अरबस्तानचा इतिहास - भाग ०८

Submitted by Theurbannomad on 20 February, 2021 - 04:18

दुभंग

राहोबोम आपल्या इस्राएल राज्याच्या राजगादीवर बसल्यावर त्याने एकूण पंधरा शहरं वसवली. प्रत्येक शहराला त्याने मजबूत तटबंदी बांधली होती, कारण शेजारच्या जुडा राज्याशी त्यांचा असलेला उभा दावा आणि दूरवरच्या इजिप्शिअन साम्राज्याला पुन्हा एकदा लागलेली साम्राज्यविस्ताराची आस. इथे जेरोबोमनेही आपल्या जुडा राज्याची घडी बसवायचा आटोकाट प्रयत्न केला. एकूण अठरा वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत त्याने राहोबोमच्या राज्याबरोबर अनेक लढाया केल्या. दोघांना एकमेकांवर कुरघोडी करायची असल्यामुळे या काळात संघर्ष ज्यू लोकांच्या पाचवीला पुजलेला होता.
राहोबोमनंतर गादीवर आला त्याचा मुलगा अबीजा. त्याच्या काळात झालेल्या एफ्रेमच्या घनघोर लढाईत जेरोबोमला खूप मोठी नामुष्की पत्करावी लागली. त्याच्या पाच-एक लाख सैन्याला अबीजाच्या सैन्याने यमसदनी धाडलं. या वाईट पराभवानंतर जेरोबोमने हाय खाल्ली आणि लवकरच त्याचं निधन झालं. या लढाईत त्याच्या राज्याचा बेथेल, जेशाना आणि एफ्रेमच्या मोठ्या भूभागावर अबीजाचं वर्चस्व आलं.
या सततच्या लढायांनी खिळखिळं झालेलं ज्यूडाचं साम्राज्य मुळापासून हादरलं ते इजिप्तच्या शिशांक राजाच्या आक्रमणामुळे. या घटनेमुळे दोन बोक्यांच्या भांडणात लबाड मांजरीने सगळं लोणी फस्त केल्याची गोष्ट आठवते. हा शिशांक आपल्याबरोबर लिबियन , कुसाईट आणि सुकाईट लोकांमुळे प्रबळ झालेली आपली प्रचंड सेना घेऊन लेव्हन्ट प्रांतात उतरला. १२०० रथस्वार , ६०००० घोडेस्वार आणि प्रचंड पायदळ घेऊन आलेल्या या राक्षसी सेनेचा मुकाबला करणं ज्यू लोकांना शक्य नव्हतंच. राहोबोमच्या जुडा साम्राज्याचा घास या शिशांकने सहज पचवला आणि जुडा साम्राज्याला आपल्या साम्राज्याचं अंकित करून घेतलं. अशा रीतीने जुडा राज्याचं स्वतंत्र अस्तित्व संपून ते इजिप्तच्या साम्राज्याचं मांडलिक राष्ट्र बनलं. या राष्ट्राची धुरा नामधारी राजा म्हणून अबीजाच्या हातात आली .
इथे जेरोबोमच्या इस्राएलच्या साम्राज्यात त्याच्यानंतर गादीवर बसलेला त्याचा मुलगा नादाब अल्पायुषी ठरला. धर्मगुरू अहिजाच्या मुलाने - बाशाने कपटाने याचा काटा काढला आणि तो स्वतः आता इस्राएलच्या गादीवर बसला. ही कहाणी आता पुढेही सुरु राहणार होती. बाशाचा मुलगा आणि बाशानंतरचा इस्राएलच्या राजा इलाह आपल्याच दरबारातल्या झिम्री नावाच्या अधिकाऱ्याकडून मारला गेला. हा झिम्री फक्त सात दिवस राजा म्हणून जगला. त्याच्या या कपटकारस्थानामुळे चिडून इस्राएलच्या सैन्याने ओमरी नावाच्या शूर सरदाराला राजगादीवर बसवलं. झिम्रीने आपल्या राजमहालाला आग लावून स्वतःलाही त्या आगीच्या हवाली करून आपलं आयुष्य संपवलं. ओमरीच्या पुढच्या तीन पिढ्यांनी इस्राएलवर राज्य केल्यावर जेहू याने ओमरीच्या वंशजांना संपवून इस्राएलचं राज्य आपल्या हाती घेतलं. या जेहूचं आणखी एक पाप म्हणजे एकत्र आलेलं जुडा आणि इस्राएलचं राज्य पुन्हा विस्कळीत करणं. जुडाचा सहावा राजा जेहोशाफात आणि इस्राएलचा सातवा राजा अहाब यांनी पुढाकार घेऊन जेहोशाफातच मुलगा जेहोराम आणि अहाबची मुलगी अथालिया यांचं लग्न करून दिलं. याच अहाबच मोठा मुलगा अहाझीया लवकर गेल्यावर गादीवर बसलेला जोराम याला जेहूने ठार करून गाडी बळकावली होती.
जेहूच्या पाचव्या पिढीच्या राजाला - झकारियाला लोकांसमोर ठार करून त्याच्या सैन्याच्या प्रमुखाने - शालूमने राज्य बळकावलं. यालाही राजसत्ता केवळ एक महिनाभर नशिबात आली, कारण मेनाहेम याने या कपटी शालूमला संपवून इस्रायलची धुरा आपल्या हाती घेतली.
त्याच्या मुलाला - पेकाहीयाला त्याच्या दरबारातल्या महत्वाच्या सरदाराने - पेकाने यमसदनी धाडलं आणि २० वर्ष राज्य केलं. त्याला ठार मरून होशिया इस्राईलच्या राजा झाला. या सगळ्या रक्तरंजित आणि कपटनीतीने भरलेल्या इतिहासाची सांगता झाली ती या होशियाच्या कारकिर्दीत. इस्राएलच्या राज्याचा एकोणिसावा आणि शेवटचा राजा असलेल्या या होशियाला शेजारचा असिरियन राजा पाचवा शाल्मानेसेर याने पराभूत केलं आणि कैद करून तुरुंगात खितपत ठेवलं. इस्रायली लोक या असिरियन राज्याचे मांडलिक झाले आणि त्यांना शाल्मानेसेरच्या सैनिकांनी आपल्या राज्यात नेलं.
ज्यू लोकांनी आपल्या हेव्यादाव्यांनी भरभराटीला आलेलं आपलं एकसंध साम्राज्य अशा तऱ्हेने होत्याचं नव्हतं केलं. त्यांच्या नशिबी आता आली होती ती इजिप्शिअन आणि असिरियन यांच्यासारख्या प्रबळ साम्राज्याची गुलामगिरी. त्या काली पराभूतांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही आपले मांडलिक करून घ्यायची प्रथा सर्वमान्य होती. इस्राएलच्या पवित्र भूमीवर आता स्थानिक टोळ्या आणि छोटेमोठे भटके कबिले यांचाही वावर सुरु झाला.
शाल्मानेसेर या घटनेनंतर लवकरच निर्वर्तला आणि दुसरा सरगोन त्याच्या जागी गादीवर बसला. त्याच्या काळात पराभूत इस्रायली लोक असिरियाच्या साम्राज्यात विखुरले गेले. आपल्या साम्राज्यात आपल्याला विरोध करणाऱ्या अथवा करू शकणाऱ्या लोकांना शक्तिहीन करण्याची ही खास असिरिअन पद्धत. जे ज्यू इजिप्तच्या आश्रयाला गेले, तेसुद्धा तिथे विखुरले गेले. स्वतःच्या राज्यात रहात नसल्यामुळे ते आता फक्त आणि फक्त उपरे म्हणून आयुष्य जगू लागले.
सेनाचेरीब हा सरगोन दुसरा याचा मुलगा. यानेही जुडा आणि इस्राएलच्या भूमीवर हल्ले सुरूच ठेवले. त्याने केलेल्या चढायांमध्ये जुडाच्या बहुतांश तटबंदीच्या शहरांची वाताहात झाली. त्याने जेरुसलेमवरही हल्ला केला आणि पूर्णतः नसलं तरी अंशतः जेरुसलेम आपल्या टाचेखाली आणलं. सरगोनचा तिसरा वंशज असलेल्या इशारहाडोन याने इजिप्शिअन साम्राज्याशी दोन हात केले आणि बराचसा भाग आपल्या अमलाखाली आणला , परंतु संपूर्ण इजिप्त काबीज करण्यात काही त्याला यश मिळालं नाही. त्याचा मुलगा असुरबानीपाल याने मात्र आपल्या हयातीत जबरदस्त पराक्रम गाजवला. याने असिरियाच्या साम्राज्याला एकसंध केलं, विस्तारलं आणि बंडखोरीला चांगलाच आळा घातला. बॅबिलोनियन राज्यानेही त्याला आपला सम्राट म्हणून स्वीकारलं. पुढे इजिप्तच्या साम्राज्यावरही त्याने आपला पूर्ण अंमल प्रस्थापित केला. आजही त्याला शेवटचा महापराक्रमी असिरियन राजा म्हणून संबोधलं जातं.
पुढे असुरबानीपालच्या निधनानंतर असिरियन साम्राज्यात अस्थिरता निर्माण झाली, ज्याचा फायदा घेऊन नाबोपोलासार याने बंड केलं आणि आपलं स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित केलं. बाबिलोन येथे आपल्या साम्राज्याची राजधानी प्रस्थापित करून त्याने बराचसा असिरियन प्रदेश आपल्या हाताखाली आणला. त्याचा मुलगा दुसरा नेबूकडनेझार हा ज्यू लोकांच्या इतिहासातल्या एका काळ्याकुट्ट अध्यायाचा कर्ताधर्ता. आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून हा आजूबाजूच्या प्रदेशावर आपला अंमल प्रस्थापित करत गेला.त्याने अत्यंत पाशवीपणे जेरुसलेमच्या यहोवाच्या देवळाचा विध्वंस केला. आधीच्या राजांनी ज्यू लोकांना मांडलिक बनवलं असलं, तरी त्यांच्यावर अत्याचार केले नव्हते. या नेबूकडनेझारने मात्र सगळ्या ज्यू लोकांना सरळ आपल्या राज्यात गुलाम म्हणून नेलं.
ज्यू लोकांसाठी कर्दनकाळ ठरलेला हा नेबूकडनेझार आपल्या बॅबिलोनियन राज्यासाठी मात्र अतिशय आदरणीय सम्राट ठरला. त्याच्या काळात बाबिलोन शहर त्या भागातल्या व्यापाराचं आणि कलेचं माहेरघर झालं होतं. जगप्रसिद्ध ' हँगिंग गार्डन ऑफ बाबिलोन ' याच्याच काळात बांधलं गेलं. ' बुक ऑफ डॅनियल ' मध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याच्या प्रतिमेपुढे नतमस्तक न होणाऱ्या तीन ज्यू लोकांना त्याने आगीत शिरायला सांगितल्यावर त्यांनी जराही विचार न करता तसं केलं, आणि त्यातून ते सुरक्षित बाहेर आले हे बघून नेबूकडनेझारचा ज्यू लोकांच्या देवावर विश्वास बसला. परंतु त्याने ज्या पद्धतीने ज्यू लोकांना अपमानित केलं, त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली आणि त्यांच्यातल्या आज्ञा न मानणाऱ्या लोकांना निर्घृणपणे ठार केलं, ते बघता तो ज्यू लोकांसाठी यमदूताचा अवतारच ठरला.
अशा रीतीने जुडा आणि इस्राएलमध्ये दुभंगलेल्या ज्यू साम्राज्याची अखेर ज्यू लोकांच्या सर्वस्वाचा घास घेऊन झाली. यहोवा देवतेच्या आदेशाप्रमाणे एकेश्वरवादाचा मार्ग न धरता यहोवाव्यतिरिक्त इतर स्थानिक देवतांचीही पूजा करण्याच्या दुर्बुद्धीमुळे आणि एकत्र राहण्याऐवजी पवित्र भूमीची शकलं केल्यामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे, या निष्कर्षाला अखेर ते पराभूत झालेले आणि गुलामगिरीत जगणारे ज्यू लोक आले. पुढे त्यांना पुन्हा एकदा पुनर्वसनाची संधी मिळाल्यावर त्यांनी ज्या प्रकारे आपल्या राज्याचा आणि समाजरचनेचा विचार केला, ते बघता या बाबिलोनिअन काळात त्यांनी भोगलेल्या त्रासाचा त्यांच्या मनावर किती खोलवर प्रभाव पडला होता, हे दिसून येतं. यापुढचा ज्यू लोकांचा इतिहास आता एकेश्वरवादाच्या भक्कम पायावर लिहिला जाणार होता आणि आज ज्याला 'झिओनिस्ट ' विचार म्हणून ओळखलं जातं, ते ज्यू लोकांचं पवित्र भूमीचं वेड त्यांची ओळख बनणार होतं.
या घडामोडी घडत असलेला भाग ( ज्याला आज लेव्हन्टचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं ) हा जरी वेगवेगळ्या साम्राज्यांच्या कुरघोड्यांचं केंद्रबिंदू असला, तरी अनेक प्राचीन संस्कृती याच भागात जन्माला आल्या आणि विस्तारल्या. आजच्या इराक आणि सिरियाच्या भागात , मुख्यत्वे तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यात उदयाला आलेली मेसोपोटेमियन संस्कृती ही अतिशय प्रगत संस्कृती म्हणून ओळखली जाते. या मेसोपोटेमियाचे लोक ख्रिस्तपूर्व ६५०० - ३८०० मध्ये उबाईद काळात आजच्या सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात स्थायिक झालेले होते. पुढे ब्रॉन्झ युगाच्या अखेरीस मीडिअन लोक आजच्या बहारिन देशापर्यंत ये-जा करत असल्याचे उल्लेख बायबलमध्ये आढळतात. पुढे अरेबियाच्या उत्तर-पश्चिम प्रांतात लिहायान कबिल्याचं राज्य उदयाला आलं. त्यांच्यावर पुढे नाबातियन लोकांनी मात करून आपलं राज्य आणलं.
नंतरच्या अब्राहमच्या वंशजांच्या काळात या वाळवंटात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. हेगरचा या वाळवंटातला प्रवास, इथे वेगवेगळ्या बदाऊनी टोळ्यांचा झालेला सुळसुळाट, पुढे प्रेषित मुहम्मदांकडून स्थापन झालेला इस्लाम धर्म आणि या धर्मखाली इथल्या टोळ्यांचा झालेलं एकत्रीकरण या सगळ्यामुळे हा रखरखीत वाळवंटाचा प्रदेश इतिहासात आपलं अस्तित्व पावलोपावली ठळकपणे दर्शवत गेला.पुढच्या काही प्रकरणांमध्ये या विषयावर सविस्तर माहिती येणारच आहे, पण येथे या विषयाला हात घालण्याचं कारण म्हणजे लेव्हन्टच्या भागातल्या साम्राज्यांच्या चढाओढीत सामील होणार नवा गडी या प्रदेशातून चाल करून येणार होता. पर्शियाच्या साम्राज्याकडून आता या भागात अनेक महत्वाच्या घटना घडवल्या जाणार होत्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इथे जेरोबोमच्या इस्राएलच्या साम्राज्यात त्याच्यानंतर गादीवर बसलेला त्याचा मुलगा नादाब अल्पायुषी ठरला.

जेरोबोमचं राज्य जुडा ना? खरं तर ह्या भागाचे पहिले काही परिच्छेद वाचले. पण नंतर कोणाचा मुलगा कोण वगैरे तपशील फार गुंतागुंतीचा वाटल्याने कंटाळा आला वाचायचा. तेव्हा हा भाग स्किप करून एकदम पुढचा वाचेन. आय होप त्याने पुढचे भाग समजण्यात काही अडचण येणार नाही.

पण नंतर कोणाचा मुलगा कोण वगैरे तपशील फार गुंतागुंतीचा वाटल्याने कंटाळा आला वाचायचा. >>>>> आह! मला बरं वाटले हे वाचून.पुढचे वाचेपर्यंत मागचे विसरायला होत होते.नेटाने वाचले तरी कोण कोणाचा हे डोक्यावरून गेलेच.

थंबरनोमॅड, फार परिश्रम घेतले आहेत हो हे सारे भाग लिहायला.