मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग २० - अन्तिम

Submitted by Theurbannomad on 15 February, 2021 - 10:25

२ ऑगस्ट २००८ चा दिवस.
सीरियाच्या तार्तास बंदराच्या उत्तरेकडच्या रीमाल अल झहाबिया येथे एल आलिशान बंगल्यामध्ये अनेक महत्वाचे लोक एकत्र जमले होते. हा बंगला थेट समुद्रकिनाऱ्यावर बांधलेला होता. बंगल्याच्या समोरच्या व्हरांड्यातून किनारा आणि त्यापुढे अथांग पसरलेला भूमध्य समुद्र दिसत होता. हा बंगला होता जनरल मोहम्मद सुलेमान याचा. हा राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांचा उजवा हात. त्यांचा लष्करी सल्लागार. याचा लौकिक असा, की सीरियातील असाद यांच्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा असलेला हा माणूस थेट राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या एका आलिशान कार्यालयातून काम करायचा. अणुभट्टीच्या उभारणीच्या कामात याने मोलाची कामगिरी बजावली होती.
वास्तविक हा मोहम्मद सुलेमान दमास्कस महाविद्यालयात शिकत असताना तत्काळीं राष्ट्राध्यक्ष हाफेझ अल असाद यांच्या मोठ्या मुलाच्या - बसाल अल असाद याच्या खास मर्जीतला म्हणून प्रसिद्ध होता....पण पुढे १९९४ साली या बसालचा अपघातात मृत्यू झाल्यावर आणि पुढे २००० साली हाफेझ अल असाद कर्करोगाने अल्लाच्या घरी गेल्यानंतर याने धाकट्या बशरशी सलगी वाढवली. पुढे पुढे बशर यांचा आपल्या या मित्रावरचा विश्वास इतका वाढला, की सगळ्या महत्वाच्या निर्णयात त्याचं मत घेणं गरजेचं मानलं जाऊ लागलं. याला सीरियाने जगापुढे फारसं येऊ दिलं नव्हतं, कारण याने पडद्याआडून अनेक ' धुरंधर ' लोकांशी संधान बांधलं होतं. यांच्यापैकी एक म्हणजे हिझबुल्ला या कुख्यात अतिरेकी संघटनेचा लष्करी म्होरक्या असलेला इमाद मुघनिये. या अभद्र युतीतून अनेक व्यवहार जन्माला आले होते. इराणच्या आणि सीरियाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना हिझबुल्ला संघटनेचा पत्ता याच्याच कृपेने मिळाला होता. याचं क्षेपणास्त्रांमुळे २००६ सालच्या लेबनॉन युद्धात इस्राएलला बरंच नुकसान सहन करावं लागलेलं होतं. शिवाय या सुलेमानने सीरियामध्ये क्षेपणास्त्र तयार करण्याचे कारखानेही सुरु केले होते. त्याशिवाय जैव-अस्त्र आणि रासायनिक अस्त्र तयार करण्याच्या कामालाही त्याने चांगलंच प्राधान्य दिलं होतं.
अशा ' महान ' लौकिकामुळे इस्राएलच्या नजरेत हा सुलेमान अनेक वर्षांपासून आलेला होताच...आता अणुप्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचा शोध अमेरिकाही घ्यायला लागली. हा सुलेमान इतका भारी , की त्याने पुन्हा एकदा नव्याने अणुभट्टी तयार करण्याचा घाट घातला. कोरियाच्या आणि इराणच्या आपल्या ' सुहृदांबरोबर ' त्याने तशी बोलणीही सुरु केली. याची कुणकुण इस्राएलला लागली होती का कुणास ठाऊक, पण इस्राएलने याला संपवायचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. हाच ऑपरेशन आउटसाइड द बॉक्सचा शेवटचा अध्याय.
सुलेमान वास्तविक हवापालट व्हावा म्हणून आपल्या आलिशान बंगल्यात काही खास निवडक मित्रांबरोबर आला होता. एका मोठ्या टेबलावर हे सगळे जण आरामात खातपीत बसले होते. गप्पा मारता मारता सुलेमान समोर समुद्राकडे बघत मौजमजेत गुंगून गेला होता. त्यासाच्या डोळ्यांसमोरच्या त्या लाटांमध्ये नक्की काय चाललेलं आहे, याची त्याला यत्किंचितही कल्पना नव्हती... किनाऱ्यापासून साधारण दोनशे यार्ड अंतरावर समुद्रात त्या लाटांमध्ये दोन आकृत्या अतिशय धीम्या गतीने बंगल्याकडे सरकत होत्या. या आकृत्या होत्या इस्राएलच्या नौदलाच्या घटक तुकडीच्या दोन कमांडोंच्या. सीरिया - इस्राएलच्या समुद्री सीमेवर त्यांनी समुद्रात उडी घेतली होती आणि पाण्याखालून पोहोत पोहोत ते सुलेमानच्या या खास बंगल्याच्या समोरच्या समुद्रापर्यंत पोचले होते.
त्यांनी किनाऱ्याच्या एका आडोशाच्या भागात आपापल्या जागा घेतल्या आणि सायलेन्सर लावलेल्या दूर पल्ल्याच्या खास बंदुका जमिनीवर स्थिर रोवल्या. बंदुकांवर लावलेल्या दुर्बिणीतून त्यांनी समोरच्या बंगल्यात जमलेल्या लोकांवर एक नजर टाकली. त्या घोळक्याच्या मधोमध बसलेला सुलेमान त्यांना दिसला. त्यांनी लक्ष्यावर बंदुकांचा रोख स्थिर केला आणि श्वास रोखून बंदुकीच्या चापावर बोट ठेवलं.
काही वेळाने आजूबाजूचे लोक पुरेसे विखुरलेले दिसल्यावर त्यांनी लक्ष्याचा अचूक भेद केला. अचानक टेबलवर बसलेल्या सुलेमान यांच्या डोक्यात एक गोळी आरपार गेली आणि त्यांचं डोकं टेबलावर कोसळलं. त्यातून वाहायला लागलेलं रक्त बघून मग पळापळ झाली. काहींनी टेबलाखाली आडोसा घेतला आणि काही बंगल्याच्या आत पळाले. काहींनी भिंतीच्या मागे लपत बंदुका काढून बाहेर डोकावायला सुरुवात केली. समोरच्या समुद्रकिनाऱ्यावर अथवा समुद्राच्या आत काहीही दिसत नव्हतं. इस्राएलचे दोघे कमांडो बंदुका पाठीवर लावून पाण्यात शिरले होते. पाण्याखालून पुन्हा एकदा त्यांनी इस्राईलच्या समुद्री सीमेकडे जायला सुरुवात केली. काही तासांमध्ये ते दोघे जण आपल्या देशाच्या हद्दीत आपल्या नौदलाच्या जहाजावर पोचलेही होते....कामगिरी फत्ते झालेली होती.
हा घाव सीरियाच्या वर्मी लागला होता. राष्ट्राध्यक्ष असाद तर या बातमीने मुळापासून हादरले....इतक्या महत्वाच्या माणसावर दमास्कसपासून १५० मैलांवरच्या एका जागी असा सुनियोजित हल्ला होतो आणि त्या हल्लेखोरांचा मागमूसही कोणाला लागत नाही हे त्यांच्यासाठी भीतीदायक होतं. इस्राएलने त्यांच्या मनात अशी जरब निर्माण केली होती, की यापुढे सीरियामध्ये कोणताही गुप्त प्रकल्प सुरु करताना त्यांना हजार वेळा विचार करावा लागणार होता. मोसाद आणि इस्राईलच्या लष्करी हेरखात्याने एकत्रितपणे याही मोहिमेत महत्वाची कामगिरी बजावली होती....ती कामगिरी म्हणजे बरोब्बर कोणत्या दिवशी मोहम्मद सुलेमान त्याच्या बंगल्यात येणार आहे, ती तारीख. त्यांच्या या कामगिरीमुळेच सुलेमानचा काळ कोणत्या वेळी येईल हे ठरलं होतं.....
तेल अवीव येथे या कामगिरीनंतर अभिमानाने ओल्मर्ट यांनी आपल्या शिलेदारांची पाठ थोपटली होती...या कामगिरीसाठी वापरलेल्या फ्लोटीला-१३ या बोटीला नेव्हीकडून महत्वाचे सन्मान दिले गेले. ही इस्रायलची खास पद्धत जगाला योग्य तो संदेश द्यायची. या कृतीतून अनेक गोष्टींचा उलगडा जाणत्या लोकांना झाला आणि मोसाद आपल्या पुढच्या कामगिरीसाठी सज्ज झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच उत्कंठावर्धक आणि रोचक लेखमाला ! लिखाणाची शैली फार सुंदर आणि ओघवती आहे , लेख मालिकेचे भाग नियमित आणि लवकर पोस्ट केल्यामुळे वाचनात सातत्य राहिले आणि उत्कंठा कायम राहिली. सिरियावरील हल्ल्याचे वर्णन वाचताना भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांची प्रकर्षाने आठवण आली . इस्राईल अतिशय लहान देश असून सुद्धा , त्यांची गुप्तहेर संघटना आणि राजकारण्यांची एकी यामुळे आपला दबदबा राखून आहे. खरेच खूप काही शिकण्यासारखे आहे या देशाकडून.
इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार !
पुढील लेखमालिकेच्या प्रतीक्षेत !

ज ब र द स्त !!
मोसाद बद्दल इतर ठिकाणी वाचले होते. पण हा सिरीया चा किस्सा माझ्या साठी नवीन आहे.
अतिशय खिळवून ठेवणारी मालिका! २० भाग आले तरी ' अंतिम' वाचून वाईट वाटले Happy

मोसाद बद्दल इतर ठिकाणी वाचले होते. पण हा सिरीया चा किस्सा माझ्या साठी नवीन आहे.>>>> +१

पण छान झाली लेखमालिका.

सध्या तुमच्या लेखमाला रात्री वाचत असल्याने प्रतिसाद द्यायचा कंटाळा करते. पण ही मालिका खूप सुरेख झाली. 'अंतिम' वाचून वाईट वाटलं. जमलं तर ह्या विषयावरच्या पुस्तकं आणि डॉक्युमेंटरीजची सूची दिलीत तर बर्‍याच वाचकांना उपयोग होईल असं सुचवावंसं वाटतं. ह्या मालिकेसाठी मनापासून आभार

खूप detail लिखाण झालं आहे खूप सुंदर, इंडिया च्या RAW टीम ने पण खूप ऑपरेशन्स केले असतील, त्या बद्दल काही माहित असेल तर please लिहा

खूप detail लिखाण झालं आहे खूप सुंदर, इंडिया च्या RAW टीम ने पण खूप ऑपरेशन्स केले असतील, त्या बद्दल काही माहित असेल तर please लिहा

@ सियोना
सुभाषचंद्र बोस आणि मोसाद यांचा काहीही संबंध नाही.

छान झाली लेखमालिका
झपाट्याने वाचून काढले सगळे भाग Happy
खूपच रोचक आहे
मोसाद विषयी आणखी वाचायला आवडेल