अरबस्तानचा इतिहास - समारोप

Submitted by Theurbannomad on 22 February, 2021 - 16:47

अरबस्तानच्या वाळवंटात घडलेल्या घटनांचा हा गोषवारा जितका रंजक आहे, तितकाच वैविध्यपूर्ण. या भागातली संस्कृती इतर जगापेक्षा निराळी. जगातल्या तीन प्रमुख धर्मांचा उगम झालेली ही भूमी गेल्या हजारो वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरांतून गेली असल्यामुळे येथे इतिहासाला कलाटणी देणाऱ्या असंख्य घटना घडून गेल्या आहेत. या भूमीतून जसे ओसामा बिन लादेन निपजले, तसेच राजे फैसलही. इथल्या अरबांमध्ये एका बाजूला कट्टर इस्लामी विचारांना कवटाळून राहिलेले मूलतत्त्ववादी आहेत, तसेच दुसरीकडे जगाला ' गज़ल ' या काव्यप्रकाराची देणगी देणारे कलेचे भोक्तेही आहेत. रखरखीत वाळवंटाच्या कुशीत तग धरून राहिलेले अरब जितके रांगडे, तितकेच दिलखुलास. वेळप्रसंगी सत्तेसाठी आपल्या भावंडांचाही जीव घेणारे अरब एखाद्यावर जीव लावला तर तो प्राणापणाने जपतातही. या भूमीत मेसोपोटेमिया, पर्शिया, इजिप्त या अतिशय प्रगत आणि वाहाबी विचारांच्या मूलतत्त्ववादी अशा दोन टोकांच्या संस्कृती जन्माला आल्या.अरबस्तानच्या वातावरणासारखीच इथल्या माणसांच्या स्वभावाची दोन टोकं. इथे एकीकडे आलिशान गाड्यांमधून फिरणारे राजघराण्यातले अरब दुसरीकडे वाळवंटात तंबू ठोकून गप्पाटप्पा मारतानाही दिसू शकतात. महागड्या सुटाबुटांमध्ये जग फिरणारे अरब रमझानसारख्या पवित्र काळात आपल्या पारंपरिक वेशभूषेत दिवसभर अन्नपाण्याविनाही राहतात. घोडे, उंट अशा प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे अरब दुसरीकडे हिंसक होऊन आपल्या विरोधी गटातल्या माणसांना निर्दयीपणे मारूही शकतात. एकंदरीतच विलक्षण विरोधाभासाने भरलेलं आणि भारलेलं हे अरब जग म्हणावं तर विलक्षणही आहे आणि म्हणावं तर एकसुरी.
अरेबियन नाईट्स, इसापनीती आणि कुराण यापलीकडेही अरब जगतात खूप काही आहे. अठराव्या शतकातला आणि लिओनार्डो द विन्चीनंतरचा सर्वगुणसंपन्न मनुष्य म्हणून ज्याला जग ओळखत, तो सर रिचर्ड बर्टन या अरबस्तानच्या प्रेमात का पडला, हे समजण्यासाठी या जगताच्या अंतरंगात डोकावून पाहावं लागतं. भारतीय उपखंडात , युरोपमध्ये आणि चीन-जपानसारख्या देशांमध्ये असलेली निसर्गाची विविधता या अरबस्तानला फारशी मिळाली नाही. युरोपमध्ये घडून आलेल्या रेनेसाँससारख्या स्थित्यंतरातून हा भाग कधी गेलाच नाही. अमेरिका, भारत अथवा इंग्लंडसारखी या भागात लोकशाही मूळ धरू शकली नाही. रशियाच्या बाजूलाच असूनही इथे साम्यवादानेही बस्तान बसवलं नाही. इथे वर्षानुवर्षं कायम राहिलेली एकमेव गोष्ट म्हणजे ' संघर्ष '. त्याच्या जोडीला विश्वासघात आणि कारस्थानांचीही देणगी या भागाला ईश्वराने भरभरून दिलेली आहे. अगदी इव्ह आणि ऍडमपासून या भागाच्या इतिहासात हे पदोनपदी दिसून येतं आणि तरीही इथला इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. युरोपियन महासत्तांना या अरबस्तानने नुसतं थोपवलंच नाही, तर अनेकदा युरोपमध्ये शिरकावही करून दाखवला आहे. इथले लोक जसे पट्ट्टीचे दर्यावर्दी आहेत , तसेच केवळ आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या साहाय्याने योग्य दिशेला मार्गक्रमण करणारे कुशल वाटाडेही आहेत. रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, अंकगणित अशा अनेक शास्त्रात हे अरब निपुण मानले जातात. इजिप्त, पर्शिया आणि मेसोपोटेमियाच्या संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी या संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे अनेक दाखले दिले आहेत.
अरबस्तानच्या प्रदेशात भटकंती करताना, इथल्या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताना आणि त्यांच्या तोंडूनच त्याचा इतिहास - भूगोल समजून घेताना मला त्यांच्यातला प्रखर राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान प्रकर्षाने जाणवला. पेट्रोडॉलरच्या जोरावर इथल्या लोकांनी मागच्या शंभर वर्षात प्रचंड उत्कर्ष करून घेतलेला असला, तरी अजूनही इथे शाबूत असलेल्या राजेशाही समाजव्यवस्थेचा मागोवा घेताना मला शाळेत शिकलेल्या समाजशास्त्राच्या विषयाचा नव्याने परिचय झाला. दुबईसारख्या खऱ्या अर्थाने ' वैश्विक ' शहरात राहायला मिळाल्यामुळे काही तुरळक नियमांचा अपवाद सोडल्यास राहणीमानाचं स्वातंत्र्य मी भरभरून उपभोगलं असलं, तरी कामानिमित्त इतर अरब देशांमध्ये गेल्यावर तिथले निर्बंधही अनुभवले आहेत. रमझानच्या महिन्यात लहान वयाच्या मुलांपासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत सगळे जण निर्जळी उपवास धरताना बघितले आहेत आणि रोजा सोडताना माझ्या धर्माचा, जातीचा अथवा नागरिकतेचा विचार न करता मला आपल्याबरोबर भोजनात अगत्याने सामील करून घेणारे अरबी सुहृदही मी अनुभवले आहेत. मायभूमीशी जोडलेली नाळ घट्ट ठेवूनही मला माझ्या या कर्मभूमीशी एक जिव्हाळ्याचं नातं जपता आलाय, ते अशा सगळ्या मित्रमंडळींमुळेच.
साठा उत्तरांची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करताना माझ्याकडून काही राहून गेलं असेल, तर त्याबद्दल वाचक मला मनापासून क्षमा करतील, अशी मला आशा आहे. या जगाचा इतिहास, भूगोल, समाजकारण, अर्थकारण, धर्मजीवन आणि राजकारण मला जस समजल आणि उमजल, ते तुम्हा दर्दी वाचकांसमोर आणताना मला अतिशय आनंद होतं आहे.
विख्यात अरबी लेखक सादल्लाह वानूस यांच्या शब्दांनी या लेखनप्रपंचाचा शेवट करणं इथे संयुक्तिक ठरेल. ते म्हणतात, “We are doomed by hope, and come what may, today cannot be the end of history.”
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिका खूप आवडली.

>>अरबस्तानच्या प्रदेशात भटकंती करताना, इथल्या लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताना आणि त्यांच्या तोंडूनच त्याचा इतिहास - भूगोल समजून घेताना मला त्यांच्यातला प्रखर राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान प्रकर्षाने जाणवला. >>

अभ्यास आणि काम यांतलेच आहे का एक आवड म्हणून?
या भागातले लोक खूप हुशार होते. असिरिअन( खाल्डिअन) म्हणजे हल्लीचा अरबस्तान- इराक आणि सिरियाचा काही भाग असावा म्हणतात. ज्योतीष यांचेच भारतात पारंपरिक म्हणून चालते. ग्रीकांनी इकडे पोहोचवले.

सगळे भाग अगदी मन लाऊन वाचले.

रमझानच्या महिन्यात लहान वयाच्या मुलांपासून जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत सगळे जण निर्जळी उपवास धरताना बघितले आहेत आणि रोजा सोडताना माझ्या धर्माचा, जातीचा अथवा नागरिकतेचा विचार न करता मला आपल्याबरोबर भोजनात अगत्याने सामील करून घेणारे अरबी सुहृदही मी अनुभवले आहेत. >>> हे तर मला तिथे अन इथे भारतातही अनुभवायला मिळाले, मिळते आहे.....

खूपच माहितीपूर्ण लेख मालिका !! अतिशय गुंतागुंतीचा पण तरीही रंजक इतिहास वाचताना छान वाटले . अजून अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या लेखमाला येऊ द्या !

@srd
कामाचा भाग आहेच, पण आवड सुद्धा आहेच.

@DJ
आपल्याकडे पूर्वीपासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहिले आहेत, पण अरब देशांमध्ये हा अनुभव माझ्यासाठी चकित करणारा होता. इथे हे सगळे प्रकार होत नाहीत म्हणून गैरसमज आहेत आपल्याकडे, जे निघून गेले.

@ srd
ज्योतिष संपूर्णपणे भारताचीच देणगी आहे, आपण खालदियन ज्योतिष पद्धतीतून त्यात थोडीशी भर घातली इतकंच. भारतीय ज्योतिष ज्या गृहितकांवर आधारलेलं आहे, ती पूर्णपणे आपली आहेत. ग्रीकांनी काही नव्या संकल्पना आपल्यापर्यंत आणल्या हे खरं पण त्यातून आपल्या शास्त्रात थोडीशी भर पडली, that's it.

खालदियन ज्योतिष पद्धतीतून राशी, राशीस्वामी आले. तसं तिकडे एक शिल्पच आहे अडीच हजार वर्षापूर्वींचं. ( Time-Life. Book series मधल्या Time पुस्तकात आहे)
राशिंची चित्रं आणि चिन्हंही त्यांचीच.

नक्षत्र ज्योतिष आणि साडेसातीविचार भारतीय.
----------------------
या कला संस्कृतीच्या भागाचे जे हाल चाललेत सध्या ते बघवत नाहीत.

@ srd
आपली ज्योतिष विद्या वेदिक काळापासून आहे, जो ब्राँझ युगाच्या शेवटचा काळ मानला जातो. खलदियन ज्योतिषकाळ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकाच्या काळातला आहे. आपलं वेदांग ज्योतिष सर्वाधिक प्राचीन ज्योतिष आहे. भृगू संहितेचा काळ आणि खलदियान ज्योतिष प्रगत व्हायचा काळ साधारण सारखाच आहे, पण भृगू संहितेत नमूद केल्याप्रमाणे संहितेत मांडलेल ज्ञान भृगू ऋषींनी आधीच्या प्रचलित ज्ञानात स्वतःची भर घालून तयार केलं आहे, म्हणजेच आपल्या ज्योतिषाचा काळ अजून मागे जातो.

तुम्हि लिहिण्याचे बरेच कष्ट घेतले आहेत त्या बद्दल कौतुक.

तुमच्या इतिहासाच्या लेखनात बायबल चे अनेक संदर्भ आहेत. बायबल हे historic document आहे का? इतिहासकारांचे यावर काय म्हणणे आहे? हे स्पष्ट कळले नाही. तुमच्या स्टोरीमय इतिहासात myth कुठली ऐतिहासिक सत्य कुठले (= sonething that is currently accepted as historic fact by history scholars) याचा अंदाज लावता आला नाही त्यामुळे फार गोंधळ झाला. त्यामुळे apocryphal आहे की काय वाटत राहाते.

तुम्ही तूमच्या सोर्सेस ची यादी देत नाही (मोसाद च्या वेळी सुद्धा दिली नाही) त्यामुळे तुम्ही मांडलेल्या इतिहासाची credibility कळत नाही. हे अरबस्तान आणि मोसाद दोन्ही ठिकाणी झाले. उदा - मोसाद च्या लेखमालेत झिएव आणि इस्सर यांच्या भेटीचे वर्णन. त्यात झिएव च्या मानसिक स्थितीचे वर्णन आहे. डोळ्यात ज्वालामुखी दिसणे, अंगाला कंप सुटणे जागच्या जागी थिजणे, कसेबसे धैर्य गोळा करणे, आवाजातली जरब जाणवणे वैगेरे वैगेरे. हे वर्णन झिएव ने कोणाला सांगितले / लिहिले तरच कळेल ना? पण तुम्ही सोर्स सांगत नाही त्यामुळे ही तुम्हि घेतलेली स्टोरीटेलिंग ची लिबर्टी आहे की कसे काही कळत नाही. मग अजून कुठे कुठे लिबर्टी घेतली आहे, यात anecdotal or apocryphal किती असेल शंका येत राहाते.

You got my respect Happy

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!

@ नाबुआबुनमा

अरब इतिहास हा पूर्णपणे बायबल , तोरा , कुराण आणि इथल्या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीवर आधारलेला आहे. संदर्भ देणं खूप जिकिरीचं आहे कारण मी गेले १५ वर्ष या विषयावर वाचतो - लिहितो आहे. तुम्ही त्या त्या topic वर अगदी wikipedia वर जरी वाचलं तरी तुम्हाला माहिती मिळेल, बाकीची detailed माहिती बऱ्याचशा संदर्भ पुस्तकांमधून आलेली आहे. त्यातली काही पुस्तकं अरबी आहेत, जी भाषांतरित नाहीयेत.

मोसाद वरच्या लेखांमध्ये त्या त्या घटनेचं वर्णन थोड्याशा नाट्यमय पद्धतीने केलंय कारण त्या लेखांची शैली तशी आहे. स्वतः कोणत्याही जागी नसताना त्या त्या घटनेचं वर्णन करणं ' If I were there ' पद्धतीनेच होऊ शकतं, जे लिखाणाचं स्वातंत्र्य आहे.

छान मालिका. जेरुसलेम पुस्तकात मी हे सर्व वाचलेले आहे. प्ण मराठीत छान वाट्ते. थोडे ग्लि चेस आहेत. पण चलता है. ये हो वाचा खरा
उच्चार याहवे असा आहे.

सर्वत्र पवित्र मंदिराचा उल्लेख मंदिर टेंपल असाच आहे. सिनेगॉग नव्हे.

९ प्लेग वेग वेगळे आहेत. अंधार, गार पीट अंगावर गांधी उठणे, फर्स्ट बॉर्न मुलगे मरणे, लोकस्ट ची धाड, व इतर.

सोर्स ची यादी द्याल का.

ज्योतिष विद्या वेदिक काळापासून आहे, ती किती जुनी हा वाद नाही. पद्धती वेगळ्या होत्या. राशी तिकडून घेतल्या .

प्रत्येक धर्मात चमत्काराचा उपयोग वर्तवलेला आहे. पण त्याबद्दल बोलणे हा वेगळा विषय आहे. श्रद्धा हेच मूळ आहे.

ज्या गोष्टी खरोखरंच अस्तित्वात होत्या त्या सापडल्या आहेत.
बाइबल काय किंवा इतर बऱ्याच पुस्तकांत संदिग्धपणा आहे.

@ Srd
आपल्याकडे रामायण काळात आणि त्याआधी नाक्षत्रिय फलादेश बघण्याची पद्धत होती. राशीनुसार फलज्योतिष तपासण्याची पद्धत त्यापुढे आली. तुम्ही सांगत आहेत त्याप्रमाणे राशींची माहिती जरी खाल्डियन ज्योतिषातून आलेली असली, तर फलादेश पद्धतीत झालेला हा बदल कशामुळे झाला हे समजू शकतं. तूर्तास तरी याविषयी अधिक खोलात जाऊन वाचण्याची इच्छा आहे, त्यातून यथायोग्य माहिती मिळाली की या विषयावर सविस्तर बोलू शकेन.

भूमध्य समुद्राजवळ पूर्वी व्यापारी केंद्रे होती. यवन ( ग्रीक) अरब, राजस्थानी, हे एका ठिकाणी मालाची देवाण घेवाण करत. फारसी,अरेबी आणि संस्कृत पंडीत ग्रंथांची भाषांतरे करत. ते सर्व साहित्य इथेच भारतात होते. ब्रिटिशांनी १८१८ आणि १८५७ नंतर मिळतील ती सर्व हस्तलिखितं गोळा करून ब्रिटनला पाठवली. तर आपल्याकडे अभ्यासाला फारच थोडे ग्रंथ उरले. नालंदा ध्वस्त केले ते मुसलमान आक्रमकांनी.

१. अरबी समाज हा मागास विचारांचा का आहे? मागास राहिल्याने त्यांचा कोणता फायदा होत असावा?
२. अरब खरेच मागास आहेत की नाटक करतात? कारण त्यांनी फॉक्स स्टुडिओ सारख्या संस्था तसेच ऑस्ट्रेलियासारख्या देशात जमिनी घेऊन पैसे गुंतवण्यातली अक्कल असल्याचे दाखवून दिले आहे.भविष्यात तेल संपल्यावरची आर्थिक तरतूद करण्याची अक्कल आहे यांना.यांना सगळ्या आधुनिक सोयीसुविधा हव्यात पण सामाजिक व्यवस्था मध्ययुगीन हवीय.असे का? हे कधी सुधारणार?

@ केशउ
अरबी समाज मागास नाहीये पण काहीसा धर्मवेडा आहे. या सगळ्याचं मूळ आहे त्यांच्या आजवरच्या इतिहासात. त्यातही वाळवंटी देश आणि उत्तर आफ्रिकी देश जास्त कट्टर आहेत, भूमध्या समुद्राच्या आसपासचे देश पूर्वीपासून बरेच पुढारलेले आहेत पण सततच्या संघर्षात त्यांची वाताहात झालेली आहे.
या सगळ्यामध्ये इथली राजेशाही आणि हुकुमशाही समाजव्यवस्था कारणीभूत आहे. तेलातून आलेल्या संपत्तीचा फायदा इथे खोलवर गेलाच नाही. तशात सततचा संघर्ष , इस्राएल देशावर सतत खार खाऊन राहिल्याने बाकीच्या महत्त्वाच्या बाबींकडे झालेलं दुर्लक्ष आणि युरोप - अमेरिकेच्या प्रभावातून कधीही न झालेली सुटका यामुळे इथे ऐश्वर्य कधीही योग्य पद्धतीने उपभोगत आलं नाही.

लेखमालिका आवडली. या तीन धर्मांच उगमस्थान एकच आहे हे माहिती होतं पण नक्की कशा गोष्टी घडत गेल्या ते पहिल्यांदा वाचलं. तुमचा अभ्यास दांडगा आहे. लिहिता पण सुरेख! त्यामुळे नवीन नवीन विषयांवर लिहीत रहा.
धन्यवाद.