अरबस्तानचा इतिहास - भाग ०६

Submitted by Theurbannomad on 18 February, 2021 - 19:25

पुनश्च हरिओम

मोझेस आपल्या तांड्यासह सरतेशेवटी इजिप्तमधून कनानकडे निघाला. त्या प्रवासाची सुरुवात झाली रामसेस शहरामधून. हे शहर प्राचीन इजिप्त देशाचं अतिशय महत्वाचं शहर. तांडा सगळ्यात आधी सुकोथ नावाच्या शहरात आला. तेथून यहोवाच्या संरक्षणात हा तांडा लाल समुद्राच्या काठावर आला. बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मोझेसच्या तांड्यावर पुन्हा एकदा आपल्या उरल्या सुरल्या सैनिकांसह फॅरोहने हल्ला करण्याची योजना आखली आणि मागाहून ते मोझेसचा पाठलाग करत त्याच्या जवळ पोचले, तेव्हा यहोवाने इजिप्शिअन सैनिक आणि मोझेसचा तांडा या दोहोंमध्ये आगीची एक अभेद्य भिंत तयार केली. या भिंतीमुळे इजिप्शिअन सैन्य पुढे सरकू शकत नव्हतं. आता मोझेसने आपल्या आवाहनाने तांबडा समुद्र शब्दशः मधोमध दुभागला आणि त्या समुद्रतलावरून मोझेस आपल्या तांड्यासह इजिप्तच्या बाजूच्या काठावरून पलीकडच्या कनानच्या बाजूच्या काठावर सुखरूप आला. आता यहोवाने आगीची भिंत शांत केली.दुभंगलेल्या समुद्रात त्वेषाने फॅरोहचं सैन्य शिरलं आणि बघता बघता समुद्र पुन्हा पूर्ववत होऊन ते सगळं सैन्य समुद्राच्या पोटात सामावलं गेलं. पलीकडच्या काठावर उरला तो फक्त फॅरोह. मोझेसने एके काळच्या आपल्या या ' भावाला ' शेवटचं बघून घेतलं आणि कनानच्या दिशेने कूच केलं.
सिनाईच्या टेकड्यांच्या प्रदेशात आल्यावर अखेर मोझेसचा तांडा विसावला. मोझेसला या खडतर प्रवासात पावलोपावली यहोवाने हरतऱ्हेची मदत केली. या भागात अन्न आणि पाणी या दोहोंचं दुर्भिक्ष्य. याशिवाय प्रदेश रखरखीत. कधी 'मन्ना' ( एक प्रकारचं धान्य ) , कधी क्वेल पक्षी तर कधी पाणी पुरवून यहोवाने आपल्या लेकरांचा प्रवास शक्य तितका सुसह्य केला. दंतकथेनुसार रेफीडिअम नावाच्या जागी विसावा घेत असलेल्या या तांड्यावर कॅननवासियांना नेहेमी पाण्यात बघणाऱ्या अमलेकाइट्स कबिल्याने हल्ला केला. मोझेसला यहोवाचा आशीर्वाद होताच, त्यामुळे त्याने आपला हात उंचावताच त्याच्या तांड्यातल्या लोकांचा लढाईत वरचष्मा राहत असे, तर हात खाली केल्यावर अमलेकाइट्स लोकांचा. शेवटी आरोन आणि हूर यांनी त्याचे दोन्ही हात वर धरून ठेवले आणि मोझेसच्या डोळ्यांदेखत त्या लढाईत त्याच्या तांड्याची सरशी झाली आणि 'इस्राएल' स्थापनेच्या मार्गात आडकाठी आणू शकणारी एक टोळी अशा प्रकारे गारद झाली.
आपल्या या जावयाच्या स्वागताला जेथ्रो मोझेसच्या दोन्ही बायकांसह सामोरा आला. त्यानेच आग्रह केल्याप्रमाणे मग मोझेसने या 'इस्राएलाईट्स' लोकांमधून काही महत्वाच्या लोकांचं एक मंत्रिमंडळ तयार केलं. सिनाईचं वाळवंट तुडवल्यावर अखेर सिनाईच्या टेकड्यांवर सगळे जण पोचले आणि स्थिरावले, तेव्हा यहोवाने मोझेसला डोंगरमाथ्यावर येण्याची आज्ञा केली. येथेच त्याने आपल्या समस्त अनुयायांसाठी 'दहा मार्गदर्शक तत्व ' अर्थात 'टेन कमांडमेंट्स ' मोझेसच्या हवाली केल्या. एका दगडाच्या पाटीवर कोरलेल्या या कमांडमेंट्स म्हणजेच आजच्या ज्यू लोकांचा ' तोरा ' हा धर्मग्रंथ.
भूतकाळात कनानच्या वेगवेगळ्या कबिल्याचे आणि टोळ्यांचे लोक आपापल्या देवतेचं करत असलेलं पूजन थांबवून फक्त एकेश्वरवाद मानण्याची आज्ञा यहोवाने दिली. दहा तत्वांपैकी हे एक महत्वाचं तत्व. शिवाय आधीच्या सगळ्या देवदेवतांना पूर्णपणे विसरून जायचा स्पष्ट संदेशही त्याने दिला. या क्षणापासून एकच देवाला , एकच पवित्र भूमीला आणि एकच ग्रंथाला मानणारे ज्यू लोक खऱ्या अर्थाने सुसंघटित झाले. या तत्वांमध्ये आखून दिलेलं अजून एक महत्वाचं तत्व म्हणजे आठवड्यातून एक दिवस विश्रांती आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी राखून ठेवणं. या दिवसाला ' सब्बाथ ' असं संबोधलं जाऊ लागलं. आजही ज्यू आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये हा 'सब्बाथचा दिवस' असतो.
मोझेसकडून यहोवाच्या आज्ञा पाळण्यात फक्त एक चूक झाली. पिण्याचं पाणी हवा असेल तर कोणत्याही खडकाजवळ जाऊन त्या खडकाशी फक्त संभाषण केलं तरी त्यातून पाण्याचा झरा फुटेल हे सांगूनही मोझेसने पाण्याच्या शोधात एक खडक फोडण्याचा प्रयत्न केला. देवाच्या आज्ञेवर एका अर्थाने अविश्वास दाखवल्यासारखी ती कृती असल्यामुळे त्याच्यावर देवाचा कोप झाला होता.
काहीही असलं, तरी मूळ कनानच्या आणि इजिप्तहून बरोबर आलेल्या इतर लोकांच्या सततच्या भुणभुणीला आणि प्रश्नांना तोंड देणं खायचं काम नव्हतं. मोझेसने आरोनच्या साहाय्याने तब्बल चाळीस वर्ष या सगळ्या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड दिलं. दहा मार्गदर्शक तत्वांच्या व्यतिरिक्त समाजजीवनाचे अधिकचे नियमसुद्धा या काळात यहोवाने मोझेसला सांगितले. या सगळ्याच्या एकत्रीकरणातून जन्माला आला तो ज्यू धर्मियांचा महत्वाचा ग्रंथ - बुक ऑफ द कॉवेनंट ' म्हणजेच ज्यू लोकांचा करारनामा. थेट यहोवाने आखून दिलेली ही तत्व आजही ज्यू लोकांच्या जीवनाची दिशा निश्चित करतात.
जॉर्डन नदीच्या पूर्वेकडचा जवळ जवळ सगळं प्रदेश या काळात मोझेसने आपल्या अधिपत्याखाली आणला. तरीही केवळ यहोवाच्या आज्ञेला तंतोतंत नं मानल्यामुळे त्याला त्याच्या हयातीत 'इस्राएल'च्या पवित्र भूमीत पाय ठेवता आला नाही. यहोवाने मनाई केल्यामुळे त्याला आपल्या अनुयायांना 'इस्राएल'च्या भूमीपर्यंत नेता आलं नाही. वयाच्या १२०व्य वर्षी अखेर मोझेसने मोआबच्या प्रांतात नेबो टेकड्यांजवळच्या प्रदेशात देह ठेवला. इस्राएलच्या पवित्र भूमीपासून हे ठिकाण अगदी हाकेच्या अंतरावर आहे, यावरून आपल्या आदेशच पालन तंतोतंत न केल्यामुळे यहोवा देव किती निष्ठुर होऊ शकतो, याची कल्पना येते. बेत प्योर नावाच्या ठिकाणी त्याच दफन केलं गेलं.
मोझेस जेव्हा आपल्या तांड्यासह कनानच्या भूमीजवळ आला, तेव्हा त्या भूमीची व्यवस्थित माहिती मिळवायच्या हेतूने त्याने एकूण १२ अनुयायी पुढे पाठवले. या अनुयायांना बायबलमध्ये 'हेर' अशा अर्थाने संबोधलं गेलं आहे. या हेरांमधला महत्वाचा होता जोशुआ. हा जोशुआ यहोवानेच मोझेसचा उत्तराधिकारी म्हणून निवडला असल्यामुळे मोझेसनंतर इस्रायली लोकांच्या प्रमुखपदी त्याची वर्णी लागली.
या जोशुआच्या आई-वडिलांबद्दल निश्चित माहिती आजतरी उपलब्ध नाही. अर्थात प्रत्यक्ष मोझेसचा उत्तराधिकारी असल्यामुळे तो मूळच्या कनानवासीय लोकांपैकीच एक होता ही त्याची ओळख तर्कसंगत वाटते. मोझेसच्या आयुष्यातलं त्याचं महत्व समजायला एक उपलब्धी पुरेशी आहे, ती ही, की ज्या तंबूमध्ये यहोवा आणि मोझेस संभाषण करत असत, त्या तंबूच्या रक्षणाची जबाबदारी या जोशुआकडे होती. इस्राएलच्या भूमीची माहिती घेऊन परतलेल्या त्या १२ हेरांपैकी फक्त जोशुआ आणि कालेब या दोघांनीच त्या भागाचा सकारात्मक अहवाल मोझेसला दिल्यामुळे त्या दोघांनाच यहोवाने सर्वप्रथम इस्राएलच्या पवित्र भूमीवर पाय ठेवायचा मान दिला.
मोझेसच्या पावलांवर पाऊल ठेवत या जोशुआने आपल्या प्रजेसह जॉर्डन नदी पार केली. तांबड्या समुद्राला दुभंगून जसा मोझेस पल्याड आला, तसाच जोशुआ ही नदी दुभंगून आपल्या अनुयायांसह पलीकडे चालत गेला. येथे त्याची गाठ पडली जेरिकोवासीयांशी. हे तटबंदीयुक्त शहर पवित्र इस्राएलच्या भूमीचा एक भाग होतं. इथे लढल्या गेलेल्या युद्धाचं वर्णन मोठं रोचक आहे. आपल्या हेरांकडून हे शहरवासी इस्रायली लोकांना आणि यहोवाला वचकून असल्याची खबर जोशुआला मिळाली. एकूण सहा दिवस ' आर्क ऑफ द कॉवेनंट ' - एक अशी संदूक जिच्यात बुक ऑफ द कॉवेनंट ठेवलेलं होतं - घेऊन इस्रायली धर्मगुरूंनी आणि लोकांनी त्या शहराच्या तटबंदिभोवती प्रदक्षिणा घातली. सातव्या दिवशी पुन्हा एकदा सात वेळा त्यांनी हा प्रकार केला आणि आपले कर्णे वाजवायला सुरुवात केली. त्याचबरोबर इस्रायली लोकांनी प्रचंड आवाजात जल्लोष सुरु केला. हे कर्णे एडक्याच्या शिंगांपासून बनवलेले होते, असा उल्लेख हिब्रू बायबलच्या ' बुक ऑफ जोशुआ ' मध्ये आहे.
आजच्या वैज्ञानिक दृष्टीने विचार केला, तर ध्वनीच्या मारक क्षमतेचा उपयोग करून इस्रायली लोकांनी ती जेरिको शहराची तटबंदी ध्वस्त केली. या घटनेचा उल्लेख वाचला, तर ध्वनी एक शस्त्र म्हणून उपयोगात आणून अक्खी तटबंदी फोडून काढण्याचा परिणाम त्या जेरिको शहराच्या लोकांवर काय झाला, हे समजत. कानाचे पडदे फाटून त्या बिचाऱ्या जेरिकोवासीयांना कायमचं बहिरेपण आलं असावं, अशी शंका हे वर्णन वाचताना सारखी येतं राहते. यहोवाच्या नियमानुसार आता त्या ४०००० इस्रायली लोकांनी त्या शहरातला एकूण एक सजीव ठार केला. वाचली ती राहाब नावाची वेश्या, जिने इस्रायली हेरांना आपल्याकडे सुरक्षित आसरा दिला आणि तिचे ' लोक ' , जे तिच्या विश्वासातले आणि नात्यातले होते. जोशुआने कदाचित इजिप्तच्या दिवसांमध्ये तिथल्या फॅरोहकडून प्रेरणा घेतली असणार, कारण जेरिको शहराची तटबंदी जो कोणी बांधायला जाईल, त्याच्या घरात जन्माला येणारं मूल ठार केलं जाईल असं त्याने फर्मान काढलं. या जेरिको शहराची जागा १८६८ साली चार्ल्स वोरेन याने शोधून काढली, जी आज इस्राएलमध्ये असून तेल एस-सुलतान या नावाने प्रसिद्ध आहे.
तिथून पुढे आय नावाच्या शहरावर दुसऱ्या प्रयत्नात इस्रायली लोकांनी विजय मिळवला. त्यांना मग तिथल्या जेरुसलेम, हेब्रॉन, जेर्मुथ, लाचिष आणि एग्लोन या पाच आमोराईट प्रांताचे राजे येऊन मिळाले. प्रबळ झालेल्या सैन्यासह इस्रायली लोकांनी मग जीबीयन शहरावर हल्ला चढवला. या ठिकाणी यहोवाच्या मदतीने जोशुआने आकाशातल्या सूर्याला आणि चंद्राला आपापल्या जागी स्थिर करून दिवस लांबवला आणि लढाई जिंकली अशी कथा बायबलमध्ये प्रसिद्ध आहे. यहोवा स्वतः या युद्धात जातीने उतरला आणि भल्या मोठ्या आकाराच्या गारा आकाशातून शत्रुसैन्यावर फेकून त्याने ते सैन्य गारद केलं. अशा पद्धतीने यहोवाच्या सक्रिय मदतीच्या साहाय्याने जोशुआने अनेक युद्धं जिंकली आणि पवित्र कनान भूमीच्या सगळ्या प्रांतावर त्याने आपला अंमल बसवला. त्याच्या हातून इस्राएलचे पवित्र राज्य अखेर स्थापन झालं. अनेक इतिहाससंशोधक या कामगिरीमुळे जोशुआला मोझेसनंतरचा ईश्वराचा प्रेषित मानतात.
वयाच्या ११०व्या वर्षी अखेर या लढवय्या रांगड्या गड्याने शेवटचा श्वास घेतला. आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये त्याने आपल्या धर्माचे आणि रोटीबेटी व्यवहाराचे पावित्र्य जपण्यासाठी इस्रायली लोकांना आसपासच्या स्थानिक टोळ्यांशी काहीही संबंध न ठेवण्याचा आदेश दिला. ज्यू लोकांचा टोकाचा वांशिक अभिमान हा इतका जुना आहे.त्याचबरोबर त्याने या वाचनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ओक झाडाच्या खाली एक कोनशिला स्थापन केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं किमनथ-हेरेस येथे त्याच्या अनुयायांनी दफन केलं. आज ही जागा वेस्ट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनच्या एका भागात आहे.
या जोशुआला मुस्लिम लोकांमध्येही अतिशय मानाचे स्थान आहे.या जोशुआचा उल्लेख ते ' अल्लाहने आशीर्वाद दिलेला ' आणि ' अल्लाहचा खरा अनुयायी ' असा करतात. आकाशातला सूर्य कधीही कोणासाठीही थांबला नाही, पण या जोशुआसाठी मात्र त्याने अपवाद स्वीकार केला अशा प्रकारे त्याच्याबद्दल ' अल-जलालायीन ' मध्ये गौरवोद्गार काढलेले आहेत.
कनानच्या म्हणजेच इस्राएलच्या पवित्र भूमीवर आता यहोवाच्या प्रजेचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले होते. यहोवाने प्रत्यक्ष मदत करून आपल्या दैवी शक्तीच्या साहाय्याने या ज्यू लोकांना संरक्षित केल्यामुळे त्या प्रांतात त्यांचा चांगलाच दरारा निर्माण झाला होता. आजच्या पॅलेस्टीने, इस्राएल, जॉर्डन, सीरिया आणि इराकचा काही भाग अशा विस्तीर्ण प्रांतापर्यंत ऐसपैस पसरलेली इस्रायलची सीमा म्हणजे ज्यू लोकांचं स्वतःच हक्काचं साम्राज्य होतं. ज्यू लोकांच्या आयुष्यातली वणवण संपून आता त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झालेली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users