अरबस्तानचा इतिहास - भाग १३

Submitted by Theurbannomad on 22 February, 2021 - 16:41

शकलं

प्रेषित मोहम्मदांच्या इस्लामस्थापनेच्या कार्यात त्यांना मदत केली दोन गटांनी. एक होता मूळच्या मक्का शहरातल्या त्यांच्या अनुयायांचा गट, जे इस्लामचे आद्य अनुयायी होते आणि दुसरा मदिनावासियांचा गट, ज्यांनी मोहम्मदांचं रक्षण करून त्यांच्या नेतृत्वाखाली उम्माह स्थापन केला होता. त्या अर्थाने ते इस्लामिक साम्राज्याचे आद्य नागरिक. या मदिनाच्या लोकांच्या गटाचं नाव होतं 'अन्सार '. अन्सारचा अर्थ होतो मदत करणारे. त्यांनी एकत्र जमून परस्पर निर्णय घेतला तो आपल्यातल्याच एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडे उम्माची सूत्र सोपवण्याचा.
हे ऐकून मक्केच्या गटाचे लोक चवताळले. त्यांनी या सभेच्या ठिकाणी धाव घेतली. अखेर या दोन गटांमध्ये संघर्ष पेटतो की काय, अशी बिकट अवस्था निर्माण झाली. परिस्थिती अवघड होती.
अखेर सगळ्यांनी मोहम्मदांच्या बायकोच्या - आईशाच्या वडिलांना म्हणजेच प्रेषितांच्या सासऱ्यांना आपल्या उम्माचा प्रेषितांनंतरचा प्रमुख म्हणून निवडलं. ही निवड दोन्ही बाजूच्या गटांना मान्य होती, कारण हे अबू बक्र मोहम्मदांबरोबर सावलीसारखे असायचे आणि मोहम्मदांच्या शिकवणुकीने प्रभावित होऊन त्यांनी आपली अमाप संपत्ती धर्मकार्यासाठी दान केली होती. परिसरात ते चांगलाच आब राखून होते. हे मूळचे मक्कावासीय असल्यामुळे अन्सारींचा गट काहीसा खटटू झाला, परंतु त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच इतका आदर होता की त्यांच्या नावावर एकमत व्हायला फारसा वेळ गेला नाही.
मक्कावासीयांमध्येही दोन गट होते. एक अबू बक्र यांना पाठिंबा देणारा आणि दुसरा मोहम्मदांचे चुलतभाऊ आणि जावई असलेले अली यांना पाठिंबा देणारा. परंतु दुसऱ्या गटाने तात्पुरती माघार घेतली. अबू बक्र यांचं स्थान सगळ्यांना माहित होतं. आता प्रश्न आला तो हुद्द्याचा. प्रेषित फक्त मोहम्मद असू शकतात, त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी कोणत्या नावाने ओळखले जाणार, असा तो प्रश्न. शेवटी अबू बक्र यांनी स्वतःच या प्रश्नच उत्तर शोधलं. त्यांनी मोहम्मदांच्या वारासदारांसाठी ' खलिफात रसूल अल्ला 'अशी पदवी तयार केली. या पदवीचा अर्थ प्रेषितांचे उत्तराधिकारी. अशा प्रकारे अबू बक्र उम्माचे पहिले खलिफा म्हणून इतिहासात अजरामर झाले.
यांच्या कारकिर्दीची सुरुवातच झाली आजूबाजूच्या अरब टोळ्यांच्या बंडाळीच्या त्रासाने. या बंडाळीला मोडून काढणं जरुरीचं होतं, कारण प्रत्येक बंडखोर टोळीवाल्या नेत्याने स्वतःला प्रेषिताच्या दर्जाचं घोषित करून मोहम्मदांच्या पावलांवर पॉल ठेवून आपली वेगळी चूल मांडायचा प्रयत्न केला होता. रिददा संघर्ष या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्या लढायांमध्ये या सगळ्यांचा बिमोड झाला. या सगळ्यातून मार्ग निघतो, तोच घरचं संकट उभं ठाकलं. नजद भागातल्या बानू फाझरा आणि बानू तमिम या टोळ्यांनी आपल्या प्रांताचा आखून दिलेला कर भरण्यावरून वाद उकरून काढला. बहारिन आणि ओमानच्या भागातल्या काही टोळ्यांनी मोहम्मदांच्या निधनाची संधी साधून इस्लामच्या प्रसारात अडथळा आणायचा प्रयत्न करायला सुरुवात केली.
शेवटी या सगळ्याचा निकाल लावण्यासाठी अबू बक्र यांनी आपलं सैन्य सज्ज केलं. एक एक करत या सगळ्यांचा त्यांनी चांगलाच बंदोबस्त केला. इस्लामच्या शिकवणुकीला अनुसरून स्थापन झालेला उम्मा अजूनही प्रबळ आहे आणि मोहम्मदांच्या निधनानंतरही या साम्राज्याची घडी व्यवस्थित आहे हा संदेश या सगळ्यातून अरबस्तानच्या कानाकोपऱ्यात गेला. अशा प्रकारे अरबस्तानावर आपली पकड बसवून अबू बक्र यांनी आपला मोर्चा पूर्वेकडच्या बायझेंटाईन आणि ससानियन साम्राज्यांकडे वळवला. ही साम्राज्यं आधीच शतकानुशतकं युद्ध करून जेरीला आलेली होतीच. ताज्या दमाच्या सुसज्जित मुस्लिम सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागणं अशक्य होतं. शेवटी पार पर्शिया आणि लेव्हन्टच्या भूमीपर्यंत मुस्लिम लोकांची मजल गेली.
या युद्धांमुळे एक अतिशय महत्वाची घटना घडली, ज्यामुळे अबू बक्र यांचे इस्लामिक जगतावर अनंत उपकार झाले. ६३२ सालच्या यामामाच्या लढाईत मोहम्मदांची कुराणाची शिकवण मुखोद्गत असलेले ३००च्या वर 'हाफज' मारले गेले आणि ही शिकवण शुद्ध स्वरूपात लिहून काढण्याचं महत्व अबू बक्र यांच्या लक्षात आलं. सामान्यतः तोपर्यंत कुराण एका व्यक्तीकडून वाचिक स्वरूपात दुसऱ्याकडे जात असे. पुढे चुकूनमाकून त्याच्या शुद्ध स्वरूपात कोणी आपल्या मनातल्या गोष्टी मिसळल्या किंवा लढाईत मृत्युमुखी पडून पुढच्या पिढीकडे कुराण पोचवण्यासाठी कोणी सुयोग्य जाणकार उरलाच नाही, तर प्रेषितांचे मौल्यवान विचार नष्ट होतील, या विचारांनी त्यांच्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या. या सगळ्यामुळे अबू बक्र यांच्या कारकिर्दीत कुराण लिखित स्वरूपात आलं. मोहम्मदांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी अशा प्रकारे सगळ्यांना वाचता येईल अशा स्वरूपातला पहिला कुराणाचा ग्रंथ तयार झाला आणि पुढे त्याच्या अनेक प्रती निघाल्या. या महत्वाच्या कामाबद्दल त्यांना सूचना केली ती त्यांच्या विश्वासातल्या उमर यांनी. अबू बक्र यांनी धर्मपंडितांचं मंडळ म्हणजे 'उलेमा 'स्थापन करून कुराणाचा सुसंगत अर्थ लावणं, व्यवहारातल्या नव्या प्रश्नांची आणि अडचणींची मीमांसा करून त्याचा धर्मसुसंगत तोडगा शोधणं आणि कुराणाच्या मूळ शिकवणुकीला पुढच्या पिढीकडे विशुद्ध स्वरूपात पोचवणं ही कामं त्यांना वाटून दिली.
अबू बक्र यांनी इस्लामची घडी अतिशय नीटनेटकी बसवली. आपल्या हयातीत आपल्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर करून पुढचा संघर्ष टाळावा, या उद्देशाने त्यांनी उत्तराधिकारीही नेमला. परंतु नेमका अली यांना तो मन न मिळता त्या जागी वर्णी लागली ती उमर यांची. हे तेच उमर, ज्यांनी कुराणाच्या लिखित स्वरूपाचा आग्रह अबू बक्र यांच्याकडे धरला होता. हे उमर इब्न अल-खताब कुराईश कबिल्याचेच. मोहम्मदांबरोबर मक्केहून मदिनेला गेलेल्यांपैकी एक. मोहम्मदांच्या जवळचे आणि अबू बक्र यांच्या खास मर्जीतले. अबू बक्र निरवर्तल्यावर त्यांनी उम्माचे दुसरे खलिफा म्हणून सूत्र हाती घेतली.
यांच्या काळात इस्लाम अतिशय वेगाने पसरला. वायव्येकडे थेट भूमध्य समुद्राच्या प्रांतांपर्यंत त्यांनी धडक दिली आणि प्रेषित मोहम्मदांच्या इसरा आणि मिराजच्या अनुभवांमध्ये त्यांनी ज्या पवित्र जेरुसलेमच्या भागातून सफर केली होती, त्या जेरुसलेम शहराला आपल्या साम्राज्यात आणलं. पुढे पार इजिप्त, तुर्की, लिबिया इतक्या खोलवर त्यांनी आपल्या इस्लाम धर्माचा झेंडा रोवला. वर उत्तरेला आजच्या अझरबैजान, आर्मेनिया आणि पर्शियाच्या कॉकेशस प्रांतातल्या भूभागावर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
उमर यांची इस्लामिक साम्राज्याला मिळालेली मोठी देणगी म्हणजे राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेची त्यांनी बसवून दिलेली घडी. इतक्या महाप्रचंड साम्राज्याला मदिना अथवा मक्का येथे बसून चालवणं अशक्य होतं. शेवटी त्यांनी आपल्या साम्राज्याचे १३ प्रांत आखून दिले. प्रत्येक प्रांताचा सुभेदार म्हणजे 'अमीर ' निवडून त्याचे अधिकार निश्चित केले. त्यांच्या सुव्यवस्थेचे उदाहरण म्हणजे त्या काळात अरबस्तानमध्ये आलेल्या दुष्काळात आणि प्लेगच्या साथीत झालेलं काम. अनेक अभ्यासकांच्या मते उमरने आखून दिलेली राज्यव्यवस्था इतकी चांगली होती, की आपापसातल्या सुनियोजनाने या संकटांवर इस्लामिक साम्राज्याने मात केली, तीही खूप जास्त प्रमाणात हानी न सोसता. ज्यू आणि ख्रिस्ती लोक या साम्राज्यात अल्पसंख्यांक असले, तरी नव्या प्रांतांना इस्लामिक साम्राज्याला जोडण्याच्या मोहिमेत मदत केल्याबद्दल त्याने त्यांना जमिनी आणि व्यापार करण्यासाठी लागणारं साहाय्य देऊन त्यांना समाधानी ठेवलं. त्याच्या काळात व्यापार भरभराटीला आला होता आणि इस्लामिक साम्राज्य आपल्या सुवर्णकाळात होतं.
नक्की कोणत्या कारणाने कोणास ठाऊक, पण खलिफा उमर यांच्या शरीरात अनेक वेळा खंजीर खुपसून त्यांना त्यांच्या एका पर्शियन नोकराने ठार केलं आणि या कर्तबगार खलिफाचा अकाली मृत्यू झाला. काही अभ्यासकांच्या मते आपल्या मायभूमीचा - पर्शियाचा घास घेतल्याचा राग त्याने अशा प्रकारे काढला असावा, परंतु या घटनेचे काही ठोस कारण उपलब्ध नाही. अशी आख्यायिका आहे, की आपल्या मृत्यूच्या आधी हज्ज यात्रेदरम्यान सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेला अनुसरून जेव्हा तिथे दगडफेक सुरु होती, तेव्हा एक दगड खलिफा उमर यांच्या डोक्याला लागला आणि ही हज्ज यात्रा त्यांची शेवटची ठरेल अशा प्रकारचा संदेश त्यांना ऐकू आला.
काहीही असलं, तरी एका कर्तबगार खलिफाचा हा असा अकाली मृत्यू इस्लामिक जगताला धक्का देणारा होता. या वेळी पुन्हा एकदा खलिफापदाचा मान कोणाला मिळणार, असा प्रश्न आला. हल्ल्यानंतर तीन दिवसांनी उमर यांनी प्राण सोडला. त्या तीन दिवसात त्यांनी सहा जुन्या जाणत्या लोकांची एक समिती नियुक्त केली आणि त्यांना पुढच्या खलिफापदासाठी सुयोग्य व्यक्ती निवडायची कामगिरी सोपवली.
अली यांनी या वेळी तरी आपल्या गळ्यात खलिफापदाची माळ पडेल, अशी आशा धरली होती पण तो मान गेला उथमान यांच्याकडे. हे उथमान प्रेषित मोहम्मदांच्या नात्यातले, त्यांच्याचं कुराईश कबिल्यातले पण वेगळ्या कुटुंबातले. त्यांच्या कुटुंबाचं नाव होतं उम्मयाद. या कुटुंबाचं हाशिम या प्रेषितांच्या मूळ कुटुंबाशी हाडवैर. तरीही त्यांची वर्णी खलिफापदावर लागली. या उथमान यांचं पूर्ण नाव उथमान इब्न अफ्फान.
या खलिफा उथमान यांच्या नियुक्तीने इस्लामिक जगतात नाराजी पसरली. दूरदूरच्या प्रांतात त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला. कारभार सांभाळणं त्यांना हळू हळू डोईजड होऊ लागलं. फुटीरांनी पुन्हा आपलं डोकं वर काढलं. अखेर इराकमधून आलेल्या काही बंडखोरांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक उथमान यांच्या निवासस्थानाला वेढा घातला आणि आत प्रवेश केला. ते बिचारे नमाज पढण्यात गर्क होते. बेसावध अवस्थेत नमाज पडत असतानाच त्यांच्यावर वार झाला आणि हातातल्या कुराणावर त्यांच्याच रक्ताचा अभिषेक झाला. जागीच खलिफा उथमान मृत्युमुखी पडले.
सरतेशेवटी चौथ्या वेळी मात्र अली यांना खलिफापदाचा मान मिळाला. शेवटी हा मान म्हणजे काटेरी मुकुट. तशात इराकी लोकांकडून उथमान यांचा खून झाल्याच्या जखमा ताज्या होत्याच. अली यांनाही अशाच निखाऱ्यांवरून चालावं लागलं. इजिप्तच्या लोकांना अली खलिफा म्हणून अमान्य होते. शिवाय अली यांच्या आजूबाजूच्या काहींना ते सलत होतेच. तशात उम्मयाद आणि हाशिम कुटुंबीयांमध्ये असलेल्या सुप्त वैराचा उद्रेक कधीही होऊ शकेल, अशी परिस्थिती झालेली होती. उथमान यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या जवळच्या लोकांची आणि कुटुंबीयांची वर्णी अमीरपदांवर लावलेली होती. त्यातला एक होता दमास्कसचा अमीर मुआविय्या. या वशिलेबाजीला खतपाणी न घालता मुआविय्या याला अमीरपदावरून काढण्याच्या हालचाली खलिफा अली यांनी सुरु केल्या आणि दोन कुटुंबियांच्या वैराचं भूत बाटलीतून बाहेर आलं. तशात खलिफा उथमान यांच्या हत्येला अली हेच कारणीभूत असल्याचे आरोप त्यांच्यावर उम्मयाद कुटुंबीयांनी केले.
मुआविय्या याच्या अखत्यारीत असलेला लेव्हन्टच्या भागाचा प्रदेश सधन. त्याने तिथल्या ताज्या दमाच्या सीरियन फौजेला जमवून थेट खलिफा अली यांच्यावर चाल केली. कुणकुण लागताच खलिफा अली यांनी मदिना शहरातून आपलं कामकाजाचं ठाणं नेलं ते थेट कुफा येथे. ही जागा होती युफ्रेटीस नदीच्या किनाऱ्यावर. तिथल्या लोकांनी अली यांना संपूर्ण सहकार्य करायचं वचन दिलं आणि लढाईच्या तयारीही मदत केली. दोन्ही बाजूच्या फौजा सीफिन या ठिकाणी भिडल्या आणि इस्लाममध्ये 'फितना' म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागरी युद्धाचे पडघम वाजले.
या युद्धात झालेल्या संहारानंतर अखेर दोन्ही बाजूंच्या सैन्याने वाटाघाटींचा मार्ग निवडून या भांडणाचा निकाल लावण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. अली यांना हे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. हातातोंडाशी आलेला घास उगीच घालवल्याबद्दल त्यांनी अली यांना दोष दिला. शेवटी तह होऊन अली यांच्या खलिफापदाला मान्यता देऊन मुआविय्या आपल्या प्रांतात परतला. स्वभावाप्रमाणे त्याने काही दिवसातच आपल्याला जेरुसलेमच्या पवित्र भूमीचा खलिफा म्हणून जाहीर केलं आणि संघर्षाचं पुढचं पाऊल पडलं.
या सगळ्याचा परिणाम झाला अली यांच्या हत्येत. इस्लामच्या खलिफापदाला लागलेला हा शाप अली यांनाही भोवला. तेही कुफा इथल्या मुख्य मशिदीत फजरचा नमाज पद्धत असताना त्यांना त्यांच्यावर नाराज असलेल्या एकाने विषारी बाण मारून अली यांना जखमी केलं. घाव वर्मी लागला होताच...अखेर दोन दिवसात अली यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा आणि मोहम्मदांचा नातू हुसेन इब्न अली आता खलिफापदाचा मानकरी झाला. तिथे मुआविय्यासुद्धा निजधामाला गेला आणि त्याचा मुलगा याझिद त्याच्या नंतरचा खलिफा झाला.
अशा प्रकारे मूळ मक्का आणि मदिना भाग बाजूलाच राहून इराकमधील कुफा आणि सीरियामधील दमास्कस अशी दोन सत्ताकेंद्र तयार झाली. दोन्हीकडे खलिफा होते. दोघेही स्वतःला इस्लामच्या आणि प्रेषित मोहम्मदांच्या शिकवणुकीच्या मार्गावर चालणारे खरे अनुयायी मनात होते. एकीकडे मक्का आणि दुसरीकडे जेरुसलेम असल्यामुळे प्रेषितांच्या पवित्र जागाही समसमान वाटल्या गेल्या होत्या. दोन कुटुंबियांमधलं हाडवैर आता एकमेकांच्या मुळावर उठलं होतं. शेवटी याझिदने आपल्या तीर्थरुपांनी अर्धवट सोडलेलं काम हाती घेतलं. आपल्या सैन्याची जमवाजमव केली आणि सीरिया - इराक या दोन देशांमधील वाळूचा प्रचंड पसारा तुडवत त्याच्या फौजा कुफाच्या दिशेला निघाल्या. खबर मिळताच हुसेन यांनीही आपल्या सैन्याची जमवाजमव केली आणि तेही निघाले.
तैग्रिस नदीच्या जवळच्या आजच्या इराक देशातल्या करबला येथे हुसेन यांच्या फौजा उतरल्या. पलीकडून याझिद यांच्या सैन्याने करबला गाठलं आणि तैग्रिस नदीच्या बाजूला तळ ठोकला. हुसेन यांच्या फौजा आणि तैग्रिस नदी यांच्या मध्ये नेमक्या याझिदच्या फौजा होत्या. त्यांनी हुसेन यांना नदीचं पाणी मिळू नये अशा प्रकारे आपले मोर्चे उभारले. आधीच याझिदच्या फौजा हुसेन यांच्या फौजांपेक्षा अधिक प्रबळ,त्यात त्या भागातील वैराण जमीन आणि वर आग ओकणारा सूर्य आणि हुसेन यांच्या बाजूचा पिण्याच्या पाण्याचा साठा संपत चाललेला. या विषम युद्धात अर्थात हुसेन यांचा निभाव लागणं अवघड होतं. दहा दिवस चाललेल्या युद्धात त्यांनी भाऊ हसन आणि त्यांचा मुलगाही गमावला. अखेर छावणीबाहेर त्यांना गाठून याझिदच्या सैन्याने त्यांचं डोकं उडवलं आणि याझिदला नजराणा म्हणून पेश केलं.
या घटनेने प्रेषित मोहम्मदांचा थेट वंशज असलेला त्यांच्याच हाशिम कुटुंबातला खलिफा हुसेन आणि त्याचे साथीदार हालहाल होऊन मृत्युमुखी पडले. कुफाच्या लोकांनी करबलाला प्रयाण केलं. आपण वचन देऊनही प्रेषितांच्या वंशजांना वाचवू शकलो नाही, या भावनेने त्यांनी तेथे हंबरडा फोडला. झाल्या प्रकाराला आपण जबाबदार आहोत, अशा समजुतीने त्यांनी छाती बडवून आक्रोश सुरु केला. आपल्या कृत्याचा प्रायश्चित्त म्हणून त्यांनी स्वतःला जखमा करून घ्यायला सुरुवात केली. आजही मोहर्रमच्या दिवशी ही प्रथा त्यांच्या वंशजांनी कायम ठेवली आहे.
अशा प्रकारे खलिफा अली, खालींग हुसेन आणि त्यांचे भाऊ हसन यांना मानणाऱ्या लोकांचा 'शिया' पंथ इस्लाममध्ये उदयाला आला. बाकीचे मुस्लिम 'सुन्नी'म्हणून ओळखले जाऊ लागले. दोन कुटुंबांच्या आपापसातल्या हाडवैराची परिणीती अखेर अशा रक्तरंजित अध्यायात झाली. हे वैर आता शतकानुशतकं अबाधित राहणार होतं. इस्लाम धर्म अशा प्रकारे स्थापनेच्या काही वर्षांमध्येच दुभंगला आणि जन्माला आलेले हे दोन्ही इस्लामिक पंथ आपापल्या वाटेने चालायला लागले. ही वाट जिथे जिथे एकमेकांना छेद देत गेली, तिथे तिथे रक्ताचे पाट वाहिले. प्रेषितांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरेचे अशा प्रकारे तुकडे करून आपापल्या अहंकाराची किंमत वसूल केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अशा प्रकारे खलिफा अली, खालींग हुसेन आणि त्यांचे भाऊ हसन यांना मानणाऱ्या लोकांचा 'शिया' पंथ इस्लाममध्ये उदयाला आला. बाकीचे मुस्लिम 'सुन्नी'म्हणून ओळखले जाऊ लागले.

हा एकच फरक आहे का दोन्ही पंथांत?

@ स्वप्ना राज
नाही . बाकी अनेक फरक आहेत पण ते नंतर चालीरीती , भौगोलिक परिस्थिती अशा सगळ्यातून तयार झाले आहेत. मूळ भेदाचा मुद्दा हाच.