उरण्या ( Uranya) : गालातल्या गालात हसवणारा एक धमाल ग्रीक चित्रपट

Submitted by अजय on 18 February, 2021 - 00:17
 uranya

अमेझॉन प्राईमवर असलेला हा चित्रपट म्हणजे एक धूळीत हरवलेलं रत्न म्हणता येईल.

साल १९६९. ग्रीसमधल्या एका बेटावर राहणार्‍या ५ टीन एजर मुलांची ही कहाणी. या ५ जणांना मोठे व्हायची खूप घाई झाली आहे. म्हणजे कधी एकदा आपला कौमार्यभंग होतो याची. Happy

आता आपल्यातल्याच कुणाचा कौमार्यभंग आधी, कुणाचा नंतर हे त्याना पटणं शक्य नाही. पाच जण एकमेंकात करार करतात की कौमार्यभंग होणार तो सगळ्यांचा एकदमच, एकाच आठवड्यात. पण गावातलं वातावरण तसं कर्मठ. त्यामुळे अजून अनेक वर्ष वाट पहायची , मग रीतसर कुणाशी लग्न करायचं, इतकं थांबायची त्यांची मुळीच तयारी नाही. त्यातून एकाला असा शोध लागतो की गावाबाहेर राहणारी "उरण्या " ही सुंदर बाई म्हणे पैसे घेऊन तुमचा कौमार्यभंग करून देते. एकाच्या, मोठ्या भावाच्या, मित्राच्या मित्राने हे सांगितले असते. मग हे पाच वीर, केवळ या ऐकीव माहितीवर, तिला न भेटता, तिला देण्यासाठी पैसे साठवायला सुरु करतात.
त्याच काळात गावात पहिल्यांदाच सिनेमा येतो. गावातला एक गडी , तंबू टाकून थियेटरचा धंदा सुरु करतो. त्यातला एक चित्रपट "फक्त प्रौढांसाठी" असतो त्यामुळे या ५ जणांना आत प्रवेश मिळत नाही. मग आपला एक हिरो, थियेटरच्या कुंपणाबाहेरून , लटपटी करून , उंचावरून आत थियेटरमधले पाहण्याच्या प्रयत्नात, स्वतःचा पाय मोडून घेतो.
पाच जणात (४ विरुद्ध १) भरपूर बाचाबाची होते . "तुझा पाय मोडल्यामुळे, आमचा कौमार्यभंग, आम्ही पुढे का ढकलायचा? तू तुझा पाय बरा झाल्यावर कर" या मुद्दयावरून इतर चौघे चिडले असतात. पण शेवटी त्यांची तडजोड होते.

ही फक्त एक झलक आहे. पण कौमार्यभंगाच्या आड एकामागे एक अनेक अडचणी येत जातात , त्यातून कथा पुढे सरकत जाते. या बरोबर ग्रीसमधे नुकतीच कम्युनिस्ट राजवट आली असते पण गावातल्या कुणालाच ती नको असते याचेही उपकथानक त्यात आहे. इतर व्यक्तीरेखा, त्यांचे प्रसंग, उपकथानक हे प्रत्यक्षातच पाहण्यासारखे आहे.

हा सगळा चित्रपट टीन एजर मुलांंच्या डोळ्यातून पहायचा आहे.

चित्रपटाचा मुख्य विषय सरळ सरळ सेक्शुअल आहे (coming of age movie) . पण नग्नता किंवा संभोग दृष्ये नाहीत. कथानक, दिग्दर्शन , पटकथा, अभिनय, छायाचित्रण, नाट्यमयता या अत्यंत मूलभूत गोष्टी एकदम सकस आहेत. चित्रपट क्षेत्रातल्या विद्यार्थ्याने तर आवर्जून बघावा.

IMDB वरचा हा एक अभिप्राय खूप काही सांगून जातो -
"My wife convinced me to go to our local Othellos cinema in Limassol to watch this movie. All I can say is that I was amazed by the quality of this picture. The direction, the casting, the nostalgic 60's atmosphere, the photography, the landscapes and even the special effects were all without precedent for a Greek movie. You get the feeling that you're on a magic carpet ride right up to the climax and when you get there you wish the movie would not end. It proves that a well crafted story is all that is needed to create magic."

चित्रपट ग्रीक भाषेत आहे. इंग्रजी सबटायटल सकट पाहणे आवश्यक !

पण मग शेवट नक्की काय होतो, "उरण्या" जर खरोखर पैसे घेत असेल तर इतक्या कर्मठ गावात तिला कसे राहू देतात, "उरण्या " हे पात्र अगदी थोडा वेळ आहे तरी त्या पिक्चरचं नाव "उरण्या " का आहे, हे समजण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.

आणि हो हे फक्त माझेच मत नाही. २००७ साली थेसालोनिकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिले पारितोषिक मिळालेला हा चित्रपट आहे.
वेळ : १ तास ३५ मिनिटे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख वाचून मलेना चित्रपटाची आठवण झाली. IMDB चा अभिप्रायाने उत्सुकता वाढली. चित्रपट पाहण्यात येईल. लेखासाठी आभार.

भारीच
ग्रीक आणि बराच सुपीरियर बालक पालक दिसतोय हा.
नक्की बघते
(शोधला.भारतीय प्राईम वर मिळाला नाही.)

परिचय आवडला. घरातले प्री-टीन्स घरात नसताना किंवा झोपलेले असताना बघायला पाहिजे Happy
बालक-पालक बघून का कोण जाणे, पण शेवटी हाताला काही लागलं नाही असं वाटलं होतं. परत बघितला पाहिजे एकदा.

छान परिचय. आवडेल असं वाटतयं. ग्रीक लँडस्केप्स आवडतात. बघणारं. वेगळ्या भाषेतील चांगल्या सिनेमाचा परिचय लिहिल्याबद्दल आभार , आवर्जून बघितल्या जात नाहीत.

छान परिचय. तो फोटो बघून लक्षात आले की प्राइम वर काहीतरी बघायला शोधताना अनेकदा टेम्प्ट होउन सुद्धा समहाउ बघितला गेला नाही Happy

छान ओळख करून दिलीय.
इथे भारतात दिसेल का ? कारण इथे मला दोन तीन इराणी चित्रपट सापडले नाहीत. ते बहुतेक तिकडच्या प्राईमवर आहेत.

इथे वाचून पाहीला काल, मस्त आहे.

चित्रपटाचा मुख्य विषय सरळ सरळ सेक्शुअल आहे (coming of age movie) . पण नग्नता किंवा संभोग दृष्ये नाहीत.>>>
तरी एका दृष्यात एका गाढवाने थोडा गाढवपणा केला आहेच Wink

अजयजी
असंच मलेना या इटालियन मूव्हीबद्दल पण लिहा. तुमच्या भाषेत वाचायला आवडेल.