ना कुणी असते कुणा सांगावयाचे

Submitted by निशिकांत on 11 March, 2021 - 11:09

लोक राजे जाहले अपुल्या मनाचे
ना कुणी असते कुणा सांगावयाचे

होत असते व्हायचे ते, हे खरे पण
प्राक्तनावर सर्व का सोडावयाचे?

चांगले नकली फुलांचे भाग्य असते
भय नसे त्यांना कधी कोमेजण्याचे

गुंतले जर मखमली काव्यात सारे
प्रश्न जनतेचे कुणी उचलावयाचे?

बाप मरता धाडले डॉलर मुलाने
पिंडदानाला कुणा बसवावयाचे?

वाटते पाहून टीव्ही मालिकां की
विश्व हे झाले जणू खलनायकाचे

बंद दारे, लावले पडदे घराला
राव मी, कोणास का बोलावयाचे?

शांतता कायम स्वरूपी नांदते पण
वादळाला यायचे अन् जावयाचे

देत का नाहीस तू "निशिकांत" शिक्षा?
शिकविले पोटी गुन्हे घालावयाचे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---मंजुघोषा
लगावली-- गालगागा x ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users