अरबस्तानचा इतिहास - भाग ०९

Submitted by Theurbannomad on 20 February, 2021 - 04:19

पुनर्भरारी ते विजनवास

बॅबिलोनियन साम्राज्याला घरघर लागली ती नेबूकडनेझार नंतरच्या चवथ्या सम्राटाच्या काळात. हा नाबोनिडस आपल्या आधीच्या ‘ लाबाशी – मर्दुक ‘ राजाचा काटा काढून बॅबिलोनियन राज्याचा सर्वेसर्वा झाला होता. याच काळात पश्चिम आशियाच्या भागात एक शक्तिशाली साम्राज्य उदयाला आलेलं होतं - अकायमेनिड या नावाने ओळखलं जाणारं पहिलं पर्शियन साम्राज्य. या साम्राज्याचा सम्राट होता सायरस द ग्रेट. याने आधीच्या समस्त साम्राज्यांपेक्षा आकाराने प्रचंड असं आपलं साम्राज्य स्थापन केलं असल्यामुळे पुढच्या काळात महापराक्रमी म्हणून ओळखल्या गेलेल्या अलेक्झांडरसारख्या योद्ध्यालाही या सायरसबद्दल प्रचंड आदर होता.
एका बाजूला भूमध्य सागरापासून ते दुसऱ्या बाजूला थेट सिंधू नदीच्या उंबरठ्यापर्यंतच्या भागात , युरोपच्या पूर्वेकडच्या भागात आणि बाल्कनच्या प्रदेशात, आजच्या तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान या देशांमध्ये येतो तो वायव्य दिशेकडचा प्रदेश अशा विस्तीर्ण भागांवर हे साम्राज्य पसरलेलं होतं. या साम्राज्याची स्थापना केलेल्या सायरस याने सगळ्यात आधी मीडिअन साम्राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. हे साम्राज्य म्हणजे मेदेस लोकांचं राज्य असलेला आजच्या इराणचा पश्चिम आणि उत्तर प्रांताचा भाग. त्यानंतर त्याने लिडियन साम्राज्याचा घास घेतला. हे साम्राज्य म्हणजे आजच्या पश्चिम तुर्कस्तानचा उसाक, मनीसा आणि इझमिरचा भाग. शेवटी त्याचा मोर्चा वळला तो बॅबिलोनियन साम्राज्याकडे.
या सायरसला ज्यू लोकांच्या मनात अतिशय आदराचं स्थान आहे, ते त्याने ज्यूंची बॅबिलोनियन साम्राज्याच्या तावडीतून सुटका केल्यामुळे. नाबोनिडसच्या काळात सायरसने या बॅबिलोनियन साम्राज्यावर चढाई केली. एलम आणि उत्तर बाबिलोनियाचा काही भाग त्याने सहज जिंकून घेतला. त्याला बॅबिलोनियन साम्राज्याशी लढाई करण्यापेक्षा त्यांच्याशी बोलणी करून त्यांना आपल्या साम्राज्याचा अंकित करून घ्यायची इच्छा होती, पण नाबोनिडस बॉर्सिप्पा भागात पळून गेल्यामुळे त्याने चढाया सुरूच ठेवल्या. अखेर काहीही पर्याय न उरल्यामुळे नाबोनिडस शरण आला आणि बॅबिलोनियन साम्राज्य पडलं.
या सायरसपुढे आता बाबिलोनमध्ये गुलाम होऊन खितपत पडलेले ज्यू आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि आपल्याला अभय देण्याची विनंती केली. सायरस नशिबाने बॅबिलोनियन राजांसारखा उलट्या काळजाचा निघाला नाही, कारण त्याने मोठ्या सन्मानाने या ज्यू लोकांना गुलामगिरीच्या शापातून मुक्त केलं. इतकंच नाही, तर त्यांच्या पवित्र मंदिराच्या पुनर्रउभारणीसाठी त्याने मुक्त हस्ताने मदत केली. ज्यू लोकांना आपल्या ' पवित्र भूमीत ' परत जायला त्याने परवानगी दिली आणि नेबूकडनेझारने मंदिर ध्वस्त केल्यानंतर बरोबर आणलेल्या मंदिरातल्या मौल्यवान वस्तू कनानवासियांच्या ताब्यात देण्याची आज्ञाही केली. ज्यू लोक या सायरसला याच कारणामुळे ' मसीहा ' असं संबोधतात.
यहोवाच्या लेकरांचा पुन्हा एकदा आपल्या पवित्र कनानच्या भूमीकडे प्रवास सुरु झाला. आपल्या पवित्र भूमीमध्ये आणि महत्वाचं म्हणजे जेरुसलेममध्ये पाय ठेवून पुन्हा एकदा आपल्या साम्राज्याची उभारणी करायचं महत्कठीण काम आता त्यांच्या अंगावर आलेलं होतं. भग्न मंदिर पुन्हा एकदा त्यांना बांधायला लागणार होतं. आधीच्या घटनांमुळे धडा शिकून आता ते एकाच यहोवा देवतेची पूजा करणार होते. या कनानवासियांमध्ये कष्ट उपसायची शारीरिक आणि मानसिक ताकद वरदान मिळाल्यासारखी पिढ्यानुपिढ्या चालत आलेली असल्यामुळे आपल्या साम्राज्याच्या पुनर्निर्माणाच्या कार्यात ते सगळे जण आता सर्वस्व बहाल करणार होते.
झेरुब्बाबेल हा जुडाच्या शेवटून दुसऱ्या राजाचा म्हणजेच जेकोनियाचा नातू. इस्रायली लोकांना बाबिलोनमधून पुन्हा कनानच्या प्रांतात आणताना त्याने त्यांचं नेतृत्व केलं. त्याला सायरसने एहूद मेदिनात भागाचा गव्हर्नर म्हणजेच प्रशासक म्हेणून नियुक्त केलं होत. हा भाग मूळच्या जुडाच्या साम्राज्याचा एक छोटासा तुकडा होता. त्याच्या बरोबर होता जोशुआ. या दोघांनी मिळून ४२,३६० ज्यू लोकांना पुन्हा जेरुसलेमपर्यंत आणलं. सायरसच्या अकायमेनिड साम्राज्याचा भाग म्हणून ज्यू लोकांचा प्रदेश जरी ओळखला जात असला, तरी ज्यू लोकांना बऱ्याच प्रमाणात स्वायत्तता आणि स्वातंत्र्य होतं. या सगळ्यांनी आधी धाव घेतली ती झिऑन टेकड्यांकडे. आपल्या बेचिराख झालेल्या सिनेगॉगला पुन्हा एकदा जुन्या दिमाखात उभं करण्याचं काम त्यांनी आपल्या हातात घेतलं.
सायरसच्या काळात मंदिराचा पायाभरणीचा शुभारंभ झाला असला, तरी सायरस नंतरच्या दारिअस आणि त्याच्याही नंतरच्या आर्टसॅरसेस पहिला या सम्राटांच्या काळातही मंदिराच्या बांधकामाचं काम सुरु होतं. झेरुब्बाबेल याने ज्यू लोकांच्या प्रशासकीय बाजूची धुरा आपल्या हातात घेतली तर जोशुआ या मंदिराचा वरिष्ठ धर्मगुरू झाला. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असली, की प्रजेलाही स्थैर्य मिळतं. ज्यू लोकांनी हळू हळू एक एक वीट रचत आपल्या जुन्या साम्राज्याच्या स्मृती मनात ठेवून पुन्हा एकदा ' इस्राएल ' राष्ट्र उभारायला घेतलं.
' एज्रा-नेहेमियाच्या ' ग्रंथांप्रमाणे ज्यू लोकांचे मातृभूमीमध्ये परत येणे एकत्र झालेले नव्हते. ' वेव्ह ऑफ रिटर्न टू झिऑन ' म्हणजेच झिऑनच्या पवित्र भूमीत परतणाऱ्या ज्यू लोकांच्या लाटा अशा अर्थाने त्याबद्द्दल माहिती उपलब्ध आहे. एकूण तीन वेळा आकाराने मोठे ज्यू समूह आपल्या मातृभूमीत आले. झेरुब्बाबेल यांच्यानंतर इझरा आणि नेहेमिया यांच्या नेतृत्वाखाली विखुरलेले ज्यू झिऑनच्या पवित्र भूमीत आले. आता जवळ जवळ पन्नास-पंचावन्न हजार ज्यू आपल्या मूळ भूमीमध्ये जमा झालेले होते.
या ज्यू लोकांच्या राज्याला सततच्या लढाया आणि आक्रमणं पाचवीलाच पुजलेली होती. एका अर्थाने पर्शियन साम्राज्याचा भाग असलेलं हे नवं 'इस्राएल' आता इजिप्त आणि पलीकडच्या ग्रीक साम्राज्याच्या डोळ्यात खुपायला लागलं.पर्शियन साम्राज्य आपला विस्तार वाढवत ग्रीक साम्राज्याला जाऊन भिडलं आणि या दोन प्रबळ सांडांच्या झटापटीत इस्राएलसारखी छोटी मांडलिक राज्यं अडकित्त्यात सापडायला लागली.
जगाच्या इतिहासात एक अजरामर योद्धा म्हणून मान्यता पावलेला मॅसिडोनियाचा अलेक्झांडर म्हणजेच अलेक्झांडर द ग्रेट. या अलेक्झांडरला वयाच्या विसाव्या वर्षीच राजगादीवर बसायचा योग आला. ग्रीक साम्राज्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्याने आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या भागात आक्रमणं करायला सुरु केलं. वयाच्या अवघ्या तिशीत त्याने जगाच्या इतिहासातील महाप्रचंड साम्राज्य आपल्या टाचेखाली आणून दाखवलं, यावरून त्याच्या लढाऊ वृत्तीची आणि महत्वाकांक्षेची कल्पना करता येऊ शकते.
या अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्याचा भाग असलेल्या बाल्कनच्या प्रदेशात आपलं सैन्य घुसवलं. अथेनियन आणि थेबन प्रांतांच्या उठावाला चिरडून त्याने आपला मोर्चा आशियाकडे वळवला. तुर्कस्तानच्या भूभागावर आपला अंमल प्रस्थापित करून तो सीरियाकडे वळला. सर्दीस नावाचं पर्शियन साम्राज्याचं मांडलिक राज्य ग्रानिकसच्या लढाईत त्याच्यापुढे लोटांगण घालतं झालं आणि लेव्हन्टच्या भूभागाकडे जायचा त्याचा मार्ग खुला झाला.
ख्रिस्तपूर्व ३३३ साली इससच्या लढाईत तेव्हाच्या पर्शियन साम्राज्याचा सम्राट दारिअस आपल्या प्रचंड सैन्यासह समोर उभा असूनही अलेक्झांडरने आणि त्याच्या सैन्याने त्यांची दाणादाण उडवली. स्वतः दारिअस रणांगणावरून पळून गेला. लेव्हन्टच्या समुद्रकिनाऱ्याच्या भूभाग आणि सीरिया अलेक्झांडरच्या मुठीत आला. टायरे या आत्ताच्या लेबॅनॉनमध्ये असलेल्या प्राचीन शहराने त्याला थोडं दमवलं, परंतु अखेर त्याही भागाचा घास घेऊन त्याने आपला मोर्चा गाझा प्रदेशाकडे वळवला. इजिप्तशी दळणवळण ज्या ज्या मार्गांनी होत होतं,त्या त्या मार्गांवर त्याचा कब्जा असल्यामुळे गाझानंतर ईजिप्तवर चाल करण्याचा मार्ग मोकळा होणार हे स्पष्ट होतं. गाझाच्या तटबंदीयुक्त शहरांनी त्याला बराच काळ घाम गाळायला लावला. गाझा प्रांतावरच्या चढाईतच त्याच्या खांद्याला मोठी दुखापत झाली. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर गाझा पडलं आणि इजिप्तवर त्याच्या सैन्याचा पुढचा घाला घातला गेला.
इजिप्त फत्ते केल्यावर त्याने असिरियन आणि बॅबिलोनियन प्रांतांवर चढाया केल्या आणि तो भूप्रदेश जिंकून घेतला. आता पर्शियन साम्राज्याच्या मांडलिक प्रांतांवर त्याचं पूर्ण नियंत्रण आलं होतं. पर्शियाशी त्याने बराच काळ लढाया केल्या आणि त्या साम्राज्याचा बराचसा भूभाग काबीज करून आपला मोर्चा भारताकडे वळवला.
सीरिया आणि लेव्हन्टच्या लढायांमध्ये अर्थातच नुकत्याच स्थिरस्थावर होऊ पाहणाऱ्या ज्यू लोकांच्या आधीच मांडलिक असलेल्या राज्याची ससेहोलपट झाली. प्रत्यक्ष पर्शियन सैन्याला भारी पडणारा अलेक्झांडर संख्येने आणि ताकदीने कमी असलेल्या ' इस्राईल 'ला झेपणारा नव्हताच. या लढायांमध्ये पुन्हा ज्यू लोकांच्या सिनेगॉगची पडझड झाली. ते बिचारे स्वतःचा जीव वाचवत जितक्यांदा मंदिर भग्न व्हायचं, तितक्यांदा ते पुन्हा बांधून काढायचे. तशात ग्रीकांच्या अत्याचारांना तोंड देणं आणि गुलामासारखी वागणूक सहन करत कसंबसं जगत राहणं यापलीकडे त्यांना काहीही करता येत नव्हतं.
पुढे अलेक्झांडरच्या भारतावरच्या स्वारीमध्ये मात्र त्याला विशेष मर्दुमकी गाजवता आली नाही. वर्षानुवर्षे आपल्या मायभूमीपासून दूर राहून आणि सतत लढाया लढून त्याच सैन्य आता वैतागलं होतं. तशात ग्रीसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी डोकं वर काढत होती. शेवटी आपल्या मातृभूमीत परतण्याचा भाग्यसुद्धा या अलेक्झांडरच्या नशिबी आलं नाही आणि वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी बाबिलोनच्या भूमीत दुसऱ्या नेबूकडनेझारच्या महालात त्याने शेवटचा श्वास घेतला.
अलेक्झांडरचा कोणीही वारसदार योग्य त्या वयात असणं शक्य नव्हतंच. त्याच्या मृत्यूनंतर ग्रीकांमध्ये सुंदोपसुंदी माजली आणि या बलाढ्य महासाम्राज्याचा नेता पुढे कोण होणार, यावर कुरघोड्यांचं घाणेरडं राजकारण सुरु झालं. या काळातच ग्रीकांच्या शेजारी एक वेगळंच साम्राज्य उदयाला येत होतं. ज्युलिअस सीझर हा रोमन सेनापती ख्रिस्तपूर्व १०० साली रोम येथे जन्माला आला. त्याने पुढाकार घेऊन आपल्या रोमन सम्राटाच्या विरोधात आपली वेगळी चूल मांडली. त्याच्या हत्येनंतर पुढे त्याच्याच वंशजाने - पहिल्या ऑगस्टसने रोमन साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. हे रोमन साम्राज्य विस्तारायला लागलं ते जगज्जेता व्हायच्या महत्त्वाकांक्षेने. या रोमन लोकांनी ज्यू लोकांना पुन्हा एकदा आपलं मांडलिक बनवलं.
या काळात ज्यू लोकांच्या किडूकमिडूक राज्याचा राजा होता हॅरॉड. हा हॅरॉड काही वाईट राजा नव्हता. त्याच्या काळात त्याने पवित्र सिनेगॉगच्या डागडुजीचं आणि विस्ताराचं काम केलं होतं. टेम्पल माउंट - जे आज अल अकसा नावाने ओळखलं जातं - उत्तर दिशेला वाढवण्याचं कामही याच्याच अखत्यारीत झालं. त्याने ज्यू लोकांना एकत्र ठेवलं असलं, तरी त्यांचं सामर्थ्य यथातथाच होतं. या हॅरॉडला शेवटी रोमन साम्राज्याचं मांडलिकत्व पत्करावं लागलं आणि ज्यू लोक पुन्हा एकदा आपल्या पवित्र भूमीत राहूनही उपरे झाले. याच्या निधनानंतर रोमन लोकांनी या भूभागाला तीन हिश्श्यांमध्ये विभागलं - जुडीया, समारिया आणि इदूमिया.
यापुढच्या काळात या भागात झालेल्या घडामोडींनी जगाला दोन नवे धर्म दिले. हाच तो काळ, जेव्हा येशूने ख्रिस्ती धर्माची स्थापना केली आणि पुढे प्रेषित मोहम्मदांनी इस्लाम स्थापन करून अरब जगताला इस्लामच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. मूळच्या ज्यू लोकांना - ज्यांना यहूदी किंवा झिओनिस्ट अशा नावांनी सुद्धा ओळखलं जातं, ते ज्यू कपाळावर बसलेला उपऱ्यांचा शिक्का पुसण्यातही यशस्वी झाले नाहीत. काही वर्षांनी रोमन लोकांनीच त्यांना पुन्हा एकदा आपल्या पवित्र भूमीतून परागंदा व्हायला लावलं, ते थेट पुढच्या सतरा-अठरा शतकांसाठी. इतका काळ आपल्या पवित्र भूमीपासून आणि सिनेगॉगपासून लांब राहूनही त्यांचा वंश आणि कडवा धर्माभिमान टिकून राहिला हेच एक मोठं आश्चर्य. पुन्हा पुन्हा परागंदा होऊन पुन्हा पुन्हा नव्याने सुरुवात करायची उमेद त्यांच्या रक्तात ही अशी शतकानुशतकं राहिलेली आहे.
ऍडम आणि इव्ह यांच्यापासून सुरु होणारी ही कहाणी अशा प्रकारे एका रंजक वळणावर येऊन स्थिरावते. या कहाणीमध्ये जसे नायक आहेत तसेच खलनायक. भाऊबंदकी आहे तसाच पराक्रमही आहे. आपल्या पवित्र भूमीचा कडवा अभिमान आहे आणि सतत राखेतून पुन्हा पुन्हा भरारी घेण्याची विजिगीषू वृत्तीही आहे. ज्यू लोक कदाचित जगाच्या इतिहासातले सगळ्यात अभागी लोक असले, तरी त्यांच्या अस्तित्वाच्या झगड्यात दिसून येणारा स्वधर्माचा आणि वंशाचा अभिमान आजही अनेक इतिहासकारांना अनुकरणीय वाटत आलेला आहे. अब्राहमीक धर्मांमधला ज्यू हा आद्य धर्म आणि त्यांचा धर्मग्रंथ म्हणजे जगाच्या इतिहासातल्या सर्वाधिक प्राचीन ग्रंथांपैकी एक असलेला तोरा हा ग्रंथ. आज उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून अशा या प्राचीन लोकांचा करून दिलेला हा अल्प परिचय पहिल्या भागाचा मुख्य विषय असावा, यातच त्यांचं महत्व अधोरेखित होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखन रंजक तर आहेच पण त्यामागे घेतलेले कष्ट जाणवताहेत . धन्यवाद हा मेहनतीसाठी . हे सर्व आंतर्जालावर असतेच पण मराठी लहेजात वाचण्याची एक और खुमारी असतेच ना !!

>>धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असली, की प्रजेलाही स्थैर्य मिळतं.

प्रजा जर एकाच धर्माचं पालन करत असेल तर. आणि हे आजच्या globalization च्या काळात थोडं कठिण आहे.

>>या काळात ज्यू लोकांच्या किडूकमिडूक राज्याचा राजा होता हॅरॉड.

हा तो कंसासारखा नुकत्या जन्मलेल्या बाळांना ठार मारायचा हुकूम देणारा हॅरॉड का?