अरबस्तानचा इतिहास - भाग १५

Submitted by Theurbannomad on 22 February, 2021 - 16:44

ख्रिस्ती धर्माची दुफळी

एका बाजूला मध्यपूर्वेमध्ये अरब लोकांचा सत्तेवरचा प्रभाव कमीकमी होऊन बिगरअरबांचं प्राबल्य वाढत होतं, आणि दुसरीकडे युरोपमध्ये मात्र ख्रिश्चन धर्मामध्ये वादळ निर्माण होतं होतं. निमित्त होतं ख्रिस्ती धर्मात झालेल्या गटबाजीचं. येशूच्या धार्मिक शिकवणुकीच्या मार्गाने एकत्र आलेले युरोप आणि पूर्व आशियाचे ख्रिश्चन धर्माचे लोक जसजसे स्थिरावत गेले तसतशी या भागात शेकडो चर्च उभारली गेली. त्या चर्चमध्ये धर्मगुरू आले. हळू हळू या धर्मगुरूंची एक विशिष्ट व्यवस्था अस्तित्वात आली, ज्यात सर्वोकंच धर्मपीठ, त्याखालोखाल प्रांतीय धर्मपीठं आणि त्याहीखालोखाल स्थानिक पातळीवरची धर्मपीठं अशी उतरंड होती. त्याशिवाय या चर्चना संलग्न असलेली धर्मप्रचारकांची फौज आणि या सगळ्याच्या अनुषंगाने येणारी अर्थव्यवस्था असा हा पसारा सहा-सात शतकांमध्ये चांगलाच विस्तारला.
मुळात या सगळ्याची सुरुवात झाली बायबलच्या काही मजकुरावरून. अब्राहमीक धर्मांमध्ये ' होली स्पिरिट ' म्हणजे 'दैवी शक्ती / आत्मा ' या अर्थाची एक संकल्पना आहे. या संकल्पनेनुसार सामान्य मनुष्य ईश्वराचा प्रेषित होण्यामागे ' होली स्पिरिट' कारणीभूत असतं. ईश्वर ज्या पुण्यवान आणि भाग्यशाली मनुष्याची आपला संदेश सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी निवड करतो, त्या मनुष्याला दैवी आत्म्याद्वारे ' प्रेषितावस्था' प्राप्त होते. अमूर्त अवस्थेतला ' सर्वशक्तिशाली ' देव हा एकाच असला, तरी त्याच्या खालोखाल ' पिता ', ' मुलगा ' आणि ' दैवी आत्मा ' या तीन ईश्वरी शक्ती आहेत ( ज्याला ट्रिनिटी असं संबोधन आहे ) हा या संकल्पनेवर आधारलेला बायबलचा सिद्धांत.
पश्चिम युरोपमधल्या लॅटिन चर्चने ' पिता ' आणि ' मुलगा ' या संकल्पनेचा एक वेगळा अर्थ काढला. त्यांच्या मते दैवी आत्मा पिता आणि मुलगा अशा दोहोंकडून पुढचा प्रवास करू शकतो. पूर्वेकडच्या ग्रीक चर्चने या अर्थाला मूळ बायबलच्या शिकवणुकीत केलेली ढवळाढवळ म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या मते बायबलच्या विशुद्ध अर्थामध्ये घुसडखोरी हा ईश्वराच्या पवित्र शिकवणुकीमध्ये हस्तक्षेप. पुढे रोमच्या चर्चने जगभरातल्या ख्रिस्ती धर्माच्या लोकांवर आपला हक्क राहील अशा अर्थाचं फर्मान काढलं - ' पापल सुप्रीमसी' म्हणजेच पोपच्या सर्वशक्तिशाली असण्याची ही सक्ती. या फर्मानावर काही ख्रिश्चनांनी आक्षेप घेतला. सरतेशेवटी अकराव्या शतकात ख्रिस्ती धर्माची ' ऑर्थोडॉक्स ' आणि ' रोमन कॅथॉलिक ' अशा दोन पंथांमध्ये विभागणी झाली.
१०५३ साली इटलीच्या दक्षिण प्रांतातल्या चर्चना लॅटिन पद्धतीने धर्माचरण करण्याची सक्ती फर्मावण्यात आली.कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मायकल सरुलारियस याने या फर्मानाच्या विरोधात आपल्या प्रांतातली सगळी लॅटिन चर्च बंद करण्याचं प्रतिफर्मान काढलं. या सगळ्या तंट्याच्या मुळाशी होता धर्माच्या केंद्रीकरणाचा संघर्ष. रोम आणि कॉन्स्टॅन्टिनोपल ही त्या काळातली रोमन साम्राज्याची दोन शक्तिशाली केंद्र. एक पश्चिमेला युरोपमध्ये तर एक पूर्वेला आशिया खंडात. दोहोंमध्ये व्यापार, दळणवळण आणि रोटीबेटी व्यवहार असले, तरी दोघांमध्ये ख्रिस्ती साम्राज्याचं केंद्र होण्याची सुप्त महत्वाकांक्षा होतीच. धर्माच्या निमित्ताने या महत्वाकांक्षा दोन्ही बाजूच्या राजकीय वर्तुळासाठी एकमेकांच्या विरोधात उभं राहण्याचं निमित्त ठरल्या आणि चढाओढीला सुरुवात झाली.
१२०२ सालच्या चौथ्या धर्मयुद्धात - क्रुसेडमध्ये पोप इनोसंट तिसरा याने सुरुवातीला अयुबीड मुस्लिम साम्राज्याला लक्ष्य केलेलं असलं, तरी त्या निमित्ताने त्याने कॉन्स्टॅन्टिनोपलवर चढाई करून बायझेंटाईन साम्राज्यावर लॅटिन ख्रिस्ती ( रोमन कॅथॉलिक ) झेंडा फडकावला. कॉन्स्टॅन्टिनोपलचे तुकडे पाडून त्यातून छोटी राज्य तयार केली. प्रत्येक छोट्या राज्यात आपल्या मर्जीतले लोक आणून बसवले आणि स्वतःच्याच धर्मबंधूंविरोधात काटाकारस्थानाने कारवाया करून 'ऑर्थोडॉक्स ' पंथाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. यातून हे साम्राज्य सावरता सावरतात ऑटोमनांनी त्यांना कायमचं संपवलं.
अजूनही ऑर्थोडॉक्स पंथाचे ख्रिस्ती लोक कॉन्स्टॅन्टिनोपलच्या बायझेंटाईन चर्चला आपल्या श्रद्धास्थानांमध्ये अग्रक्रम देतात. पुढे जाऊन ख्रिस्ती धर्मात या सगळ्यांपेक्षा वेगळा 'प्रोटेस्टंट ' पंथसुद्धा अस्तित्वात आला, जो बायबललाच प्रमाण मानून आपली शिकवण द्यायला लागला. यांनी इतर पंथांमध्ये अस्तित्वात असलेल्या मौखिक अथवा लिखित स्वरूपातल्या बायबलनंतरच्या प्रथा, परंपरा, शिकवण, जिझसनंतरच्या 'होली फादर्स 'या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्ती पितामहांच्या शिकवणी अशा सगळ्यांना तिलांजली दिली.
वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या तीन पंथांचे लोक आपापल्या श्रद्धेला अनुसरून ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करत गेले. युरोपमध्ये बऱ्याचशा प्रमाणात रोमन कॅथॉलिक पंथ विस्तारला आणि रोम हे पोपचं अधिकृत निवासस्थान असलेलं शहर ख्रिस्ती लोकांच्या धर्मसत्तेचं केंद्रबिंदू झालं. रशियन देशांमध्ये ऑर्थोडॉक्स पंथीयांनी आपलं बस्तान बसवलं. प्रोटेस्टंट्स मुळातच बंडखोर. ते जगभरात विखुरलेल्या अवस्थेतच राहिले. पुढे स्थानिक भाषा, प्रथा, संस्कृती या सगळ्यांचा प्रभाव पाडून ख्रिस्ती धर्माच्या या तीन पंथांमध्येही उपपंथ तयार झाले.
युरोपमधल्या जिझसच्या या लेकरांनी पुढे साम्राज्यवादी धोरण अनुसरून आपला धर्म अतिपूर्वेकडच्या देशांमध्ये, अमेरिकेमध्ये आणि आफ्रिकेमध्ये साम - दाम - दंड - भेद वापरून वाढवला. परंतु अरबस्तान आणि लेव्हन्टच्या परिसरात झालेल्या एका महत्वाच्या घटनेने त्यांची डाळ या भागात काही शिजली नाही. पंधराव्या शतकात कॉन्स्टॅन्टिनोपल मुस्लिम धर्माच्या ताब्यात गेलं आणि या भागातला ख्रिस्ती धर्माचा प्रभाव संपला.
मंगोल आक्रमणाच्या काळात स्वतःच्या आणि स्वतःच्या सैन्याच्या संरक्षणासाठी मध्य - पश्चिम आशियामधून अंतोलिया प्रांतात आलेल्या अर्तूगृल नावाच्या पराक्रमी योद्ध्याने तेराव्या शतकाच्या अखेरीस ऑटोमन साम्राज्याचा पाया रचला. त्याचा मुलगा पहिला उस्मान, ज्याला उस्मान गाझी अशा नावाने ओळखलं जातं, या ऑटोमन साम्राज्याचा पहिला सम्राट. त्याच्या नावाचा ओथमान असाही स्थानिक उच्चर होता, ज्यावरून त्याच्या घराण्याने स्थापन केलेल्या साम्राज्याचं नाव पडलं. त्याचा मुलगा ओर्हाम पुढे सम्राट झाल्यावर त्याने बायझेंटाईन साम्राज्याच्या अखत्यारीतला अंतोलिया प्रांताच्या वायव्येकडचा भाग आपल्या साम्राज्याला जोडला. प्रसिद्ध प्रवासी इब्न बतूता याने ओर्हामच्या काळातल्या ऑटोमन साम्राज्याचं वर्णन 'वैभवशाली, सुसज्ज आणि संपन्न ' अशा शब्दात केलं आहे.
या ओर्हामच्या मुलाने म्हणजेच सम्राट पहिला मुराद याने गॅलिली आणि एड्रियानोपल ( आत्ताच्या तुर्की, ग्रीस आणि बल्गेरियाच्या सीमेचा प्रदेश ) आपल्या साम्राज्यात आणला. हे एड्रियानोपल रोमन बायझेंटाईन साम्राज्यातील अतिशय महत्वाचं ठाणं. मुरादने या जागेला एदिरन असं नवं नाव देऊन तिथे आपल्या साम्राज्याची नवी राजधानी थाटली. उद्देश होता येथून युरोपमध्ये मुसंडी मारून साम्राज्यविस्तार करणं. बाल्कन प्रदेश त्याने आपल्या साम्राज्यात आणला. स्वतःला 'सुलतान' हि पदवी घेणारा हा पहिला ऑटोमन सम्राट.
त्याच्या पुढच्या पहिल्या बायझीदने साम्राज्यविस्तार केला असला, तरी त्याच्या मुलांमध्ये सुलतान होण्यावरून जुंपली. अखेर त्याच्या चौथ्या मुलाने - पहिला मेहमेद याने आपल्या भावांना नामोहरम करून साम्राज्याची शकलं पाडण्यापासून रोखलं. याच धामधुमीत शिरजोर होऊ पाहणाऱ्या युरोपियन ख्रिस्ती सैन्याला आणि 'बेलिक' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अंतोलियाच्याच छोट्याशा प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या गटाला त्याच्या मुलाने - दुसऱ्या मुरादने वठणीवर आणलं. त्यासाठी त्याच्या आयुष्याची २५ वर्ष खर्ची पडली. या दुसऱ्या मुरादला बायझंटाईन साम्राज्याच्या एका महत्वाच्या शहराचा घास घ्यायचा ध्यास होता. हे शहर हाती आलं, की बायझेंटाईन साम्राज्याच्या ऑटोमन साम्राज्यातल्या लुडबुडीला आला बसेल आणि साम्राज्याच्या वैभवात घसघशीत भर पडेल, हे त्याला चांगलंच माहित होतं. हे शहर म्हणजे आज इस्तंबूल या नावाने ओळखलं जाणारं तेव्हाचं कॉन्स्टॅन्टिनोपल.
मेहमत हा या दुसऱ्या मुरादचा मुलगा. त्याची आई हुमा हुतां ही गुलाम स्त्री होती. तिच्याबद्दल असं सांगितलं जातं, की ती मूळची इटालियन ज्यू असून सुलतान दुसरा मुराद याच्याशी लग्न झाल्यावर तिने सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारला. काही अभ्यासकांच्या मते ती सर्बियन ख्रिश्चन होती. काहीही असलं, तरी सुलतान दुसरा मुराद याच्या या चौथ्या बायकोने जन्म दिलेला मुलगा मेहमत याने ऑटोमन साम्राज्याचा झेंडा सर्वदूर पोचवल्यामुळे ती ऑटोमन साम्राज्यासाठी अतिशय लाभदायी ठरली, हे नक्की.
या मेहमतच बालपण अतिशय खडतर होतं. राजवाड्यात आपल्या भावंडांबरोबर मोठं होतं असताना त्याला एक प्रकारचं उपरेपण सहन करावं लागत असे. त्याची आई गुलाम , त्यात परप्रांतीय. वयाच्या अकराव्या वर्षी त्याला राजकारण आणि राज्य-व्यवस्थापनाचे धडे गिरवायला अमस्या शहरात पाठवलं गेलं. त्याचा मार्गदर्शक होता अकसामसादिन नावाचा त्या काळी पंडित, कवी, धर्मशास्त्री आणि संत म्हणून ओळखला जाणारा एक प्रभावशाली अवलिया. त्याच्या शिकवणुकीचा प्रचंड प्रभाव मेहमतवर पडला. त्याच्या मनात सुन्नी मुस्लिम धर्माची पाळंमुळं याच काळात घट्ट रोवली गेली. याच अकसामसादिनने त्याच्या मनात कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज करण्याची स्वप्न रुजवली. नशिबाचे फासे असे काही फिरले, कि चक्क एकाच वर्षात - वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याच्या डोक्यावर सुलतानपदाचा मुकुट आला. सुलतान दुसऱ्या मुरादने स्वतःच्या जिवंतपणी हा मान आपल्या मुलाकडे स्वेच्छेने दिला असल्यामुळे त्यावर कोणी नाराजी व्यक्त केली नाही, परंतु या घटनेने नाराज झाला तो सुलतानाचा मुख्य वजीर हलील पाशा.
पुढे जानिसारी म्हणून ओळखले जाणारे सुलतान मुरादचे अंगरक्षक या नियुक्तीच्या विरोधात उभे राहिले. हे घरचं दुखणं तलवारीच्या मार्गाने सोडवणं शहाणपणाचं नसल्यामुळे अनिच्छेने का होईना, पण पुन्हा दुसरा मुराद गादीवर परतला. या काळात कोसोवोच्या लढाईत फत्ते झाल्यावर मुरादने कारामनीद भागातल्या सम्राट शाहरोखला हरवलं आणि पुढे थेट अल्बानियाच्या प्रांतापर्यंत आपले झेंडे फडकावले. शेवटी हिवाळ्यात अतिश्रमाने आजारपण येऊन तो अंथरुणाला खिळला आणि पूर्वजांनी स्थापन केलेल्या राजधानीत - 'एदिरन' मध्ये त्याने शेवटचा श्वास घेतला.
या काळात मेहमत सगळ्या घटनांचा आढावा घेत होता. त्याला सल्ला देणारी त्याची आई आणि अकसामसादिन हे दोघे त्याला राजकारणात अधिकाधिक धूर्त आणि संयमी करत होते. जानिसारी लोकांच्या बंडामागे वजीर हलील पाशाची भूमिका असू शकते, कारण मुरादला पुन्हा सुलतानपदावर आणण्यामागे त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं, हे मेहमत जाणून होता. हा वजीर पुढे डोईजड होऊ शकतो, हे त्याला उमजलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सुलतानपदाची गादी हाती येताच त्याने सर्वप्रथम आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपल्या दूतांद्वारे दूरदूरच्या साम्राज्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली.
या सगळ्याच्या बरोबरीने त्याने अतिशय पद्धतशीरपणे आपल्या साम्राज्याच्या नौदलाची फेरआखणी केली. नौदल सुसज्ज करण्याच्या दृष्टीने त्याने खास कागागीर नेमून आपल्या लढाऊ जहाजांची डागडुजी केली. जोडीला कॉन्स्टॅन्टिनोपलच्या आशिया भागाच्या बाजूला - जेथे ऑटोमन साम्राज्याने अनेक वर्षांपासून आपलं बस्तान बसवलं होतं - त्याने रुमेलिहिसरी नावाचा दणकट समुद्रदुर्ग बांधला. त्याच्या पणजोबांनी वास्तविक अन्दोलूहिसरी नावाचा एक किल्ला त्या भागात बांधला होता, पण या नव्या किल्लाच्या आगमनामुळे बोस्फोरसच्या अरुंद खाडीवर ऑटोमन साम्राज्याची पकड आता अधिक आवळली गेली.
हे सगळं घडत असताना केवळ वीस वर्षाच्या कोवळ्या मेहमतला सामना करावा लागत होता त्याच्या तीर्थरुपांच्या काळापासून वजीरपदावर मांड ठोकून बसलेल्या हलील पाशाचा. सुलतान मेहमत वयाने लहान असल्यामुळे त्यांनी आततायीपणे निर्णय घेऊन साम्राज्याच्या सुरक्षिततेला आणि स्थैर्याला हानी पोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नये, ही या पाशाची भूमिका. त्यात वरवर साम्राज्याची काळजी जरी दिसत असली, तरी आतून त्याचा उद्देश काहीही करून सुलतानाला आपल्या कह्यात ठेवण्याचा होता. दुर्दैवाने विशीत असला तरी मेहमत राजकारणात मुरला होता. त्याने पाशाला आपल्यापासून लांबही केलं नाही आणि त्याला आपल्या निर्णयामध्ये अति ढवळाढवळही करू दिली नाही. अखेर तयारी मनाजोगती झाल्यावर त्याने कॉन्स्टॅन्टिनोपलला धडक द्यायचा निर्णय घेतला. पाशाने थोडीफार खळखळ केल्यावर त्याने मुद्दाम त्याला आपल्याबरोबर मोहिमेत सामील केलं.
इ.स. ६७४-६७८ मध्ये अरब योद्धा अबू अयुब अल अन्सारी याने कॉन्स्टॅन्टिनोपलवर अयशस्वी चढाई केली होती. त्याचं थडगं या ऑटोमन सैन्याला वाटेत सापडल्यावर मेहमतने जातीने त्या थडग्याला भेट दिली. १४५३ साली मेहमतने हा इतिहास बदलण्याच्या दृष्टीने आपली चढाई सुरु केली. दोन लाख सैन्य, ३२० लढाऊ जहाजं आणि हंगेरीहून ऑटोमन सैन्यात सामील झालेला ओरबान नावाचा एक निष्णात गोलंदाज ( तोफ चालवणारा ' तोपची ' ) अशी जय्यत तयारी झालेली होती. हा ओरबान आधी बायझेंटाईन साम्राज्याच्या आश्रयाला गेला होता, पण तिथे त्याला विशेष प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो ऑटोमन साम्राज्यात आला. त्याने आपल्या तोफ बनवण्याच्या कलेबद्दल मेहमतला सांगितल्यावर मेहमतने त्याला हवी तशी रसद उपलब्ध करून दिली. या ओरबानने त्यातून तयार केली एक महाप्रचंड तोफ, जी खास कॉन्स्टँटिपोपलच्या तटबंदीला ध्वस्त करण्याच्या उद्देशाने आघाडीवर तैनात केली गेली होती. त्या तोफेचं नाव होतं ' बॅसिलिका ' , जी बाबिलोनच्या भिंती उध्वस्त करण्याइतकी शक्तिशाली आहे अशी बढाई हा ओरबान मारायचा.
बायझेंटाईन रोमन कॉन्स्टॅन्टिनोपलच्या बाजूने खुद्द सम्राट द्रगासेस पलाईलोगोस ( अकरावा कॉन्स्टंटाईन ) आपल्या सैन्यच नेतृत्व करत होता. रोमन साम्राज्याच्या प्रदीर्घ इतिहासाच्या अनुभवातून त्यांनी युद्धशास्त्रात चांगलीच प्रगती केली होती. बोस्फोरसच्या खाडीत शिरायला ज्या निमुळत्या भागातून जहाजांना आत यावं लागे, त्या भागात त्यांनी शक्तिशाली लोखंडी साखळ्यांचा एक अडथळा तयार केला होता. त्या काळी नबहुतेक जहाजं लाकडी असत. या साखळ्यांमुळे आत शिरू पाहणाऱ्या जहाजांची बुडं फुटून त्यांना जलसमाधी मिळत असे. शिवाय कॉन्स्टॅन्टिनोपलची तटबंदी दगडाच्या तींन मजबूत थरांच्या बांधकामांनी ( ज्याला थिओडोसियन भिंत म्हणून ओळखलं जातं ) जवळ जवळ अभेद्य केलेली होती. खाडीमध्ये शिरल्याशिवाय कॉन्स्टॅन्टिनोपलच्या तटबंदीला हात लावणं अशक्य होतं. शिवाय युरोपच्या बाजूला असल्यामुळे रोमन साम्राज्याच्या बाकीच्या भागातून आणि दोस्त राष्ट्रांकडून कधीही कुमक मागवणं सहज शक्य होतं.
मेहमतने आधीच्या काळात युरोपियन साम्राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्यामुळे रोमन त्याच्या बाबतीत गाफील राहिले. तशात त्याचं कोवळं वय बघून तो फार काही करायला धजावेल अशी त्यांना शक्यताच वाटत नव्हती. त्याने बोस्फोरसच्या खाडीच्या किनाऱ्यावर किल्ला बांधून तेथे आपल्या तोफा आणि सैन्य तैनात करूनही त्यांना त्याची ही कृती केवळ समुद्रमार्गाने होणाऱ्या व्यापारावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याची खेळी वाटली. मुळात १३४६ ते १३५० च्या काळात काळ्या प्लेगच्या साथीमुळे युरोप आणि बायझेंटाईन प्रांतात हाहाःकार माजवलेला होता आणि त्यात जवळ जवळ वीस कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. या सगळ्यानंतर तुर्कस्तानच्या भागात मार्माराचा समुद्र, प्रिन्सेस बेट, पेलोपोनेस्सी अशा मर्यादित भागातच रोमन साम्राज्य उरलेलं होतं. त्यामुळे आपल्यावर हल्ला होईल अशी शक्यताच या रोमन सम्राटाला वाटली नव्हती. या सगळ्या कारणामुळे कॉन्स्टॅन्टिनोपलच्या आत दहा हजारभर सैन्यही त्याच्या दिमतीला उरलं नव्हतं.
मेहमतने आपल्या मोहिमेचा शुभारंभ केला तो कॉन्स्टॅन्टिनोपलच्या आजूबाजूला आपला फास आवळून.वायव्य दिशेला खुद्द मेहमत, त्याचा मुख्य योद्धा ' ओरबान ' आणि त्याची ' बॅसिलिका ' आणि मेहमतची जिंकण्याच्या उद्देशाने पाय रोवून उभी असलेली सेना होती. नैऋत्येला इशाक पाशा नावाचा मेहमतचा विश्वासू सरदार तैनात होता. ईशान्येला बोस्फोरस खाडीपलीकडे झगनॉस पाशा हा दुसरा शूर सेनानी आपली सेना घेऊन तैनात होता. यांच्याकडे तटबंदीच्या पूर्वेकडच्या समुद्राकडे नजर ठेवण्याचं कामसुद्धा होतं. समुद्रात मेहमतने आपल्या चारशे लढाऊ जहाजांना चढाई करायला तैनात केलं होतं. उरलेल्या दिशेला होता अथांग पसरलेला समुद्र.
याशिवाय पेरा नावाचा एक छोटासा भाग कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ईशान्येला खाडीच्या मुखाशी होता, जो एक स्वायत्त प्रांत होता. 'गोल्डन हॉर्न' या नावाने ओळखला जाणारा हा भूभाग. या प्रांताचा सर्वेसर्वा होता जेनोईज वंशाचा पोदेस्ता. हा माणूस होता पक्का व्यापारी. याला मेहमतने आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला पुढच्या काळात व्यापारासाठी अधिकच्या सवलती आणि आपल्या सैन्याचं संरक्षण देण्याचं आमिष मेहमतने दाखवलं. वाटाघाटींच्या वेळी या पोदेस्ताने अनुकूल प्रतिसाद दिला खरा, पण प्रत्यक्षात मात्र त्याने रोमन सम्राटाच्या बाजूने उभं राहून मेहमतचा विश्वासघात केला. वझीर पाशा हि संधी साधून मेहमतला चढाईपासून परावृत्त करायचा प्रयत्न करायला लागला आणि मेहमतने अधिक त्वेषाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झाली वायव्येकडून. 'बॅसिलिका' कॉन्स्टॅन्टिनोपलच्या तटबंदीवर आग ओकू लागली. ही तोफ अतिप्रचंड असली, तरी तिची एक समस्या होती. एकदा चालवली कि तिच्यात नवा दारुगोळा भरायला तीन तास लागत. शिवाय तिच्या आकाराचे तोफगोळेसुद्धा कमी होते. मेहमतने या तोफेच्या साहाय्याने तटबंदी एका आठवड्यात ध्वस्त करण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण महिनाभर होऊनही पदरी निराशा येत होती. तोफेची डागडुजी करताना रोमन सैन्य तटबंदीचीही डागडुजी करून घेत. शेवटी मेहमतने ओरबानला ती तोफ अविरत चालवण्याचा हुकूम दिला आणि सहाव्या आठवड्यात ती तोफ आतल्या दारुगोळ्यासह फुटून त्यात ओरबान मारला गेला. पुन्हा एकदा वजीर पाशा आपल्या सुलतानाला मागे वळवण्याची विनंती करायला लागला.
पडद्याआडून रोमन सम्राटाने आपल्या मायभूमीच्या आणि युरोपातल्या इतर साम्राज्यांच्या दूतांबरोबर बोलणी सुरु केली.अलीकडच्या काही काळात युरोपमध्येही धर्मसत्ता दुभंगलेली होती. पूर्वेकडचे प्रदेश आणि पश्चिमेकडचे प्रदेश आपापसात अनेकदा धर्माच्या मार्गाने आपापसात भांडले होते. चर्च दुभंगलेलं होतं. अशा वेळी रोममध्ये बसलेल्या पोपने ही मदतीची याचना आपल्याला येशूने बहाल केलेली सुवर्णसंधी समजून आपले फासे टाकले. पूर्वेकडच्या प्रदेशावर आपल्या चर्चचा अंमल प्रस्थापित करण्याच्या हेतूने त्याने अनेक वर्षांपासून चर्चांमध्ये अडकलेली मागणी पुढे दामटली. पश्चिमेच्या प्रांतातल्या चर्चच्या आणि पर्यायाने रोमच्या पोपच्या प्रभावाखाली पूर्वेकडच्या धर्मसत्तेचे विलीनीकरण करण्याची ती मागणी मान्य करण्यावाचून बायझेंटाईन साम्राज्याला गत्यंतर नव्हतं. नमनाला घडाभर तेल वाया गेल्यावर अखेर किएव्ह ( आताच्या युक्रेन देशाची राजधानी ) प्रांतातल्या कार्डिनल इसिडोर पोपच्या सांगण्यावरून कीऑस प्रांतातला जिओव्हानी गीअसतीयानी नावाचा जेनोईज वंशाचा शूर इटालियन सेनानी बरोबर घेऊन कॉन्स्टॅन्टिनोपलला आला.त्यांनी आपल्याबरोबर हजार-बाराशे सैनिकांची कुमक आणली. त्यांच्यामध्ये होते २०० निष्णात तिरंदाज, जे दूरवरच्या लक्ष्याचा भेद करण्यात पटाईत होते.
इथे मेहमतने आपल्या तीक्ष्ण बुद्धीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने जे काही केलं, ते त्याला इतिहासात युद्धशास्त्राच्या पुस्तकांमध्ये अजरामर करून गेलं. पारंपरिक पद्धतीने काही हाती लागत नसल्यामुळे अखेर त्याने सामान्य माणसांना वेडसर वाटू शकेल असा निर्णय घेतला. बोस्फोरसच्या खाडीचा मुखाकडचा भाग साखळ्यांच्या मजबूत अडथळ्याने आणि रोमन सैन्याच्या सुसज्जित युद्धनौकांनी बंद केला होता. उत्तर दिशेला ऑटोमन सैन्याने खाडीच्या दोन किनाऱ्यांना सांधणारा पूल बांधला असला, तरी सात किलोमीटर लांबीची खाडीच्या किनाऱ्याला समांतर असलेली 'थिओडीसियन तटबंदी' आणि त्यावरचे रोमन गोलंदाज मुखापासून आतापर्यंतच्या खाडीच्या पाण्यात शत्रूच्या एकाही होडीला टिकू देत नव्हती. ऑटोमन युद्धनौका होत्या मुख्य समुद्रात. तिथून साखळी, रोमन युद्धनौका आणि तटबंदीवरच्या रोमन तोफा इतके अडथळे पार करून त्यांना आत घुसणं अशक्य होतं. या सगळ्याचा विचार करून मेहमतने आपल्या युद्धनौका जमिनीवरून भल्या मोठ्या तरफांच्या आणि आपल्या प्रचंड सैन्याच्या साहाय्याने खाडीच्या मुखाला वळसा घालून थेट खाडीच्या मधोमध उतरवण्याचा निर्णय घेतला. वजिराने आपल्या बाजूने या योजनेमधला ' अविचार ' बोलून दाखवला, परंतु मेहमतच्या नसानसांमधलं तरुण रक्त आता इरेला पेटलं होतं.
योजनेप्रमाणे खरोखर मेहमतच्या प्रचंड सैन्याच्या एका तुकडीने जंगल साफ करून तिथल्या उंच झाडांच्या खोडांपासून जमिनीवर दणकट तराफे तयार केले. या तराफ्यांना भरपूर तेल लावून त्यांना एकमेकांवर घरंगळत जाण्यासाठी सैन्याने नीट तयार केलं होतं. शिवाय जमिनीच्या नैसर्गिक उताराचाही त्यांनी अभ्यास केला होता. मनुष्यशक्ती आणि पशूशक्ती शेकडोंच्या संख्येने वापरून आपल्या युद्धनौकांना त्यांनी खेचत खेचत त्या तरफांवर आणलं आणि जंगलातून पेरा प्रांताला वळसा घालून त्यांनी त्या नौका महिन्याभरात बोस्फोरसच्या खाडीच्या मध्यभागी आणून पाण्यात उतरवल्या. या सगळ्या प्रकाराचा आवाज होऊन शत्रू सावध होऊ नये म्हणून मेहमतने एका बाजूला आपल्या तोफदलाला तोफांचा मारा सुरु ठेवण्यास सांगितलं आणि दुसरीकडे पेरा प्रांताच्या कोणीही ही बातमी फोडू नये म्हणून त्यांच्यावरही नजर ठेवली.
एकीकडे हे सगळं दिव्य पार पडत असताना समुद्रात इटलीहून आलेल्या जहाजाच्या तांड्यामध्ये आणि ऑटोमन युद्धनौकांमध्ये जुंपली. ऑटोमन युद्धनौकांनी जबरदस्त लढत देऊनही इटलीच्या युद्धनौकांच्या आडोशाने अन्नधान्याची रसद घेऊन काही छोटी गलबतं खाडीच्या मुखातून आत शिरली. सगळ्या बाजूने घेतल्या गेलेल्या कॉन्स्टॅन्टिनोपलसाठी हा मोठा दिलासा होता. या घटनेमुळे रोमन अधिक निर्धास्त झाले. शहर वाचवण्यासाठी त्यांच्याकडे आता अन्नधान्याची पुरेशी तरतूद झाली होती आणि त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे त्यांना ऑटोमन सैन्य फार काळ टिकाव धरणार नाही याची खात्री होती.
अखेर २६ मे १४५३ रोजी ऑटोमन सैन्याने आपली निकराची लढाई सुरु केली. याही वेळी सबुरीने घ्यायचा वजीर पाशाचा सल्ला धुडकावून आपल्या इरेला पेटलेल्या सैन्याच्या साहाय्याने मेहमतने जमीन आणि खाडी अशा दोन्ही बाजूने चढाई केली. आपल्या प्रचंड सैन्याच्या तुकड्या करून त्यांच्या लाटांवर लाटा कॉन्स्टॅन्टिनोपलच्या अभेद्य तटबंदीवर धडकवायच्या आणि जमेल त्या मार्गाने आत शिरायचं अशा रणनीतीने ऑटोमन सैन्य लढत होतं. सुरुवातीला ऑटोमन सैन्याच्या ख्रिस्ती सैनिकांनी मोर्चा सांभाळला. ही रणनीती मनोवैज्ञानिक दृष्ट्या महत्वाची होती, कारण आपल्या साम्राज्यात ख्रिस्ती लोकांना मान आहे हा संदेश कॉन्स्टॅन्टिनोपलच्या सामान्य लोकांना मिळणं हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर पुढे आली अविवाहित ' अझाप ' सैनिकांची तुकडी. हे सगळं होतं असताना मुख्य अनातोली सैनिकांची तुकडी 'ब्लासर्न' भागातल्या तोफांच्या माऱ्याने काहीशा कमजोर झालेल्या तटबंदीला भेदण्याचं काम करत होती.
या सगळ्या लढाईचा रागरंग बघून अखेर इटालियन सैनिक बंदराकडे धावले आणि जमेल तशा मार्गाने तिथून पळून जाऊ लागले. उलूबाटली हसनच्या नेतृत्वाखाली जानिसारी सैनिक पुढे आले आणि त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. शेवटी ग्रीक सैनिकांनीही इटालियन सैनिकांचा मार्ग निवडला. उरल्यासुरल्या सैनिकांसह सम्राट कॉन्स्टंटाईनने प्रतिकार केला खरा, पण एव्हाना कॉन्स्टॅन्टिनोपल ऑटोमन सैन्याने आपल्या पोलादी मुठीत आवळून सगळीकडे प्रचंड रक्तपात सुरु केला होता.
अशा प्रकारे २९ मे १४५३ रोजी जवळ जवळ दोन महिने चाललेल्या या लढाईची अखेर कॉन्स्टॅन्टिनोपल ऑटोमन साम्राज्यात विलीन होण्यात झाली. आपल्या सैन्याला तीन दिवस मेहमतने मनसोक्त रक्तपात करू दिला. तेव्हाच्या परिस्थितीचं वर्णन करताना फिलिप मनसेल नावाचा इतिहासकार लिहितो, की शहराच्या एकाही मनुष्याला ऑटोमन सैन्याने जिवंत सोडलं नाही. जे इटालियन अथवा ग्रीक सैनिकांबरोबर पळून जाण्यात यशस्वी झाले, ते नागरिक सोडून कोणीही जिवंत राहील नाही. खाडीच्या पाण्यात, रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये रक्तामांसाचा चिखल झाला होता आणि ऑटोमन सैनिक आपल्या दोन महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या संतापाचा उद्रेक अधिकाधिक पाशवी पद्धतीने अत्याचार करून शमवू पाहात होते. वजीर हलील पाशालाही आपल्या वागणुकीची ' योग्य' ती शिक्षा मिळाली.
मेहमतने विजयी सम्राटाच्या थाटात कॉन्स्टॅन्टिनोपलमध्ये प्रवेश केला. ऑटोमन सैन्याची अपरिमित हानी झाली असली, तरी त्याने त्याच्या लहानपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं होतं. त्याने सर्वप्रथम ' आया सोफ्या ' मध्ये जाऊन नमाज पढला आणि कॉन्स्टॅन्टिनोपल सुन्नी मुस्लिम धर्माचं एक महत्वाचं केंद्र झालं. असं म्हणतात, की कॉन्स्टॅन्टिनोपल पडायच्या आधी आकाशात चंद्रग्रहण दिसलं होतं, ज्याच्याकडे बघून बहुतेक नागरिकांचा धीर सुटला होता. त्यानंतरच धुकं ओसरताच त्यांना आया सोफ्याच्या घुमटावरून एक प्रकाशाची रेषा आकाशात गेलेली दिसली, ज्याचा अर्थ ' शहराची देवता शहर सोडून गेली ' असा काढून सगळ्यांनी पराभवाची खूणगाठ मनाशी बांधली होती.
या घटनेचे अनेक दूरगामी परिणाम युरोप आणि अरबस्तानच्या इतिहासावर झाले. युरोपमध्ये या घटनेमुळे भूकंप झाला. ख्रिस्ती धर्माच्या लोकांचा सुरुवातीला या घटनेवर विश्वासच बसला नाही. युरोपमधल्या चर्चचा प्रभाव पूर्वेकडच्या देशांमधून जवळ जवळ लयाला गेला, ज्यामुळे मुस्लिम धर्माच्या साम्राज्यांना या अरबस्तान, लेव्हन्ट, पूर्व युरोप आणि उत्तर - पूर्व आफ्रिकेच्या भूभागावर आपल्या सत्तेचा विस्तार करण्याची संधी मिळाली. ऑटोमन साम्राज्यात बाकीच्या अल्पसंख्यांक धर्मांना आणि पंथांना जरी मान्यता असली, तरी मुस्लिम आणि त्यातही सुन्नी मुस्लिम धर्म या भागात चांगलाच प्रबळ झाला.
या सगळ्या परिणामांपेक्षा महत्वाचा एक परिणाम या घटनेचं महत्व विशद करण्यास पुरेसा ठरेल, तो हा, की या घटनेमुळे तुर्की साम्राज्य अतिशय प्रबळ झालं आणि खलिफापदाचा मान अरबांकडून तुर्कांकडे गेला. आत्ताच्या सौदी अरेबियाच्या बऱ्याचशा प्रदेशावर - मक्का आणि मदिना या शहरांसकट - आणि इराक-सीरिया-जॉर्डनच्या बऱ्याचशा भूभागावर ऑटोमन साम्राज्य प्रस्थापित झालं. अरबांचा प्रभाव या प्रदेशात नगण्य झाला. ते पुन्हा वाळवंटात जे गेले, ते पुढची काही शतकं चाचपडतंच राहिले. त्यांच्यापैकी जे त्यातल्या त्यात सुसंघटित होते, त्यांनी तुर्कांची चाकरी पत्करून आपल्या किडूकमिडूक ' साम्राज्यांना ' तुर्कांचं अंकित करून सुरक्षित केलं. तुर्की लोक आता ऐटीत मक्केच्या यात्रेसाठी येऊ लागले. या भागातल्या लोकांचं उत्पन्न आता केवळ तीर्थयात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंवर यायला लागलं. फक्त भारतात मात्र चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात अल्लाउद्दीन खिलजीनंतर तुर्की सल्तनतीला ग्रहण लागलं ते मुघलांच्या आगमनानं.
जगाच्या इतिहासातली एक अविस्मरणीय आणि युद्धशास्त्राच्या दृष्टीने असाधारण लढाई म्हणून कॉन्स्टॅन्टिनोपलच्या या लढाईचं महत्व आहे. या लढाईने रेनेसाँस नावाने ओळखल्या जाणाऱ्या युरोपातल्या नवनिर्मितीच्या युगावरही चांगलाच प्रभाव टाकला. बायझंटाईन साम्राज्याच्या अनेक लोकांनी युरोपात आसरा घेतला आणि आपल्या वैभवशाली साम्राज्याच्या इतिहासातून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आणि कलाकौशल्याचा युरोपातल्या स्थानिक कलाकौशल्याशी संगम घडवून आणून त्यांनी पुढे युरोपचं पुनरुत्थान घडवून आणलं. इटली आणि रोम जगाच्या ख्रिश्चन धर्मियांचं केंद्र झालं, तेही याच कारणामुळे.
पुढच्या शतकांमध्ये अरबस्तानात अनेक महत्वाच्या घडामोडी घडणार होत्या. पुढचा काळ होता युरोपच्या व्यापारी आणि साम्राज्यवादी विचारसरणीच्या महासत्तांनी जगाची आपापल्या मर्जीने वाटणी करून घ्यायचा. या सगळ्यात पुन्हा एकदा महत्व येणार होतं लेव्हन्टच्या आणि अरबस्तानच्या दक्षिण - पूर्व भागाला. मधल्या वाळवंटात मात्र सुन्नी इस्लामच्या एका नव्या शाखेचा उदय होणार होता, ज्यामुळे या भागात हळू हळू रक्तपाताच्या मार्गाने अतिरेकी विचारसरणीची बीजं पेरली जाणारं होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users