अरबस्तानचा इतिहास - भाग ०७

Submitted by Theurbannomad on 18 February, 2021 - 19:26

' लोकशाही ' ते ' राजेशाही '

जोशुआने आपल्या हयातीत आपला उत्तराधिकारी नेमला नसला तरी त्याच्याबरोबरच देवाने ज्याला पवित्र भूमीमध्ये प्रथम पाय ठेवण्याचा मान दिला होता, त्या कालेबच्या हातात आता इस्राएलचं नेतृत्व येणं अपेक्षित होतं. परंतु इस्रायली लोकांनी थेट यहोवालाच जोशुआचा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न केला. यहोवाने आश्चर्यकारकरित्या एक उत्तराधिकारी न नेमता ' जोशुआचा उत्तराधिकारी म्हणजे इस्राएलच्या पवित्र भूमीचे ज्यू लोक ' असं उत्तर दिलं.या उत्तरामुळे इस्रायली लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ' बुक ऑफ जोशुआ ' नंतरच्या ' बुक ऑफ जजेस ' मध्ये वर्णन केल्याप्रमाणे या काळात इस्रायली लोकांमध्ये आपल्या राज्याचा विस्तार वाढवण्याची चढाओढ सुरु झाली होती आणि शीर्षस्थ नेतृत्वाच्या अभावामुळे गटबाजी आणि कुरघोड्यासुद्धा सुरु झाल्या होत्या.
सिमियान वंशाच्या लोकांनी साथ दिल्यामुळे इस्रायली लोकांनी आधी बेझेकवर हल्ला करून तिथल्या स्थानिक कनानाईट आणि पेरिझाइट लोकांची कत्तल केली. या लोकांचा प्रमुख होता अदोनी-बेझेक नावाचा क्रूर राजा. तो आपल्या जेवणातले उरले सुरले तुकडे त्याने कैद केलेल्या , तसेच हाताचे अंगठे आणि पायाची बोटं छाटलेल्या सत्तर राजांना अतिशय वाईट पद्धतीने खायला लावायचा. इस्रायली लोकांनी त्याला पळून जाताना पकडलं आणि त्याचीही तशीच अवस्था केली. त्यानंतर त्यांचा मोर्चा वळला तो जेरुसलेम शहराकडे. बरंचसं जेरुसलेम टाचेखाली येताच त्यांनी नेगेव्ह आणि हेब्रॉन आपल्या ताब्यात घेतलं.
आता पाली अली ती डेबीर शहराची. येथे कालेबने उघडपणे " जो वीर डेबीर शहर इस्राईलच्या साम्राज्यात आणेल, त्याच्याशी माझी मुलगी अकसा हिचा विवाह मी लावून देईन " अशी घोषणा केली. नेमका कालेबच्या भावाचा - कानाझचा मुलगा ओथनील या कामगिरीत यशस्वी झाला आणि आपल्या चुलतबहिणीचा आयुष्याचा जोडीदारही झाला. हा ओथनील ' बुक ऑफ जजेस ' मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्यू लोकांचा ' फर्स्ट जज ऑफ द नेशन ऑफ इस्राएल ' म्हणजे पहिला प्रमुख.
या इस्रायली लोकांनी पुढे गाझा, अशकरोन ,एक्रोन आणि या शहरांच्या आजूबाजूच्या प्रांतावर आपला अंमल प्रस्थापित केला.त्यातला समुद्रकाठच्या प्रांताचा भाग पुढे फिलीस्तीनी आणि इतर काही टोळीवाल्यांनी पुन्हा काबीज केला. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की इस्रायली लोक या समुद्रकाठच्या लोकांशी कधीही युद्धं करत नसत, कारण त्यांच्याकडे 'लोखंडी चाकांचे रथ' होते, जे अतिशय मजबूत असल्यामुळे त्यांच्यावर इस्रायली लोकांच्या अस्त्रशास्त्रांचा परिणाम होतं नसे. यहोवाने त्यांना आश्वस्त केलं होतं, की पुढे जाऊन या प्रांतावर आणि या लोकांवर त्यांचा विजय होईल. कालांतराने लोहधातूच्या कार्बनायझेशनचा शोध लागल्यावर इस्रायली लोकांनीसुद्धा लोखंडाचा चांगला वापर करण्यात प्राविण्य मिळवलं.
प्रत्येक साम्राज्याच्या भरभराटीचा काळ असतो, तसाच त्याचा पडता काळसुद्धा असतोच. कालचक्र फिरलं की भल्या भल्या लोकांची आयुष्य फिरतात. पॅलेस्टिनी लोकांमध्येसुद्धा हळू हळू अंतर्गत कुरबुरी आणि वर्चस्ववादातून येणार कटूपणा वाढायला लागला. मुळात इस्रायली लोक म्हणजे वेगवेगळ्या कबिल्यांच्या लोकांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला समूह होता. हे कबिले म्हणजे अब्राहम या त्यांच्या मूळपुरुषाच्या वंशजांच्या पुढच्या शाखा आणि पोटशाखा असल्यामुळे त्यांच्यात सगळंच आलबेल असणं शक्य नव्हतं. हळूहळू आजूबाजूच्या टोळ्यांनी आपले जे जे जुने प्रांत इस्रायली लोकांबरोबर लढाईत हरले होते, त्यातून पुन्हा आपला प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. इस्रायली लोकांमध्येही प्रांतांचे सुभेदार निर्माण होतंच होते. शेवटी हे अती होतंय, म्हणून यहोवाला आता हस्तक्षेप करणं महत्वाचं वाटू लागलं.
यहोवाचा देवदूत आपल्या या शेफारलेल्या लेकरांना भेटायला अखेर इस्रायलला आला. जोशुआ आणि कालेबच्या काळात देवदूत येतं असेल तर स्वतः लोक त्याला सामोरे जात असत, पण आता देवदूताला आपल्या या प्रजेला एकत्र आणायची कसरत करावी लागत होती. ' बुक ऑफ जजेस ' मधल्या शेवटच्या प्रमुखाच्या - सॅमसनच्या वडिलांना हा देवदूत भेटला आणि त्याने त्याला त्याच्या पत्नीच्या पोटी मुलगा जन्माला येईल अशी भविष्यवाणी ऐकवली. हा सॅमसन अतिशय शक्तिशाली होता. त्याने नुसत्या हातांनी सिंहाला ठार केलं होतं अशा त्याच्या अचाट शक्तीच्या आख्यायिका आहेत.
या सॅमसनने तिमना नावाच्या फिलीस्तीनी मुलीशी सूत जुळवलं आणि तिच्याशी लग्नही केलं. इस्रायली लोकांच्या आणि त्याच्या स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याने हा प्रकार केला असला, तरी यहोवाचा या सगळ्यात हात होता. फिलीस्तीनी टोळीला नेस्तनाबूत करण्याची ती एक शक्कल होती. यहोवाने या सॅमसनच्या शरीरात जी ताकद दिलेली होती, त्याचा पुढे या ' सत्कार्यात ' उपयोग होणार होता.
लग्नानंतरच्या मेजवानीच्या वेळी सॅमसन याने उपस्थित तीस-एक फिलीस्तीनी पाहुण्यांना एक कोडं घातलं. जर त्यांनी त्या कोड्याचं उत्तर दिलं तर तो त्यांना वस्त्रांचे तीस तागे देईल, अन्यथा त्यांनी सॅमसनला तीस तागे द्यावे अशी ती पैज होती. त्या फिलीस्तीनी लोकांनी तिमनाला धमकावून तिच्याकडून उत्तर काढून घेतलं आणि सॅमसन पैज हरला. त्याने लगोलग जवळच्याच अशकलोन प्रांतात जाऊन तिथे तीस फिलीस्तीनी लोकांना यमसदनाला पाठवलं आणि त्यांचे तागे घेऊन तो आपल्या बायकोच्या घरी आला. अर्थात या प्रकाराने चिडून तो पुन्हा आपल्या वडिलांकडे आला.
तिथे त्याच्या बायकोच्या घरच्यांनी तिचं लग्न एका फिलीस्तीनीशी लावून दिलं. काही दिवसांनी परतल्यावर त्याला झालेला प्रकार समजला आणि त्याचा राग अनावर झाला. त्याने फिलीस्तीनी लोकांच्या ऑलिव्हच्या बागा जाळून टाकल्या. फिलीस्तीनी लोकांनी त्याच्यावर चाल करून येताच आख्यायिकेप्रमाणे त्याने एका गाढवाच्या जबड्याचं हाड शस्त्र म्हणून हातात घेतलं आणि आपल्या यहोवाने बहाल केलेल्या दैवी ताकदीने १००० फिलीस्तीनी लोकांना एकहाती ठार केलं.
पुढे तो गाझा प्रांतात गेल्यावर तिथे त्याला डेलीला नावाची मुलगी आवडायला लागली. फिलीस्तीनी लोकांनी तिला काही करून सॅमसनच्या ताकदीचं रहस्य काढून घ्यायची गाळ घातली. अनेक दिवस प्रयत्न केल्यावर अखेर त्याचे केस कापले तर त्याची शक्ती कमी होते, हे रहस्य तिला त्याच्याकडूनच ज्ञात झालं आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला असताना तिने त्याचे केस कापून टाकले. ही शक्ती त्याला यहोवाने फिलीस्तीनी प्रांताचा बिमोड करण्याच्या उद्देशाने दिली आहे, हेही त्याच्याकडून तिने काढून घेतलं आणि फिलीस्तीनी लोकांना सांगितलं.
शक्तिपात झालेल्या सॅमसनला फिलीस्तीनी लोकांनी अखेर धरलं. त्याचे डोळे फोडून त्याला तुरुंगात कष्टाची कामं करण्यास पाठवलं. तुरुंगात त्याचे केस पुन्हा वाढले. फिलीस्तीनी लोकांनी आपल्या डॅगॉन देवतेला बळी देण्यासाठी या सॅमसनची निवड केली आणि त्याला देवळात आणलं. केस वाढलेले असल्यामुळे त्याची शक्ती पुन्हा पूर्ववत झालेली फिलीस्तीनी लोकांच्या लक्षात येत नाही. अखेर अंध असूनही देवळाच्या आधाराच्या खांबांना आपल्या शक्तीने कोसळवून सॅमसन तीन हजार फिलीस्तीनी लोकांसकट स्वतःला संपवतो. त्याचा देह त्या ढिगाऱ्यातून काढून आणून सॅमसनचे कुटुंबीय त्याचं त्याच्या वडिलांशेजारी दफन करतात.
या सॅमसनबरोबरच इस्रायली लोकांचा सहावा आणि शेवटचा प्रमुख संपला आणि फिलीस्तीनी लोकांनी इस्रायली लोकांबरोबर उभा दावा मांडला.आता सत्तेच्या संघर्षात त्यांचं पारडं जड झालं होतं. इस्रायली लोकांना एबेन-एझेरच्या लढाईत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी ' आर्क ऑफ द कॉवेनंट ' बाहेर काढलं. त्या दैवी ग्रंथाच्या शक्तीच्या साहाय्याने आपण लढाई जिंकू, या भ्रमात वावरणारे इस्रायली लोक अखेर ती ' आर्क ऑफ द कॉवेनंट ' फिलीस्तीनी लोकांच्या हाती गमावून बसले. ही आर्क त्यांनाही फळली नाहीच. त्यांनी जिथे जिथे ती आर्क आपल्या पराक्रमाच्या गाथा सांगायला नेली, तिथे तिथे त्यांच्यावर आणि त्या प्रांतावर अरिष्ट आलं. सात महिन्यानंतर अखेर फिलीस्तीनी लोकांनी वैतागून ती ब्याद पुन्हा इस्रायली लोकांच्या ताब्यात दिली. पण झालेल्या प्रकाराने इस्रायली लोकांचं मनोबल चांगलंच खच्ची झालं. त्यांच्यात निर्माण झालेल्या अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे एके काळचं त्यांचं विस्तीर्ण साम्राज्य लयास जातं की काय, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली.
इस्राएलमध्ये या परिस्थितीत उदय झाला तो राजेशाहीचा. इस्राईलच्या एकूण बारा मूळ टोळ्यांपैकी एक होती प्रेषित जेकब आणि रेचलच्या धाकट्या बेंजामिनच्या वंशजांची टोळी. या वंशात जन्मलेला किश आणि त्याची बायको यांच्या पोटी जन्माला आलेला सौल हा ज्यू लोकांचा पहिला राजा. अशा रीतीने पुन्हा एकदा प्रेषितांच्या थेट शाखेकडे इस्राएलचं नेतृत्व आलं. या घटनेत महत्वाचा ठरला तो सॅम्युएल नावाचा सीर.
हा सॅम्युएल एलकाना आणि हाना या लेवाईट दाम्पत्याच्या पोटी जन्माला. शिलोह प्रांताच्या महापुजाऱ्याकडे - इलाय कडे हा तिथल्या मंदिराच्या कामात मदत करत होता. अवघ्या ११ वर्षाच्या वयात त्याला काही गूढ आवाजाचे संकेत मिळायला लागले. हे संकेत ईश्वरी असावेत, असं इलायने सांगितल्यावर त्याने त्या आवाजाला उत्तर दिलं. ईश्वराने त्याला इलायच्या घरचे कसे नालायक आहेत आणि त्यांच्यामुळे त्या घराण्याचाच नव्हे, यार त्या प्रांताचाही कसा ऱ्हास होईल, याची माहिती दिली. त्याचप्रमाणे तो ईश्वराने नेमलेला प्रेषित आहे हेही त्याला सांगितलं.
आता ईश्वराचा हा प्रेषित आजूबाजूच्या इस्रायली लोकांना आदरणीय वाटू लागला आणि त्याच्या शब्दांना मान मिळू लागला. एबेन-इझरच्या दारूण आणि अपमानास्पद पराभवानंतर सॅम्युएलने पुढच्या वीस वर्षांमध्ये हळू हळू आपल्या सैन्याची जमवाजमव केली. अखेर मिझपा येथे सैन्य एकत्र करून त्याने फिलीस्तीनी लोकांवर चढाई केली. त्या इस्रायली लोकांनी फिलिस्तीनींना अक्षरशः कापून काढलं. आता समस्त इस्रायलला आपला महत्वाचा नेता मिळालेला होता. सॅम्युएल या सगळ्यांचा म्होरक्या झाला आणि स्वीकारलाही गेला. त्याच्याशी यहोवा थेट संभाषण करत असल्यामुळे त्याला प्रेषिताचा दर्जा मिळाला.
त्याने आपल्या दोन मुलांना - जोएल आणि अबीजा यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमलं असलं, तरी ते इस्रायली लोकांना पसंत पडले नाहीत. त्यांच्यात इस्रायली लोकांचं नेतृत्व करण्याची धमक नव्हती. फिलीस्तीनी लोक कधीही लचका तोडायला हल्ले करू शकतील, अशी अस्थिर परिस्थिती असताना एखादा खमक्या नेता पॅलेस्टिनी लोकांच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या ठिकाणी असणं अपेक्षित होतं. अखेर सॅम्युएलला तशी व्यक्ती मिळाली, टी सौल याच्या रूपाने. सौलच्या राज्यारोहणाच्या वेळी सॅम्युएलने राजाचा दर्जा ' प्रेषित ' आणि ' म्होरके ( जज ) " यांच्या खालोखाल असल्याचं महत्वाचं विधान करून नेतृत्वाची उतरंड आखून दिली.
या सौलवर सर्वप्रथम सॅम्युएलने यहोवाच्या आदेशानुसार आजूबाजूच्या अमलेकाइट राज्याचा पूर्ण बिमोड करून त्यांना संपूर्णपणे नष्ट करण्याची कामगिरी सोपवली. ते राज्य जरी संपवलं असलं, तरी सौलने अमलेकाइट राजाला - अगागला अभय देऊन सोडून दिलं. यहोवाच्या आदेशाचा हा अनादर आहे, तेव्हा त्याच्याच संमतीने राजा झालेल्या तुला तुझं राजेपण सोडूनही द्यायला लागू शकत, अशा तिखट शब्दात सौलची कानउघाडणी करून अखेर सॅम्युएलने अगागला ठार केलं.
या घटनेमुळे असेल, पण सौलबद्दल त्याच्या मनात अढी उत्पन्न झाली आणि त्याने डेव्हिड याला राजा म्हणून तयार करून त्याला गादीवर बसवलं.गोलिएथ नावाच्या शक्तिशाली फिलीस्तीनी महामानवाला ठार मारणारा तो हाच डेव्हिड. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सौलच्या नंतरचा ज्यू लोकांचा राजा झालेल्या या डेव्हिडने जेरुसलेम काबीज करून फिलीस्तीनी लोकांनी पळवून नेलेली ' आर्क ऑफ द कॉव्हेनन्ट ' पुन्हा पॅलेस्टिनी लोकांच्या ताब्यात आणली आणि पॅलेस्टिनी लोकांचं एकसंघ साम्राज्य तयार केलं. त्याच्या मुलाने - अबशालोम याने आपल्या बापाविरुद्ध बंद केल्यावर जिवाच्या भीतीने तो राज्याबाहेर पळून गेला, परंतु अबशालोम अकाली मृत्यू पावल्यावर त्याने पुन्हा पॅलेस्टिनी राज्याची धुरा हाती घेतली.
त्याने त्याच्या आयुष्यात केलेल्या अमाप रक्तपातामुळे यहोवाने त्याला ज्यू लोकांचं पवित्र मंदिर - ज्याला सिनेगॉग म्हणून आज ओळखलं जातं - बांधायची परवानगी नाकारली. त्याने आपल्या मुलाला - सॉलोमन याला आपला उत्तराधिकारी नेमलं. या सॉलोमनची कथासुद्धा अतिशय गुंतागुंतीची आहे. डेव्हिड जेरुसलेम येथे असताना त्याला बाथशेबा नावाची एक सुंदर स्त्री अंघोळ करताना दिसली. तिच्या सौंदर्यावर भाळून त्याने तिच्याबरोबर संबंध ठेवले , ज्यातून जन्माला आलेला मुलगा म्हणजे सॉलोमन. डेव्हिडचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा अदोनीजा त्याचा रूढार्थाने वारसदार असायला हवा होता, परंतु डेव्हिडने तो मान दिला सॉलोमनला.
या अदोनीजाने बंड करण्याचा प्रयत्न केला , परंतु त्याला यश आलं नाही. सॉलोमनने त्याला मोठ्या मानाने माफ केलं, पण काही वर्षांनी पुन्हा एकदा त्याने तसाच प्रयन्त केल्याचं समजल्यावर मात्र त्याला मृत्युदंड मिळाला. सॉलोमन जेव्हा गादीवर आला, तेव्हा इस्रायली लोकांचं राज्य चांगलंच एकसंध आणि विस्तारलेलं होतं. इतिहासात अतिशय शक्तिशाली आणि श्रीमंत म्हणून प्रसिद्ध असलेला सॉलोमन अजून एका महत्वाच्या कारणामुळे महत्वाचा ठरतो. या सॉलोमननेच जेरुसलेम येथे यहोवा देवतेच्या ज्यू लोकांचं पवित्र मंदिर उभारलं.
या सॉलोमनला प्रत्यक्ष यहोवाने अतिशय उच्च दर्जाची बुद्धिमत्ता वरदान म्हणून दिली होती. त्याच्या कुशाग्र बुद्धीचे आणि वैचारिक क्षमतेचे असंख्य किस्से आहेत. अनेक महत्वाच्या ग्रंथांचा रचनाकर्ता म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या राज्यामध्ये अनेक महत्वाच्या जागा विकसित केल्या. आधीच्या युद्धांमध्ये बेचिराख झालेली अनेक शहरं त्याने पुन्हा बांधून काढली. त्याच्या काळात इस्राईलच्या व्यापार इतका भरभराटीला आला, की इजिप्त, तैरे , अरबस्तानाचा आतला भाग या जवळच्या प्रदेशाबरोबरच समुद्रमार्गाद्वारे थेट दक्षिण भारताशी त्याचा व्यवहार चाले.
या सॉलोमनला ७०० बायका आणि ३०० अंगवस्त्र होती, असा इतिहासात उल्लेख आहे. थेट इजिप्तच्या फॅरोहची मुलगी त्याने आपली एक बायको म्हणून स्वीकारली होती. याशिवाय आजूबाजूच्या महत्वाच्या राज्यांमधल्या आणि कबिल्यांच्या राजकन्या लग्न करून त्याने आपल्या राज्यात आणल्या होत्या. थोडक्यात काय, तर हा चांगलाच ' स्त्रीलंपट ' होता हे नक्की. शेबा ( किंवा सबा ) नावाच्या आफ्रिकन राज्याची राणी ही सॉलोमनला वंश झालेली होती, जिच्यापासून पुढे जन्माला आलेले वंशज आजही इथिओपिया देशाच्या इतिहासात मानाचं स्थान राखून आहेत. असं म्हणतात, की सॉलोमनच्या राज्याकडून ' आर्क ऑफ द कॉव्हेनन्ट ' ची प्रतिकृती स्वीकारून या साहेबाच्या राणीचा सॉलोमनपासून झालेला मुलगा पहिला मानेलिक हा ज्यू धर्मिय झालेला होता.
या सॉलोमनच्या काळात एकसंध असलेलं ज्यू लोकांचं यहोवा देवतेला पुजणारं इस्राएलचं साम्राज्य त्याच्या मृत्यूनंतर मात्र दुभंगलं. पराभूत आणि कमजोर राज्याचं नेतृत्व करायला कोणीही आपणहून तयार होतं नसलं, तरी भरभराटीला आलेल्या प्रबळ साम्राज्यावर मात्र अनेकांचा दावा असतो. या सॉलोमनचा मुलगा रेहोबोम हा त्याचा नैसर्गिक उत्तराधिकारी असला, तरी त्या साम्राज्याच्या दहा कबिल्यांच्या प्रमुखांना हा राहोबोम आपला राजा म्हणून मान्य नव्हता. निमित्त होतं त्याच्या तुसड्या आणि गर्विष्ठ वागणुकीचं. मुळात इस्रायली समाजरचनेत प्रेषित आणि धर्मगुरूंना प्रचंड महत्व होतं. जरी सॉलोमनने ज्यू लोकांचं भलं मोठं मंदिर बांधून काढलेलं असलं, तरी त्यामुळे आसपासच्या प्रांतांमधल्या स्थानिक मंदिरांचं महत्व कमी झालं होतं. धर्माच्या जोडीने येणाऱ्या अधिकारामुळे पूर्वीच्या धर्मगुरूंना आणि त्यांच्या कोंडाळ्याला नाही म्हंटलं तरी गावपातळीवर महत्व होतं, जे या मंदिरामुळे कमी झालेलं होतं. तशात इस्राईलच्या उत्तर आणि दक्षिण भाग डेव्हिड हयात असेपर्यंत जरी इस्रायलचा भूभाग असला, तरी बराचसा स्वतंत्र निर्णय घेणारा होता. सॉलोमनच्या काळात झालेल्या राज्याच्या एकत्रीकरणामुळे तेही स्वातंत्र्य कमी झालं होतं. या सगळ्याचा उद्रेक झाला तो राहोबोमच्या राज्याभिषेकाच्या वेळी.
शेचेनच्या पवित्र भूमीवर जेव्हा हा सोहोळा साजरा होणार होता, तेव्हा या सोहळ्याच्या निमित्ताने वरिष्ठ मंत्रिमंडळाला सॉलोमनच्या संमतीने राज्यकारभारात काही महत्वाच्या सुधारणा सुचवायचा होत्या. त्या सुधारणांमुळे सत्ता आणि पैसा या वरिष्ठ मंत्रिमंडळाच्या हाती एकवटणार होता. अर्थातच प्रांतीय पुढाऱ्यांनी याला विरोध दर्शवला. आपल्या तुसड्या स्वभावाला आणि आजूबाजूच्या खुशमस्कऱ्यांच्या चिथावणीला अनुसरून राहोबोम अतिशय उद्धटपणे या विरोधकांशी भांडला. खुद्द सॉलोमनच्या शब्दांनीही त्याने आपला सूर बदलला नाही आणि तिथे दुहीची ठिणगी पडली.
अहिजा नावाच्या धर्मगुरूने मग या नाराज लोकांमधल्या असंतोषाचा वापर आपली पोळी शेकण्यासाठी करून घेतला. नेबात नावाच्या एफ्रेम कबिल्याच्या प्रमुखाचा मुलगा जेरोबोम याला त्याने हाताशी धरलं आणि बंडाळी घडवून आणली. सॉलोमनच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची ' जुडा ' आणि ' इस्राएल ' अशा दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली. जेरोबोम उत्तरेकडच्या इस्राईलच्या आणि राहोबोम दक्षिणेकडच्या ज्यूडाच्या राजगादीवर आले. कर्तृत्ववान पूर्वजांच्या पुढच्या पिढ्या भाऊबंदकीमध्ये होत्याचं नव्हतं करतात , त्यातलाच हा प्रकार.
इस्राएलच्या आजवरच्या इतिहासात सगळे संघर्ष ' कनानवासीय आणि यहोवाला पूजणारे ज्यू ' विरुद्ध इतर असे झाले होते. अनेक वेळा आपल्याच पवित्र भूमीसाठी त्यांनी भूतकाळात संघर्ष केला होता. प्रेषित, धर्मगुरू, राजे आणि वेळप्रसंगी खुद्द यहोवा देवसुद्धा या संघर्षात प्राणपणाने सामील झालेला होता. या सगळ्या प्रेरणादायी इतिहासाची सांगता या अशा घटनेत व्हावी, ही शोकांतिका अभिमानास्पद नसली तरी पुढे या दोन राज्यांच्या भविष्यात अशा काही घटना घडणार होत्या, की या प्रांताच्या समाजजीवनावर आणि इतिहासावर त्यांचा दूरगामी परिणाम होणार होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके कष्ट घेऊन लिहिताय ते ठिक पण एकुणातच भारतीय इतिहास सोडला तर बाकी अतिशय टुकार मागासलेले इतिहास वाटतात
बुक आॅफ झेस. लोल

फारच गुंतागुंत असलेला भाग. अर्थात आपल्या महाभारतातील नावे, नाते किंवा प्रसंग इतर धर्मिय लोकांना असेच गुंतागुंतीचे वाटत असतील असा विचार चाटून गेला.

वाचतॉ आहे. लिहीत रहा.

छान लेखमाला.
प्रत्येक भागात मागच्या भागांची लिंक देता आली तर सर्व भाग एका ठिकाणी सापडतील.