अरबस्तानचा इतिहास - भाग १०

Submitted by Theurbannomad on 21 February, 2021 - 08:43

ख्रिस्ती धर्माचा उदय

लेव्हन्ट भागातल्या ज्यू आणि बाकीच्या टोळ्यांची अवस्था सततच्या आक्रमणामुळे अतिशय बिकट झालेली होती. त्या साम्राज्यांशी त्यांचं काहीही हाडवैर नव्हतं, त्यांच्या आपापसातल्या हाणामाऱ्या थांबत नव्हत्या आणि मधल्यामध्ये या प्रांतातले लोक भरडले जात होते. जेरुसलेम आणि आसपासचा प्रांत रोमन साम्राज्याचा अंकित झालेला होता.जुडिया प्रांतात ज्यू राजा डेव्हिडच्या वंशात जन्मलेला जोसेफ हा एक साधा सुतार. त्याच्या आणि त्याची पत्नी मेरी हिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ पुढे जाऊन त्या प्रांताच्या लोकांचा तारणहार होईल, असं त्यांना वाटलं होत का कुणास ठाऊक, पण पुढे ख्रिस्ती लोकांनी त्याला संताचा दर्जा दिला. हा संत जोसेफ आणि ' आई ' मेरी हे जीजसचे पालक. बायबलची गोष्ट प्रमाण मानली, तर जिजसचा जन्म जोसेफमुळे नाही, तर देवदूतांमुळे झाला आणि म्हणून त्याला जन्म देऊनही मेरी कुमारिकाच राहिली. अशा प्रकारे जीजस हा थेट ईश्वराचा अवतार होता. याच कारणामुळे मेरीला 'व्हर्जिन मेरी' असंही संबोधलं जातं.
या जिजसला येशू, ईसा , इमानुएल अशा अनेक नावांनी संबोधलं जातं असलं, तरी ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्माचे लोक याला ईश्वराचा अवतार मानतात. आजच्या जेरुसलेमपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या नाझरेथ गावात जोसेफ आणि मेरी आपल्या लहानग्या येशूला घेऊन आले आणि स्थिरावले. वडिलांच्या सुतारकामात येशू त्यांना मदत करत असे. येशूच्या बालपणाबद्दल खूपशी माहिती आज उपलब्ध नाही. त्या काळात त्या प्रांतात जॉन नावाचा धर्मगुरू होता. उंटाच्या कातडीचे कपडे घालणारा, मध आणि टोळ खाणारा असा हा जॉन लहान मुलांचा बाप्तिस्मा करायचा. ईश्वराकडून आपल्या पापांना माफी मिळवून हवी असेल, तर बाप्तिस्मा करणं हाच एकमेव मार्ग आहे असं तो सांगायचं. ' मार्कच्या गॉस्पेल्स ' मध्ये ( गॉस्पेल म्हणजे वेगवेगळ्या महापुरुषांनी लिहून काढलेली धर्माची शिकवण आणि त्या अनुषंगाने त्या काळच्या महत्वाच्या घटनांची लिखित स्वरूपातली माहिती ) नमूद केल्याप्रमाणे या जॉनची प्रत्यक्ष ईश्वराने प्रेषितांच्या आधी पृथ्वीवर पाठवलेला देवदूत अशी ओळख आहे आणि म्हणून त्याला ' सेंट जॉन द बाप्टिस्ट ' असं संबोधित केलं गेलं आहे.
जिझसच्या आयुष्याबद्दल अभ्यासकांची इतकी मतमतांतरं आहेत, की बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दलच्या माहितीत विरोधाभास आणि विसंगती आढळून येते. उदाहरणार्थ, ' सिनॉप्टिक गॉस्पेल' आणि ' गॉस्पेल ऑफ जॉन' या दोहोंमधल्या माहितीत बरीच तफावत आहे. तशात ' जुन्या 'आणि ' नव्या ' टेस्टामेंट्समध्ये पुन्हा अनेक विसंगती आहेत. या कारणामुळे साधारण सर्वमान्य माहिती प्रमाण मानून येथे त्याच्याबद्दल उहापोह केलेला आहे.
हा जॉन लोकांना सांगत असे. की लवकरच तुमचा बाप्तिस्मा करणारा सिद्धपुरुष तुमच्या आयुष्यात येईल, जो पवित्र पाण्याने नाही तर आपल्या अस्तित्वाने तुम्हाला पापमुक्त करेल. जिझसच्या चार भावांचा - जेम्स, जोसेफ, जुडास आणि सायमन यांचा आणि बहिणींचा उल्लेख लूक आणि मॅथ्यू यांच्या गॉस्पेल्समध्ये आहे. बहिणींची नाव मात्र आज उपलब्ध माहितीनुसार ज्ञात नाहीत. लहान असताना त्याच्या विक्षिप्तपणाच्या तक्रारी शेजारपाजारच्या लोक करत असत, असा उल्लेख त्यात आलेला आहे. या विक्षिप्त गोष्टी म्हणजेच त्याच्याकडून बोलल्या जाणाऱ्या ईश्वरी संदेशाबद्दलच्या गोष्टी.
तरुण व्हायला लागलेला जिझस आपलं कुटुंब म्हणजे आपले अनुयायी असं उघडपणे आणि थेट बोलू लागलेला होता. अखेर जॉनने जिझसचा जॉर्डन नदीच्या पाण्याने बाप्तिस्मा केला. या वेळी त्याचं वय साधारण तीस वर्षाचं होतं असा अभ्यासकांचा कयास आहे. त्या बाप्तिस्माच्या वेळी पाण्यातून वर येताच स्वर्गाचे दरवाजे उघडले जाऊन तिथून एक दैवी आकृती खाली आली आणि तिने त्याचबरोबर एका दैवी आवाजाने त्याला ' ईश्वराचा अंश ( प्रेषित ) ' अशा अर्थाने संबोधलं. वेगवेगळ्या गॉस्पेल्समध्ये हि कहाणी काही अंशाने बदलते, परंतु ईश्वराने जिझसला 'प्रेषित ' म्हणून संबोधल्यावर मात्र सगळ्या गोस्पेल्सचं एकमत आहे. या घटनेनंतर जिझसने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं. असं म्हंटलं जात, की आधी जुडास प्रांतात त्याने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं असलं, तरी नंतर खुद्द जेरुसलेम येथे त्याने तयार केलेलं दुसरं मंत्रिमंडळ अधिक लोकमान्य होतं आणि त्याचं बराचसा कार्य या जेरुसलेमच्याच परिसरात पार पडलं. या काळात त्याने असंख्य चमत्कार करून दाखवले आणि लोकांनी त्याच्या दैवी शक्तीचे अनुभव घेऊन त्याला ईश्वरी अवताराचा दर्जा दिला. प्रचंड वादळाला शांत करणं, पाण्यावरून चालणं अशा प्रकारचे ते चमत्कार होते.
सध्याच्या उत्तर इस्राएलमधल्या कोरॅझिम पठारावर त्याने आपल्या अनुयायांना अनेक महत्वाचे उपदेश केले. हे उपदेश म्हणजे ईश्वराने त्याच्या तोंडून दिलेली आदर्श शिकवण असं ख्रिस्ती लोक मानतात. याच काळात त्याच्या अनुयायांची संख्या वाढायला लागली. जिझसने त्याचे एकूण बारा सर्वाधिक योग्यतेचे अनुयायी निवडून त्यांना आपले ' प्रेषित ' ( अपॉसल्स ) म्हणून नियुक्त केले. या काळात घडलेली एक महत्वाची घटना त्याच्यावर आजूबाजूच्या ज्यू लोकांच्या नजरा रोखल्या जायला कारणीभूत ठरली.
ज्यू लोकांच्या दुसऱ्या सिनेगॉगमध्ये तेव्हा अनेक भोंदू आणि पैसेखाऊ लोकांचा सुळसुळाट झाला होता. आपल्या स्वार्थासाठी ते खोटेपणा, धाकधपटशा, अव्वाच्या सव्वा भाव आकारणे, पैशांची अफरातफर अशा अनेक वाईट गोष्टी करत असत. त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या या दुष्कृत्यांचा उघड निषेध करून जिझसने एका अर्थाने सापाच्या शेपटावर पाय ठेवला. त्यांच्या काळ्या कृत्यांना त्याने लोकांसमोर उघड केलंच, पण त्याचबरोबर जोडीला या कुकर्मांमुळे ईश्वरी प्रकोप होऊन या प्रदेशात हाहाकार माजेल, अशी भविष्यवाणीही वर्तवली. हा विध्वंस जिवंतपणे तुमच्याच डोळ्यांसमोर घडेल, असं सांगून त्याने त्या सगळ्या कुप्रवृत्तीच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकवली.
आपल्याला उघड उघड आव्हान देणारा हा उपाटसुम्भ कोण, अशा विचाराने त्या सगळ्यांनी त्याच्यावर खार खायला सुरुवात केली. तशात त्याने एका ' लाझारस ' नावाच्या एका मनुष्याला मृत झाल्यावरही पुन्हा जिवंत केलं आणि या गोष्टीचा गवगवा होऊन त्याच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. ज्यू धर्मगुरूंच्या अस्तित्वाचाच प्रश्न आता निर्माण झाला होता.आपल्यातलाच कोणीतरी येऊन सरळ सरळ आपल्याला आव्हान देतो, हे त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. अखेर या सगळ्याची अखेर व्हायची तीच झाली.
आपल्या ' मृत्यूची ' चाहूल अर्थात जिझसला लागली होतीच, कारण तो ईश्वराचा अवतारच होता. अखेर त्याने आपल्या १२ ' प्रेषितांना ' मेजवानीसाठी एकत्र बोलावलं. याच घटनेला ' लास्ट सपर ' म्हणून ओळखलं जातं. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराचं 'द लास्ट सपर' हे चित्र याच घटनेचं. याच मेजवानीच्या वेळी जिझसने आपल्यातला एक जण आपल्याविरुद्ध फितूर होईल, अशी भविष्यवाणी वर्तवली. काही अभ्यासकांच्या मते हा घरभेदी म्हणजे जुडास. त्याचप्रमाणे त्याचा एक ' प्रेषित ' - पीटर हा तीन वेळा विचारूनही जिझसची ओळख दाखवणार नाही , तिसऱ्या नकाराच्या वेळी जवळच एक डोमकावळा ओरडत असेल आणि सगळे प्रेषित त्याच्याकडे पाठ फिरवतील अशीही भविष्यवाणी त्याने केली.
जेरुसलेमच्या टेकड्यांच्या पायथ्याशी ऑलिव्ह वृक्षांनी भरलेली गेथसेमाने नावाची बाग बायबलमधलं एक अतिशय महत्वाचं स्थान आहे. याच जागी आपल्या अनुयायांसह आलेला असताना जिझसला ज्यू धर्मगुरू, उच्चभ्रु आणि शक्तिशाली लोक पकडतात आणि त्याची ओळख पटवून घेतल्यावर त्याला अटक करतात असा उल्लेख बायबलमध्ये केलेला आहे.ही ओळख पटवायला कारणीभूत ठरतो जुडास, जो जिझसला ' रब्बी ' म्हणजे ईश्वर या अर्थाने जाणूनबुजून संबोधित करतो. या वेळी झालेल्या गोंधळात जिझसने आधी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार त्याचे अनुयायी आणि प्रेषित त्याच्याकडे पाठ फिरवतात आणि पीटर तीन वेळा जिझसची ओळख देण्यास नकार देतो. या वेळी ओरडणाऱ्या डोमकावल्याचा आवाज येऊन पीटर ढसाढसा रडतो, असा उल्लेख त्या कथेत आहे. यापुढचे प्रसंग तेव्हाच्या प्रशासनाच्या पाखंडी आणि क्रूर वर्तणुकीची चांगलीच कल्पना देतात.
जिझसला धर्मगुरूंच्या आणि इतर पाखंडी परंतु शक्तिशाली लोकांच्या सभेत हजर केलं जातं. ' संहेडरीन' या नावाने ओळखली जाणारी ही सभा म्हणजे रोमन प्रशासक पॉंटीएस पिलाटे याचं 'न्यायालय'. जिझसला या न्यायालयात अतिशय अपमानास्पद अवस्थेत उपस्थित केलं जातं. त्याच्यावर देशद्रोह, फसवाफसवी, चेटूक, लोकांना फितवून त्यांच्या मनात प्रशासनाबद्दल विष पेरणं अशा अनेक ' गुन्ह्यांचे ' आरोप केले जातात. जिझसने स्वतःला ज्यू लोकांचा देव म्हणून घोषित कशाच्या आधारावर केलं, असाही त्याला प्रश्न केला जातो. जिझस अर्थात कोणत्याही आरोपाचं खंडन करत नसल्यामुळे आणि माफी मागत नसल्यामुळे अखेर त्याला लोकांसमोर हजर केलं जातं. त्याचे काही अनुयायी आणि मूक समर्थक सोडले, तर बाकीच्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल काहीही कणव नसते, याची पुष्टी करणारा प्रसंग म्हणजे जिझस आणि बाराब्बास मनाच्या एका विकृत खुनी गुन्हेगारापैकी एकाला मुक्ती देण्याबद्दल विचारणा केल्यावर जनसमुदायाने त्या बाराब्बासला मुक्ती देणं.
शेवटी तेव्हाच्या क्रूर प्रथेनुसार जिझसला अखेर क्रूसावर लटकावलं जातं. त्याच्याबरोबर दोन अट्टल गुन्हेगारांनाही त्याच्याच बाजूला क्रूसावर लटकावलं जातं. बायबलमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जिझसचे प्राण जाताच तिथल्या वातावरणात अचानक बदल होतो, जेरुसलेमच्या त्या भल्या मोठ्या मंदिराला तडे जातील इतक्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप होतो आणि त्या भागात काहीतरी अरिष्ट येण्याची चिन्ह दिसायला लागतात, ज्यामुळे रोमन अधिकारी जिझस देवाचा अवतार असल्याचं मान्य करून आपल्या कृत्याची आठवण काढत भयभीत होतात.
शेवटी निकोडेमस आणि जोसेफ हे दोघे जिझसच्या मृतदेहाला एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून एका गुहेत ठेवतात आणि गुहेचं तोंड बंद करतात. मेरी माग्दालिनी ( हिला त्या काळच्या वेगवेगळ्या लिखाणात जिझसची अनुयायी, पत्नी, सहचारिणी अशा अनेक विशेषणांनी संबोधलं गेलं आहे ) ही या घटनेच्या नंतरच्या रविवारच्या दिवशी त्या गुहेचं तोंड उघडते आणि जिझस पुन्हा एकदा जिवंत अवस्थेत बाहेर येतो अशा प्रकारे बायबलमध्ये त्याच्या ' पुनर्जीवित ' होण्याचं वर्णन आहे. आपल्या अनुयायांना आपल्या तळहातावरच्या आरपार भोकात हात घालायला देऊन तो आपण तोतया नसल्याची खात्री पटवून देतो, ज्यामुळे त्याच्या ईश्वरी अवतार असण्यावर कोणालाही शंका उरत नाही.
पुनर्जीवित झाल्यानंतर जिझस एकूण चाळीस दिवस पृथ्वीवर राहतो. या काळात तो आपल्या अनुयायांना बेथनी नावाच्या गावात एकत्र करून त्यांना ' देवदूत ' येईपर्यंत जेरुसलेम न सोडण्याचा आदेश देतो. शेवटी चाळीसाव्या दिवशी तो सदेह स्वर्गात जातो. या कथेचं कुराणात थोड्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं गेलं आहे. क्रूसावर चढवण्याआधीच प्रत्यक्ष ईश्वर जिझसला आपल्याबरोबर घेऊन स्वर्गात जातो अशा प्रकारे ही घटना कुराणात नोंदली गेली आहे.
जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या काही अलौकिक आणि दैवी व्यक्तींमधली जिझस हि निःसंशयपणे एक महत्वाची व्यक्ती. या दैवी पुरुषाची शिकवण मूलतः क्षमाशीलतेच्या मार्गावर चालण्याची आहे. या जिझसबद्दल असंख्य आख्यायिका, कहाण्या आणि समजुती वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आढळून येतात. खुद्द ख्रिस्ती लोकांमध्येही जिझसच्या आयुष्यातल्या अनेक घटनांबद्दल मतमतांतरं आहेत. मेरी माग्दालिनी आणि त्याचे संबंध सहजीवनाचे होते आणि मेरी जेरुसलेम सोडताना आपल्या पोटात जिझसचा ' पवित्र वंश ' घेऊन गेली होती, अशाही प्रकारचा एक मतप्रवाह बायबलच्या संशोधकांमध्ये आढळतो. या सगळ्यावर कितीही मतभिन्नता असली, तरी जिझसने आपल्या शिकवणुकीने आपल्या अनुयायांना एका नव्या धर्माची दीक्षा दिली, हे मात्र नक्की.
जेरुसलेमच्या भूमीवर ज्यू लोकांच्या देखत आता ख्रिस्ती धर्म उदयाला आलेला होता. लवकरच या धर्माचा प्रसार झपाट्याने आजूबाजूच्या प्रांतात होणार होता आणि थेट रोमन लोकांकडून स्वीकारला गेल्यामुळे या धर्माला आता राजमान्यताही मिळणार होती. या धर्माचं प्रतीक म्हणून लाकडी क्रूसावर लटकवलेल्या जिझसची प्रतिमा शतकानुशतकं ख्रिस्ती लोक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून जपणार होते आणि आपल्या या ईश्वरी अवतार असलेल्या महापुरुषाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून ख्रिस्ती आणि ज्यू लोकांमध्ये कायमचं वितुष्ट येणार होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्नः जिझसचा उदय झाला तेव्हा, रोमनांनी ज्यूंना गुलाम केलं होतं, ते आपल्याच भूमीतून १७-१८ शतकं परागंदा झाले होते असं असतांना, जिझसचा उदय आणि त्याला त्रास देणारे / ठार मारणारे ज्यूच कसे? रोमन असायला हवेत ना? ज्यांचा धर्म तोवर स्पेसिफाय झाला नव्हता...

@harshal chavhan
रोमन सम्राटांनी ज्यू लोकांना मांडलिक बनवलेलं असलं तरी त्यांना त्यांच्या भूमीतून हाकलून दिलं नव्हतं. ज्यू राजा हॅरोड रोमन सम्राटांच्या हातातलं प्याद झालेला होता. ज्यू धर्मीयांच्या लालची आणि पैसा - केंद्रित वर्तनामुळे येशूने निर्माण केलेल्या नव्या धर्माकडे लोक आकर्षित झाले. त्याला क्रूसावर चढवताना ज्यू आणि रोमन एक झाले होते, पण पुढे रोमनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे त्या पापातून त्यांना एका अर्थाने मुक्ती मिळाली, पण ज्यू लोकांवरचा डाग तसाच राहिला.
त्याच ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या रोमनांनी पुढे ज्यू लोकांना त्यांच्या भूमीतून हाकलून दिलं आणि १७-१८ शतकं ते परागंदा राहिले.

येशू ख्रिस्त क्रुसवर चढवला जाण्याच्या घटनेनंतर भारतात, काश्मीर मधे येऊन राहिला असल्या बद्दल मध्यंतरी एक पुस्तक वाचले होते, त्याप्रमाणे येशूने तिबेटमधे राहून धर्माचा अभ्यास केला होता.. त्याची या निमित्तने आठवण झाली..
आपण खरोखर इतकी गुंतागुतीची माहीती सोपी करुन सांगत आहत त्याबद्दल अनेक धन्यवाद !