मजला, तूच माझा सखा (१)
धरीसी हरी गिरी करी, नरकासूर मारी
अघासूर, धेनुकासुर, पूतना संहारी
लीला तुझ्या गाता देवा अंत नाही सुखा (२)
कंसाचा तू काळ, भक्तांचा सुकाळ
कालिया मर्दीला तुने अक्राळ विक्राळ
तुझ्या परी तूच मुरारी, कोणी न तुजसारिखा (३)
हे शारंगपाणी, हे चक्रपाणी
आले तुझ्या चरणाशी मी घेऊन नयनी पाणी
त्राता दुजा कुणी नसे माझी लाज राखा (४)
८४.माझे मन चंचल
माझ्या मनाचे तरंग जणू सागराच्या लाटा
पळू पाहे दशदिशा परी अपुर्या त्या वाटा (धृ)
किती समजावू मी त्याला परी स्वस्थ ते बसे ना
मारी उसळया क्षणोक्षणी, त्याच्या नानाविध छटा ।।1।।
कधी क्रोधे लाल होऊनी करी फुत्कार नागाचा
कधी परिधान करी लोभ मोह शिरी फेटा ।।2।।
चंचल चपले वाणी ते कधी इथे कधी तिथे
घडी घडी नूर बदली जणू घड्याळाचा काटा ।।3।।
अगणित कामना तयात, तारका कमी नभांतरी
मना तुझा न कळे ठाव कधी गहन, कधी थिटा ।।4।।
द्वेष इर्षांच्या धाग्यांनी विणले त्याने जाळे घट्ट परी
असे किनार प्रीतीची माया ममतेचा तो बुट्टा ।।5।।
माझ्या मना तुज विनविते नको धावू सैरावैरा
ध्यास धरी परमात्म्याचा, आधार खरा तोच मोठा ।।6।।
८५.स्मरण
स्मरण, स्मरण, भगवंता, नित्य राहो तुझे नाथा नको दुजे काही आता राहो तुझे पाई माथा (धृ)
तव नाम रूप मनी हेची
असो माझ्या ध्यानी (१)
दे मला आशीष
तव सेवा घडो विशेष (२)
तव नाम देई मुखी
अंतकाळी जे मज राखी (३)
८६.शंभो महादेवा
शंभो, शंभो महादेवा तुझा विसर न व्हावा
नित्य घडो तुझी सेवा सत्संग सदा घडावा (धृ)
त्रिशूलाने त्रिगुण ताडी, डमरून अहंकार झाडी
वैराग्याची दे मज गोडी इतुकेच मागते देवा (१)
चंद्राची शीतलता देई गंगे परी निर्मळ ठेवी
हलाहल जसे तू पचवी तसे सहनशील मज ठेवा (२)
जटाधारी गंगाधारी त्रिनयना मज तू तारी
त्रैलोक्याच्या कैवारी, तव चरणी ठाव द्यावा (३)
८७. सय मायभूमीची
कामं संपत नाहीत
दिवस जातो सरून
सय जात नाही
डोळे येतात भरून
शब्द सुचत नाहीत
भावना उचंबळून
मायभूमिच आठवते
मला फिरून फिरून
८८. अंतर्यामी
किती रे प्रभू नावे तुझी किती तुझी रुपे
सदा सर्व ठायी तिथे तू जिथे नजर जाते (धृ)
सिंधू तूच, बिंदू तूच, तूच अणूरेणू,
तूच ज्याने वृंदावनी वाजविला वेणू
जळी स्थळी पाषाणी मी तुझीच मूर्ती पाहते (१)
धरा,अग्नि वृक्ष वारे, तूच गगन तारे
तूच धरीला गिरी कराग्री, तूच ना मुरारे
दरी शिखरी तूच असशी वसशी चराचराते (२)
बाह्य जगी दिससी मजला, का न दिसे चित्ता अंतर्यामी जाणावे तुज, हीच माझी इच्छा एवढेच दीनानाथा, तुझ्या पदी मागते (३)
८९. मोबाइल
बरं झालं देवा आता मोबाईल आले ।।
चालता चालता का होईना माणसं बोलू लागले।।
बोलायला वेळ नाही हे कारण मागे पडले।।
काम करता करता आता संवाद घडू लागले।।
लॅपटॉप पीसीची मिजास आता संपली।।
बुकिंग, वेटिंग इत्यादिची भानगडच मिटली।।
चालता बोलता झटक्यात आता कामं होऊ लागली।।
स्क्रीन टच करताच आपली माणसं भेटू लागली।।
मोबाईल नव्हता तेव्हा आपण कसं बरं जगत होतो?।।
क्षणोक्षणी आपण काय मूग गिळत होतो?।।
जग आता जवळ नव्हे मुठीतआले ज्याच्यामुळे।।
सहवासाला आसुसल्यांची थोडी भूक भागते त्याच्यामुळे।।
बरं झालं देवा तू तुझे दूत पाठविले धरणीवर।। मोबाईल नावाने आम्ही त्यांना केले स्थानापन्न हृदयावर।।
९०. हरी
हरी, हरी, हरी हरीचे धरी चरण तुझ्या करी त्याचे तू स्मरण करी जे नित्य निर्विकारी (धृ)
शरणागत वत्सल तो भक्तांची सावली
सर्व साक्षी सर्वात्मक जगताची माऊली (१)
नको अहंकार कधी, सत्संगाची जडो व्याधी आसक्तीला त्यागून तू, वैराग्याची कास धरी (२)
सर्व कर्म अर्पण करी, निष्काम कामनी धरी दीनोद्धारक प्रभू तुला भवसागरी तारी (३)
९१. मी धरा
तुम्ही दिलं मी घेतलं
तुम्ही फेकल मी धरलं
तुम्ही टाकलं मी उचललं
तुम्ही उधळल मी रुजवल
तुम्ही भिरकावलं मी झेललं
हे नरा मी धरा मीच तुझा आधार खरा
आजवर तू साचवलं मी पचवल
पण यापुढे विचार कर जरा
मी फुगेन मी फुरंगटेन मी तापेन
तेव्हा म्हणशील का तू मी कसा ही वागेन?
हे मानवा तू नव्ह्वे मीच तुझा आधार खरा
मी वसुंधरा मी वसुंधरा
९२. आला श्रावण
हो आला श्रावण झुलूया आनंदाच्या हिंदोळ्यात (धृ)
चला मेंदी रेखू
चला नाहू माखू
चला भिजूया श्रावणसरीत (१)
बघा झाली वृष्टी
कशी नटली सृष्टी
रमू या तिच्या धुंद सहवासात (२)
बघू इंद्रधनू
फुलवित तनू
मन न्हाईल सप्त रंगात (३)
किती नाचू गाऊ
हर्ष कसा दाऊ
चित्त झाले फुलपाखरा गत (४)
हिरवी कंच राने
हलती डुलती पाने
जणू विहरती हर्ष सागरात (५)
९३.तू माझा भगवंत
तू माझा भगवंत
तू अनादी तू अनंत तू माझा भगवंत (धृ)
तू अक्षय तू अव्वय
तू सहाय्य तू वेद ।।
तू अक्षर तू अजर (वार्धक्यरहित)
तू अपार अव्यक्त ।।
तू अच्चुत तू अचिंत्य
तू अगोत्र स्वतंत्र ।।
तू आधार तू अमर
तू अभय तु आधेय(आधारभूत)।।
तू अक्रिय व्याप्त -व्यापक
तू अशोक असंग ।।
तू अव्यक्त तूच व्यक्त
तू द्वैत तू अद्वैत।।
तू पुराणू तू शून्य संपूर्णू
तू साकार निराकार।।
तूची स्थूल तूची सूक्ष्म
तू सर्वदा सर्वत्र ।।
तूची ज्ञाता तूची ज्ञेय
आत्मा -अनात्मा ज्ञान।।
तूच करता तू करविता
तू प्रतिपाळी तू काळ ।।
९४.पुरूष प्रकृति
पुरूष तो उत्तम
प्रकृति ती अधम
कोण ठरवते कोण जाणे
मग होतो कसा समागम?।।
उत्तम म्हणवणार्या पुरुषाने
सगळीच जागा व्यापली कणाकणाने
दिले प्रकृतीला ढकलून कोपर्यात
जरी सत्व नाही सोडले तिने ।।
अस्मिता तिने खंबीरपणे जपली
त्यासाठी खपखप खपली
क्षमा, शांती, दया, करुणा जमवून
भुईला सकस करून टाकली ।।
त्या भुईतच पुरुषाने स्वबीज पेरले
मीच मोठा समजून प्रकृतीला उघड्यावर टाकले
रक्षण पोषण करून तिने बीजाला अंकुरले
सृष्टी निर्माण करून स्वत:चे उत्तमत्व सिद्ध केले ।।
नसतीच दिली तिने योनी आपली
तर बीज कसे अंकुरेल?
पुरुष आपला मोठेपणा
कुठे कसा मिरवेल?
९५.आयुष्य
अश्रू साचूनी डोळ्यात
मन भिजवूनी जातात
चिंता काळ्या काळ्या भोर
चित्त गोठवूनी विरतात
धडधड हृदयाची पडझड देहाची
अशी येते माऽऽझ्या नशिबात ।।१।।
भयसूरी चिरते काळजाला
वासना व्यापते देहाला
हाव लालसांचे असुर
पळविती आयुष्याला
सळसळ कामनांची वळवळ रसनेची
भिरभिरते माझ्या भोवताल ।।२।।
जग जग जगतो माणूस असा
पण आयुष्याचा काय भरवसा
आज आहे उद्या नाही
देह अधांतरी कसा
तळमळ, तडफड, रडरड, चिडचिड
सर्व विरते आगीच्या पोटात (३)
९६.पुण्योदय
पुण्य पुण्य हो उदया माझे आले
श्री सद्गुरूचे दर्शन घडले, मजला श्री गुरुचे चरण दिसले (धृ)
गुरु चरणांचा महिमा वर्णाया शब्द पडती तोकडे
त्या चरणांच्या कृपा प्रसादे भाग्य उजळे केवढे
चरणामृत सेवन करुनी मी धन्य आज जाहले (१)
गुरु हे ब्रम्ह, गुरु श्री शंकर, गुरु विष्णु साक्षात गुरु रूपाने भूमी वरती अवतरले भगवंत
विषय वासना समूळ हरुनी पावन मजला केले (२)
गुरु चरणांवर मस्तक ठेऊनी त्यांना मी प्रार्थिले सेवेचा द्या नित्य लाभ मज म्हणूनी त्या विनविले
वरद हस्त मग शिरी ठेवूनी ब्रम्हभूत मज केले (३)
स्वप्नातील हा लाभ घेऊनी मंत्रमुग्ध मी जाहले सत्यातही हे घडो म्हणूनी प्रभू चरणी मी लोळले
वाट पाहते गुरु रायांची जन्मभरी नच थकले(४)
९७.तुझं देणं
दिलेस तू दोन डोळे पण दाखवलं ना तुझं रूप दृश्य जगतातील चित्र बघून मिळाले ना सुख।।
दिलेस तू दोन कान पण ऐकला ना तुझा आवाज
आर्जवले मी कितीदा दिली ना तू साद।।
दिलेस तू दोन पाय पण दाखवली ना वाट
उंच वळणाचे जीवनात किती चढले मी घाट।।
दिलेस तू दोन हात पण दिले ना त्यांना काम कसं रे तुझं देणं असा कसा राधेचा श्याम? ।।
दिलेस तू नाक त्याने घेतला किती सुवास जाणले ना मी तूच आहे माझा प्रत्येक श्वास।।
दिलेस तू मुख मला पण कधी बोलला नाहीस माझ्याशी
खाण्यासाठी वापरले मी अर्थ न दिला वाचेसी।।
आता एकच दे तू मला दुसरं काही मागणार नाही कवेत घे तू मला अन सोडव ही मोह मायेची व्याधी।।
९८.शोध
तू म्हणतोस मी सर्वत्र आहे
मग दिसत कसा नाही
तू नाहीसच म्हणावे तर
तुझे अस्तित्व सतत जाणवत राही ।।१।।
शोधले तुला सर्व दूर
चंद्र सूर्य तार्यातही
पाना फुलात तळ्यात मळ्यात
तू कुठे सापडलाच नाही ।।२।।
कुठे कुठे शोधले तुला
अगदी जळी स्थळी अन पाषाणी ही
पिंजून काढले धरती आकाश
पण गवसली नाही तुझी निशाणी ही।।३।।
का खेळतोस माझ्याशी ही लपाछपी
खेळायला संगे नाही का कुणी
काहींना तू दिसतोस म्हणे
मग माझ्याच डोळ्यात का आणतोस पाणी।।४।।
एक दिवस अचानक
आवाज ऐकला आतला
(होतास )दडलेला तू माझ्यातच
(मला एकदम सापडला )
हा ज्ञान प्रकाश फाकला
माझा गोविंद माझ्या मुखातून हसला ।।५।।
९९.आमचा भाऊ सियान
आमचा भाऊ सियान
इवलासा सुंदरसा सियान आमचा भाऊ त्याच्याबरोबर आम्ही खेळू
त्याच्या संगे नाचू गाऊ (धृ)
त्याचे मण्यापरी गोल गोल डोळे
तो लुकूलुकू पाहे चहूकडे
त्याची गोड गोड पापी घेऊ (१)
तो हसतो खट्याळ भारी,
बालकृष्णच आला घरी
त्याचे सगळे हट्ट आम्ही पुरवू (२)
भाऊबीजेला त्याला ओवाळू
रक्षाबंधनाला राखी बांधू
त्याला छान छान गोष्टी शिकवू (३)
त्याचे कौतुक वाटते भारी
दृष्टाविल बाळ, आणा मीठ मोहरी
आमच्या काजळाची तीट त्याला लाऊ (४)
आम्ही दोघी बहिणी लाडाच्या लाडाच्या सियान बाळाच्या प्रेमाच्या प्रेमाच्या
त्याचे लाड सांगुनी बाबांना, खोड्या सांगुनी आईला, त्याला मुठीत आम्ही ठेऊ (५)
१००.कवितेची कविता
कळेल का मला व्याख्या कवितेची
ती असते अभिव्यक्ती दडलेल्या भावनांची
की ती असते शृखंला सुंदर सुबक शब्दांची
ती नुसतीच धडपड तर नसेल ट ला ट अन र ला र लावण्याची
खरच काय बरं असेल कविता म्हणजे उत्तुंग कल्पना की भरारी उंच उगाच आकाशातली की ती म्हणजे छाया पडछाया संकल्प विकल्पांची
कविता म्हणजेच गाणं की गीत म्हणजेच कविता
बघा किती व्याख्या केल्या मी कवितेच्या पाहता पाहता
या व्याख्या बरोबर की चूक कोणाला विचारायचं?
त्यावर एक कविता करून सगळ्यांनाच कोड्यात टाकायचं
उत्तर सापडेल तेव्हा तुम्ही द्या ते सावकाश माझ्या मते सध्या तरी मी ठरवलंय
कविता म्हणजे भावनेच्या शब्दांना मनाच्या कागदावर लिहायचं
परिचय
सौ सुजाता सुभाष बोधनकर( सुधा पुरुषोत्तम देशपांडे) एम. एस. सी. बॉटनी
नायजेरियाच्या (वेस्ट आफ्रिका) दहा वर्षांच्या वास्तव्यात सायन्स आणि गणित अध्यापन. भारतात परतल्यावर संगणक विषयाचे अध्यापन. कुमार वयीन व तरुण वर्गासाठी गीता बोध ही भगवद्गीतेवर आधारित पुस्तिका प्रकाशित. शृंगेरीच्या शंकराचार्यांकडून संपूर्ण गीता मुखोद्गत परीक्षेत पारितोषक प्राप्त. गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी आध्यात्मिक विषयांवर विविध संस्थांमध्ये व्याख्याने.आकाशवाणीवर स्वलिखित एकांकिकांचे प्रसारण. जेष्ठ नागरिक संघाच्या पुणे संघटनेच्या नाट्यछटा स्पर्धेत सलग तीन वर्षे पारितोषिक प्राप्त. विविध विषयांवर एक तासाच्या कार्यक्रमाचे लेखन व त्यांचे सादरीकरण.
ही काव्यस्फूर्ति म्हणजे त्यांच्या स्वानंदाची अभिव्यक्ती म्हणूनच या काव्यसंग्रहाचे शीर्षक 'काव्यसुधानंद'
मायबोलीवर स्वागत आहे. छान आहे
मायबोलीवर स्वागत आहे. छान आहे कविता.
>>>>>एक माझी सख्खी आई, दुसरी
>>>>>एक माझी सख्खी आई, दुसरी गीताई
कर्मण्येवाधिकारस्तेचा तिच्यामुळे मला बोध झाला
आवडले.
सर्व कविता नाही वाचल्या पण ज्या वाचल्या त्या आवडल्या. विठ्ठलाच्या तर खासच. मिष्किल आहेत काही काही.