अरबस्तानचा इतिहास - भाग ०१

Submitted by Theurbannomad on 17 February, 2021 - 07:26

मूळपुरुष ते आद्यपुरुष

ऍडम आणि ईव्ह. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन महत्वाच्या धर्मांच्या धर्मग्रंथांमध्ये उल्लेख असणारे समस्त मनुष्य प्रजातीचे जन्मदाते. स्वर्गामध्ये सुखाने राहणाऱ्या या आदीपुरुष आणि स्त्रीला स्वर्गातल्या दिव्य फळबागेतल्या 'चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दलची माहिती ' - अर्थात 'बुद्धी आणि शहाणपण ' प्रदान करणाऱ्या झाडाची फळं सोडल्यास इतर कोणत्याही झाडाची फळं खाण्यास परवानगी होती. एका सर्पाच्या धूर्त शब्दांवर विश्वास ठेवून त्या दोघांकडून त्या झाडाचं फळ खाल्लं गेलं आणि त्यांचं अमरत्व त्यांच्याकडून ईश्वराने काढून घेतलं, जेणेकरून पृथ्वीवर ( एका अर्थाने मृत्युलोकात ) या ऍडम आणि ईव्हची रवानगी झाली अशी आख्यायिका बायबलमध्ये ( बुक ऑफ जेनेसिस आणि बुक ऑफ इझिकेल ) आढळते.
या ऍडम आणि ईव्हची पुढची पिढी म्हणजे केन आणि अबेल नावाची दोन मुलं. बायबलमध्ये उल्लेखिलेल्या आख्यायिकेप्रमाणे रूढार्थाने 'जन्म' घेतलेला पहिला मनुष्य म्हणजे 'केन' आणि ' मृत्यू ' पावलेला पहिला मनुष्य म्हणजे 'अबेल'. आख्यायिकेनुसार हा केन पृथ्वीवरचा तिसरा मनुष्यप्राणी आणि त्याचा भाऊ अबेल हा चौथा. काही हिब्रू दंतकथांमध्ये केन हा ईव्ह आणि सैतानाचा पुत्र होता , ऍडमचा नाही असाही उल्लेख आहे . थोडक्यात काय, तर फळ खाऊन आलेल्या शहाणपणातून ईव्हने थेट बाहेरख्यालीपणा केला अशा मतितार्थाची ही कथा ज्यू धर्मीयांमध्ये प्रचलित आहे . त्या कथांनुसार केन हा अर्धा मर्त्य आणि अर्धा दैवी असा काहीतरी विलक्षण मनुष्य होता असा अर्थ निघतो.
काहीही असो , पण हा केन ज्यू धर्मियांच्या ' तोरा ' आणि ख्रिस्ती धर्मियांच्या ' बायबल ' या दोन्ही आद्य ग्रंथांप्रमाणे महत्वाचा ठरतो तो एका वेगळ्याच कारणासाठी .स्वतःच्या पाठोपाठ जन्मलेल्या अबेल या आपल्या सक्ख्या भावाला ठार करण्याच्या कृत्यामुळे हा केन त्या अर्थाने पृथ्वीतलावरचा आद्य गुन्हेगार ठरतो . यहोवा देवतेला - या देवतेचा उल्लेख थेट लोहयुगामध्ये आहे - प्रसन्न करून घ्यायच्या उद्देशाने केनने दिलेली आहुती त्याला फळली नाही हे मात्र नक्की कारण यहोवा देवतेने त्याला ' तू आयुष्यभर भटकत राहशील ' अशा अर्थाचा शाप दिला . ही घटना घडली त्या एडन शहराच्या पूर्व दिशेला असलेल्या नोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात हा केन आला आणि तिथे त्याने आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांचं शहर वसवलं . केनच्या मुलाच्या - इनॉकच्या नावाने ओळखलं जाणार हे शहर म्हणजे मनुष्याने वसवलेलं पहिलं शहर .
ऍडम आणि इव्ह यांचा तिसरा मुलगा - सेथ - हा अबेलच्या खुनानंतर जन्माला आल्यामुळे इव्हला तो ईश्वराने दिलेल्या आशिर्वादासारखा होता. हा सेथ खऱ्या अर्थाने ऍडम आणि इव्हचा औरस पुत्र आणि वारसदार असल्यामुळे आपल्या वडिलांकडून त्याला अनेक गूढ ईश्वरी माहितीचं ज्ञान मिळालं होतं , असा उल्लेख हिब्रू कथांमध्ये आढळतो. या सेथच्या सातव्या पिढीचा वारसदार असलेला लामेच म्हणजेच पृथ्वीवर आलेल्या महापुरातून निवडक प्राणिमात्रांना आणि मनुष्यजातीला तारणाऱ्या नोआचा पिता.
हा लामेच ' एकपत्नीत्वाच्या' प्रथेला छेद देणारा पहिला मनुष्य. त्याच्या दोन बायकांपैकी - अदाह आणि झिल्लाह यांच्यापैकी - नक्की कोणाचा नोआ हा मुलगा होता याबद्दल माहिती आजतरी उपलब्ध नाही. परंतु बायबलप्रमाणे आजच्या प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या आद्य पूर्वज असलेला नोआ त्याच्या महाप्रचंड जहाजातून निवडक प्राण्यांची आणि मनुष्यांची कशा प्रकारे जलप्रलयातून सुटका करतो, याचं वर्णन तोरामध्ये आणि बायबलमध्ये अतिशय विस्ताराने आलेलं आहे. ईश्वराला पृथ्वीवर मनुष्यांच्या बेबंद वागणुकीने माजलेल्या बजबजपुरीचा राग येऊन त्याने महाप्रलय घडवून आणला अशी ती गोष्ट आहे. ईश्वराच्या संकेतांवर आणि सूचनांवर विश्वास ठेवून एकट्या नोआने एक प्रचंड आकाराचं जहाज बांधलं , त्यात प्रलयापूर्वी अनेक पशुपक्ष्याच्या जोड्या आणि आपलं कुटुंब सुरक्षित केलं आणि प्रलय ओसरल्यानंतर त्या सगळ्यांनी पृथ्वीवर नवं जग निर्माण केलं , ज्यामुळे हा नोआ 'प्रलयपूर्व' काळातला दहावा आणि शेवटचा पुराणपुरुष मानला जातो. त्याने ईश्वराकडून पुन्हा कधीही तशा प्रकारचा प्रलय नं घडवून आणण्याचं वचन घेतल्याचेही उल्लेख असल्यामुळे त्याचे या पृथ्वीवर अनंत उपकार झालेले असले, तरी पुढे त्याच्याच अतिरिक्त मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे ज्याला बायबलच्या ' बुक ऑफ जेनेसिस ' मध्ये ' हामला दिलेला शाप ' अशा अर्थाने संबोधलं गेलेलं आहे , ती घटना त्याच्या वाट्याला आली.
त्याच्या तीन मुलांपैकी ( बायबलप्रमाणे या तीन मुलांची नावं शेम , हाम आणि जफेथ ) हाम या मुलाच्या नावावरून तो शाप ओळखला जातो. आपल्या पित्याला निर्वस्त्र अवस्थेत बघितल्याचा गुन्ह्यामुळे त्याला पित्याकडून म्हणजे खुद्द नोआकडून मिळालेला हा शाप म्हणजे गुलामगिरीच्या प्रथेची सुरुवात असा अनेक तज्ज्ञांचा कयास आहे. हामच्या पिढ्या - ज्यांना हिब्रू ग्रंथांमध्ये कनान प्रांताचे रहिवासी म्हणून उल्लेखलं जातं - या शेमच्या पिढ्यांचे - ज्यांना इस्राईल प्रांताचे रहिवासी म्हणून उल्लेखलं जातं - पिढ्यानुपिढ्या नोकर होऊन राहतील अशा प्रकारचा हा शाप अजूनही अनेक इतिहासतज्ञांच्या मते अर्थाचा अनर्थ केला गेलेला इतिहासातला एक नकोसा अध्याय आहे. या शापाबद्दल ज्ञात असलेल्या माहितीमध्ये असलेला त्रोटकपणा आजही अनेकांना या घटनेवर अधिक संशोधन करण्यास खुणावतो.
काहीही झालं, तरी या घटनेमुळे पुढे घडलेल्या घडामोडी आजच्या अरबस्तानच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरल्या. कनानचे लोक म्हणजे आजच्या भूमध्य समुद्रकिनाऱ्याच्या लेव्हन्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रांताच्या दक्षिणेकडच्या भागातले मूळ रहिवासी. या लोकांपैकी काहींनी एकेश्वरवाद स्वीकारून आपला वेगळा गट निर्माण केला. आज जो भाग जेरुसलेम , जॉर्डन , पॅलेस्टिन अशा देशांमध्ये विभागला गेला आहे त्या भागात हे लोक राहू लागले. या लोकांना ' इस्रायली ' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. काही तज्ज्ञांच्या मते कनानचे लोक आणि त्या प्रांतातले इतर हिब्रू बदाऊनी लोक यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला वंश म्हणजे हे ' इस्रायली '. या लोकांमध्ये पहिल्यांदा एकेश्वरवाद रुजला आणि वाढला, असा एक मतप्रवाह इतिहासतज्ञांमध्ये आहे.
शेमच्या पुढच्या पिढ्यांमधल्या आठव्या पिढीचा मुख्य पुरुष म्हणजे तेरा. अब्राहम, नाहोर आणि हरान नावाची तीन मुलं हा त्याचा वंशविस्तार. त्यानेच उर कसदिम या आपल्या वस्तीच्या स्थानातून कनान येथे स्थलांतर केलं. हे ' उर कसदिम ' म्हणजे ' तेल अल मुकाय्यर ' नावाचं आजच्या इराक देशाच्या दक्षिणेला नासिरीया शहराजवळ असलेलं ठिकाण. १८६२ साली हेन्री रॉलिन्सन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने शोधून काढलेलं हे ठिकाण आजही बायबलच्या अभ्यासकांना खुणावत असतं.
बायबलमध्ये उल्लेख आल्याप्रमाणे ईश्वराने तेराला कनानच्या पवित्र भूमीत जायचा आदेश दिला होता यामागचं कारण आहे ' एकेश्वरवाद '. उर कसदिमच्या भागात ५०० हून अधिक देवदेवतांची उपासना होत असल्यामुळे अशा भूमीमध्ये एकाच ईश्वराची उपासना करणाऱ्या तेराला , त्याच्या कुटुंबियांना आणि अर्थातच पुढील वंशजांना सुयोग्य वातावरण मिळणं शक्य नाही, सबब त्यांनी कनानच्या पवित्र भूमीकडे प्रयाण करावं अशा अर्थाचा खुद्द ईश्वराचा आदेश शिरोधार्य मानून हा प्रवास सुरु झाला होता. उर कसदिम हे शहर बॅबिलोनियन राजा हम्मुराबीने स्थापन केलेल्या राज्याचा एक भाग होतं. हम्मुराबीच्या राज्याचे लिखित स्वरूपातले ठोस कायदेकानू याही शहरात लागू होते. शहराची संरचना अतिशय बांधेसूद होती. मनोरे, महाल, ऐसपैस रस्ते, त्या रस्त्यांच्या दुतर्फ़ा बांधलेली दुमजली घरं , कालव्यांच्या द्वारे अरबी समुद्राला जोडणारा सागरी दळणवळणाचा मार्ग अशा संपन्न आणि सुखी शहरातून कनान येथे जाण्यामागे ईश्वरी आदेश असला तरी हे दिव्य नक्की तेराने का स्वीकारलं, असा प्रश्न पडल्याशिवाय नक्कीच राहवत नाही.
दुर्दैवाने तेरा कनान येथे पोचायच्या आतच हरान या ठिकाणी स्वर्गवासी झाला. हे हरान आजच्या तुर्की देशाच्या उरफा गावाच्या जवळ आहे. त्या काळात आधुनिक दळणवळणाच्या साधनांच्या अभावी जवळजवळ ६०० मैलांचा हा प्रवास दमवणारा असला तरी हा प्रवासाचा मार्ग निसर्गसंपन्न आणि सधन प्रांतातून झालेला असल्यामुळे तेराला आणि त्याच्या कुटुंबियांना खाण्यापिण्याची आबाळ नक्कीच झाली नसावी. या मार्गात येणारे महत्वाचे अडथळे म्हणजे रोगराई आणि ' ईद्या ' नावाने ओळखली जाणारी बारीक वाळूच्या कणांची वादळं. तेराच्या प्रवासात या अडथळ्यांचा त्याला फारसा उपद्रव झाला नसावा कारण त्याच्या कुटुंबीयांपैकी कोणीही या दीर्घ प्रवासात ईश्वराच्या भेटीस गेलं नाही. उर कसदिम ते बाबिलोन, बाबिलोन ते अशुर, निमृद मार्गे अशुर ते निनेवे, त्यानंतर गॉझन आणि शेवटी हरान असा हा प्रवास अनेक महिन्यांचा होता. हि सगळी ठिकाणं आजच्या इराक आणि तुर्की या देशांमध्ये आहेत आणि आजही या मार्गाला तीर्थयात्रेच्या दर्जा आहे.
तेराने उर कसदिम सोडायच्या आधीच त्याचा मुलगा हरान अकाली आपल्या पित्याच्या डोळ्यांसमोर गेला असल्यामुळे प्रवासात त्याच्याबरोबर अब्राहम आणि नाहोर हि त्याची दोनच मुलं होती. अनेक अभ्यासकांच्या मते हरानच्या स्मृतीवरूनच तेराने ज्या गावात आपलं बस्तान बसवलं, त्या गावच नाव ' हरान ' पडलं. या गावात पित्याच्या मृत्यूनंतर अब्राहमने वयाची पंच्याहत्तरी गाठेपर्यंत वास्तव्य केलं असा उल्लेख जुन्या ग्रंथांमध्ये आढळतो. आख्यायिकेनुसार २०५ वर्षे वय असलेल्या तेराने हरान गावी प्राण सोडल्यावर कुटुंबीयांनी त्याचे अंत्यसंस्कार केल्यानंतर पावसाळा संपताच नववर्षाच्या शुभमुहूर्तावर ईश्वराने अब्राहमला कनान येथे प्रयाण करण्याचा आदेश दिला. त्यानेही लगोलग आपल्या कुटुंबकबिल्याला आपल्यासोबत हरान गाव सोडून कनानकडे जाण्यास भाग पाडलं.
अब्राहमचा आणि त्याच्या कुटुंबाचा हा प्रवास आता पश्चिम दिशेला आजच्या सीरिया देशात असलेल्या जेराबलूस शहराच्या जवळ वसलेल्या कर्चेमिश नावाच्या गावामार्गे सुरु झाला. हे गाव हरानपासून ५० मैलांवर आहे. या गावापासून पुढचा प्रवास म्हणजे अब्राहमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांपैकी एक मानला जाणारा बेक्का खोऱ्यातील प्रवास. आजच्या जॉर्डन देशात असलेला हा प्रांत अतिशय सुपीक आणि संपन्न होता. आज सिरिया आणि इस्राईलच्या सततच्या लढायांमुळे हैराण झालेल्या या प्रांतात अब्राहमच्या काफिल्याने त्या काळी केलेला प्रवास मात्र अतिशय सुखकारक होता। या खोऱ्यातून पुढे अलेप्पो शहरात अब्राहमचा काफिला पोचला. तेथे आपल्या गायींना मनसोक्त चरू दिल्यावर काही दिवसांनी काफिल्याने कादेशमार्गे दमास्कस गाठलं. तेव्हाच्या काळी सुद्धा व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचं शहर मानलं जाणारं दमास्कस त्या प्रांतातलं एक धनाढ्य शहर म्हणून नाव राखून होतं. दमास्कस या शहराच्या नावाचा शब्दशः अर्थ जरी ' पखालीभर रक्त ' असा हिंस्त्र असला, तरी हे शहर व्यापारी, योद्धे, धनाढ्य दुकानदार आणि प्रवाशांनी भरलेलं होतं. या शहरात अब्राहमच्या काफिल्याची चांगली खातिरदारी झाली.
अब्राहमचा काफिला दमास्कसला बराच काळ थांबला. पावसाळ्याचा मोसम सरताच त्यांनी अखेर त्या शहराचा निरोप घेऊन कनानच्या दिशेने प्रयाण केलं. मार्गात होता आजच्या सीरिया आणि लेबनॉन देशांच्या सीमेवरचा आणि इस्राईलने सहा दिवसांच्या युद्धात कायमचा काबीज केलेला गोलान टेकड्यांचा भाग. या बसाल्ट खडकांच्या पठाराच्या दक्षिणेकडे यार्मुक नदी , पश्चिमेकडे हुला खोरं आणि गॅलिलीचा समुद्र , उत्तरेकडे हरमन पर्वत आणि पूर्वेला रक्कड वादी आहे. आजचा सामरिक युद्धाच्या दृष्टीने अतिशय मोक्याचा असलेला हा प्रदेश तेव्हाच्या काळी मात्र निसर्गरम्य खुष्कीचा मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. जॉर्डन नदीला वळसा घालून अखेर बेथ - शान नावाच्या तटबंदीच्या शहरात हा काफिला आला. सरतेशेवटी यार्मुक नदी आणि जॉर्डन नदी जिथे एकत्र येते, त्या संगमाच्या ठिकाणी येताच अनेक वर्षांच्या अब्राहमच्या त्या प्रवासाची सांगता झाली.
समोर नदीच्या पल्याड त्याच्या ईश्वराने त्याला ज्या भूमीमध्ये पाठवलेलं होतं , ती भूमी त्याच्या दृष्टीक्षेपात आलेली होती. आजच्या इस्राएल देशाच्या सीमा म्हणजे जवळ जवळ पूर्वीच्या कनान प्रांताच्या सीमा. ५० मैल रुंद आणि १२० मैल लांब अशा चिंचोळ्या आकाराच्या त्या प्रांतात जेव्हा अब्राहम आणि त्याच्या काफिल्याने पाऊल ठेवलं असेल, तेव्हाच्या त्यांच्या मनस्थितीची नुसती कल्पना करूनही संवेदनशील मनाच्या लोकांच्या अंगावर काटा येईल ! त्या वेळी अब्राहमला कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल, की आपल्याच पुढच्या पिढ्यांमधून या कनान प्रांताच्या भूमीमध्ये तीन महत्वाचे धर्म जन्माला येणार आहेत, ज्यांच्यात वर्षानुवर्षे चालणाऱ्या लढायांमुळे पुढच्या अनेक पिढ्यांचा इतिहास रक्तरंजित होणार आहे !
बायबल आणि तोरा या अनुक्रमे ख्रिस्ती आणि ज्यू धर्मियांच्या आद्य धर्मग्रंथात उल्लेखलेली ऍडम आणि इव्ह यांच्यापासून सुरु होणारी मनुष्यजातीची कहाणी अशा पद्धतीने अब्राहम या पुराणपुरुषांपर्यंत येऊन थांबते. कानांच्या भूमीत ज्या जागी अब्राहमने सर्वप्रथम बस्तान बसवलं , त्या जागी म्हणजे शेचेम येथे अब्राहमने आणि त्याच्या अनुयायांनी दगडांनी एक वेदी बांधून काढली. ज्यू धर्मियांच्या या आद्य पवित्र स्थानी आजही अनेक ज्यू लोक आपल्या आद्यपुरुषाच्या खुणा शोधायला येत असतात. शेचेम गावापासून अब्राहमच्या काफिल्याने दक्षिण दिशेला आपला प्रवास सुरूच ठेवला आणि अखेर बेथेल या ठिकाणी एका टेकडीजवळ त्यांनी अखेर आपला प्रवास थांबवला. बेथेल येथे त्यांनी ईश्वराच्या उपासनेसाठी दुसरी वेदी बांधून काढली. ही जागासुद्धा आजच्या इस्राएलमध्ये ज्यू धर्मियांची अतिशय महत्वाची जागा म्हणून ओळखली जाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहिलंय..! माहितीपुर्ण लेख..! पुधील भागांच्या प्रतिक्षेत.

असंच मानवाच्या उत्पत्तीबद्दलचं लिखाण हिंदु / बौद्ध / जैन धर्मातील ग्रंथात असेल तर जाणकारांनी जरुर लिहावे जेणे करून एकमेकांशी काही दुवा सापडतो का ते कळेल.

मानवाची सुरुवात कशी झाली या दंतकथा हे ओल्ड टेस्टामेंटमध्ये आहे. केम्ब्रिज + ओक्सफर्ड पंडितांनी मूळ हिब्रू भाषेतल्या ग्रंथाचे पद्यमय गद्य इंग्रजी रुपांतर केलेलं मी वाचलं आहे. आता ते बाइबल ( ओल्ड आणि न्यु टेस्टामेंट) माझ्याकडे नाही. त्यात या सर्व कथा आहेत. इंग्रजी भाषेत आलेले बरेच वाकप्रचार, उपमा यांचा उगम या बाइबलमध्येच सापडतो.

अर्थात त्यास चमत्काराची जोड अधिक आणि इतिहास कमी आहे. कारण सर्व मानव जात एकाच कुटुंबापासून वाढणे अशक्य आहे. साताठ पिढ्यांत आंतरविवाह केल्यास काय होते हे इजिप्तच्या फराहोंचे उदाहरण आहेच. दुबळी संतती निपजते. म्हणजे कुठेतरी आणखी वेगळ्या वंशाचे आदम आणि इव असण्याची गरज आहे. ते असणारच. पण हे आदम आणि इव प्रातिनिधिक धरता येतील.

तुम्हाला कुणाला ते जाडजूड बायबल मिळाल्यास अवश्य वाचा. पांढरा शुभ्र पातळ कुरकुरीत कागद वापरल्याने हलके पण टिकावू आहे.

या इतिहासाचे लेख देण्याबद्दल लेखकाचे अनेक आभार.

@srd
मी ते बायबल वाचलं आहे.
इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, कुराण प्रथमतः लिखित स्वरूपात प्रेषित मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर शंभरेक वर्षांनी लिहिलं गेलं. बायबल सम्राट काँस्टंटाईन याने जे बायबल लिहून काढलं तेच आज सगळ्यात जुनं बायबल म्हणून ज्ञात आहे, त्याआधी लिहिली गेलेली बायबल नष्ट झाली होती अथवा केली गेली होती. Dead sea scrolls सापडल्यानंतर बायबलवर अनेक प्रश्नचिन्ह उत्पन्न झाली होतीच...

मुद्दा हा की या सगळ्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास सुरू आहे आणि त्यातून वेगवेगळे निष्कर्ष निघत आहेत, पण जोवर ते सर्वमान्य होत नाहीत तोवर ते आहेत तसे वाचण्यातच शहाणपणा आहे.

धर्मग्रंथ म्हणजे मानवाच्या सुखदु:खाच्या शोधाच्या रंजक कथा असं वाटू लागतं.
मुद्दा हा की या सगळ्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास सुरू आहे आणि त्यातून वेगवेगळे निष्कर्ष निघत आहेत, पण जोवर ते सर्वमान्य होत नाहीत तोवर ते आहेत तसे वाचण्यातच शहाणपणा आहे.
सर्वमान्य म्हणजे सत्य हेच आहे असं लादलं जाणे किंवा हेच बरोबर म्हणून नाइलाजाने मान्य करणे. विज्ञान एकेक गोष्ट उलगडून सांगते की बाबारे तुझी मर्यादा एवढीच आणि का.

@ srd
धर्माला जेव्हा अतिरेकी अभिमानाची आणि आंधळ्या अनुकरणाची जोड मिळते तेव्हा सारासार विवेक नाहीसा होतो. नवीन शोध लागले तरी ते सर्वमान्य होणं आवश्यक असतं, अन्यथा त्या शोधावरून भावना दुखायचे प्रकार होतात.

छान विषय आहे. पण नावांचे उच्चार नीट बघून घ्या. माझ्या ऐकण्यात अबेल असा उच्चार नसून एबल असा आहे.

नावात काये? मुलीचे नावे इवा असते. मुसलमान लोक हव्वा ठेवतात. कारण त्यांच्या मते आदम और हव्वा की पहली जोडी थी।
अब्राहाम, इब्राहिम दोन्ही प्रचलित आहे.

मानव जात म्हणजे आपण आदम व इव्ह पासून झालो कि मनू पासून ? तिकडे चिन्यां ची वेगळीच उपपत्ती असणार ! तिथे आपण कुठल्या तरी चँग आन चिन्गी पासून निर्माण झालेलो असणार . छ्या एवढी प्रगती होउनही आपला नक्की मूळ पुरुष आणि स्त्री काही समजत नाही बोवा !
एनी वे , लेख उत्तम आहे आणि मेहनतीने लिहिला आहे. आता मूळ कथाच भम्पक आणि काल्पनिक असल्याने लेखक काय करणार . पुढे खर्‍या व्यक्ति येतील तेव्हा जरा लिन्क लागेल....

चांग ली सुरुवात. मी सध्या सायमन कि सिमॉन सेबाग माँटेफिओरे ह्यांनी लिहिलेल्या जेरुसलेम ह्या पुस्तकाची पारायणे करते. ऑडिओ बुक आहे. शहर कसे वसले पासून सद्यकाळा परेन्त इतिहास लिहिला आहे. त्यात ह्या सर्वाचा उल्लेख आहे.

त्या आधी सायमन बे कर ह्यांनी लिहिले ल्या एन्शंट रोम ह्या ची पारायणे केली. ह्यात टायबेरिअस ने उध्वस्त केलेल्या ज्युइश मंदिराची कथा फारच मनाला चटका लावून गेली. व जोसिफस चे वाचणे, इतर कट्टर ज्यु लोकांनी मसाडा फोर्ट मध्ये आत केलेल्या सामुदायिक आत्महत्या. एकूणच ज्यु लोकांन बद्दल इतका द्वे श का निर्माण झाला असे वाटून वाटून कसे तरी होते.

ह्या सर्वाचा उगम अर्थात राइज अँड फोल ऑफ थर्ड राइक मधून झाला. ज्यू लोकांचा समूळ नायनाट करणॅ त्यांची धर्मस्थाने उध्वस्त करणे हे पार बीसी ई पासून नेबुकद न्देझर पासून होत आले आहे. ते का असा प्रश्न पडतो. होलोकास्ट शब्दाचा अर्थ एक प्राणी संपूर्ण पणे धूर होउ न वर जाणे असा भयानक आहे.

रोमन साम्राज्य व जेरुसलेम मधील मानवी कृरते बद्दल वाचल्यावर गेम ऑफ थ्रोन एकदम लेम वाटते. ह्या मालिकेत हे सर्व पुढे येइलच.
एकूण ही भूमी फारच ऐतिहासिक व पुरा तत्व विषयक महत्वाची आहे.

ते मंदिर सर्वनाश करणे ह्या घटनेचा ज्युइश बाजूने व रोमन बाजूने दोन्ही पुस्तकांत विचार केला आहे. व टायबेरिअस चे युद्ध, होली ऑफ द होली मंदिर ह्यावर उत्तम व्हिडिओ उपलब्ध आहे त युट्युब वर.

खूप दिवस शीर्षक वाचत होते. पण मुहूर्त नव्हता लागला.
उत्तम विषय. छान लिहीले आहे. पण खूप मोठा घास झाला माझ्यासारखीच्या साठी. समजून घ्यायला वेळ लागला.

@रानभुली

धन्यवाद! हा विषय आहेच खूप किचकट, मलाच १५-१६ वर्ष लागली हा इतिहास समजून घ्यायला