अरबस्तानचा इतिहास - भाग ०३

Submitted by Theurbannomad on 17 February, 2021 - 11:52

कुटुंबकलह

अब्राहमच्या आयुष्यात सारा ही त्याची लग्नाची बायको होतीच। या साराच्याच दासींपैकी एक असलेली हेगर ही इजिप्शिअन स्त्री अब्राहमच्या विशेष मर्जीतली होती. ही हेगर अब्राहमच्या गुलामांपैकी एक होती, असे उल्लेख ' बुक ऑफ जेनेसिस ' मध्ये आहेत , परंतु कुराण मात्र तिला अब्राहमच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा देतं. काहीही असलं, तरी ही हेगर साराच्या डोळ्यात खुपू लागली ती एका नाजूक कारणामुळे. साराच्या आधी हि हेगर गर्भवती राहिल्यामुळे अर्थात अब्राहमला आपल्याकडून नाही, तर आपल्या दासीकडून वंशज मिळणार हा राग साराच्या मनात होताच , याशिवाय आपल्याला गर्भधारणा होत नसल्यामुळे आपल्यापेक्षा हेगरचा प्रभाव आपल्या नवऱ्यावर राहणार याची खंतही होती. अखेर साराच्या जाचाला कंटाळून हेगरने आपल्या गर्भवती अवस्थेतच त्या प्रांतातून निघून जायचा निर्णय घेतला. साराचा अब्राहमवर इतका प्रभाव होता, की तिने हेगारविरोधात अब्राहमचेसुद्धा कान भरले होते. अब्राहमचे वय ही घटना घडली तेव्हा ८६ वर्षाचं होत, असा बायबलमध्ये उल्लेख आहे.
ही हेगर कनानच्या भूमीतून बाहेर पडली आणि शूर नावाच्या प्रांताच्या दिशेला चालायला लागली. हा प्रांत म्हणजे आजच्या सिनाईच्या वाळवंटाचा प्रदेश, असा अनेक इतिहासतज्ञांचं मत आहे. वाटेतल्या एका झऱ्याच्या जवळ तिला एक देवदूत भेटला, ज्याने तिला पुन्हा साराकडे परतायला सांगितलं. त्यानेच हेगरला पुढे तिचा होणारा ' मुलगा ' ( मुलगी नव्हे ) अतिशय शक्तिशाली होईल , असं भाकीत ऐकवलं. त्या मुलाचं नाव हेगरने 'इश्माईल' ठेवावं असाही सल्ला त्या देवदूताने तिला दिला. पुढे हेगर या देवदूतच उल्लेख ' एल रोई ' या नावाने करत असे.
देवदूताची आज्ञा शिरसावंद्य मानून हेगर अखेर आपल्या नवर्याकडे आणि सवतीकडे परतली. काही दिवसातच तिला मुलगा झाला आणि देवदूताच्या सल्ल्याप्रमाणे तिने त्याचं नाव 'इश्माईल' असंच ठेवलं.
इश्माईलच्या जन्माच्या तेरा वर्षांनी यहोवाने पुन्हा एकदा अब्राहमला दृष्टांत दिला. असा म्हणतात, की या क्षणापर्यंत अब्राहमचं नाव 'अब्राम ' आणि साराचं नाव ' सराई ' होतं , परंतु यहोवानेच त्यांचं नामकरण केलं. अब्राहम या नावाचा अर्थ होतो अनेक देशांचा राष्ट्रपिता आणि सारा या नावाचा अर्थ होतो राणी. याचं दृष्टांतात यहोवाने अब्राहमला त्याच्या पुढच्या पिढीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा सुंता करण्याच्या सक्तीचा आदेशही दिला. त्यानुसार त्याने स्वतःसकट आपल्या अनुयायांपैकी सगळ्या पुरुषांचा आणि इश्माईलचा सुद्धा सुंता करवून घेतला. अब्राहमचे वय ही घटना घडली तेव्हा ९९ वर्षाचे होते.
या घटनेनंतर काही दिवसांनी आपल्या तंबूशेजारच्या एका झाडाच्या बाजूला बसलेला असताना त्याला आकाशात यहोवा आणि तीन देवदूत दिसले. लगबगीने त्याने त्या तिघांना गुढघ्यात बसून अभिवादन केले आणि त्यांच्या पादप्रक्षालनाची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांना त्याने आपल्या घरचं अन्न ग्रहण करण्याची विनंती केली. ती स्विकारली जाताच त्याने साराला ब्रेड तयार करण्यास फर्मावले आणि आपल्या एका मदतनिसाला दूध, दही आणि गायीचा बछडा आणायला सांगितला. त्या तिघांनी हा 'नैवेद्य ' संपवेपर्यंत अब्राहम त्यांच्या बाजूला उभा होता. त्यातल्या एकाने मग अब्राहमला आपण पुढच्या वेळी येऊ, तोपर्यंत साराला मूल झालेलं असेल अशी भविष्यवाणी ऐकवली. इतक्या वृद्ध वयात आपल्याला मूल कसं होणार, याचा विचार मनात येऊन सारा हसली, ज्यावर देवदूतांनी आक्षेप घेतला. ईश्वराला काहीच अशक्य नाही, तेव्हा आपल्या बोलण्यावर साराच विश्वास का नाही, असा थेट प्रश्न आल्यावर चपापून साराने सारवासारव केली.
मेजवानीनंतर ते तिघे अब्राहमला घेऊन समोरच्या टेकडीवर आले. तिथून त्यांनी सोडोम आणि गोमोरा शहरांच्या दिशेने नजर फेकली. या शहरांमध्ये अधर्म आणि वाईट आचार प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे अखेर ईश्वरी हस्तक्षेप अनिवार्य आहे, हे त्यांनी अब्राहमला सांगताच त्याच्या मनात ईश्वरी प्रकोपाचं भीषण चित्र उभं राहिलं. त्या शहरांमध्ये कमीत कमी दहा सज्जन मनुष्य असतील, तर त्या शहरांचा विनाश रोखता येऊ शकेल का, या त्याच्या विनंतीवजा प्रश्नावर ईश्वराने अखेर तसं असेल तर त्या शहरांना सर्वनाशापासून वाचवण्याचं वचन अब्राहमला दिलं. याच सोडोम शहराच्या जवळ अब्राहमच्या भाच्याचं - लॉटचं - वास्तव्य होतं. त्या तिघांपैकी दोघे जण मग त्या ' दहा सज्जनांचा शोध घ्यायला ' एकेक शहराच्या दिशेला निघाले.
सोडोम शहराजवळ येताच त्यांना लॉट भेटला. त्याने त्यांना आपल्या घरात येण्याची विनंती केली. शहराच्या काही लोकांनी लॉटच्या घरासमोर गर्दी करून त्या आगंतुक पाहुण्यांना लॉटने सगळ्यांसमोर आणावं अशी धमकी द्यायला सुरुवात केली. त्याऐवजी आपल्या कुमारिका असलेल्या तरुण मुलींना गर्दीच्या हवाली करण्याचा प्रस्ताव लॉटने त्या गर्दीला दिला. गर्दीने दार तोडायची धमकी द्यायला सुरु करताच त्या शहराच्या लोकांची मानसिकता देवदूतांच्या ध्यानात आली. त्यांनी आल्या ईश्वरी शक्तीने गर्दीतल्या प्रत्येकाची दृष्टी अधू करून लॉटला वाचवलं आणि त्याला आपली ओळख सांगितली. आता मात्र त्या गावाला ईश्वरी प्रकोपापासून वाचवणं अब्राहमच्याही हातात उरलं नव्हतं .
दुसऱ्या दिवशीय पहाटे अब्राहम त्याच टेकडीवर गेला. समोर नजर टाकताच ' दहासुद्धा सहृदयी सज्जन नसलेल्या ' त्या दोन्ही शहरांच्या जागी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले त्या दोन शहरांचे भग्नावशेष आणि त्यातून आकाशापर्यंत पोचलेला धुराचा लोट त्याला दिसला. लॉट आणि त्याचे कुटुंबीय तेव्हढे त्या देवदूतांच्या मदतीमुळे जीव वाचवण्यात यशस्वी झाले.
परंतु त्या तीन देवदूतांनी अब्राहमला दिलेल्या भविष्याच्या दृष्टांताने मात्र अब्राहमच्या आयुष्यात वर्षभरातच - म्हणजे अब्राहमच्या वयाच्या १००व्या वर्षी - एक महत्वाची घटना घडवून आणली. प्रत्यक्ष ईश्वराकडूनच अब्राहमला भविष्य सांगितले गेले होते, त्यामुळे अर्थातच साराने शंका घेऊनही जे व्हायचं ते झालं. १००व्या वर्षी अब्राहम पुन्हा अनेकदा 'बाप' झाला. साराला अब्राहमकडून एक मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे अब्राहम आणि साराचा ' पवित्र ' वंश पुढे नेणारा एका अर्थाने औरस पुत्र. या दाव्याबद्दल मात्र वेगवेगळ्या धर्मीयांमध्ये मतभिन्नता आहे, कारण बायबल आणि तोरा या ग्रंथांनी जरी हेगरला अब्राहमच्या बायकोचा दर्जा दिलेला नसला, तरी कुराणात मात्र तिला अब्राहमची लग्नाची दुसरी बायको असंच संबोधलं गेलेलं आहे .
काहीही असलं, तरी ईश्वरी दृष्टांताच्या बरोब्बर एक वर्षाने साराच्या पोटी जन्माला आलेला हा ' आयझॅक ' सारासाठी सर्वच दृष्टीने महत्वाचा ठरला. अब्राहमच्या वंशाचा वारसदार म्हणून त्याला मान मिळणार आणि त्याचा पालनपोषण लाडाकोडात होणार हे ओघाने आलंच होतं. त्यामुळे तो थोडा मोठा झाल्यावर अब्राहमने आपल्या समस्त कुटुंबकबिल्याला मेजवानी दिली. अब्राहमच्या नशिबात ईश्वराने काय भोग लिहून ठेवले होते कुणास ठाऊक, पण कोणत्याही क्षणांचा निखळ आनंद काही त्याच्या वाट्याला आलं नाही, हेच खरं , कारण याच मेजवानीतून पुढे हेगर आणि सारामधल्या वितुष्टाचा नवा अध्याय लिहिला गेला.
हेगरच्या मुलाने - इश्माएलने - आपल्या लहान सावत्र भावाची म्हणजेच आयझॅकची थट्टा केल्याचं निमित्त झालं आणि साराच्या मनातला द्वेष पुन्हा एकदा जागृत झाला. अब्राहमची पट्टराणी असल्यामुळे आपला मुलगा आयझॅक अब्राहमचा वारसदार म्हणून पुढे यावा ही तिची सुप्त इच्छा होतीच. अखेर अब्राहमने ( बहुदा ) या कुटुंबकलहापुढे हात टेकले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी हेगर आणि इश्माएल या दोघांना समोर बोलावून घेतलं, त्यांच्या हातात खाण्यापिण्याचं सामान आणि पाणी दिलं आणि त्या दोघांना ' बीरशेबा ' नावाने परिचित असलेल्या दक्षिणेकडच्या नेगेव्ह वाळवंटातल्या प्रांताकडे निघून जायला फर्मावलं. आजही या नावाचं शहर इस्राएलमध्ये त्याच ठिकाणी आहे, यावरून या शहराच्या प्राचीनतेची कल्पना येऊ शकते.
या शहराबद्दलची एक महत्वाची आख्यायिका हिब्रू बायबलमध्ये आढळते. अब्राहम आणि स्थानिक फिलीस्तीनी ( पॅलेस्टिनी ) राजा अबिमेलेच यांच्याशी संबंधित ही कथा आहे. अब्राहम फिलीस्तीनी प्रांतातल्या कादेश आणि सूर शहरांमधल्या गेरार भागात राहात असताना त्याने साराची ओळख आपली बहीण म्हणून उघडउघड्पणे करून द्यायला सुरुवात केली होती. साराच्या आरस्पानी सौंदर्यामुळे अबिमेलेचला तिची भुरळ पडली नसती, तरच आश्चर्य होतं. परंतु त्याने तिला स्पर्श करण्याआधीच ईश्वराने त्याला सारा ही अब्राहमची बायको असल्याचा दृष्टांत दिला आणि त्याला एका विवाहित स्त्रीशी संबंध ठेवण्याचं पाप करण्यापासून वाचवलं. अबिमेलेच या प्रकाराने संतापला , पण ईश्वरानेच अब्राहमची ओळख 'प्रेषित ' अशी करून दिल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. अबिमेलेचने अब्राहमला झाल्या प्रकाराचा जाब विचारताच त्याने जिवाच्या भीतीपोटी आपण हे कृत्य करण्यास प्रवृत्त झाल्याची जबानी दिली. सारा आपल्या वडिलांचीचं परंतु वेगळ्या स्त्रीकडून झालेली मुलगी आहे, सबब ती त्या अर्थाने आपली सावत्र बहीणच आहे अशीही माहिती त्याने अबिमेलेचला दिली. शेवटी अबिमेलेचने साराला अब्राहमकडे सुपूर्द केलं आणि बरोबर नोकर आणि मेंढ्या, बैल वगैरे पशुधनसुद्धा दिलं.
या प्रांतात पाण्याचं दुर्भिक्ष्य होतंच. या अबिमेलेचच्या एका सरदाराचा - फिकॉलचा आणि अब्राहमचा परिसरातल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवरून तंटा सुरु झाला. फिलीस्तीनी सैनिकांनी त्या विहिरींवर कब्जा केला. शेवटी त्या विहिरी आपणच खोदलेल्या असल्याची माहिती अब्राहमने शपथेवर अबिमेलेच राजाला दिली आणि तसे पुरावे सादर केले. या विहिरींची मालकी शेवटी अबिमेलेचने अब्राहमच्या हातात देऊन तिथून निघून जाणं पसंत केलं. या सात विहिरींचा परिसर तेव्हापासून ' बीरशेबा ' म्हणून ओळखला जाऊ लागला. बीर म्हणजे हिब्रू भाषेत विहीर आणि शेबा म्हणजे मूळ हिब्रू भाषेतल्या सात आकड्याच्या 'शुवा' या संबोधनाचा अपभ्रंशित उच्चार. आजही त्यातल्या चार विहिरी त्या परिसरात बघायला मिळतात.
त्या वेळी आपल्याच एका बायकोला आपल्या मुलासकट त्या परिसरात आपल्याच हाताने आपण घालवून देऊ, अशी कल्पना अब्राहमने नक्कीच केलेली नसणार. परंतु नियतीने तसा प्रकार घडवून आणल्यावर हेगर आपल्या मुलाला घेऊन त्या प्रांतात वणवण भटकत राहिली. बरोबरच्या शिधेवर फारसे दिवस निघणं शक्य नव्हतंच…. अखेर खाण्यापिण्याचे जिन्नस आणि पाणी संपल्यामुळे हेगर आणि इश्माएल घायकुतीला आले. इश्माएलची अवस्था बिकट झाल्यावर हेगर त्या ओसाड वाळवंटात पाण्याच्या शोधार्थ भटकू लागली आणि आपल्या नशिबाला बोल लावत जिवाच्या आकांताने आक्रन्दू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने त्या परिसरात असलेले देवदूत तिच्या मदतीला आले आणि त्यांच्यापैकी एकाने आपल्या ईश्वरी सामर्थ्याने आपला एक पंख जमिनीवर आपटून जमिनीत पिण्याच्या पाण्याची एक विहीर निर्माण केली. इश्माएल आणि हेगरने आपली तहान भागवल्यावर त्या देवदूताने इश्माएलच्या भविष्याबद्दल एक महत्वाचं भाकीत केलं. प्रत्यक्ष प्रेषिताचा थेट वंशज असल्यामुळे इश्माएल पुढे जाऊन ईश्वराने तयार केलेल्या एका महान देशाचा सर्वेसर्वा होईल, हे ते भाकीत. इश्माएल या नावाचा अर्थसुद्धा ' ईश्वरापर्यंत पोचलेली प्रार्थना ' असा आहे.
ही विहीर म्हणजे आजच्या मुस्लिम धर्मियांच्या मक्का यात्रेदरम्यान ते ज्या पवित्र विहिरीचं पाणी प्रश्न करतात आणि बरोबर घेऊन येतात, ती 'झमझम' विहीर. आज या झमझम विहिरीचं जे स्थान आहे, त्या स्थानाबद्दल अनेक तज्ज्ञांचं दुमत आहे, कारण अब्राहमचं कनान प्रांतातलं वसतीस्थान, बीरशेबा प्रांत आणि आत्ताच्या मक्का शहरामधील अंतर बघता आधुनिक दळणवळणाच्या साधनांशिवाय हेगर आणि लहान इश्माएल इतकं मोठं अंतर कापून आले असतील हे तर्कसंगत वाटतं नाही. आजच्या अनेक अरब संशोधकांनी कुराणात उल्लेखलेल्या या स्थानांचा नव्याने परामर्श घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि कदाचित पुढे जाऊन या विषयावर नवं संशोधन इतिहासाची अनेक पानं नव्याने उलगडायला मदतही करू शकेल , पण आजच्या प्रचलित माहितीनुसार तरी त्या मायलेकांचा प्रवास रखरखत्या वाळवंटातून शेकडो मैल लांब आजच्या मक्केपर्यंत झाला, हेच मान्य करणं क्रमप्राप्त आहे.
हा इश्माएल पुढे आपल्या आईबरोबर परानच्या वाळवंटात आला आणि स्थिरस्थावर झाला. कुराणानुसार हे वाळवंट म्हणजे आजच्या सौदी अरेबियामधील हेजाझ प्रांत. याहीसंबंधी इतिहासकारांमध्ये मतमतांतरं आढळत असली, तरी इश्माएल जिथे वाढला, ती जागा रखरखीत वाळवंटी असल्यामुळे त्याच्या वाट्याला खडतर आयुष्य आलं, हे मात्र खरं. तो धनुर्विद्येत पारंगत होता असा उल्लेख कुराणात आहे. त्याच्या आईने त्याच्यासाठी एक इजिप्शिअन मुलगी वधू म्हणून पसंत केली. त्या दोघांना पुढे झालेली १२ मुलं म्हणजे इजिप्त ते असिरियन प्रांतातल्या १२ महत्वाच्या टोळ्यांचे प्रमुख. शिवाय त्यांना ' महालत ' आणि ' बासमथ ' नावाच्या दोन मुलीही होत्या , ज्यांच्यापैकी बासमथ ही आयझॅकच्या थोरल्या मुलाची - इसाऊची धर्मपत्नी होती असा उल्लेख कुराणात आढळतो. या इश्माएलच्या मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा कादर हा कुराईश कबिल्याचा प्रमुख होता , ज्या कबिल्यात पुढे प्रेषित मोहम्मदाचा जन्म झाला. अशा प्रकारे इश्माएलच्या शाखेपासून पुढे निर्माण झालेले वंशज हे आजचे प्रेषित मोहम्मदांनी निर्माण केलेल्या मुस्लिम धर्माचे अनुयायी आहेत , ज्याच्याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रकरणांमध्ये येणार आहे.
इथे सारा आपल्या मार्गातला काटा निघाल्यामुळे खुशीत होती. तिच्या मुलाला आता अब्राहमच्या एकमेव वंशजाचा मान मिळण्याचे सगळे मार्ग निर्धोक झालेले होते. आयझॅक - ज्याच्या नावाचा शब्दशः अर्थ होतो ' हसणारी व्यक्ती ' - ही धर्मग्रंथांप्रमाणे कनानच्या पवित्र भूमीबाहेर कधीही न गेलेली एकमेव व्यक्ती आहे. या आयझॅकला १८० वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं - इश्माएलपेक्षाही दीर्घ, कारण इश्माएल १३७ वर्ष जगला, असा धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे.
या आयझॅकला अब्राहमने तरुण वयात प्रवेश करताच मोरिया डोंगराच्या माथ्यावर नेलं. ईश्वराच्या पुढच्या आज्ञेनुसार आपल्या मुलाचं मार्गक्रमण व्हावं, या उद्देशाने अब्राहमने ईश्वराचा धाव केल्यावर त्याला ईश्वरानेच त्या जागी येण्याची आज्ञा केली होती. तीन दिवस प्रवास करून शेवटी आपल्या अनुयायांना पायथ्याशी थांबवून ठेवून बापलेक डोंगरमाथ्यावर गेले, तेव्हा ईश्वराने अब्राहमला आयझॅकचा बळी देण्याची आज्ञा केली. अब्राहमच्या मनात तेव्हा नक्की काय चलबिचल झाली असेल, कुणास ठाऊक, पण ज्या मुलासाठी इतका अट्टहास केलं त्याचा आपल्याला आपल्याच हाताने बळी द्यावा लागणार आहे हे ऐकून त्याच्या मनाला असंख्य वेदना नक्कीच झाल्या असणार ! ईश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्याने आयझॅकचा बळी देण्यासाठी आपल्या हातातला सुरा सरसावला, परंतु ईश्वराला ते दृश्य पाहून त्याची दया आली हे अब्राहमचं नशीब. आयझॅकच्या ऐवजी बाजूच्याच झुडपात अडकलेल्या मेंढ्यावर मग तो सरसावलेला सुरा फिरला आणि ईश्वराच्या मनासारखं झालं. अब्राहमच्या या आज्ञाधारकतेमुळे प्रसन्न होऊन ईश्वराने त्याला उत्तरोत्तर त्याच्या वंशजांची आणि अनुयायांची भरभराट होईल असा शुभाशीर्वादही दिला. या घटनेनंतर अब्राहमने आपल्या अनुयायांसह आणि कुटुंबासह बीरशेबा प्रांतात स्थलांतर केलं.
साराच्या मृतयूनंतर अब्राहमने तिचं हेब्रोन प्रांतातल्या ' केव्ह ऑफ द पॅट्रीआर्च ' नावाने ओळखल्या जाणार्या भागात दफन केलं. आजही हा भागवेस्ट बँक म्हणून ओळखल्या जाणार्या पॅलेस्टिनच्या एका प्रांताच्या दक्षिणेकडे सुस्थितीत आहे. अब्राहमने साराच्या मृत्यूनंतर आपल्या केतुरा नावाच्या गुलाम स्त्रीबरोबर तिसरं लग्न केलं. या केतुराबद्दल आज फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी तिने अब्राहमच्या आयुष्यात अजून सहा अपत्यांची भर घातली असं तोरा आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे. अनेकांच्या मते ही केतुरा म्हणजेच हेगर , परंतु या दाव्याला ठोस पुष्टी देणारी माहिती आजतरी उपलब्ध नाही. केतुराची झिमरन , जोकशान , मेदान , मीडिअन , ईशबक आणि शुआ ही सहा अपत्यं म्हणजे इस्राएलच्या दक्षिण आणि पूर्व भागातल्या सहा अरब टोळ्यांचे प्रमुख. ईश्वराने दिलेल्या वरदानाप्रमाणे अब्राहमच्या पुढच्या पिढीतल्या प्रत्येक वंशजाने एक एक करत आजूबाजूच्या विस्तीर्ण भूभागावर आपली राज्य प्रस्थापित केली आणि अशा पद्धतीने सध्याच्या लेव्हन्ट ते सौदी अरेबिया - इराण सीमेपर्यंतचा प्रदेश आता अब्राहमच्या वंशजांच्या अंमलाखाली आला.
आपल्या १७५ वर्षाच्या आयुष्यात अब्राहमने अशा प्रकारे या विस्तीर्ण भूभागाचा नकाशा पालटून टाकला. आजच्या ज्यू , ख्रिश्चन , मुस्लिम आणि बहाई धर्माच्या आद्यपुरुषाचा मान या अब्राहमकडे जातो. हे धर्मच मुळी आज ' अब्राहमीक धर्म ' म्हणून ओळखले जातात. या धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्येही 'अब्राहम-पूर्व ' आणि 'अब्राहमोत्तर ' असे ढोबळ कालखंड उल्लेखले जातात. हिब्रू लोक आणि ईश्वर यांच्यातल्या कोव्हीनंट बिटवीन द पीसेस ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कराराचा कर्ताधर्ता , या तिन्ही धर्मांमध्ये ' प्रेषित ' म्हणून मान्यता पावलेला आणि विखुरलेल्या टोळ्यांमध्ये विभागलेल्या अरबस्तानच्या विस्तीर्ण भूभागावर आपल्या अनुयायांचा आणि वंशजांचा एकछत्री अंमल प्रस्थापित करणारा इतिहासातला एक महत्वाचा पुराणपुरुष म्हणून या अब्राहमला मान आहे. त्याने केलेल्या स्थलांतराचा - उर, हरान ,दमास्कस, शेचेन , बेथेल, इजिप्त, पुन्हा बेथेल, हेब्रॉन, डॅन, होबा, सालेम, पुन्हा हेब्रॉन, जेरार, बीरशेबा, मोरिया, पुन्हा बीरशेबा आणि शेवटी हेब्रॉन असा हा प्रदीर्घ प्रवासमार्ग या तिन्ही धर्मांच्या अनुयायांसाठी आजही पवित्र मानला जातो. या मार्गावर आजही अनेक तीर्थयात्री आपल्या आद्यपुरुषाच्या खुणा शोधत तीर्थयात्रा करत असतात.
अब्राहमच्या मृतयूनंतर त्याच दफन आयझॅक आणि इश्माएल या दोन्ही मुलांच्या उपस्थितीत ' केव्ह ऑफ द पॅट्रीआर्च ' येथेच झालं. त्याच्या दफनाची जागा साराच्या बाजूला असावी, हेगरच्या नाही, आणि ते दफन होतं असताना इश्माएल तिथे असावा, हा एक हृदयस्पर्शी योगायोग इथे विशेष नमूद करण्यासारखा. हेगरचा मृत्यू झालेली जागा या ' केव्ह ऑफ द पॅट्रीआर्च ' पासून शेकडो मैल लांब मक्केच्या जवळ आहे, जी आज 'मस्जिद - एल - हराम ' म्हणून ओळखली जाते. इश्माएल आणि आयझॅक या दोघं भावंडांमध्ये हाडवैर असावं, असं दर्शवणारा एकही पुरावा आज उपलब्ध नसतानाही त्यांच्या वंशजांनी वेगळ्या धर्मांची चूल मांडून शतकानुशतकं एकमेकांशी उभा दावा मांडला हाही योगायोग इथे नमूद करण्यासारखा. काहीही असो, पण अब्राहमच्या मृत्यूमुळे अरबस्तानाला एकसंध करणारा आणि ईश्वराकडून आपल्या अनुयायांसाठी थेट आदेश घेऊन त्यांना वागण्या - बोलण्याचे नियम घालून देणारा एक महान पुराणपुरुष काळाच्या उदरात सामावला गेला, हे मात्र नक्की. अब्राहमचा काळ थेट ब्रॉन्झ युगाचा असल्याचं आज संशोधकांनी शोधून काढलेलं आहे, यावरून त्याच्या अरबस्तानच्या समाजजीवनावर पडलेल्या प्रदीर्घ प्रभावाचा अंदाज येऊ शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीनही भाग वाचले. हे वाचायला जरा बोअर वाटतंय. आधीच्या दोन मालिकांमध्ये थोडा थरार होता आणि पुढे काय होणार ह्याची उत्सुकता. ह्यात तसं काही वाटत नाहीये.

खूप कमी जणांना ही माहीती असते. इतक्या सान्गत्वार लिहिल्या बद्दल धन्यवाद.
आज च्या जगातल्या सगळ्यात मो ठ्या मुसिबत कि जड Happy असलेलि. कहाणि आहे ही.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. लवकर लीहा.

तीनही लेख वाचले. भारी इतिहास कथन आहे. यातलं काहीच माहित नव्हतं. हा लेख वाचल्यावर १७५ वर्षं, १३७ वर्षं, १८० वर्षं असं कुणाला आयुष्य लाभु शकतं का..?? हा एक प्रश्न मनात घर करुन बसलाय.

@DJ
महाभारतात उल्लेख आहे, त्यावरून भीष्माचार्य , श्रीकृष्ण अशा महापुरुषांचे वय सुद्धा युद्धाच्या वेळी आजच्या मानकांप्रमाने वृद्ध होतं....स्वामी समर्थ सहस्त्र वर्षांचे होते असं त्यांच्या बखरीत आलं आहे...एकंदरीत पुराणपुरुष आपल्यापेक्षा चांगलेच दीर्घायुषी होते हे नक्की!

सुमेरियन संस्कृतीच्या cuniforms वरच्या माहितीप्रमाणे एक एक सुमेरियन राजा काहीशे वर्ष राज्य करत होता....इजिप्तच्या फॅरो राजाचं वयसुद्धा दीड - दोनशे मानलं जातं. यावर संशोधन सुरू आहे पण अजून तरी या सगळ्या वयाच्या प्रकरणाचं खंडन करणारा पुरावा सापडला नाहीये.

छान आहे हा भाग हि !
पवित्र विहिरीचं पाणी प्रश्न करतात>>>इथे प्राशन हवं ना ?

137 व्या वर्षी मेला म्हणून ठिके
नैतर अजून किती मुले जन्माला घातली असती ईश्वर जाणे
अचाट कथा आहेत या
आपापल्या पुराणात असतात त्याच धर्तीच्या
तरी धृतराष्ट्र गांधारी चा 100 चा रेकॉर्ड मोडला असेल असं वाटत नाही यांनी
मुळात हा प्रेषित म्हणवायचा तरी कसा
जिवाच्या भीतीने एकदा नाही दोन वेळा बायकोला लोकांच्या हवाली करतो, गुलाम स्त्रियांशी संबंध ठेऊन मुले जन्माला घालतो आणि वर घालवून देतो
अगदीच अचाट

@ आशुचैंप
आपल्याकडेही कर्णाच्या जन्माची कथा आहे ना....लग्नापूर्वी झालेला मुलगा अनौरस असतो, जो कर्ण होता. फक्त तो सूर्य आणि कुंती यांचा पुत्र होता म्हणून त्याला थेट ' वेश्या पुत्र ' संबोधलं गेलं नाही.