अरबस्तानचा इतिहास - भाग १४

Submitted by Theurbannomad on 22 February, 2021 - 16:43

अधर्मयुद्धं आणि धर्मयुद्धं

उमय्याद आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाल्यावर त्यांना वेसण घालणारं कोणी उरलं नाही. त्यांनी आपल्या विजयाच्या धुंदीत आपल्या आजूबाजूच्या प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. यथावकाश त्यांनी इस्लामिक साम्राज्याची धुरा आपल्या हाती घेतली आणि उत्तर आफ्रिकेत इस्लाम धर्म विस्तारला. एका टोकाकडच्या अरबी समुद्रापासून दुसरीकडे थेट भूमध्य समुद्राच्या भागापर्यंत त्यांनी इस्लामचा झेंडा रोवला. आपल्या जवळच्या लोकांची वर्णी या प्रांतांमधल्या अमीरपदावर लावून त्यांनी आपली प्रशासकीय पकड घट्ट केली.
या उम्मयाद कुटुंबाचे जवळचे नातेवाईक म्हणजे अबू अल अब्बास. हे अब्बासिद घराण्याचे वंशज, उम्मयादांचे चुलते. इ.स. ७४९ मध्ये त्यांनी समस्त उम्मयाद कुटुंबियांना आपल्या घरी मेजवानीसाठी पाचारण केलं. मेजवानी म्हंटल्यावर झाडून सगळे उम्मयाद कुटुंबीय अब्बासिदांच्या घरी आले. हे आमंत्रण म्हणजे उम्मयाद कुटुंबासाठी सैतानाच्या घरचं आमंत्रण ठरलं. एका झटक्यात ऐंशी उम्मयाद अब्बासिदांनी अल्लाहच्या दरबारात पाठवले. अब्द अल रहमान हा एकमेव उम्मयाद त्यातून कसाबसा निसटला आणि पार स्पेनला पळून गेला. तिथे त्याने कालांतराने 'अल अंदलास' नावाचं युरोपमधलं पहिलं मुस्लिम राज्य वसवलं. इस्लाम धर्म युरोपात अशा विचित्र पद्धतीने शिरला.
इथे अब्बासिद आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाले आणि त्यांनी लगेच आपल्या साम्राज्याचा लवाजमा हलवला तो थेट बगदादला. दमास्कसच्या आजूबाजूच्या भागात उम्मयादांचं वर्चस्व अनेक वर्ष होतं, त्यामुळे इथे फंदफितुरीची शक्यता जास्त होती. शिवाय पूर्वेला खोलवर पसरलेल्या इस्लामिक साम्राज्याकडे लक्ष देणं गरजेचं होतंच. मक्का आणि मदिनाही त्याच दिशेला. या अब्बासिदांनी बगदादला वस्ती करून राहिलेल्या शिया मुस्लिम लोकांना गोड गोड बोलून आपल्या बाजूला ओढलं. या शिया लोकांना उम्मयाद वंशाचा नायनाट करणारे अब्बासिद जवळचे वाटले. आपल्या खलिफाच्या मृत्यूचा बदला या अब्बासिदांनी घेतला, अशा भावनेने त्यांनी अब्बासिदांना पाठिंबा दिला. आजूबाजूच्या भागात बस्तान बसवायला त्यांनी लागेल ती आणि लागेल तितकी मदत अब्बासिदांना केली. हे करत असताना सत्तेत वाटा मिळून आपलं भविष्य सुधारेल, अशा भ्रमात हे शिया लोक होते.
अब्बासिद कुटील राजकारणाचे मेरुमणी. त्यांनी जरी उम्मयाद घराण्याचा निर्वंश केला असला तरी त्यांच्या त्या कृत्यात भरलेला विश्वासघात ओळखण्यात शिया लोक कमी पडले. आपला मतलब साध्य झाल्यावर अब्बासिदांनी शिया लोकांनाही बाजूला केलं. हळू हळू इराकच्या विस्तीर्ण भूभागावर त्यांनी आपलं निशाण रोवलं. हे शिया इराकमध्ये बाजूला सारले गेले, ते पुन्हा सत्तेत यायला २००६ साल उजाडावं लागलं यावरून त्यांच्याशी अब्बासिदांनी केलेल्या विश्वासघाताची कल्पना येऊ शकते.
या अब्बासिदांनी आपल्या राज्याच्या कारभारासाठी पर्शियन अधिकाऱ्यांचा उपयोग करून घेतला. शिवाय अरबेतर मुस्लिम लोकांनाही आपल्या कारभाराची घडी बसवण्यासाठी आपल्यात सामील करून घेतलं. आठव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतच्या काळ इस्लामिक धर्माचा भरभराटीचा काळ म्हणून ओळखला जातो. या सुवर्णयुगाची सुरुवात केली 'हारून अल रशीद' या अब्बासिद सम्राटाने. बगदाद शहर या काळात समस्त इस्लामच्या साम्राज्याचा केंद्रबिंदू झालं होतं. इ.स. ७८६ ते ८०९ या २३ वर्षाच्या कालखंडात हारून अल राशीदने बगदादचं जगप्रसिद्ध ग्रंथालय उभारलं. हे तेव्हाच्या काळातील सर्वाधिक ग्रंथ असलेलं एक महत्वाचं ग्रंथालय असल्यामुळे त्याला 'माहितीचा खजिना' अशा अर्थाचं संबोधन आजही इराकी लोकांमध्ये प्रचलित आहे.
अरबी संस्कृतीच्या महत्वाच्या काठांपैकी एक असलेल्या कथा म्हणजे 'अरेबियन नाईट्स '. हा हारून अल रशीद या कथांचा नायक. अवघ्या विसाव्या वर्षी तो सिंहासनावर बसला आणि त्रेचाळिसाव्या वर्षी त्याने सत्तेच्या आकर्षणातून स्वतःची मुक्तता स्वेच्छेने करून घेतली. वैराग्यच पत्करलं. राज्य आपल्या दोन मुलांमध्ये वाटून टाकलं. परंतु आपल्या तेवीस वर्षांच्या कारकिर्दीत बगदादला त्याने ग्रीक, भारतीय, पर्शियन, अरब आणि आजूबाजूच्या इतरही अनेक संस्कृतींचा मिलाफ घडवून आणला. इतर भाषांमधल्या अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची भाषांतरं अरबी भाषेत त्याने करून घेतली. कलेच्या प्रांतात मुक्त मुशाफिरी करू दिली. या
सुरुवातीला रोमन बायझेंटाईन साम्राज्याने अरबस्तानच्या प्रांतात घुसण्यासाठी चालवलेली धडपड त्याने यशस्वीपणे थांबवली. स्वतःचा पराक्रम सिद्ध करून दाखवला. परंतु पुढे पुढे राज्यकारभाराकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. त्याच्या राज्याच्या प्रांतांमध्ये स्वयंभू सुभेदार निर्माण झाले आणि त्यांनी हळूच आपली वेगळी चूल मांडायच्या हालचाली सुरु केल्या. आपल्या वैराग्यामुळे असेल, पण हारून अल राशीदला त्याचं विशेष काही वाटत नव्हतं. त्याच्या मुलांच्या काळात हळू हळू अब्बासिदांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.
पुढच्या दोन शतकांमध्ये एका बाजूला आचके देत कसंबसं अब्बासिदांचं इस्लामी साम्राज्य तग धरून राहिलं आणि दुसरीकडे युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माने जोर पकडला. अकराव्या शतकात युरोपात पुन्हा एकदा धर्माभिमानाचे वारे वाहू लागले. लक्ष्य होतं अर्थात जेरुसलेम आणि आसपासचा परिसर. जेरुसलेम, बेथलेहेम, नाझरेथ ही शहरं ज्यू, मुस्लिम आणि ख्रिस्ती या तिन्ही धर्मीयांसाठी महत्वाची. ज्यू कधीच परागंदा होऊन विखुरलेले. मधल्या काळात मुस्लिम लोकांनी या प्रांतांवर ताबा मिळवलेला. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्ती धर्मियांच्या ताब्यात ही पवित्र स्थळं आणावीत अशा आकांक्षेने युरोपीय ख्रिस्ती राजे आता सज्ज झाले.
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या 'क्रूसेड्स' म्हणजे धर्मयुद्धांचा हा काळ. अकराव्या शतकापासून युरोपियन ख्रिस्ती लोक अरब प्रांतांवर चालून येत होते. आठ वेळा त्यांनी आक्रमणं केली. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरच्या एकर, हैफा, जॅफ्फा अशा शहरांमध्ये पलीकडून या युरोपीय फौजा उतरायच्या. तिथून या धर्मयुद्धाला सुरुवात व्हायची. मुस्लिमांना मागे सारत जेरुसलेम काबीज करायचं आणि तिथे आपलं प्रशासन आणायचं हा त्यामागचा उद्देश. १०९५ साली सुरु झालेल्या पहिल्या क्रुसेडमध्ये खुद्द पोप याने ख्रिस्ती धर्मिय सैन्याला विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता. १०९८ पर्यंत युरोपियन सैन्य इराकच्या मोसूल प्रांतापर्यंत येऊन धडकलं. १०९९ साली अखेर जेरुसलेम पडलं आणि पहिल्या क्रुसेडमध्ये ख्रिस्ती लोकांनी पुन्हा या अभागी शहरावर आपली सत्ता आणली. फ्रेंच आणि नॉर्मन लोकांनी कब्जा मिळवताना केलेल्या संहारात जेरुसलेम भकास झालं. लाखोंच्या संख्येने लोकांची कत्तल झाली आणि अखेर हे पहिलं धर्मयुद्ध संपलं.
तुर्कीक प्रांतातल्या इमाद अल-दिन झेंगी या महत्वाकांक्षी सरदाराने मोसूल, अलेप्पो, हामा आणि पुढे एदेसा येथपर्यंत आपला अंमल प्रस्थापित करून आपल्याला त्या प्रांताचा 'आताबेग ' म्हणजे राज्यकारभारी म्हणून घोषित केलं. त्याच्यानंतर त्याचा एक मुलगा सैफ अद-दिन मोसूलचा आणि दुसरा नूर अद-दिन अलेप्पोचा आताबेग झाला. पोपने अखेर या सगळ्याचा बिमोड करण्यासाठी दुसऱ्या धर्मयुद्धाची नांदी छेडली. याही वेळेस जेरुसलेम येथे युद्ध झालं. युरोपियन सैन्याने दमास्कस आणि भोवतालच्या प्रांतावर हल्ले केल्यामुळे जेरुसलेम आणि दमास्कस यांच्यात अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम झाला. अखेर दमास्कसच्या महत्वाच्या लोकांनी युरोपियन सैन्याला दूर करून तुर्कीक सैन्याला पाठिंबा दिला आणि युरोपीय सैन्य माघारी गेलं.
तिसऱ्या आणि अंतिम धर्मयुद्धात मात्र युरोपियन फौजांना चांगलाच दणका लागला. या वेळी इजिप्तला राज्य होतं फातिमिदांचं. हे प्रेषित मोहम्मदांच्या मुलीच्या - फातिमाच्या वंशातलं घराणं. जेरुसलेमला ख्रिस्ती लोकांकडून होणाऱ्या रक्तपातामुळे हे फातिमिद संतापलेले असले, तरी त्यांना ख्रिस्ती सैन्य आपल्या अंगावर घ्यायची आपली ताकद नाही हे माहित होतं. परंतु ११६४ साली आपल्या काकांबरोबर - शिरूख याच्याबरोबर आपल्या तुर्किक सम्राट नूर अद-दिन याच्या आदेशानुसार अल-आदीद या पौगंडावस्थेतल्या फातिमिद खलिफाला राज्यकारभारात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने मदत करायला आलेल्या सलाहुद्दीन नावाच्या तरुण योद्ध्याने पुढे क्रुसेडमध्ये महत्वाची भूमिका बजावली. हा सलाहुद्दीन मूळचा सद्दाम हुसेनच्या तिक्रित गावचा. कुर्दिश सुन्नी मुसलमान. हे कुर्दिश वंशाचे लोक अतिशय शूर, साहसी आणि निष्णात लढवय्ये. तशात या लोकांचा वावर उत्तर इराकच्या भागातल्या डोंगरदऱ्याच्या परिसरातला असल्यामुळे ते जात्याच टणक. याने आपल्या फौजेला बरोबर घेऊन धर्मयुद्धात युरोपियन फौजांना धडा शिकवायचा निर्णय घेतला. त्याचा तडाखा इतका जबरदस्त होता, की युरोपियन फौजा कशाबशा आपल्या मायभूमीत पळून गेल्या.
युरोपियन फौजांनी या सलाहुद्दीनचा धसका इतका घेतला, की त्याच्या नावाने इंग्लंडच्या राजाने करखातं तयार करून लोकांवर 'सलाहुद्दीन टाइद ' नावाचा कर बसवला. उद्देश हा, की येणाऱ्या पैशांतून सैन्य वाढवता यावं. जर हा कर भरायचा नसेल तर एकाच पर्याय होता - सैन्यात भरती होण्याचा. शिवाय इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या तीन राष्ट्रांनी मिळून आपलं सैन्य एकत्र केलं आणि जेरुसलेम काबीज करण्याचा प्रयत्न केला. याही वेळी सलाहुद्दीन याने आपल्या शूर कुर्दिश सैन्याच्या जोरावर युरोपियन सैन्याची दाणादाण उडवली. युरोपियन लोकांची झालेली दशा इतकी वाईट होती, की त्यांनी या सलाहुद्दीनच्या पराक्रमापुढे हाय खाल्ली.
या सगळ्या धुमश्चक्रीत सलाहुद्दीन पॅलेस्टाईन भागात आला आणि स्थिरावला. इजिप्त, पॅलेस्टाईन, सीरिया आणि आजूबाजूचे प्रांत काबीज करून त्याने आपल्या अयुबीद साम्राज्याची स्थापना केली. ११९३ साली त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलांनी साम्राज्य हाती घेतलं. दुर्दैवाने या शूर सम्राटाची पुढची पिढी यथातथाच निघाली आणि हे साम्राज्य अल्पावधीत लयाला गेलं.
फ्रेडरिक दुसरा हा रोमन सम्राट आणि नववा लुई हा फ्रेंच सम्राट आता एकत्र आले आणि त्यांनी जेरुसलेम मिळवायचे प्रयत्न करण्याची नव्याने सुरुवात केली. थोड्याबहुत यशानंतर अखेर १२९१ साली इजिप्तच्या लोकांनी युरोपियन लोकांना मागे ढकललं आणि शेवटी हाती धुपाटणं घेऊन युरोपियन पुन्हा आपल्या देशात गेले. आठ धर्मयुद्ध लढूनही युरोपियन देशांच्या हाती इजिप्तपासून अरबस्तानच्या भूमीतली तसूभरही जागा आली नाही. 'हेचि काय फळ मम तपाला ' असा रास्त विचार करून त्यांनी शेवटी जेरुसलेम मिळवायचा नाद सोडून दिला.
या काळात आशियाच्या उत्तरेला एक नवं साम्राज्य उदयाला आलं होतं - चंगेझ खानाचं मंगोल साम्राज्य. सुरुवातीच्या काळात टोळीयुद्धाच्या स्वरूपाच्या चकमकींमधून चंगेझ खानाने मंगोलियाच्या विस्तीर्ण पठारावर आपला एकछत्री अंमल स्थापन केला. थेट चीनच्या भूमीवर रक्ताचे सडे पाडले आणि आपलं साम्राज्य विस्तारलं. त्याचा त्याच्याइतकाच क्रूर आणि पराक्रमी नातू हुलागू खान आपल्या प्रचंड मंगोल सेनेसह या प्रांतात घुसला. आपल्या मंगोल सम्राट असलेल्या भावाच्या - मोंगके खानाच्या आदेशावरून मुस्लिम साम्राज्याचा पूर्ण बिमोड करण्याची जबाबदारी अंगावर घेऊन तो वाऱ्याच्या वेगाने पर्शियाच्या बाजूने अरबस्तानच्या भूमीत शिरला.
या मंगोल सैन्याचं लक्ष्य होतं बगदाद. कर्दनकाळ हुलागू खान आपापल्या सैन्यासह बगदादला आला आणि त्याने या सुसंस्कृत आणि संपन्न शहराची रयाच पालटली. अनेक वर्षांच्या परिश्रमाने तयार केलेल्या बगदादच्या प्रचंड ग्रंथालयाच्या पुस्तकांवर मंगोल सैन्य तुटून पडलं. नकाशे, पुस्तकं, हस्तलिखितं यापैकी काहीही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्या ज्ञानभांडाराला टराटरा फाडून नदीत फेकून देताना रानटी मंगोल सैन्य बेभान झालं. अब्बासिद घराण्याच्या खलिफाला संपवून त्यांचा मोर्चा सीरियाच्या अयुबीद साम्राज्याकडे वळला. त्यांचीही अवस्था फार वेगळी झाली नाही.
आता वेळ आली होती इजिप्तची. या भागात मात्र त्याची डाळ शिजली नाही ती मामलुकांमुळे. हे मामलुक मूळचे तुर्की. अब्बासिद सम्राटांनी आपल्या सैन्यात त्यांना भरती केलं ते आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आपणच नेमून दिलेल्या सुभेदारांवर नजर ठेवण्यासाठी. तुर्कांशीवाय या मामलुक गुलामांमध्ये इजिप्शियन कॉप्टिक ख्रिश्चन्स, सिरकासीयन, अबखाझियान आणि जॉर्जियन लोकही होते. आपल्या पराक्रमामुळे त्यांनी हळू हळू इजिप्त आणि सीरियाच्या प्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि १२५० साली त्यांनी तेथे आपली ' मामलुक सल्तनत ' स्थापन केली. आधीच्या धर्मयुद्धांमध्ये युरोपियन ख्रिश्चनांना मागे रेटण्यात त्यांनी पराक्रमाची शर्थ केली होती आणि त्यात ते यशस्वी झालेले होते. या अनुभवाचा फायदा त्यांना मंगोल टोळ्यांशी दोन हात करण्यात झाला.
या मामलुकांनी मंगोलांना इजिप्तमध्ये शिरण्यापासून रोखलं. सिरिया प्रांताचा मामलुक अमीर बायबर्स याने हुलागू खान आपल्याकडे येत असल्याचं बघून दमास्कस सोडलं आणि थेट इजिप्शियन मामलुक सुलतान कुतुझ याच्या आश्रयाला तो आला. हुलागू खानाने दमास्कसचा घास पचवल्यावर कुतुझला शरणागती पत्करण्याची धमकी दिली. याच वेळी सुदैवाने मोंगोलियामध्ये मोंगके खान चीनच्या मोहिमेवर असताना सॉंग सम्राटांबरोबरच्या लढाईत मारला गेला आणि आपल्या सम्राटाच्या ' कुरुलताई 'च्या ( दहन ) प्रसंगी हजर राहायला हुलागू खानाने आपली सेना माघारी वळवली. त्याच्यामागे त्याने केवळ १८००० सैनिकांची कुमक देऊन कितबुका नावाच्या आपल्या मंगोल ख्रिस्ती सरदाराला सीरियामध्ये ठेवलं.
मामलुकांनी ही संधी साधून ऐन जालूत या ठिकाणी मंगोल सैन्यावर हल्ला केला आणि कितबुकाला बंदी बनवून त्याचं सार्वजनिक शिरकाण केलं. या सगळ्यात बायबर्सला कुतुझने मदत केली खरी, पण त्याचं पांग बायबर्सने फेडलं विश्वासघाताने. कुतुझला कपटाने संपवून बायबर्स मामलुकांचा सम्राट झाला. पुढेही ही परंपरा सुरूच राहिली. बायबर्सचा अंत झाला विषबाधेने. त्याची दोन मुलं पुढे मामलुक सुलतान झाली, परंतु अल्पावधीसाठीच. सत्तेसाठीच्या साठमाऱ्या मामलुकांच्या पाचवीला पुजलेल्या असल्यामुळे जो सरदार अथवा अमीर प्रबळ, तो सुलतानाच्या विरोधात कटकारस्थानं करून सत्ता आपल्या हाती घेई. अखेर या सुंदोपसुंदीतून दोन-तीन शतकांच्या कालावधीत मामलुक पूर्णपणे नामशेष झाले. आपल्या दिल्लीच्या तख्तावर आलेला कुतुबुद्दीन ऐबक हासुद्धा मामलूकच होता.
या सगळ्या रणधुमाळीतून अरबस्तान आणि लेव्हन्टच्या प्रांतात एक महत्वाचा बदल घडून आला. आत्तापर्यंत मुस्लिम खलिफापदाचा मान या ना त्या रूपाने अरब लोकांच्या वाट्यालाच आलेला होता. आपापसात कितीही हेवेदावे असले, तरी आजवर बिगरअरब लोकांकडे हा मान गेला नव्हता. क्रुसेड्स आणि पुढच्या लढायांमध्ये या प्रांतातले अरबेतर लोक - जे एक तर अरब सम्राटांचे सरदार होते, प्रांत-सुभेदार होते किंवा गुलाम - स्वतः इतके प्रबळ झाले कि त्यांनी आपले स्वतंत्र संसार थाटले. अरबांचं महत्व मुस्लिम जगतात आणि सत्ताकारणातही कमी कमी होत गेलं. शेवटी या सगळ्यातून प्रबळ झाले ते तुर्की लोक.
१०७१ सालीच सेलजुक तुर्की लोकांनी मांझींकर्ट येथे बायझेंटाईन सैन्याचा केलेला पाडाव ही त्या परिसरातली तुर्की लोकांच्या वर्चस्वाची नांदी होती. १२४३ सालच्या मंगोल आक्रमणापर्यंत तुर्की साम्राज्य अनातोलिया प्रांतावर - ज्यात आजच्या तुर्कस्तानचा बराचसा भूभाग येतो - ऐसपैस पसरलं होत. क्रुसेड्स झाल्या आणि त्यात तुर्की लोक भरडले गेले आणि शेवटी मंगोलांनी त्यांना आपलं अंकित केलं. तुर्की साम्राज्य लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलं गेलं. हे तुकडे मंगोलांच्या पायांवर निष्ठा अर्पण करून त्यांचे मांडलिक झाले.
१२९९ साली त्यांच्यातल्या उघूझ तुर्क वंशाच्या काहींनी वायव्य अनातोलिया प्रांतात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. पहिला ओस्मान हा त्यांचा नेता. त्याच्या नावावरून या नव्या साम्राज्याला ' ऑटोमन ' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. सुरुवातीला अगदीच किडूकमिडूक वाटणाऱ्या या साम्राज्याने पुढे अक्राळविक्राळ विस्तार करून दाखवला. १९२२ साली अस्ताला जाईपर्यंत हे ऑटोमन साम्राज्य अस्तित्वात होत, यावरून त्यांच्या इतिहासावरच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो.
बोस्फोरसच्या खाडीच्या दोन्ही तीरांवर वसलेलं एक सुंदर शहर म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल. हे शहर वसवलं होतं कॉन्स्टंटाईन द ग्रेट या रोमन सम्राटाच्या नावावरून ओळखलं जाणारं हे शहर रोमन साम्राज्याचं एक महत्वाचं ठाणं. मुळात आशिया आणि युरोप खंड जिथे एकमेकांशी हस्तांदोलन करतात, त्या मोक्याच्या जागी असल्यामुळे या शहराचं भू-सामरिक महत्व प्रचंड. येथील हवामान आल्हाददायक आणि लेव्हन्टच्या प्रदेशातल्या सगळ्या मोक्याच्या जागा खुष्कीच्या मार्गाने या शहराशी जोडलेल्या. व्यापार, संरक्षण, दळणवळण आणि राजकारण या सगळ्याच दृष्टीने या शहराचं इतिहासातलं महत्व मोठं. या शहराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एक भाग आशिया आणि दुसरा युरोप खंडात. अनेक वर्षांच्या रोमन वास्तुकलेची साक्ष पटवून देणाऱ्या भव्य इमारती अजूनही येथे बघायला मिळतात.
बलाढ्य बायझेंटाईन रोमन साम्राज्याच्या अखत्यारीत त्यांनी या शहराला मजबूर तटबंदीने संरक्षित केलं होतं. शिवाय मोक्याच्या जागी बुरुज बांधून त्यांनी बोस्फोरसच्या खाडीत प्रवेश करणाऱ्या एका एका पडावाला, जहाजाला आणि गलबताला आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवलं होतं. पलीकडून रोमन साम्राज्याची कुमक समुद्रमार्गे कधीही अल्पकाळात उपलब्ध होऊ शकेल, अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शहररचनेचं नियोजन केलं होतं. तटबंदीच्या आत रोमन वास्तुकलेची माहिती सांगणाऱ्या असंख्य भव्यदिव्य इमारती होत्या आणि आजही आहेत. जगप्रसिद्ध आया सोफ्या, थिओडोसिसचा ओबेलिस्क , कमानींवर उभारलेली ' अक्वाडक्ट्स ' - ज्याच्याद्वारे पाणी शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलं जाई, रोमन ख्रिस्ती धर्मियांनी वसवलेली चर्च अशा एक ना अनेक वास्तू या शहराचा वैभवशाली इतिहास आजही दाखवून देतात.
इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली एक अद्वितीय लढाई या शहरात लढली गेली. बलाढ्य बायझेंटाईन रोमन साम्राज्य आणि नुकताच मिसरूड फुटलेला तुर्की सम्राट मेहमत यांच्यात १४५३ साली लढल्या गेलेल्या या लढाईत रोमन साम्राज्याचा पाडाव होऊन ख्रिस्ती धर्माच्या अमलाखाली असलेल्या या कॉन्स्टॅन्टिनोपलचं मुस्लिम धर्मात धर्मांतरण झालं. मेहमत याच्या वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकता आलं नव्हतं, परंतु त्यांचं हे स्वप्न पूर्णत्वाला नेलं त्यांच्या कर्तृत्ववान मुलाने.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय. बगदादच्या ग्रंथालयावरच्या हल्ल्याबद्दल वाचून फार दु:ख झालं. किती आणि कसला कसला ग्रंथसाठा नष्ट झाला असेल Sad