लाल इश्क

Submitted by फारएण्ड on 9 March, 2021 - 00:50

"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे.
...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?"

ही मर्डर मिस्टरी आहे पण साधीसुधी नव्हे. एकतर ही साहित्यिक मिस्टरी आहे. म्हणजे लोक नॉर्मल बोलत असताना मधेच कधी एकदम साहित्यिक वाक्ये पॉपकॉर्नसारखी फट्कन फुटतील सांगता येत नाही. त्यामुळे एखादे पुस्तक वाचत असताना मधेच मोबाईल वर व्हॉट्सअ‍ॅप बघितल्यासारखे वाटते. दुसरे म्हणजे यातील सस्पेन्स फक्त खून कोणी केला याबद्दल नाही. तो फार बेसिक प्रकार झाला. मुळात खून कोणाचा झालाय याचाही एक सस्पेन्स आहे आणि तो पहिला अर्धा पाउण तास चालतो. फ्लॅशबॅक सीन मधे जे दिसतात, त्यातले चालू काळात जे कोण दिसत नाहीत त्यावरून त्याचा खून झाला हे समजून घ्यायचे. मग नंतर तो खून कोणी केला ही पुढची मिस्टरी....

मात्र संवादांमधली "लंच लागलाय " सारखी वाक्ये ऐकली, की आधी या वाक्यात जो मराठीचा डबल मर्डर केलाय तो पोलिसांनी आधी सोडवावा असे वाटते.

पहिल्याच वाक्याला खडा लागतो. पोलिस येतात. समोर एक कार पार्क केलेली आहे. "ही सुपरस्टार यश पटवर्धनची गाडी आहे" असे एक पोलिस म्हणतो. आपण अमिताभ, शाहरूख वगैरेंबद्दल कॅज्युअली बोलताना अमिताभ, शाहरूख असे त्यांचे उल्लेख करतो ना? की अरे या जाहिरातीत सुपरस्टार शाहरूख खान आहे! असे प्रत्येक वेळेस उपाधीसकट म्हणतो? इथे एकदा ठीक आहे पण नंतरही तसेच उल्लेख. कळले तुम्हाला सुपरस्टार यश पटवर्धनची आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना ओळख करून द्यायची आहे.पण एकदा झाल्यावर पुन्हा पुन्हा ते संस्थानिकांसारखे राजकारण धुरंधर, प्रजाप्रतिपालक वगैरे लावून उच्चार करायची गरज नाही.

तर ढोबळ कथा अशी, की एक नाटक कंपनी एका रिसॉर्टमधे तयारीकरता येते. त्यातील एकाचा खून होतो. तो सोडवण्याकरता पोलिस येतात. यात त्या नाटक कंपनी मधला सुपरस्टार हीरो हॉटेल मॅनेजरच्या प्रेमात पडतो. तेवढ्यात त्या मॅनेजरचा हॉटेल ओनरशी साखरपुडा होतो. मधेच कोजागिरी येते, आणि लगेच त्या सुपरस्टारचा वाढदिवसही येतो. मग आणखी दोन खून होतात. आणि प्रमुख संशयित स्वतःवरचा संशय वाढवून आणखी घोळ वाढवतात. शेवटी नक्की कशामुळे खुनी पकडला गेला त्याचा आपल्याला पत्त्ता न लागू देता त्याला पकडतात.

प्रमुख लीड यश, त्याची गर्लफ्रेण्ड श्रेया, नाटकाचे दिग्दर्शक पोतदार, इतर कलाकार म्हणजे निशा, विनय वगैरे लोक. तर रिसॉर्ट मॅनेजर जाह्नवी, रिसॉर्ट चा मालक गुरू, शेफ सनी व सीसीटीव्ही ऑपरेटर यादव. प्रमुख पोलिस अधिकारी रणदिवे, त्याची साहाय्यक नंदिनी निंबाळकर (यांचा फ्लर्टिंग्/रोमॅण्टिक धागा वास्तविक जमला होता पण बाकी घोळात तो हरवला). यश ला जाह्नवी कशी भेटते तर रिसोर्ट कडे येताना वाटेत झाड पडल्याने वाहतूक ठप्प होते म्हणून ते एका चहाच्या टपरीवर थांबतात, तेथेच ती दूध आणायला आलेली असते. पण का कोणास ठाउक छत्री ऐवजी डोक्यावर इरलं घेउन येते. मग वार्‍याने इरलं उडतं आणि दोघांची नजरानजर, बॅकग्राउण्डला एक शास्त्रीय तान ई. होते. इरल्यातून पांढरपेशा व्यक्तीने एण्ट्र्री मारल्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

या रिसॉर्टचा स्टाफ नक्की काय काम करतो माहीत नाही. बरेच लोक येणार म्हणून गावातून दूध आणायचे असते, तर मालक प्रमुख मॅनेजरला सांगतो आपण दोघेही जाऊ. आणि मुळात मालक आणि मॅनेजर दूध आणायला का जाणार? किचन स्टाफपैकी का नाही? तर तो भरवश्याचा नाही. दूध आणायला नाही पण सर्वांचा स्वयंपाक करायला चालेल. यावर मॅनेजरचे उत्तर काय, "रिसॉर्ट ओनर दूध आणायला? ऐकायला आयडियल वाटले तरी चांगले दिसणार नाही. नको सर. मी एकटीच जाइन. सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना?" आता रिसॉर्ट मालक दूध आणायला जाणार यात काय आयडियल, आणि दूध आणायला कसला विश्वास? इथे जरा तुपारे मधल्या ईशाचे संवाद आठवले.

तर त्या टपरीपासून तिला रिसॉर्टचा शॉर्टकट माहीत असल्याने ते चालत तेथून निघतात. पण गाडी तेथून जाउ शकत नाही. मग चालत जाऊ, कारण "गाडी आत्ता आलीये. प्रवास पायानेच सुरू केला होता" - असे पहिले पॉपकॉर्न फुटते. मग तडातड् अधूनमधून फुटतच राहतात अशी वाक्ये. बरेच दिवस रिसॉर्ट मधे राहायला येताना जवळ एखादी बॅग सुद्धा आणलेली नसल्याने ते तेथून तसेच मोकळ्या हाताने चालत जातात रिसॉर्टकडे . फक्त यश- सॉरी- सुपरस्टार यश पटवर्धन-चा अपवाद. तो जाह्नवीला तिने हातात धरलेल्या चार लिटर दुधासकट उचलून घेतो. कारण मधेच तिच्या पायात काच का काहीतरी घुसते.

आता तपासाचे सीन्स सुरू. ज्या सिनेमात स्वप्नील जोशी आहे हे आपल्याला माहीत आहे, त्यातील एका चौकशीच्या सीन मधे "ओनिंग द रूम" च्या आविर्भावात बसलेली व्यक्ती. तिच्याशी पोलिस इन्स्पेक्टर बोलत आहे. कॅमेरा हळुहळू गौप्यस्फोट करत असल्यासारखा त्या व्यक्तीच्या समोर येतो आणि तो दुसरातिसरा कोणी नसून स्वप्नील जोशी असतो! अजूनही तुम्हाला या सीनचा भारीपणा पोहोचला नसेल तर कॅमेरा इथे सर्रसर्र करून ते ठसवतो. यानंतर प्रत्येक फुटकळ संवादही चेकमेट स्वरूपाचा असल्यासारखी बॅकग्राउण्ड व कॅमेरा मूव्हमेण्ट आहे. "मला एकट्याला चहा प्यायला आवडत नाही"! इथे सर्रकन लाँग शॉट वरून इन्स्पेक्टरच्या चेहर्‍यावर क्लोज अप. "जोपर्यंत आरोपीचे तुम्ही गुन्हेगार सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला चहा ऑफर करू शकतो". - अरे या सीन नंतर तो इकडेतिकडे आरामात फिरतो, एक दोन गाणी गातो, नाचतो, झर्‍याकिनारी जाउन बसतो, तेथे बैलगाडीत....<स्पॉइलर असल्याने देत नाही>. म्हणजे तो या सीन मधे आरोपीही नाही. फक्त संशयित आहे.

यश व जाह्नवी हे प्रमुख संशयित आहेत हे खरे तर नंतर निष्पन्न होते, पण ते चित्रपटातील प्रमुख कलाकार असल्याने त्यांची तपासणी लगेच घेतली जाते. बाकी कलाकार दुय्यम असल्याने त्यांची नाही.

यश हा प्रमुख संशयित. का, तर तो केमिस्ट्री मधे एमएस्सी आहे. विषारी गॅस ने खून करणार्‍या व्यक्तीला केमिस्ट्री माहीत असायला हवी हे लॉजिक लावल्याने सर्व उपस्थितांचे शिक्षण कोठपर्यंत झाले आहे त्याची माहिती काढून हा शोध लावतात. तो अधूनमधून एका लायब्ररीवजा खोलीतून रिसॉर्टच्या जवळ विषारी गॅस बनवणार्‍या कंपन्या कोणत्या आहेत याची माहिती काढत असतो. तेथे बुकशेल्फमधे का कोणास ठाउक एकदम जड वैचारिक पुस्तके आहेत. An Unquiet Mind, Echo of the Battle, Criminal Law ई. पुलंचा पानवाला कॅप्स्टन वगैरेची मोकळी पाकिटे ठेवून "दुकानाचे ष्टॅण्डर" वाढवतो ते आठवले.

पुढे तपास सुरू होतो. नाटकाच्या तालमीच्या वेळा माहीत करून त्यावेळेस सगळ्या रूम्स रिकाम्या असतील तेव्हा शोध घ्यायचे पोलिस ठरवतात. अहो ते पोलिस आहेत. संशयितांची चौकशी करायला त्यांना ते खोल्यांमधे नसतानाची वेळ शोधून तोपर्यंत थांबायची गरज नाही. हा काही एखाद्या "हिर्‍याचे रहस्य" टाइप कथेतील बालचमू नाही गपचूप छडा लावायला. मधल्या काळात हाउसकीपिंग वाले बेड लावून वगैरे गेल्यावर मग हे लोक ते पुन्हा उचकटून पुरावे शोधतात. सुदैवाने हाउसकीपिंग वाले कामचुकार असल्याने कचर्‍याची बिन तशीच भरलेली असते. त्यात एक दोन गोष्टी सापडतात.

हाताचे ठसे व सीसीटीव्ही फुटेज हे दोन्ही सोडून बाकी तपास आधी केला जातो. बरेच डॉयलॉग झाल्यावर. पहिल्या दोन तीन वेळा खुनाच्या जागेतील गोष्टींची उलथापालथ हातमोजे वगैरे न घालता केली जाते. नाकात गेल्यावर दोन मिनीटात मारून टाकणार्‍या विषारी गॅस ने खून केला गेला आहे हे कळल्यावर सुद्धा प्रमुख पोलिस अधिकारी त्या गॅस च्या कंटेनरचा वास स्वतः घेउन चेक करतो. सीसीटीव्ही म्हणे फक्त तेथील ऑपरेटरच वापरू शकतो. पोलिसांच्या मदतीला लोणावळ्याजवळच्या या रिसॉर्ट मधे पुणे किंवा मुंबईहून एखादा तंत्रज्ञ मागवण्यापेक्षा नाट्यपूर्ण संवादांवरून तपास चालू ठेवण्याचा पर्याय पोलिस निवडतात. शेवटी डॉक्टर त्या ऑपरेटर ला तपासतो आणि त्याला काहीही झालेले नाही असा रिपोर्ट देतो, तेव्हा शेवटी ते त्याच्या रूम मधे शिरतात. पण तोपर्यंत त्यालाही मारलेला असतो. पण तेथेच सीडीज सापडतात. आता त्या लॅपटॉपवर चालवून फुटेज बघितले जाते. मग इतके दिवस कशाला थांबले? माहीत नाही.

मग थोड्या वेळाने निष्पन्न होते की खुन्याने सीसीटीव्ही फुटेज मधे फेरफार केला आहे. इतकेच काय एका संशयितानेही केला आहे. म्हणजे पोलिस सोडून सर्वांना सीसीटीव्ही सॉफ्टवेअर नुसते वापरता येते असे नव्हे तर त्यातले रेकॉर्डिंग एडिट ही करता येत असते. पण ते करण्यापेक्षा कोणालाही कसलेही प्रश्न विचारायचे आणि त्यांनीही खुनाशी रिलेव्हंट नसलेली अनावश्यक माहिती पुरवायची अशा प्रकारे तपास चालतो. हा एक संवादः

पोलिस जाह्नवीला: "यादवच्या खोलीत आज कोण गेलं होतं का?" हे तिला माहिती असायचे काय कारण?
जाह्नवी: "माहीत नाही"
पोलिसः "सहसा त्याच्या खोलीत कोण जातं?"
जाह्नवी: "सनी (शेफ). त्याला नाश्ता वगैरे द्यायला". - हॉटेलचा शेफ स्वतः नाश्ता नेउन देतो इतर स्टाफला.

मधेमधे तपास व सीन पुढे सरकवण्याकरता कसला तरी रिपोर्ट दुसर्‍या दिवशी येणार असे वाक्य अनेकदा येते. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच्या सीडीज सापडतात त्याचाही "रिपोर्ट उद्या येईल सर"

मधेच ही ष्टोरी एक वेगळेच वळण घेते. फ्लॅशबॅक मधे कोजागिरी येते. जिचा नुकताच साखरपुडा झाला आहे तिच्या हातावर हात ठेवून अगदी चिकटून बाहेर लॉनवर कोजागिरीचे दूध यशने ढवळणे हे सगळे पब्लिक जमलेले असताना दाखवले आहे. दोन मिनीटांपूर्वी यश बरोबर फोटो काढायला गर्दी करणारे पब्लिक तेथेच असते. आणि त्यावर तिचे वाक्य काय, तर "कोणी भलताच अर्थ काढेल". इथे मला पिक्चर पॉज करून विचारावेसे वाटले, की एक तरूण व एक तरूणी कोजागिरीला अगदी चिकटून उभे राहून दूध ढवळत आहेत या सीनचा भलताच नसलेला अर्थ कृपया सांगावा. तेथे मग दुधात चंद्राचे प्रतिबिंब, "ते ऑलरेडी दिसत आहे" वगैरे रोमॅण्टिक संवाद होतात. तो चंद्र ही एकाच रात्री पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे असतो. घटकेत अगदी डोक्यावर, तर काही मिनीटांत क्षितिजावर.

मग तेथे एक नाट्यमय सीन झाल्यावर चिडून यश तेथून कारने कोठेतरी निघून जातो. इथे अंतर व काळ यांच्या सीमा भेदणारा एक सीन आहे. आधी यश कारने पुढे गेला. त्यानंतर त्याला शोधायला श्रेया व गुरू दुसर्‍या गाडीने जातात. ते पाहून हॉटेलमधे आत असलेली जाह्नवी त्यांच्या मागोमाग चालत निघते. श्रेया व गुरू गाडीने शोधत जाता जाता "मला तर काहीच सुचत नाही" इतके वाक्य म्हणायला जितका वेळ लागेल किमान तितके अंतर तरी जाताना दाखवले आहेत. पण तरीही जेथे यश जाउन बसला आहे ते तेथे पोहोचायच्या आत जाह्नवी आधी तेथे पोहोचते. मग तेथे ते दोघे बाजूच्या बैलगाडीवर एक रोम्यांटिक सीन करेपर्यंत अजूनही पाटील व श्रेया तेथे पोहोचत नाहीत. जाह्नवीला एकूण बरेच शॉर्टकट माहीत असावेत.

हे सगळे डीटेल्स अशाकरता दाखवले आहेत की, पोलिसांना गुंगारा द्यायला यश व जाह्नवीच्या प्रत्येक स्टेटमेण्ट्स मधे किंचित फरक असतो असे दाखवायचे आहे. कारण यश म्हणे जाह्नवीला वाचवत असतो. हे दोघे दिवसात पन्नास वेळा भेटत असतात. तेव्हा एकदाही खून केल्याचे एकमेकांना विचारत नाहीत असे दिसते.

तो सीडीज् चा रिपोर्ट येतो. त्यातून असे समजते की एक सीडी खुनाच्या दिवशीची आहे. मग ती लॅपटॉप मधे टाकली जाते. त्याकरता रिपोर्टची का वाट बघितली माहीत नाही. त्यात फुटेज मधे एका ठिकाणी गॅप आहे असे निष्पन्न होते. ते कसे कळते? प्लेबॅक मधे दिसणार्‍या वेळेमधून? तुम्हाला असे वाटले असेल तर मराठी चित्रपटांचा अजून सखोल अभ्यास करण्याची तुम्हाला गरज आहे. अशा वेळाबिळा नसतात फुटेज मधे. मग ते त्या दिवसाचे आहे हे कसे कळाले? सीडीवर तारीख होती? तसे असेल तर दुसर्‍या दिवशी "रिपोर्ट" येइपर्यंत का थांबले? गंमत म्हणून तरी बघायची! तर त्यावर वेळबिळ नसते. पण एका सीन मधे दाराजवळची पाल ८-१० फूट वर असते, तर पुढच्या सीन मधे ती एकदम खाली असते. यावरून मधले फुटेज कोणीतरी खाल्ले आहे हे सिद्ध होते. नशीब ती पाल आळशी नव्हती. नाहीतर हा उलगडा झालाच नसता. 'बिगरी ते मॅट्रिक' मधे एक फुट वर जा, अर्धा फूट खाली ये करणारी ती गणितातील पाल हीच असावी.

मग इतका वेळ उघडून न बघितलेला लॉकर उघडायचे यांना आठवते. कारण "माणूस एखादी वस्तू जपून ठेवतो तेव्हा ती बॅगेत ठेवतो. आणि जर गुपितं जपून ठेवायची असतील तर ती तो लॉकर मधे ठेवतो". त्या लॉकर मधे आणखी सीडी निघतात. त्या लगेच लॅपटॉपवर बघितल्या जातात. त्यात काय निघते ते माहीत नाही पण पोलिसांना खुनी कोण आहे ते निर्विवादपणे त्यातून समजते. कसे ते माहीत नाही. कारण खुनाचा उलगडा आहे त्यातील घटना रूम्स मधे घडतात, कॉमन एरियात नाही.

सहसा अशा कथांमधल्या सस्पेन्स ची उकल होताना ती पोलिसांना, कथेतील पब्लिकला व प्रेक्षक म्हणून आपल्याला एकदमच व्हायला हवी. इथे आता पोलिसांना कळाले. पुढच्याच सीन मधे यश व त्याच्या मैत्रिणीलाही तो माहीत झालेला असतो. पण केवळ प्रेक्षकांचा सस्पेन्स ताणण्याकरता पोलिसही खुन्याबद्दल "म्हणजे ही व्यक्ती आत आली" असे लोकसत्तेच्या क्लिकबेट टायटल्स सारखे बोलतात. पोलिस इन्स्पेक्टर हवालदारांना खुन्याला पकडण्याची अर्जंट सूचना देतानाही म्हणतो "या व्यक्तीला उचला". मी तुम्हाला याचे नाव सांगू शकत नाही. कारण पब्लिकला कळेल. अजून ५ मिनीटे सस्पेन्स ठेवायचा आहे.

मग निशाच्या रूम मधे खुनी तिचाच गळा दाबतोय, ते जाह्नवीने पाहिल्यावर तिला घेउन तो आणखी तिसरीकडेच गेला आहे. मधल्या काळात निशा जाह्नवीच्या रूम मधे येउन पडली आहे. तेथे यश आल्यावर तेथे श्रेयाही धावत आली आहे. तिलाही जाह्नवी संकटात आहे हे माहीत आहे, अशा अगम्य सीन्स मधून खरा खुनी, खुनाचे कारण वगैरे सगळे समजते.

हॉटेल मधे स्टाफ आहे, पोलिस आहेत. त्यांना बोलवा वगैरे प्रकार नाही. यशने जाह्नवीला वाचवायला शोधत फिरायचे. इथेही श्रेया त्याला जायला सांगताना "तुझे कर्तव्य तुला तुझ्या प्रेमाकडे जायला सांगत आहे!" असे एक पॉपकॉर्न देउनच पाठवते.

या पिक्चरमधे अनेक गोष्टी काहीही गरज नसताना केल्या जातात. खुनी खून करून त्याच खोलीत लपून बसलेला आहे. तेथे एक मुलगी येते व किंचाळते. तिला कोण खुनी आहे, तो कोठे आहे काही माहीत नाही. तर हा उगाचच बाहेर येउन तिला धमकावतो. म्हणजे हा जेथे होता तेथेच लपून राहिला असता तर आवर्जून बाहेर येउन पुन्हा हे कोणाला सांगू नकोस म्हणून धमकावत बसण्याची गरजच नव्हती. नंतर त्याने खून केलेला आहे हे किमान ४-५ जणांना व इव्हन पोलिसांना कळल्यावरही तो उगाच इतरांना मारायचा प्रयत्न करत बसतो. यश व जाह्नवी यांच्यामधे विविध ठिकाणी जे काही झाले त्यातले खाजगी डीटेल न देताही चालले असते. म्हणजे हे दोघे झर्‍याकाठी काही काळ होते हे पुरेसे आहे. त्यांनी तेथे बैलगाडीत काय केले हे त्या केसशी अजिबात रिलेव्हट नसते. पण केसची नसली तरी कहानी की माँग पूर्ण केली जाते.

यशच्या प्रेमात पडत असताना जाह्नवी हॉटेल मालकाने प्रपोज केल्यावर साखरपुडा करून मोकळी होते. कारण तर यशबरोबरचे नाते मला चुकीच्या मार्गावर नेणार होते. कसला चुकीचा मार्ग? दोघेही सिंगल होते की तेव्हा. पण त्यामुळे तिला "या नात्याला नाव नाही", "या नात्याला आस्तित्त्व नाही" वगैरे वाक्ये म्हणता येतात. त्या साखरपुड्याची अनाउन्समेण्ट अफलातून आहे. गुरू व जाह्नवी दोघे यश व इतर लोकांपुढे येउन सांगत नाहीत. आधी गुरू येउन पेढे वगैरे देताना सांगतो की त्याचा साखरपुडा झाला. मग हे विचारतात कोण ती भाग्यवान मुलगी? मग भिंतीमागून जाह्नवी पुढे येते. ती काय तेथे भिंतीआड लपून बसली होती का काय कोणास ठाउक.

स्क्रिप्ट मधे नाट्यपूर्ण संवाद लिहीले आहेत ते लागू होण्याइतके त्या पात्रांच्या जीवनात काही होत नाही. "आयुष्याचे स्ट्रगल एका सेकंदात संपवणारा शॉर्टकट, तो शॉर्टकट इथपर्यंत घेउन येइल असं नव्हतं वाटलं मला" असे शेवटच्या सिक्वेन्स मधे निशा गंभीरतेने म्हणते. पण तिने तो शॉर्टकट घेतलेला सीन व ज्यात ती हा संवाद म्हणते तो सीन, यामधे तिने इतके काही म्हणावे असे काहीच दाखवलेले नाही.

आणि या सगळ्यात लाल काय आणि इश्क काय, ते ही समजले नाही. ती मिस्टरी कोणाला इण्ट्रेस्ट असेल त्यांनी सोडवावी. अ‍ॅमेझॉन प्राइमवर आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol खतरनाक आहे अ नि अ परीक्षण लाल इश्कचे.

आणि या सगळ्यात लाल काय आणि इश्क काय, ते ही समजले नाही. ती मिस्टरी कोणाला इण्ट्रेस्ट असेल त्यांनी सोडवावी.<<<<<
मर्डर मिस्ट्री प्रेमकथा असल्याने लाल इश्क असेल नाव! एवढा अचाटपणा असल्याने खरेतर सिनेमाचे नाव 'लोल(lol) इश्क' ठेवायला हवे.

सुसंगत नाही चित्रपटासारखे, ज्याने बघितला असेल त्याला आणि त्यालाच काय ते कन्फयुजन होईल बाकी ज्याने नाही बघितला त्याला काहीच कळणार नाही अगदी माझ्या सारखे ।

सुसंगत नाही चित्रपटासारखे, ज्याने बघितला असेल त्याला आणि त्यालाच काय ते कन्फयुजन होईल बाकी ज्याने नाही बघितला त्याला काहीच कळणार नाही अगदी माझ्या सारखे ।
+१११११

Lol

मस्त फा!
पोलिसही खुन्याबद्दल "म्हणजे ही व्यक्ती आत आली" असे लोकसत्तेच्या क्लिकबेट टायटल्स सारखे... हे खूपच छान!
इतका संताप येतो त्या टायटल्सचा!
ही सुपरस्टार यश पटवर्धनची गाडी आहे..., हा पूर्ण पॅराच लोल अगदी Biggrin
सहसा अशा कथांमधल्या सस्पेन्स ची उकल होताना ती पोलिसांना, कथेतील पब्लिकला व प्रेक्षक म्हणून आपल्याला एकदमच व्हायला हवी...ही अपेक्षा खूपच विनोदी आहे!

भयंकर आहे
☺️☺️
आता चित्रपट बघायलाच लागणार आहे.
अजून माझ्या डोक्यात हिंदी लाल कप्तान चा धक्का आहे त्यावर आता मराठी लाल ईशक चा स्लॅब दणकन पडणार.

Lol
फारएण्ड/ श्रद्धा/ अनु किंवा तत्सम , एकदा 'वजनदार' हा मराठी चित्रपट बघून त्यावर लिहा ना! इतका असंबद्ध नसला तरी महा बटबटीत आणि अतार्किक आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर आहे. >>> किती दिवस मी बघून , दूर्लक्ष करून , स्क्रोल करत पुढे जात होते , आता नक्की बघणार . Happy

आता बघू कि नको? Lol
थोडक्यात, संवाद तेलुगूत असते आणि सबटायटल्स मल्याळम मध्ये असते तरी आनंदात काही फरक पडला नसता. Proud
जबरदस्त पिसं काढली आहेत. डीपी अचूक आहे.

आणि या सगळ्यात लाल काय आणि इश्क काय, ते ही समजले नाही. ती मिस्टरी कोणाला इण्ट्रेस्ट असेल त्यांनी सोडवावी.<<<<<
मर्डर मिस्ट्री प्रेमकथा असल्याने लाल इश्क असेल नाव! एवढा अचाटपणा असल्याने खरेतर सिनेमाचे नाव 'लोल(lol) इश्क' ठेवायला हवे. >>> Biggrin श्र

एक नंबर!!! हा लेख वाचण्यासाठी आजच हा चित्रपट बघून (कसाबसा) संपवला.

"म्हणजे ही व्यक्ती आत आली" असे लोकसत्तेच्या क्लिकबेट टायटल्स सारखे >> अगदी अगदी!

त्या दूध आणायला एकटी जाते वाल्या प्रसंगात ती म्हणते माझ्यावर विश्वास आज ना, आणि तो गुरू म्हणतो स्वतःपेक्षा ही जास्त. हे अगदी 'भरोसा है? खुद से ज्यादा' चं शब्दशः चिझी, किंवा इथे 'दुधाळ' भाषांतर झालं.

सुरुवातीला यश आणि जान्हवी दोघांच्या जबानीतून तेच तेच फ्लॅशबॅक दोनदा बघायला लागत होते, तेव्हा वैतागलो होतो. पुढे ते चांद मातला गाणं आलं आणि वाटलं हे पण दोनदा बघायला लागणार की काय च्यायला! पण त्या पोलिसीणीने जान्हवीच्या जबानीत हा भाग स्वतःच पाढे म्हटल्यासारखा घडाघडा बोलून दाखवला आणि जान्हवीचा तेच गाणं ऐकवायचा चान्स गेला, आणि एकदाचा मी सुटलो.

Lol लई भारी! बघाय्ला हवा आता प्राइम वर. स्वप्निल जोशीच्या सिनेमाची नेहमी अशी लाल इश्क, तू हि रे, मितवा असली हिंदाळलेली का टायटल्स असतात काही कळत नाही.
इरल्यातून दूध आणायला, रिपोर्ट उद्या येईल , साहित्यिक वाक्यं, गणीतातली पाल सगळेच Rofl

मीही बघायला सुरुवात केली हा लोल इश्क. (त्यांचे चारदोन व्ह्यूज वाढण्याचे क्रेडिट या लेखालाच!) दूध आणण्यासारख्या गोष्टीला इतका विश्वास का लागतो, देव जाणे? शिवाय नक्की कोण मेले आहे, हेच गुलदस्त्यात ठेवणे फारच युनिक आहे. Proud पण व्हिक्टिमच्या खोलीत पोलीस बॅग उचकटतात तेव्हा कपडे दिसतात. आता ती व्हिक्टिमचीच बॅग का ते कळायचेय अजून.

शिवाय नक्की कोण मेले आहे, हेच गुलदस्त्यात ठेवणे फारच युनिक आहे. >>> हे खरंच शेवटपर्यंत कळत नाही? कमाल आहे! Rofl

सिक्वेल येणार असेल. त्यात कळवणार असतील.

फारेंड असल्या पांचट सिनेमाचे सुंदर परिक्षण लिहितात आणी मग इतरांना तो शोधून पूर्ण बघावा लागतो. भारताच्या जी डीपी मध्ये फारेंड यांचा -०.०१% वाटा आहे.

जबरी लिहीलंय, फा! Lol मी हा पिक्चर अगदीच बेकार कॉपी मिळालेली असताना पाहिला होता. बर्‍यापैकी धूसर दिसत होतं अधूनमधून. आता लक्षात येतंय की पिक्चर, कथा सगळंच धूसरच आहे एकूण Proud

लोल(lol) इश्क >>> श्र Rofl अगदी अगदी!

झकास रे फा!!! सिनेमा बघायचा प्रश्नच उद्भवत नाही पण हे परिक्षण मात्र स्ट्रेस बस्टर असल्यामुळे बूकमार्क करतोय.

अनु, इश्क लिहिण्यासाठी ishq स्पेलिंग लिही. मी आधी ishk लिहिले तर पहिल्यांदा ऑटोकरेक्टने 'इष्क' केले त्याचे, मग ईशक...

मध्यंतराआधी कळते कोण आहे विकटीम ते! अर्थात उचकलेल्या बॅगेवरून बांधलेला अंदाज बरोबर आला.
रूम्स उचकटून झाल्यावर, कचऱ्याच्या डब्यात हात घालून झाल्यावर कधीतरी दोन्ही पोलिसांना जाणवते की आता सगळीकडे आपलेच फिंगरप्रिन्ट्स सापडत आहेत, आता तरी ग्लव्ह्ज घालूया, सीआयडीत नाही का तसेच करतात? मग त्यांच्या या दक्षतेचे बक्षीस म्हणून त्यांना लगेच एक लाशसुद्धा सापडते.

यश म्हणतो 'प्रेम असंच असतं रणदिवे साहेब, तुम्हांला नाही कळणार' तेव्हा ती पोलिसीण बाई नंदिनी साहेबांकडे बघून अर्थपूर्ण स्मितहास्य करत असल्यासारखे वाटते.

ओह ओके Happy
मी त्या इश्क मध्ये जास्त वेळ नाही घालवला
समोर (ह्रितिक सारखे) कोणी हुस्न नसल्याने असेल.आता हा हुस्न शब्द पण गुगल शहाण्याने सरळपणे लिहू नाही दिला.
आधी हु केलं.मग स्नान केलं.मग स्नान च स्न केलं Happy वाटेवर काटेच काटे(आम्ही त्यांच्या मतदार संघात राहतो म्हणून असेल.)

या चित्रपटात स्वप्नील जोशी आहे असा इशारा पहिल्या ओळीत दिला असतात तर लेख वाचण्याचे आणि चित्रपट बघण्याचे दोन्ही कष्ट वाचले असते

मस्त नेहमीप्रमाणे. पाल Lol
बाकी असा मराठी सिनेमा आहे ते लेखामुळे कळलं. हिरविणी कोण आहेत? बघण्याची शक्यता शून्य आहे म्हणा.

भारी लिहीलंय Lol

पण स्वप्निल जोशी म्हणजे डोळ्यात बदाम बदाम बदाम... मग लॉजिक्क गेले तेल लावत.. Happy

Pages