का मिळेना भाकरी?

Submitted by निशिकांत on 7 March, 2021 - 11:03

ऐकले नाही कधीही भूक असते लाजरी
गाळलेला घाम पुसतो, "का मिळेना भाकरी"?

राहते जिथल्या तिथे जनता बिचारी नेहमी
फायदा नसतो प्रजेला कोणत्या सत्तांतरी

राव लोकांनो नका गरिबास हिणवू एवढे!
झोप त्यांची गाढ इतकी, रात्र होते साजरी

ढोसता का कैक प्याले तोल जाण्या यार हो!
प्यायची तर एवढी प्या, फक्त यावी तरतरी

मिरवणे शेखी उगाचच, रीत आहे आपुली
सांगतो मीही पुण्याचा, पण रहाया धायरी

फाटक्या, विटक्याच जिन का वापराया लागलो?
हरवली साडी नि काठावर असे जी कोयरी

राहते खात्यात शिल्लक पूर्ण वेतन दरमहा
प्रश्न, घरचा खर्च निघतो, कोठुनी वरच्यावरी?

संत जे सांगून गेले, पाळते का ते कुणी?
वाचती नुसतीच गाथा, तर कधी ज्ञानेश्वरी

तू लिही "निशिकांत" गझला हिरवळीच्या एवढ्या
ना कळो वय वाचकांना, संपलेली सत्तरी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---देवप्रिया
लगावली---गालगागा X ३ + गालगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users