हेल्लारो - गुजराती चित्रपट - परिचय आणि रसास्वाद महिला दिन विशेष

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 7 March, 2021 - 02:27

हेल्लारो ( उद्रेक )
To be liberated woman must feel free to be herself, not in rivalry to man but in the context of her own capacity and her personality ----- Indira Gandhi

हेल्लारो गुजराती भाषेतील एक संपूर्णपणे वेगळी कथा असणारा २०१९ सालचा दिग्दर्शक अभिषेक शहा यांचा पहिलाच चित्रपट. ६६ व्या NATIONAL FILM AWARD महोत्सवात बेस्ट फिचर फिल्म म्हणून या चित्रपटास पारितोषक मिळाले होते. विशेष म्हणजे मागील चाळीस वर्षात हेल्लारो च्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान गुजरातच्या वाट्याला पहिल्यांदाच मिळाला हि विशेष कौतुकाची बाब.

“ हेल्लारो” हा पुरातन गुजराती भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे पाण्याच्या प्रवाहातील उसळती लाट. हेल्लारोची कथा अशीच एका हादरवून टाकणाऱ्या सामाजिक बदलाच्या लाटेची आहे. हि कथा आहे स्त्री वर होत असणार्या अन्यायाची, तिच्या मनात घोंगावणाऱ्या वादळाची जे व्यक्त होत नाही, हि कथा आहे गावातील अंधश्रद्धेची आणि त्याचबरोबर पुरुष अहंकाराची.

१९७५ साली गुजरात राज्यातील कच्छमध्ये घडणारी हि कथा आहे. चित्रपट निर्मिती साठी कच्छच्या रणामध्ये वाळवंटाच्या मध्यभागात एक गाव उभे केले गेले. १९७५ च्या काळात हे गाव बाह्य जगाशी असे तुटले आहे कि त्याचा बाह्य जगाशी कोणताच संबध येत नाही. हि कथा १९७५ सालच्या काळातच का घडते हा प्रश्न प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहत नाही. अभिषेक शहा यांना असे एखादे गाव दाखवायचे होते ज्या गावाचा बाह्य जगाशी संबध नाही. आजच्या काळात अशा पद्धतीने ते गाव दाखवणे निश्चितच शक्य नाही.

या गावातील स्त्री उपेक्षित आहे, तिच्यावर अन्याय होतो आहेच पण त्या गावावर निसर्गाने सुद्धा असाच अन्याय केला आहे. कारण गावात तीन वर्षे पाउस पडत नाही..पावसाचे संकट दूर व्हावे म्हणून सर्व पुरुष देवीला प्रार्थना करत असतात आणि आपली श्रद्धा गरबा नृत्याच्या द्वारे व्यक्त करतात. पण या श्रद्धेचे कारण सुद्धा अंध्श्रधेत आहे. त्या गावात असणारी मुळी नावाची विधवा स्त्री पूर्वी विणकाम करत असे, तिच्यावर त्या गावात येणारा कानो नावाचा तरुण फिदा झाला. आणि एक दिवस ती कानो बरोबर पळून गेली. गावातील लोकांनी आपल्या घरातील विणकाम आगीमध्ये जाळून टाकले. पण त्या दिवसापासून गावात पाउस पडेनासा झाला. गावाने नियम केला येथून पुढे कुणीही विणकाम करायचे नाही. कुणी फकिराने सांगितले जोपर्यत मुळी आणि कानोचा बळी देण्यात येत नाही तोपर्यत गावात पाउस पडणार नाही. शेवटी त्या दोघांना हुडकून काढतात आणि देवीला बळी चढवतात. पाउस पडावा म्हणू गावाचे लोक काहीही करण्यास तयार आहेत इतके हे गाव मागासले आहे. पण या लोकांचा किंबहुना गुजरात राज्यात गरबा नृत्य प्रकार विशेष श्रद्धेचा भाग आहे.

चित्रपटाच्या सुरवातीलाच गरबाचे अप्रतिम नृत्य दाखावेले आहे. देवळाजवळील मोकळा परिसर आणि आजूबाजूला पुंजक्या पुंजक्याने विखुरलेली घरे. गरबाच्या तालावर सर्व पुरुष तल्लीन होऊन नाचत आहेत आणि देवीला प्रार्थना करत आहेत “ या जगात शांतता नांदू दे. तुझा कृपाआशीर्वाद असाच आमच्यावर राहू दे” गरबाचे हे अप्रतिम नृत्य चालू असताना स्वाभाविकपणे घरात दडून राहिलेल्या स्त्रिया आपल्या हातांनी ठेका धरत आहेत. त्यांना नाचण्याची इच्छा आहे. पण त्या नाचू शकत नाहीत. नाच चालू असताना एका घरातील छोटी मुलगी आपल्या आईला विचारते, “ आई, आपण का गरबा करू शकत नाही? तुला कधी गरबा करावासा वाटला नाही? “ मांडीवर झोपलेल्या मुलीला आई प्रेमाने थोपटून तिच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा गाण्यातले शेवटचे कडवे आपल्याला ऐकू येते. “ मनातल्या भावनांना म्यान कर. तुझ्या पायातील पैजण तसेच राहू देत. त्या देवीस प्रार्थना कर हि रात्र स्वप्न विरहित राहू देत” स्त्रियांना स्वप्ने बघण्याचा अधिकार नाही. आजूबाजूच्या घरातील दिवे हळूहळू मालवले जातात. जीवनात कोणतीच आशा नसल्याचे हे प्रतिक. पण जेव्हा घरातील दिवे मालवले आहेत त्यावेळी घराबाहेरच्या परिसरात दिव्यांचा झगमगाट आणि जल्लोष. स्त्री आणि पुरुष यांच्या विचारात, संस्कृतीत फरक दाखवणारा हा प्रसंग आहे.

अशा या मागासलेल्या गावात अर्जन नावच्या मुलाशी मंजरी या मुलीचे लग्न होते. मंजरी शहरातून आलेली आहे. इयत्ता सातवी पर्यंत शिकलेली आहे. वास्तविक सातवी म्हणजे फार शिक्षण आहे असे नाही पण त्या गावच्या मानाने हे शिक्षण उच्च मानले जाते.मंजरी बद्दल त्या गावातील बायकांना मात्र खंत आहे, तिचे सर्व शिक्षण आता चुलीत जाणार, यामुळे सर्व बायका हळहळ व्यक्त करत असतात. कारण त्यांना माहित आहे स्त्री शहरातील किवा खेड्यातील असे काहीच नसते, स्त्री फक्त तिच्या नवर्याची असते. गावातील बायकाना जरी असे वाटत असले तरी मंजरीचे भिन्न स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्याला नेहमी लक्षात येते.

गावातील बायकांना फक्त पाणी आणायला जाणे इतकाच विरंगुळा आहे. या निमित्ताने सर्व बायका एकत्र भेटतात आणि एकमेकापाशी मन मोकळे करतात. पण त्या दिवशी त्या गावात एक वेगळी घटना घडते ज्याने त्यांचे आयुष्य बदलून जाते. जेव्हा सर्व बायका पाणी आणन्यासाठी गेल्या असतात तेव्हा एक इसम कोपर्यात कुठेतरी पडलेला असतो. तहानेने तो व्याकूळ झालेला आहे. पण परपुरुषाशी बोलणे हे पाप आहे. पण तहानेने व्याकूळ झालेल्या त्या पुरुषाला मंजरी सर्व बायकांचा विरोध पत्करून पाणी देते. तो व्याकूळ इसम ढोली आहे. पाण्याने जेव्हा तो तजेलदार होतो तेव्हा हातातील ढोल वाजवन्यास सुरवात करतो. ढोलच्या तालावर मंजरी नाचण्यास सुरवात करते आणि तिच्या पाठोपाठ सर्वच बायका नाचू लागतात. पण त्यातील काही बायकांना भीती वाटू लागते आता देवीचा कोप होईल आणि अघटीत काहीतरी होईल. पण दुसर्या दिवसापासून पाणी आणणे जाणे आणि बेधुंद नाचणे हा जणू काही प्रघातच होतो.

पण एक दिवस हंसा नावाच्या एका गरोदर स्त्रीचे मुल जन्माला येण्याआधीच मरते. सर्व बायकांच्या मनात आहे त्यांनी गरबा नृत्य केले म्हणून देवीचा कोप झाला. मंजरी हंसाला सर्व प्रामाणिकपणे सांगते. जर चूक असेल तर तिची आहे याची कबुली सुद्धा देते. पण हंसा सांगते तिचा नवरा तिला बेदम मारायचा. ज्या दिवशी ती बाळंत झाली त्या दिवशी तिच्या नवर्याने तिला मारली आणि ती पडली. परिणामी तीचे बाळ गेले. गावातील अंधश्रद्धेचे हे आणखी एक उदाहरण.
ढोली त्याचे नाव आहे मुलजी ( जयेश ) हे या चित्रपटातील आणखी एक महत्वाची भूमिका. मुलजी त्याच्या गावात ढोलीच असतो. पण त्याने ढोल इतरांच्यासाठी वाजवायचा आहे. त्याच्या तालावर इतर लोक नाचतील पण त्याची निष्पाप मुलगी मात्र नाचू शकणार नाही कारण ती मुलगी आहे. एक दिवस होळीच्या दिवशी पूजा झाल्यावर संपूर्ण गावात जेव्हा शांतात असते तेव्हा आपल्या मुलीचा बालहट्ट तो नाईलाज म्हणून पूर्ण करतो. गावातील कुणीतरी हे पाहते. निष्पाप मुलगी रेवा त्याची बायको मंगला आणि ढोल वाजवणारा मुलजी हे चित्र तो इतर गावकर्याना सांगतो. एक मुलगी नाचते !! संतप्त गावकरी त्याच्या घराला आग लावतात. थोड्या वेळापूर्वी ज्यांनी होळीत पापाचा नाश होऊ दे अशी प्रार्थान केली असते ते संपूर्ण घराला आग लावून एका निष्पाप कुटुंबाला आग लावतात. आणि त्यात मुलजी वाचतो पण त्याची बायको आणि मुलगी मरण पावते. भटकत भटकत तो या वाळवंटात येऊन पडला आहे. पण इथे सुद्धा त्याला आता राहवत नाही. म्हणून सर्व बायका त्याला आपल्या गावात राहण्याचा प्रस्ताव मांडतात. ढोलकि वाजवल्यावर सर्व पुरुष त्याच्यावर खुश होऊन गावात त्याला प्रवेश देणे अशक्य नसते.
मुलजीला गावात प्रवेश मिळतो आणि सकाळी त्याने सर्व स्त्रिया पाणी आणन्यासाठी गेल्या असतात तेव्हा त्यांच्यासाठी ढोल वाजवणे आणि संध्याकाळी पुरुषासाठी हा प्रघात पडतो. पण हे चोरून चाललेले कृत्य सर्व गावकर्यांच्या एक दिवस लक्षात येते.
रात्रीची वेळ. ढोलीला मध्ये बांधून ठेवले आहे. आणि आजूबाजूला विखुरलेली घरे. त्यात बायकांचे चित्कार आपल्याला ऐकू येत्तात. अमानुषपणे पुरुष त्यांना मारत आहेत. कारण एकच त्यांनी गरबा केला आणि स्त्रियांनी नाचणे हे पाप आहे. शेवटी देवीच्या उत्सावादिवाशी त्याचा बळी द्यायचे ठरते.
गावाचा प्रमुख हातात तालावर घेऊन उभा आहे आणि मध्ये मुलजी. त्याला शेवटची इच्छा विचारतात आणि मुलजी सांगतो “ मला जिवंत जाळा” कारण त्याची बायको आणि मुलगी अशीच गेलेली असते. मरायचे तर आहेच पण शेवटची इच्छा? तो सांगतो “ मला ढोल फाटेपर्यत वाजवू दे. एकदाच शेवटचे” आणि त्याची इच्छा गावकरी पूर्ण करतात.
मुलजी हातात घेऊन ढोल वाजवतो तेव्हा त्याच्या तालावर एकेक स्त्री बाहेर येते. आणि त्या तालावर नाचू लागते. सोबत अर्थपूर्ण गाणे “ मी आता माझ्या संपूर्ण मर्यादा ओलांडलेल्या आहेत. तुम्ही दिलेले संकटांचे, अडथळ्यांचे डोंगर पार केले आहेत आता मी अपमान आणि दु:ख सहन करणार नाही. मी घाबरणार नाही.” सर्व स्त्रिया तल्लीन होऊन नाचत आहेत, त्यांच्या मनातील उद्रेक बाहेर पडत आहे आणि त्याच वेळेला पाउस पडतो. आणि चित्रपट संपतो.
या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला दिग्दर्शकाने अप्रतीम रित्या खुलवले आहे आणि त्याचमुळे हा चित्रपट अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारा आहे. चित्रपट अर्थातच स्त्री प्रधान आहे. कथेची नायिका आहे मंजरी. ती स्वभावाने बंडखोर आहे. ज्या दिवशी मंजरी पाणी आणण्यासाठी जाते त्यावेळी विधवा केसर तिथेच आली आहे. एका विधवेशी बोलणे हे पाप आहे. तरीही मंजरी तिच्याशी बोलते. कारण मंजरी बंडखोर आहे. नियम गावातील पुरुषांचा आहे आणि खेळ त्यांचाच. स्त्रिया मात्र या खेळाच्या बळी आहेत याची तिला जाणीव आहे.
मंजरी स्वभावाने तितकीच प्रेमळ आहे. गावातील गरोदर बाईला जेव्हा कुणी पाणी आणून देते तेव्हा त्या बाईला ती सहज मदत करतेच पण घरातील वृद्ध सासरे जेव्हा रात्रभर खोकत असतात तेव्हा त्यांना दुसर्या दिवशी त्यांना काढा करून देण्याचे कामही ती करत असते.
पण तितकीच ती विचारी सुद्धा आहे. गरबा करणे हे जर पाप असेल तर देवी शिक्षा गरबा ज्यांनी केला त्याला देईल. ती एकाची शिक्षा दुसर्याला का देईल? देवी एकच आहे आणि ती नेहमी आपल्या बरोबर असते. मंजरीची भूमिका साकारली आहे श्रद्धा या अभिनेत्रीने.
पण या चित्रपटातील नृत्य केवळ नेत्रसुख देणारी नाहीत तर स्त्रियांच्या मनातील विचार व्यक्त करणारी आहेत. पहिल्या नृत्यात मनातील स्वप्न दाबून ठेव हे सांगणारे नृत्य आणि त्यावेळी निराश होऊन बसणाऱ्या स्त्रीया जेव्हा शेवटच्या नृत्यात आम्ही आता घाबरत नाही. आणि सर्व कक्षा आम्ही पार केल्या आहेत हे भाव व्यक्त करतात. दोन परीस्थितला हा फरक आहे.
चित्रपटाचे साल आहे १९७५. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची हि पहिली तरुण पिढी. यावर बुरसटलेल्या विचारांचा प्रभाव असू शकतो. पण तो काळ आता राहिला नाही. स्त्री कित्येक योजने पुढे गेली, प्रत्येक क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला हे नि:संशय खरे आहे. तरीही विचार मनात येतोच असे असले तरीही अजुनी काही ठिकाणी हुंडा बळी का जातात ? मुलींच्यावर अमानुष बलात्कार का होतात? स्त्री पुढे गेली हे खरे आहे पण ती खरच निर्भय झाली का? एक गोष्ट नक्की आहे सर्व बंधने झुगारून देऊन वर्षानुवर्षे मनात असणारी संतापाची लाट, उद्रेक आता निर्भय पणे व्यक्त होत आहे.. एक दिवस असा येईलच जेव्हा सर्व भयमुक्त झाले असेल.शेवटी सुरेश भटांच्या दोन ओळी आठवतात “ हे असे असले तरी हे असे होणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही

सतीश गजानन कुलकर्णी
९९६०७९ ६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे
पिक्चर अश्या कथेचा असल्याने कदाचित पाहवणार नाही, पण तुम्ही छान लिहिलंय.पिक्चर चा आशय चांगला आहे.

छान लिहीलयत, हे वाचताना मला निलुदा नी लिंक दिलेलं गाणंच आलं डोळ्यासमोर. WA वर बघितलाय गाण्याचा व्हिडिओ. पण पूर्ण पिक्चर मलाही बघवणार नाही. मी अनु +१