अरबस्तानचा इतिहास - भाग ०२

Submitted by Theurbannomad on 17 February, 2021 - 11:50

पुन्हा स्थलांतर

उर कसदिम, हरान ,दमास्कस, शेचेन आणि बेथेल अशा हजारो मैलांच्या प्रदीर्घ प्रवासाच्या स्थलांतरानंतर अब्राहमच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण आले असले, तरी पुढे नियतीने आपल्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे, याची त्याला कल्पना नव्हती. ईश्वराच्या आज्ञेनुसार अनेक वर्षांच्या प्रवासानंतर कनानच्या प्रांतापर्यंत आलेला अब्राहम आणि त्याच्या अनुयायांचा काफिला स्थिरस्थावर होऊ लागला असताना अचानक कनान प्रांतात प्रचंड दुष्काळ पडला आणि ईश्वराने सुचवलेल्या या पवित्र भूमीमध्ये चार घास मिळणंसुद्धा कठीण होऊन बसलं. अखेर अब्राहम आणि त्याच्या अनुयायांनी कनान प्रांतातून एखाद्या अन्य प्रांतात पुन्हा एकदा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
अब्राहमच्या बायकोचं नाव होतं सारा. ही सारा अब्राहमबरोबर त्याच्या प्रवासात होती. कनान प्रांतांमधून काफिला पुन्हा एकदा नव्या प्रांताच्या शोधार्थ निघाला तो थेट इजिप्त येथे आला. इजिप्तच्या फॅरोहकडे त्या काळी प्रचंड संपत्ती , सैन्य आणि सत्ता एकवटलेली असल्यामुळे त्याच्या सैनिकांचा त्या प्रांतात चांगलाच दबदबा होता. सारा दिसायला अतिशय सुस्वरूप असल्यामुळे चुकून माकून फॅरोहला ती आवडून गेली, तर तिचा नवरा असल्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होईल या भीतीने अब्राहमने साराला त्यांचं खरं नातं लपवायची गळ घातली. त्यानुसार त्यांनी आपण एकमेकांचे भाऊ - बहीण आहोत, अशी बतावणी करून इजिप्तमध्ये प्रवेश केला। अर्थात साराच्या सौंदर्याची इतकी तारीफ सैनिकांनी फॅरोहकडे केली, की त्यालाही तिची भुरळ पडली। त्याने अब्राहमला योग्य ती ' किंमत ' देऊन साराला आपल्या प्रशस्त महालात आणलं.
ईश्वराला आपल्या अनुयायाने केलेल्या या हीन कृत्याचा राग आला आणि त्याने प्लेगच्या रोगाच्या रूपाने अब्राहमच्या घराला शाप दिला, अशी आख्यायिका आहे. या गोष्टीची कुणकुण लागताच फॅरोहला लागताच त्याने या सगळ्या प्रकारचा छडा लावला. एका ईश्वरी दृष्टांतामुळे त्याला खरी वस्तुस्थिती समजताच त्याला अब्राहमच्या खोटारडेपणाचा प्रचंड राग आला आणि त्याने अब्राहम, सारा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या कनानवासियांना आपल्या राज्यातून हाकलून दिलं. आता पुन्हा त्या सगळ्या कनानवासियांच्या नशिबात वणवण भटकायचे भोग आले. अब्राहम , त्याचा भाचा लॉट,सारा आणि त्याचे काही अनुयायी पुन्हा एकदा आपल्या मूळ कनान प्रांतातल्या बेथेल प्रांतात आले. एव्हाना तिथला दुष्काळ संपलेला असल्यामुळे त्यांनी बेथेलला आपलं बस्तान बसवलं. कितीही झालं, तरी या प्रांतात असलेल्या टोळ्या आणि अब्राहमचे अनुयायी यांच्या गायींना पुरेल इतकं मोठं कुरण तिथे उपलब्ध नव्हतं. लॉट आणि अब्राहम यांच्यात शेवटी एक सामंजस्यांचा करार झाला। लॉट आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर कनान प्रांतातून थेट जॉर्डनच्या झोर भागात आला आणि तिथल्या संपन्नतेमुळे त्याने तिथे स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्याने त्या प्रांतातल्या सोडोम भागात आपलं बस्तान बसवलं.
इथे अब्राहमने आपल्या अनुयायांसह बेथेलहून दक्षिणेकडच्या हेब्रोन प्रांताकडे प्रयाण केलं आणि तिथल्या मेमरे भागात वस्ती करायला सुरुवात केली. तिथे त्याने ईश्वराच्या उपासनेसाठी एक नवी वेदी बांधली. अनेक वर्षांनी त्याच्या आयुष्यात स्थैर्य येणार तोच पुढचं संकट त्याच्या समोर येऊन उभं ठाकलं.
जॉर्डन आणि सीरिया भागातल्या शक्तिशाली एलाम साम्राज्याचा सोडोम आणि गोमोरा शहराच्या लोकांशी झगडा सुरु झाला आणि बघता बघता त्यांच्यात युद्ध छेडलं गेलं. एलाम साम्राज्याच्या सैन्यापुढे त्या लहान शहरांच्या तुटपुंज्या सैन्याचा निभाव अर्थात लागला नाहीच. एलाम सैन्याच्या सैनिकांनी सोडोम शहराच्या पराभूत सैनिकांबरोबरच त्या शहराच्या बाहेरच्या भागात राहात असलेल्या लॉट आणि त्याच्या कुटुंबियांनाही बंदी बनवलं आणि सोबत नेलं. ओल्याबरोबर सुकं जळतं, त्याप्रमाणे काहीही संबंध नसूनही बिचारे लॉट कुटुंबीय एलाम साम्राज्याच्या तुरुंगात डांबले गेले.
ही खबर अब्राहमपर्यंत पोचताच त्याने त्याच्या ३१८ प्रशिक्षित अनुयायांना सोबत घेतलं आणि सोडोमच्या दिशेने कूच केलं. लढाईमुळे थकलं भागलेलं एलामचं सैन्य लुटीचा माल आणि बंदीवान लोकांना घेऊन परतीच्या वाटेवर चाललेलं होतं. अब्राहमने आपल्या छोट्याशा सैन्याच्या अनेक तुकड्या करून रात्रीच्या वेळी बेसावध एलामसैन्याचा फडशा पाडला. एलामच्या राजाला - चेडोरलाओमेरला - त्यांनी होबा येथे गाठून कंठस्नान घातलं. अखेर सोडोमचा राजा अब्राहमच्या पराक्रमामुळे भारावून जाऊन शावी खोऱ्यात त्याला सामोरा गेला। बाजूच्या सालेम ( सध्याचं जेरुसलेम ) प्रांताचा राजा मेलचीझेंडेक हाही अब्राहमच्या स्वागताला आला. अब्राहमला त्या समस्त प्रांतात आता चांगलाच मान मिळू लागला.
असं म्हणतात, की या घटनेनंतर प्रत्यक्ष ईश्वर आणि अब्राहम यांच्यात झालेल्या करारानुसार अब्राहमला ईश्वराने भविष्यात त्याच्या आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात घडणार असलेल्या अनेक गोष्टींचे संकेत दिले. याच करारामध्ये ईश्वराने इस्रायलच्या पवित्र भूमीवर अब्राहमचे वंशज राज्य करतील, अशी भविष्यवाणी वर्तविली होती. हिब्रू बायबलमध्ये जेनेसिस १५ १ - १५ प्रकरणात या कराराची गोष्ट अतिशय सुरसपणे वर्णन केलेली आहे , ज्याचा थोडक्यात सारांश असा - ईश्वर म्हणजेच यहोवा देवता प्रत्यक्ष अब्राहमला दर्शन देतो . त्या दिवसाची सुरुवात अब्राहमच्या ईश्वराबरोबर झालेल्या संवादाने होते, ज्यात अब्राहम आपल्याला मूलबाळ नसल्याची कैफियत यहोवासमोर मांडतो. यहोवा भविष्यात अब्राहमला मूळ होईल असा दिलासा देतो आणि अब्राहमला प्राण्यांचा बळी देण्याची आज्ञा फर्मावतो. आज्ञेनुसार अब्राहम काही प्राण्यांच्या शरीरांचे दोन भाग करून यहोवाची इच्छा पूर्ण करतो. एव्हाना दिवस मावळतीला आलेला असल्यामुळे दमलेला अब्राहम निद्राधीन होतो आणि त्याच्या गाढ झोपेत त्याला दृष्टांत देऊन काही भविष्यात घडणाऱ्या घटना सांगतो.
अब्राहमच्या पुढच्या पिढ्या चारशे वर्ष कनानच्या भूमीपासून लांब कोणत्यातरी ' अनोळखी प्रदेशात ' तिथल्या राजाची चाकरी करतील, पण या चारशे वर्षांमध्ये जमवलेल्या पुण्याईचा जोरावर पुन्हा एकदा कनानच्या पवित्र भूमीवर येतील आणि राज्य करतील, अशी महत्वाची भविष्यवाणी या दृष्टांताद्वारे अब्राहमला समजते. ही पवित्र भूमी म्हणजे केनाईट , केनिझाइट , कडमोनाइट , हित्ताईट , पेरिझाइट , राफाईम , अमोमाइट , कानानाईट , जिरगासाईट आणि जेबुसाईट हा विस्तीर्ण प्रांत. इजिप्तच्या नाईलपासून ते थेट युफ्रेटीसच्या नदीपर्यंत पसरलेला. अशा विस्तीर्ण प्रांतावर अब्राहमचे वंशज आपला एकछत्री अंमल बसवतील, हे यहोवाचं भविष्य आजही ज्यू लोकांसाठी आपल्या पवित्र इस्राएलच्या भूमीवर असलेल्या आत्यंतिक श्रद्धा आणि प्रेमाचा पाया आहे . याच भूभागाचा उल्लेख आजही ज्यू लोक ' वचन दिलेली पवित्र इस्रायलची जमीन ' असा करतात. ही सगळी भूमी म्हणजे आजच्या मुख्यत्वे इस्राएल आणि पॅलेस्टिन देशांच्या अखत्यारीत येणारा भाग.
अशा पद्धतीने अखेर अब्राहमच्या आणि त्याच्या अनुयायांच्या आयुष्यात अखेर स्थैर्य आलं. परंतु आता अब्राहमच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही घडामोडी घडणार होत्या, की त्यातून या सगळ्या प्रांताचा इतिहास - भूगोल पूर्णपणे बदलून जाणार होता. यहोवा देवतेने भविष्यवाणी केल्याप्रमाणे अब्राहमच्या वंशाला ज्या पालव्या फुटणार होत्या, त्या पालव्यांचे पुढे जाऊन प्रचंड तालवृक्ष होणार होते आणि ते पुढे जाऊन सतत एकमेकांशी जीवघेणा संघर्ष करत राहणार होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users