लाँग ड्राईव्ह ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 March, 2021 - 05:47

जरी मार्गस्थ झालेली, उदासिन वाटते आहे
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

गियर बदलत, इलाजाविण पुढ्यामधले चढण चढते
इलाजाविण नकोसे वाटणारे हे वळण वळते
धपापत अन उसासत शहर मागे टाकते आहे
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

खुल्या माळावरी बेभान वारा गाठतो जेव्हा
विचारांचा उधळला अश्व ताबा सोडतो तेव्हा
स्मृतींना शिलगवत काचा उघडते-झाकते आहे
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

कथा मी काय सांगू सांग परतीच्या प्रवासाची ?
अवेळी सूर्य कललेला, अवस्था दीन क्षितिजाची
कमालीची निरर्थकता सभोती दाटते आहे
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

सरावाने जिथे थांबायचे ती थांबली आहे
सरावाने भयानक भूकसुध्दा लागली आहे
रिकामी राहिली खुर्ची कुणाला शोधते आहे ?
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

जरी मार्गस्थ झालेली, उदासिन वाटते आहे
सुन्या वाटेवरी भरधाव गाडी धावते आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users