अज्ञातवासी!! - भाग २७

Submitted by अज्ञातवासी on 20 February, 2021 - 12:06

भाग २६

https://www.maayboli.com/node/78102#new

"किती वेळ बघत बसणार दादासाहेब?"
"माहिती नाही."
"या गल्ल्या तुमच्यासाठी सेफ नाहीत."
"मला कुणीही काहीही करू शकत नाही... जोपर्यंत मी तिला भेटत नाही."
"दादासाहेब..."
"खानसाहेब. जा तुम्ही निवांत. उद्या भेटू."
"अहो नुसत्या डोळ्यांवरून कसं ओळखणार तिला? ती जुलैला काही सांगायला तयार नाही. मी आमचा सगळा मोहल्ला छान मारला, नाही सापडली अशी कुणी."
"सापडणारही नाही खानसाहेब. शरद पौर्णिमेचा चंद्र आहे ती, नेहमी दिसणार नाही."
"ये प्यार नही, पागलपन है!"
"इसी को तो प्यार कहते है!" दादासाहेब हसले.
खानसाहेब अजूनच अस्वस्थ झाले.
"मी थांबतो दादासाहेब..."
"ठीक आहे खानसाहेब, जशी तुमची इच्छा."
दादासाहेब निवांत निरीक्षण करत उभे होते.
...तेवढ्यात मागून एक बंदूक त्यांच्या पाठीवर टेकली.
◆◆◆◆◆
"जयशंकर, टेन्शनमध्ये दिसतोय कधीचा."
"साहेब, तसं काही नाही."
"काही असेल तर सांग जयशंकर, तू माझा उजवा हात. तुला काही झालं तर मला नुकसान होईल."
"साहेब तुम्ही असताना मला कुणाची भीती?"
शेखावत हसला.
"चल, सकाळच्या पूजेची वेळ झाली. पूजेनंतर बोलू."
"ठीक आहे साहेब."
शेखावत उठला व आत गेला.
समोरच त्याचा मोबाईल पडला होता.
जयशंकरने खिशातून एक बारीक स्क्रूड्रायवर काढला...
...व मोबाईल उघडण्यास सुरुवात केली.
◆◆◆◆◆
मोक्षने शांतपणे मान मागे टेकवली.
'चला, निदान बाजू तरी क्लियर झाल्यात.' तो मनाशीच म्हणाला.
"मोक्षसाहेब, हा खेळ इतका विचित्र होईल असं वाटलं नव्हतं."
"अरे खानसाहेब," मोक्ष त्यांच्याकडे बघत म्हणाला.
"हा खेळ तर सोपा झालाय उलट."
"म्हणजे?"
"म्हणजे, अज्ञातवासातून बाहेर यायची वेळ झालीये आता..."
"मी समजलो नाही."
"समजावतो. शेखावत साठी आता सगळ्यात धोकेदायक कोण आहे? शेखावतच्या नजरेने विचार करा."
"संग्राम..." खानसाहेब उद्गारले.
"येस. त्यामुळे आता तुम्ही अप्पांनी जे केलं, तेच करायचं."
"म्हणजे?"
"म्हणजे, संग्रामच्या येण्याने या सगळ्यांच किती नुकसान होणार आहे, आणि मोक्षसारखा अडाणी आल्याने त्यांना किती मोकळीक मिळणार, हे पटवून द्यायचं."
"म्हणजे?"
"म्हणजे, अण्णांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मोक्ष वाड्यावर पुन्हा अवतरणार!!! तयारी करा."
खानसाहेब त्याच्याकडे बघतच राहिले.
◆◆◆◆◆
"तू इतका सहजासहजी सापडशील असं वाटलं नव्हतं."
"अरे पागल औरत... "खानसाहेबांनी तिच्यावर बंदूक रोखली.
"नाही खानसाहेब. काढा ती बंदूक."
"दादासाहेब?"
"तू कोण आहेस, मला माहिती नाही, पण फक्त मला वळू दे..."
"नाही..." ती ओरडली.
दादासाहेब शांतपणे मागे वळले.
तिचे भेदक डोळे, त्यांच्यावर रोखले गेले.
तेच भेदक डोळे...
"बस.. आता गोळी चालवायची असेल, तर इथे चालव."
त्यांनी डाव्या छातीच्या खाली बंदूक टेकवली.
"पुन्हा इथे यायचं नाही. कळलं? ही आमची गल्ली आहे."
"मग आजपासून हीसुद्धा माझी गल्ली झालीये."
ददादासाहेब म्हणाले.
"मौत से डर नही लगता?" तिने विचारले.
"तुला बघितल्याविना मरण येईल, याची भीती वाटते." दादासाहेब हसले.
"पागल आदमी. जा निघा इथून."
"नाही जाऊ शकत. इतक्या जवळ येऊन तुला बघितल्याविना जाईल, तर जिंदगी बुरा मान जायेगी."
"तुला जिवंत सोडणं, हेच सगळ्यात वाईट असेल मग." ती म्हणाली. "पण मला तुला सगळ्यांसमोर मारायचंय...
माझ्या भावाचा बदला घ्यायचाय..."
"मुमताज..." खानसाहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले...
...आणि तिने बुरखा वर केला....
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त