खेळली अंताक्षरी

Submitted by निशिकांत on 21 February, 2021 - 11:30

ना कधी केली सुखांची लाळ घोटुन चाकरी
वेदनांच्या सोबतीने खेळली अंताक्षरी

सांगण्याविन प्रेम कळते, फक्त नजरेतुन तरी
ताज बांधुन का उगा प्रेमात केली मस्कारी?

तेच ते पण पाचवीला पूजले असले जरी
भेटते वाटेत केंव्हा टेकडी, केंव्हा दरी

सूट हिंदू धर्म देतो, धर्मियांना एवढी!
पूजतो तुळजा भवनी, तर कुणी शाखंभरी

मुखवट्यांचे विश्व सारे, प्रश्न पडतो नेहमी
कोण आहे साव आणिक कोण करतो तस्करी

कैकदा कोर्टात गेलो, फैसला झाला कुठे?
तारखा देणेच पुढच्या, काम उरले दप्तरी

रामही न्यायाधिशांचा आज आभारी असे
टाकला पडदा जयांनी जन्मस्थळ वादावरी

नश्वराचा ध्यास सुटला, भक्तिमार्गी लागता
वस्त्र झाले जीवनाचे केवढे ते भरजरी!

ती जरी "निशिकांत"ला सोडून गेली पण तरी
आठवण झाली सखीची, नेहमीची सोयरी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--गालगागा X ३ + गालगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users